अजूनकाही
Lord Meghnad Desai यांच्या ‘Nehru's Hero - Dilip Kumar in the life of India’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘नेहरूंचा नायक दिलीपकुमार : आविष्कार भारतीयत्वाचा’ या नावाने दीपक देवधर यांनी केला आहे. लाटकर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला देसाई यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
नेहरू युगातील भारतीय चित्रपट हा या पुस्तकाचा विषय आहे. हे पुस्तक म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा देण्याचा एक प्रयत्नसुद्धा आहे. त्या काळात मी सुरुवातीला बडोदा आणि नंतर बॉम्बेमध्ये (त्या काळी हाच शब्द रूढ होता आणि माझ्या डोक्यात तोच शब्द घट्ट बसलेला आहे.) लहानाचा मोठा झालो. आमच्या जीवनात चित्रपटांना फार मोठे स्थान होते. आम्ही ते पहायचो, इतकेच नाही तर एकच चित्रपट अनेक वेळाही पाहायचो, त्यांच्याविषयी मित्रांबरोबर चर्चा करायचो. त्यातील गाणी तोंडपाठ करायचो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती गायचो, आणि फिल्मी मासिके चवीने वाचायचो. या सर्वांतून आमची मते बनायची, म्हणजे मुलांची मुलींविषयी आणि मुलींची मुलांविषयी. यातूनच आदर्श नायक आणि भारत याविषयीच्या संकल्पना दृढ झाल्या. याव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा प्रभाव नक्कीच होता, परंतु चित्रपटांनी आमचे मनोरंजन करता करता आमच्या जीवनाला आकार दिला.
या युगात दिलीपकुमार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्याने आमचे जीवन भारून टाकले होते. आम्ही त्याचे कपडे, केसांचा भांग, लकबी आणि संवाद या सगळ्याचे अनुकरण करत असू, परंतु त्याहीपेक्षा अधिक म्हणजे त्याच्या भूमिकांमधून रेखाटले जाणारे आदर्श आमच्या मनात खोलवर रुजत होते. हे पुस्तक त्या भूमिका आणि आमच्या जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडला, याविषयी आहे. हे दिलीपकुमारचे चरित्र नाही आणि तो स्टार होण्यापूर्वीची वर्षे सोडून त्याच्या खाजगी जीवनाबद्दल मी इथे काहीही सांगत नाही. आपल्याला जर गॉसिप आणि कुचाळक्यांमध्ये रस असला, तर ते दुसरीकडे शोधा. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचा विषय त्याचे सार्वजिनक जीवन हा आहे, कारण १९६४साली नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतरच्या ४० वर्षांत भारत कसा घडत गेला, त्याचे प्रतिबिंब त्यातून दिसून येते.
हे पुस्तक लिहिण्यामागील संकल्पना माझ्या डोक्यात कित्येक वर्षे घोळत होती, परंतु तिला मूर्त स्वरूप मिळाले ते एका संध्याकाळी दिलीप पाडगावकर या माझ्या मित्राबरोबर इंडिया इंटरनॅशनल सेंटर, दिल्लीच्या बारमध्ये बसलो असताना. दिलीपकुमार आणि नेहरूंच्या वर्षांतील भारत याविषयीची आमची दोघांची मते किती एकसारखी आहेत, असे आमच्या बोलण्यातून आमच्या लक्षात आले. त्यातून असा विचार बाहेर आला की, सामान्यत: राजकारणाच्या चष्म्यातून चित्रपटाकडे पाहिले जाते, तर आपण याच्या उलटे म्हणजे चित्रपटाच्या चष्म्यातून राजकारणाकडे पाहिले, तर कसे दिसेल?
ही जवळपास दहा वर्षांपूर्वीची घटना आहे. हळूहळू या उपक्रमाला आकार येऊ लागला. १९९७ साली कुमार शहानी यांनी अतिशय प्रेमाने युसुफ साहेबांबरोबर माझी एक बैठक घडवून आणली आणि तेव्हा त्यांनी मला भरपूर वेळ दिला. प्रश्नोत्तरांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चित्रपटातील काही दृश्ये, संवाद आणि गाणी असलेले एक इंटरअॅक्टिव्ह मल्टिमीडिया पुस्तक सादर करायचे, अशी माझी मूळ संकल्पना होती. परंतु आमच्या वेळा काही जुळून आल्या नाहीत. शेवटी मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली.
या पुस्तकात स्मृतींना उजाळा देणे आणि समाजशास्त्राचा अभ्यास हे दोन्ही समप्रमाणात आहे. चित्रपटांचे रसग्रहण करणे किंवा त्यांच्यावर टीका करणे, यासाठी मी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही आणि चित्रपटाच्या तंत्राशीही मी फारसा परिचित नाही. त्यामुळे दोन्ही दृष्टींनी हे पुस्तक म्हणजे एक हौशी प्रयत्न आहे. यातून दिलीपकुमारवरील माझे प्रेम आणि व्यावसायिक ज्ञानाची कमतरता, हे दोन्ही दिसून येईल. तरीही मला आशा आहे की, विविध क्षेत्रांतील लोकांना हे वाचण्यात रुची असेल.
त्या काळातल्या माझ्या गंभीर प्रकृतीच्या अनेक मित्रांच्या मताविरुद्ध मला हिंदी चित्रपट, ते जसे होते तसे आवडत असत - ते पाहण्यात मजा वाटत असे, करमणूक होत असे. मी कलात्मक चित्रपटही पाहायचो आणि उच्चभ्रू टीकाकार त्यांच्या चित्रपटांना नावे ठेवत असत, तेही वाचायचो, परंतु माझे मन धंदेवाईक चित्रपटातच रमायचे. चित्रपट गोष्टी सांगण्यासाठी असतात, मग ते भले दृक्-श्राव्य माध्यमातून असेल, असा साधा दृष्टीकोन मी या पुस्तकात ठेवला आहे.
प्रेक्षक या चित्रपटांचे ज्या प्रकारे स्वागत करत असत, त्याचाही माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे एखादा चित्रपट पडला किंवा जोरात चालला, याविषयी मी बऱ्याचदा काही मत मांडले आहे. मला वाटते की, प्रेक्षक किंवा जनता स्वीकार-अस्वीकाराच्या कौलाकरवी चित्रपटांना घडवते. लोकशाहीवर आधारित राजकारण असो किंवा चित्रपट असोत, लोक काय म्हणतात, ते ऐकणे हेच चांगले असते. हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात हिट चित्रपट बनवणे सोपे असे. चांगली गाणी असलेला एक सुसह्य चित्रपट मस्त चालायचा. चांगला चित्रपट असूनही तो फ्लॉप होणे फारच क्वचित असे. लोकप्रिय कलाकारांमध्ये आम्हाला स्वत:चे दर्शन होत असे आणि आम्ही जे पाहत असू ते आम्हाला आवडत असे. दिलीपकुमारची लोकप्रियता हा एक सच्चा सांस्कृतिक प्रवाह होता आणि या पुस्तकातून मी त्याचे मूळ शोधायचा प्रयत्न केला आहे.
.............................................................................................................................................
‘नेहरूंचा नायक दिलीपकुमार : आविष्कार भारतीयत्वाचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5174/Nehruncha-Nayak-Dilip-Kumar
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment