अजूनकाही
छत्रपती शिवाजी महाराज, शहिद भगतसिंग हे जसे भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहेत, तसेच स्वामी विवेकानंददेखील भारतीय युवकांचे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. म्हणूनच देशभरात १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस ‘युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षा असते. पण आपल्या देशात नेहमीच महामानवांच्या विचारांपेक्षा त्यांच्या मूर्तीपूजनातच धन्यता मानली जाते. शिवाय काही स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी महामानवांच्या विचारांचा विकृत पद्धतीने प्रसार करून, आपल्या सोयीचा विचारच पोचवण्याचे काम केल्याने, बरेचसे महामानव काही ठराविक लोक, समाजाकडून ‘हायजॅक’ झाल्याचे चित्र दिसून येते. दुर्दैवाने विवेकानंदांच्या बाबतीतही हेच आढळून येते.
स्वामी विवेकानंद म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर भगवी कफनी परिधान केलेल्या व्यक्तीची छबी येते. विवेकानंद म्हटले की, ज्वलंत हिंदुत्वाचे प्रेरणास्थान, भारतातच नव्हे, तर जगभरात भारतीय संस्कृती, अध्यात्म पोचवणारा अवलिया अशी विभूषणे लावून त्यांना गौरवले जाते. गेल्या तीन-चार वर्षांपासून काही संस्था-संघटनांनी विशेष अभियान राबवत स्वत:च्या सोयीसाठी विवेकानंदांचा केवळ आध्यात्मिक चेहराच समाजासमोर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. खरंच विवेकानंद केवळ एक आध्यात्मिक पुरूष होते? त्यांनी केवळ मठांची स्थापना करून धर्मप्रसाराचेच कार्य केले का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना विवेकानंद हे केवळ अध्यात्म आणि धर्मप्रसारक नव्हते, तर शोषणमुक्त समाजासाठी झटणारे, समाजवादी विचारांचा पुरस्कार करणारे एक द्रष्टे समाजसुधारक होते असे आढळेल.
१२ जानेवारी १८६३ साली जन्माला आलेल्या स्वामी विवेकानंदांचे जीवन उलगडून दाखवणारे अनेक चरित्रग्रंथ उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या ‘शोध खऱ्या विवेकानंदाचा’ या पुस्तकात विवेकानंदांच्या विचारांची मांडणी करून त्यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. या पुस्तकांबरोबरच स्वामी विवेकानंदांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, सहकाऱ्यांना लिहिलेली पत्रे अभ्यासली तर त्यांचे नेमके विचार काय होते, याचा उलगडा होण्यास मदत होते.
१ नोव्हेंबर १८९६ रोजी मेरी हिल्स यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद स्पष्टपणे म्हणतात, “मी समाजवादी आहे. समाजवाद ही परिपूर्ण व्यवस्था आहे, असे मी म्हणत नाही. पण ही व्यवस्था समाजातील प्रत्येकाची दोनवेळच्या जेवणाची हमी देते व म्हणून ही व्यवस्था मला मान्य आहे.”
रशियात १९१७ साली समाजवादी राष्ट्राची उभारणी झाली. त्याअगोदरच २१ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद समाजवादी विचारांचा पुरस्कार करत होते, हे ध्यानात घ्यायला हवे. याच वेळी त्यांनी असाही विचार वर्तवला होता की, रशियामध्ये प्रथम कष्टकऱ्यांची सत्ता येईल आणि त्यानंतर चीनमध्ये येईल. समाजवादाची लाट कोणालाही रोखता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. त्याच वेळी साम्यवादी व्यवस्थेतील उणिवा शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.
सुमारे २१ वर्षांपूर्वीच समाजवादी राष्ट्राचे भविष्य वर्तवण्याचे ज्ञान हे विवेकानंदांना काही आध्यात्मिक तपसाधनेतून मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण राष्ट्रातील, जगातील घडमोडींचा, समाजजीवनाचा सखोलतेने अभ्यास केला होता. विवेकानंदांनी जेव्हा आपल्या कार्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी ज्या देशात आपल्याला कार्य करायचे आहे तो देश स्वत:च्या डोळ्यांनी पाहून, समजावून घेण्याचे ठरवले.
त्यानुसार भारतात सुमारे १३ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी येथील समाजव्यवस्था, रूढी-परंपरा, जात-धर्मव्यवस्थेचा अभ्यास केला. जमीनदार वर्गाची श्रीमंती आणि दलितांच्या दारिद्रयाचाही त्यांनी आपल्या प्रवासात अनुभव घेतला. यातूनच त्यांनी आपल्या कार्याची दिशा ठरवली. समाजातील मागे पडलेल्या समूहाच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय या ज्ञानी महापुरुषाने केला.
पण मग ते भगव्या कफनीकडे आणि मठांकडे कसे वळले, असा प्रश्न अनेकांना पडेल. त्याचा संदर्भ विवेकानंदांचे बंधू महेंद्रनाथ यांनी नोंदवला आहे. एके दिवशी विवेकानंद आपल्या विचारात गढून गेले होते. सोबत महेंद्रनाथही होते. अचानक भानावर येऊन विवेकानंद म्हणाले, ‘मी सेंट पॉलचा विचार करत होतो. त्याने ख्रिस्ताची शिकवण आत्मसात केली आणि प्रचंड विरोधाला न जुमानता त्या शिकवणीचा प्रसार केला. तो हे करू शकला कारण तो धर्माचे वेड पांघरलेला ज्ञानी पुरुष होता. मीसुद्धा धर्माचे वेड पांघरलेला माणूस आहे आणि मला कार्यकर्त्यांचा गट उभारायचा आहे.’ या प्रसंगावरून विवेकानंदांच्या भगव्या कफनीचे रहस्य उलगडण्यास मदत होते.
धर्माबद्दल विवेकानंदांनी परखड मते नोंदवली आहेत, हेदेखील विसरता कामा नये. ते म्हणतात, ‘धर्मवेड हा मेंदूला झालेला रोग आहे. ज्यामुळे समाजाची फार मोठी हानी झाली आहे.’ ५ मे १८९७ रोजी कोलकत्याहून आपल्या शिष्या ओली बुल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘आता माझी खात्री झाली आहे की, लोक ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात तो घृणास्पद गोष्टींनी भरलेला आहे.’ ते म्हणत, ‘जो धर्म विधवांचे अश्रू पुसत नाही, अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही, त्या धर्मावर आणि त्या देवावर माझा विश्वास नाही. मग त्या धर्मातील तत्त्वे कितीही सुंदर असोत.’
स्वामी विवेकानंदांचे हे विचार पाहिले की, त्यांचा प्रतीक म्हणून वापर करणाऱ्या हिंदुत्ववादी प्रवृत्तींचे पितळ उघडे पडते. विवेकानंदांचे बंधू महेंद्रनाथ यांनी नोंदवलेल्या प्रसंगानुसार विवेकानंद हे धर्माचे वेड पांघरलेले ज्ञानी पुरुष होते. समाजातील उच्चनिचता, वर्गविषमता दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक धर्माचा आणि भगव्या कफनीचा मार्ग स्वीकारला. समग परिवर्तनाचा विचार डोळ्यांसामेर ठेवूनच त्यांनी मठांची निर्मिती केली. पण अवघे ३९ वर्षांचे (मृत्यू ४ जुलै १९०२) आयुष्य लाभलेल्या या ज्ञानी महामानवाचे शोषणमुक्त समाजाचे ध्येय्य अपुरेच राहिले. त्यांचे हे ध्येय्य पूर्ण करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या प्रतीकाचा आपल्या सोयीने उपयोग करू पाहणाऱ्या प्रवृत्त्तींपासून विवेकानंदांची सुटका करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.
लेखक प्रसारमाध्यम व जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत.
sushillad1@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment