अजूनकाही
दिल्लीत मुस्लीम समुदायावर धर्मांध शक्तींनी जो हल्ला केलेला आहे, ती जणू काही एखादी दंगल आहे आणि ही दंगल कुणी घडवून आणली, त्यास जबाबदार कोण, असा मानभावी आव देशातील तमाम प्रसारमाध्यमांतून आणला जात आहे. त्याबाबतच्या चर्चा विविध टीव्ही वाहिन्यांवर चालू आहेत. वर्तमानपत्रांतील लेखही तसेच आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना सोयीस्कर असलेली मिठाची गुळणी धरली असली तरी त्यांचे गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष ट्रम्प यांच्या दौर्याच्या वेळेस या घटना कशा काय घडल्या, याबद्दलच्या शंका उपस्थित केल्या आहेत.
यामागे विरोधकांचे जणू काही मोठे षडयंत्र आहे, असा आव त्यांनी आणला आहे. एका संघटनेने तर जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालिद याने ट्रम्प यांच्या दौर्याला केलेल्या विरोधाच्या भाषणाची क्लिप प्रसारित करून जणू काही या हल्ल्यामागे तोच असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या साऱ्या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. हा हल्ला पूर्वनियोजितपणे कोणी व कसा केला आहे, याची सर्व बित्तंबातमी त्यांना आहे, इतकेच नव्हे तर त्यात त्यांचा दुरान्वयाने का असेना पण संबंधही आहे.
देशभरात सीएए, एनआरसी व एनपीआरविरुद्ध शांततेने व सनदशीर मार्गाने चालू असलेल्या आंदोलनावर दहशत बसावी आणि हे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी, हे कायदे करणाऱ्या भाजपची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांनी नियोजनपूर्वक हा हल्ला केलेला आहे. या घटनेला दंगल म्हणता येणार नाही. कारण त्यात दोन्ही समुदायाच्या लोकांनी तुल्यबळ अशी भागीदारी केलेली नाही. मुस्लीम समाजाची सुरुवातीपासून बचावात्मक परिस्थिती होती. पण स्वसंरक्षणासाठी त्यांनी या हल्ल्याचा प्रतिकार केला असणारच.
अशा रीतीने आक्रमक व बचावात्मक पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ४९ लोक ठार झाले असून २००च्यावर लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात ठार झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जसजसे दिवस जात आहेत, तसतशी काही प्रेते पोलिसांच्या हाती लागत आहेत. अनेक लोक अजून बेपत्ता असून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत हा आकडा ५०-६०च्या वर जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत १३०० लोकांना अटक केली असून ३६९ लोकांवर खटले दाखल केले आहेत.
या संपूर्ण हल्ल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलीस जामिया मिलिया विद्यापीठापासून जेएनयुपर्यंत कसे पक्षपातीपणाने वागले याबद्दलची सविस्तर माहिती बऱ्याच जणांना आहे. दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण तथाकथित दंगलीस जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी दोन एसआयटी गटांची स्थापना केली आहे. पोलिसांची या हल्ल्यातील भूमिका लक्षात घेता, हे एसआयटी गट कशा रीतीने कार्यवाही करतील, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
हल्ला सुरू झाला त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात ‘बिझी’ होते, परंतु जेव्हा त्या महत्कार्यातून मोकळे झाले तेव्हाही याबाबत त्यांनी प्रतिबंधात्मक असे काहीही केले नाही. ज्यांच्यावर या हल्ल्याची जबाबदारी येते ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ट्रम्प यांना ‘नमस्ते’ करण्यात मग्न होते. ‘रोम जळत होते तेव्हा, सम्राट निरो बासरी वाजवत होता’ हे ऐतिहासिक सत्य बहुतेकांना माहीत आहे. परंतु ज्यांनी सम्राट निरोचे चरित्र वाचले आहे, त्यांना रोम जाळण्यात निरोचा हात होता, हेही माहीत असते. आपल्या राजधानीचा एक भाग जळत असताना, उगीचच कोण कशाला बासरी वाजवत बसेल!
केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी दिल्लीत बैठक आयोजित करून या हल्ल्याचा आढावा घेतला. त्या बैठकीतील त्यांचा चेहरा पाहता, त्यांना कोणत्याही प्रकारचे दु:ख झाल्याचे दिसले नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना ‘योग्य त्या सूचना दिल्याचे’ सांगण्यात आले, परंतु पुढेही दोन-तीन दिवस हल्ले सतत चालूच होते. या हल्ल्यात काही पोलीस सक्रियपणे सहभागी होते, उरलेले निष्क्रिय होते. यावरून त्यांनी कोणत्या सूचना दिल्या असतील, याची आपण कल्पना करू शकतो.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या हल्ल्यास गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली केली. त्याचा विरोध करण्यासाठी भाजपचे एक पुढारी व केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यातही त्यांचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता. जणू काही त्यांना जे काही पाहिजे होते ते काम झाले, असा त्यांचा अविर्भाव होता. झालेल्या घटनेबद्दलचे दुःख वा चिंता या त्यांच्याही चेहऱ्यावर अजिबात दिसून आली नाही.
याचे साधे कारण असे आहे की, असा हल्ला करणार असल्याची धमकी आप पक्षाचे माजी आमदार व भाजपचे दिल्ली येथील पुढारी कपील मिश्रा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष आंदोलनकर्त्यांना दिली होती. पण अजूनही त्या कपील मिश्रांना अटक झालेली नाही. उलट आता तर त्यांना पोलिसांतर्फे ‘वाय’ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सरकारी वकील तुषार मेहता यांच्यावतीने तशी अटक करण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही, असे न्यायालयात सांगण्यात आले आणि विद्यमान न्यायालयानेही ते मान्य केले आहे.
एस. मुरलीधरन या माननीय न्यायाधीशांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्यांची रात्रीतून तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आलेल्या न्यायाधीशांनी याबाबत एप्रिल महिन्यातील तारीख दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतची प्रकरणे सुनावणीस घेण्यासाठी विलंब होत आहे. आमच्यावरही दबाव असून दंगलीच्या घटना घडण्यापूर्वी आम्ही प्रतिबंधात्मक असे काही करू शकत नाही, अशी हतबलता माननीय सर्वोच्च न्यायालयानेही व्यक्त केली आहे. किंबहुना अटक केल्यानंतरही अशा दंगली होऊ शकतात, याबाबत त्यांनी मुंबई दंगलीचे उदाहरण दिले. यावरून दिल्लीतील संपूर्ण पोलीस यंत्रणा, प्रशासन व न्याययंत्रणा पूर्णपणे पक्षपाती पद्धतीने वागत असल्याचे लक्षात येत आहे.
याउलट आप पक्षाचे विद्यमान आमदार ताहीर हुसेन यांनी त्यांच्या घरातून दंगेखोरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे, संरक्षणासाठी पोलिसांना अनेक फोन कॉल केले असल्याचे, पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांना सुरक्षित स्थळी हलवले याचे अनेक पुरावे उपलब्ध असतानाही, त्यांनीच ही दंगल भडकवली आहे, असा एफआयआर त्यांच्यावर नोंदवला आहे. त्यांच्या अटकेचा मार्ग आता सुकर झालेला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
या संपूर्ण हल्ल्यात जवळ-जवळ निष्क्रिय राहिलेला आप पक्ष याबाबत लगेच सक्रिय झाला. या पक्षाने आमदार ताहीर हुसेन यांना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले आणि इतरांपेक्षा दुप्पट शिक्षा आमच्यातील सहभागी लोकांना द्यावी, असे आवाहन केले आहे. या हल्ल्याशी काहीही संबंध नसलेल्या कॉम्रेड कन्हैया कुमार याच्यावरील प्रलंबित असलेल्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यास केजरीवाल यांनी केंद्र सरकारला परवानगी दिली आहे. याप्रमाणे त्यांनी आपली भाजपशी असलेली जवळीकता दाखवून दिलेली आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असल्याचा भारतीय जनतेला झालेला आनंद त्यांनी फार काळ टिकू दिलेला नाही.
कोणतेही युद्ध वाईटच असते. पण याचा अर्थ या युद्धात सामील असलेले दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार असतात असे नाही. एक पक्ष आक्रमक असतो, तर दुसऱ्याला नाईलाजास्तव स्वतःचे संरक्षण करावे लागते. म्हणून तो संरक्षक पद्धतीने युद्धात सामील असतो. त्यामुळे त्या दोघांनाही सारखेच दोषी धरता येत नाही. दिल्लीतील हल्ल्यात आंदोलक संरक्षक भूमिकेत आहेत. त्यांना स्वतःचे संरक्षण करणे भाग आहे. सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांविरोधात मुस्लीम समुदाय आघाडीवर असला तरी हिंदूंसह दलित, आदिवासी, शीख व इतरही समाज त्यात सामील आहेत, हे आतापर्यंतच्या आंदोलनावरून सिद्ध झाले आहे. पण या संपूर्ण आंदोलनाला हिंदू विरुद्ध मुस्लीम असा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. दिल्ली हे त्याचे पहिले उदाहरण आहे.
२०१४ साली सत्तेत आल्यानंतर भाजपने देशभर मुस्लिम, दलित व इतरही काही अल्पसंख्याकांविरोधात धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या विरोधात गोवंश हत्याबंदीसारखे कायदे केले. त्या निमित्ताने मॉब लिंचिंगच्या माध्यमांतून त्यांच्या हत्या घडवून आणल्या. हत्या करणाऱ्यांचे सत्कारही केले. तरीही या अल्पसंख्याक समुदायाने आतापर्यंत संरक्षक भूमिकाच घेतली आहे. दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनाचे निमित्त करून, त्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडवून आणणे, ‘देश के गद्दारो को- गोली मारो...’ अशा चिथावणीखोर घोषणा देणे, भारत-पाकिस्तानच्या मॅचची तुलना करणे, पाकिस्तानात पाठवून देण्याचे वेळोवेळी वक्तव्य देणे, इत्यादी सर्व बाबींवरून धर्मांध पक्ष आक्रमक आहे, हेच सिद्ध होते. त्यामुळे दिल्ली येथील या हल्ल्याला सर्वस्वी तोच जबाबदार आहे, असे म्हणता येईल.
त्याचबरोबर असे हल्ले करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बजरंग दलासारखी संघटित दले, ती चालवण्यासाठी लागणाऱ्या तलवारी, त्रिशुल, भाले, गावठी पिस्तूल, पेट्रोल बॉम्ब या सारखी हत्यारे कुणाकडे आहेत? विविध शहरांतून लाठ्याकाठ्या घेऊन तसेच सशस्त्र मिरवणुका कोण काढत असते? शाखेत लाठ्या-काठ्या व शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण कोण, कोणाला व कशासाठी देत असते? नववीच्या विद्यार्थ्यापासूनच बजरंग दलात भरती करण्याची योजना कोणाची व कशासाठी आहे? वारकऱ्यांच्या दिंडीत धारकरी म्हणून नंग्या तलवारी कोण नाचवत असते? महाराष्ट्रात त्याबद्दलचे गुन्हे यांच्याशी संबंधित संघटनेच्या पुढार्यांवर दाखल झालेले आहेत, याची जनतेला माहिती आहे.
केंद्रातील सत्ता भाजपकडे असल्याने पोलीस व इतर प्रशासकीय यंत्रणेचेही धर्मांधकरण त्यांनी केले आहे. त्याचे चटके अल्पसंख्य समुदायाला बसत आहेत. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ज्या भागातून भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत, अशाच भागात या हल्ल्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, याचीही आपण नोंद घेतली पाहिजे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील १७९७ बेकायदेशीर कॉलनींना कायदेशीर करण्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून केल्या होत्या. त्यानुसार चाळीस लाख लोकांच्या नावावर घरे होतील, असे ट्विट पर्यावरणमंत्री व भाजपचे एक नेते प्रकाश जावडेकर यांनी केले होते. अशा किती लोकांना अशी घरे मिळाली? की ते फक्त निवडणुका जिंकण्यासाठी दिलेले आश्वासन होते, ते अजून समजले नाही. पण या हल्ल्याच्या वेळी झालेल्या जाळपोळीत ७९ घरे व ३२७ दुकाने जाळून खाक करण्यात आली आहेत. कवी बशर बद्र म्हणतात त्याप्रमाणे...
लोग टूट जाते हैं बस एक घर बनाने में,
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.
हा शेर यांना तंतोतंत लागू पडतो. याशिवाय लहान टपऱ्या, चार चाकी व हात गाड्या, त्यावरील फळ फळावळे, कपडेलत्ते व इतरही सामानसुमानाची झालेली नासधूस व लुटालूट याची गिनती अजून झाली नाही. हे सर्व नुकसान हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांचे झालेले आहे, हे सर्वांनीच ध्यानात ठेवले पाहिजे.
भीमा कोरेगाव येथे ज्याप्रमाणे दलितावर पूर्वनियोजितपणे हल्ला करण्यात आला होता, त्याप्रमाणेच दिल्ली येथील मुस्लीम अल्पसंख्याकांवरील हल्ल्याने भाजपचे हल्लेखोर स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले आहे. अर्थात त्यामुळे त्यांच्यात काही फरक पडेल असे नाही. माणसामाणसांत द्वेष आणि द्वेशातून माणसे मारणे हे त्यांच्या डीएनएमध्येच भरलेले आहे, याचीही माहिती बहुतेकांना होती. पण ज्यांना नव्यानेच माहीत झाले आहे, त्यापैकी अभिनेत्री सुभद्रा मुखर्जी यांनी आपल्या भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपचे सहकारी असलेल्या अकाली दलानेही त्यांच्या या कृत्याविरोधात आपली नाराजी व्यक्त करणारे पत्रक काढलेले आहे. अर्थात याचा भाजपच्या स्वभावधर्मावर काही फरक पडेल असे मानता येणार नाही.
या हल्ल्यानंतरही काही चांगल्या बाबी लक्षात आल्यात. त्या म्हणजे इतका हाहाकार दिल्लीत माजला असताना त्यातून विस्थापित झालेल्या बेघर लोकांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था शीख समुदायाने आपल्या गुरुद्वारांतून केली. तसेच काही वस्त्यांतून दलित समुदायाने आपल्या जिवाची पर्वा न करता असे हल्ले परतवून लावून मुस्लीम समाजाचे रक्षण केले. याची नोंद दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांनीसुद्धा घेतली आहे, ही चांगली बाब म्हणता येईल.
दिल्लीमध्ये इतकी जाळपोळ, तोडफोड, लुटालूट, भोसकाभोसकी, गोळीबार, घडवून आणले असले तरी देशातील सीएए, एनआरसी व एनपीआरविरुद्धचे आंदोलन अजिबात थांबलेले नाही. ते थांबण्याची शक्यताही नाही. उलट या धामधुमीच्या काळातच बिहार विधानसभेने तेथील जनतेच्या आंदोलनाच्या धाकाने ‘बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, तसेच एनपीआरसुद्धा २०१०च्या कायद्यानुसारच लागू केले जाईल’ असा ठराव केला. हाही भाजपला बसलेला एक तडाखाच म्हणावा लागेल. अजूनही दिल्लीतील शाहीन बागमध्ये हे आंदोलन चालू आहे. त्यामुळेही भाजप अस्वस्थच आहे. त्यांची ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
.............................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
दिल्ली दंगल : चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असावीत - सुनील तांबे
https://www.aksharnama.com/client/article_detail/4060
दिल्लीतील हिंसाचार, मोदी सरकार आणि मराठी वर्तमानपत्रे - टीम अक्षरनामा
https://www.aksharnama.com/client/article_detail/4052
असा हा २००२ पासून १८ वर्षांनंतरचा ‘माझा भारत’. आजच्या या भारतात राजधर्म पोरका आहे आणि बदमाशी उदंड आहे! - आर. एस. खनके
https://www.aksharnama.com/client/article_detail/4055
नगाऱ्यासारखी गाजत असलेली कविता - सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा - आमीर अझीज
https://www.aksharnama.com/client/article_detail/4056
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment