‘मोबाईल जॅमर’ हा प्रयोग नाट्यगृहापलिकडेही विस्तारायला हवा!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 03 March 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar मोबाईल जॅमर Mobile jammer

गेली काही वर्षे नाट्य-सिनेमागृहात वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाईलप्रमाणेच सार्वजनिक सभ्यतेला फाटा देत निर्लज्जपणे मोठ्याने अथवा खुसूखुसू बोलणाऱ्या व्यक्तींनी उच्छाद मांडलाय.

यात लहान-थोर सर्वच सामील. लहान म्हणजे पौगंडावस्थेतील मुलामुलींना या नव्या माध्यमाशिवाय संपर्काची कुठलीच रीत, भाषा समजत नाही किंवा याशिवाय इतर गोष्टी कालबाह्य वाटतात. तर थोरांना सध्याच्या धकाधकीच्या व सार्वजनिक असुरक्षित वातावरणात संपर्काचा हा एकमेव धागा अपरिहार्य झालाय, पण तंत्रज्ञान निरक्षर असल्याने त्या यंत्राचे सक्षम नियंत्रण ते करू शकत नाहीत व रसभंगाला कारण ठरतात. यात वाढत्या वयाने हटवादी झालेले वृद्ध स्त्री-पुरुष काय बिघडतं दोन मिनिटांनी, असा तिरपागडा सवाल करतात.

थोडक्यात याच शतकात अवतरलेलं हे तंत्रज्ञान व त्याचे साधन मोबाईल यंत्र हे नवे सत्ताकेंद्र झालंय.

आज रोटी, कपडा, मकान ही प्राथमिक गरज राहिली नसून मोबाईल व डेटा हा जीवनमरणाचा प्रश्न बनलाय. माझ्याकडे मोबाईल आहे. (तो किती स्वस्त महाग हा प्रश्न अलहिदा) म्हणजे माझ्याकडे माझी सत्ता आहे. त्यामुळे मोदी, अंबानी वा आणखी कुणीही आणि मी एका समान पातळीवरच आहोत! ते आणि मी कधीही एकमेकांच्या सत्तेत रमू शकतो, घुसू शकतो वा उद्ध्वस्त करू शकतो!

यामुळे मोबाईलला स्वत:चा पासवर्ड असतो. माझी सत्ता मी नियंत्रित करू शकतो. हे लोण आता शहरी ‘माय स्पेस’पासून दूरवर पसरलेल्या गावखेड्यात पोहचले आहे. तिकडची घरे जशी सात-बाराने दुभंगली जातात, तशीच ती आता मोबाईल यंत्रानेही दुभंगली जातात!

याचा अर्थ या नव तंत्रज्ञानाला विरोध, एकमेकातला संवाद संपलाय, संस्कृती बिघडतेय, कुटुंब संस्था दुभंगतेय असा रडका सूर अजिबात लावायचा नाहीए. ते जे काही होतंय त्याला मोबाईल हे एकमेव कारण नाहीच आहे. तेव्हा ती ‘गेले ते दिन’ छापाची भावगीते कम रडगाणी गाण्यात काही अर्थ नाही.

आपली समस्या वेगळीच आहे. आपण तंत्रज्ञान व ते वापरायचे यंत्र याच्या तंत्र वैज्ञानिक वापरापेक्षा ते सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून बघतो!

आठवून बघा, साधी वीज, पंखा, गॅस, फोन, फ्रीज, मोटार, स्कूटर, प्रेशर कुकर, मिक्सर, फूड प्रोसेसर, रेडिओ, कॅमेरा, टीव्ही, व्हीसीडी, डीव्हीडी, होम थिएटर, संगणक, लॅपटॉप, आयपॉड/ पॅड या सर्व गोष्टी बाजारात आल्या त्या आपल्या घरात असणं हे (पोशाखी) आधुनिक, समृद्धीचं व प्रतिष्ठेच लक्षण समजले गेलेय. आणि त्यामुळे काही वेळा गरज नसताना तर काही वेळा शंभरातल्या नव्व्याण्णवांकडे आहे म्हणून घेतल्या जातात.

खोट्या प्रतिष्ठेपायी का होईना समाज विज्ञान-तंत्रज्ञान स्नेही होत गेला हे एका(च) अर्थी बरं झालं. आम्हाला ऑन व ऑफ हे बेसिक कळलं. इतर उपयोग आम्ही सोयीप्रमाणे शिकलो वा अव्हेरले. त्यामुळे आज अगदी उच्चशिक्षित माणसाला संगणक वा स्मार्टफोन त्याची कपॅसिटी किंवा स्पेअर कपॅसिटीसह संपूर्ण वापरताच येत नाही. या अज्ञानाला मला त्याची गरजच नाही, असे स्मार्ट उत्तर असते! याचे नीट आकलन केले तर साठ हजाराच्या यंत्राचा तो पाच-दहा हजाराच्या तंत्राचाच वापर करत असतो! पण त्यासाठी तो पाच-दहा हजाराचं उपकरण न घेता ते साठ हजाराचंच घेणार, कारण सार्वजनिक प्रतिष्ठा!

याबरोबर आणखी एक मुद्दा म्हणजे जे विज्ञान-तंत्रज्ञानाला परंपराविरोधी, धर्मविरोधी ठरवणारेच या माध्यमांचा वापर करून अंधश्रद्धा वाढीस लागतील, धर्म-जाती भेदावरून ध्रुवीकरण होईल अशा गोष्टींचा प्रचार व प्रसार करतात. हे म्हणजे अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्बसाठी करण्यासारखे झाले!

तर अशा अर्धवट प्रक्रियेतून ही जी यंत्रंतंत्रं आपल्याकडे आलीत, ती तेवढ्याच अर्धवट पद्धतीने हाताळली जातात. पीसी म्हणजे पर्सनल कम्प्युटरची आपण डीटीपी मशीन्स करून टाकली!

आज अनेक विकसित देशात मोबाईल वापरणारांची संख्या कमी आहे. अगदी अमेरिकेतसुद्धा. नुकतीच जी आकडेवारी जाहीर झालीय, त्यात भारत हा मोबाईल व डेटा वापरात जगात नंबर एकचा देश झालाय. त्या प्रमाणात शौचालयेही नाहीत.

आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरकर्ते वाढल्याने व मोबाईल वापरायला ना कसलं प्रशिक्षण लागतं, ना परवाना! त्यामुळे व अंबानी बंधूंमुळे सर्व परदेशी कंपन्यांना गाशा गुंडाळायची वेळ आली. अंबानीप्रमाणेच चायनीज कंपन्यांनी अमेरिकेसह कोरिया, जपान वगैरेंना हॅण्डसेट बाजारातून गायब केले आणि भारतात मोबाईल रिंग्जचा महापूर आला.

मूळच्या गप्पिष्ट, गजाली किंवा पारावरच्या गप्पा हाणणाऱ्या पुरुषांना हे नवं माध्यम फारच उपयोगी पडलं. त्याहून अधिक ते नदीवर, विहिरीवर नळावर तसंच पुढे कॉलनीत, मुलांना शाळेत सोडताना, आणताना कानगोष्टी करणाऱ्या बायकांना तर एक नवा अवयवच प्रत्यारोपित झाला. लँडलाईनची घरातली सार्वजनिकता, पुढे कॉर्डलेस आले तरी कमी नाही झाली. त्यामुळे मोबाईल मिळवती व गृहिणी दोघींच्या आयुष्यात क्रांती करून गेला.

मात्र या क्रांतीने एकुणच व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील शांतता पूर्णच नष्ट करून टाकली.

लॅंडलाईन होते तेव्हा संकेत म्हणून दूपारी वा रात्री ९ नंतर फोन केले जात नसत. अवेळी फोन आला तर तो अप्रिय घटनेचाच असे बहुतेक. थोडक्यात व्यक्तिगत आयुष्यातील शांतता जपली जायची. बाकी कार्यालयीन कामकाज आटोपलं की, त्या नंबरचा संबंध दुसऱ्या दिवशीच येई.

हे सगळं मोबाईलने उद्ध्वस्त केलं. प्राणवायूपेक्षा सध्या मोबाईल महत्त्वाचा झालाय. त्यामुळे तो कधीही, कुठेही, कसाही वाजतो. जो तो वापरतो तोही फारशी भिडभाड न ठेवता काळवेळ स्थळ न बघता त्यावर बोलत राहतो.

नाट्यगृहातील त्रास हा रसभंगापुरता मर्यादित आहे, पण शोकसभा वा अंत्यविधीतही निर्लज्ज औचित्यभंगाचेही कुणास काही वाटेनासे झालेय. याच मोबाईलमधील कॅमेरा व सोशल मीडिया यांनी तर ‘सब तऱ्हा की हदें पार कर दी हैं’ आणि लाखोंचे जीव गेले तरी सेल्फीचे नाद सुरूच आहेत. मोबाईलवर बोलत गाडी चालवत, ट्रेन पकडताना, रस्ता ओलांडताना अनेकांनी जीव गमावलाय तरीही या वागण्यात खंड नाही.

मोबाईलच्या वेडाने आम्हाला हिंसक बनवत असंवेदनशीलही बनवलंय. अलीकडे महासत्ता जसा साथीच्या रोगाचा व्हायरस पसरवतात, तसा हा मोबाईल नामक व्हायरस या प्रचंड लोकसंख्येच्या व विविध आवडीनिवडी, विषमता, भेद असलेल्या देशात लोकांना जणू काही बुद्धिभ्रष्ट करण्यासाठी पसरवलाय काय असे वाटू लागलेय.

देशाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणच या मोबाईल नामक छोट्या यंत्राने ढवळून काढलेय. संदेश वहनासाठी पूर्वी कबुतरांचा वापर करणारा हा देश, जे कबूतर पुढे शांतीदूत बनले, त्याच देशात मोबाईल नामक संदेशवहन यंत्राने सर्वाधिक हिंसा गेल्या दशकभरात केलीय!

आज आपण सगळेच हे संहारक शस्त्र गरज, प्रतिष्ठा, अपरिहार्यता म्हणून बाळगून आहोत.

नाट्यगृहातील जॅमरने रसभंगाचा एखादा खून रोखला जाईल, पण इतर ठिकाणचे काय?

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......