१९०५ ते १९११ दरम्यान उद्भवलेल्या तीन महत्त्वाच्या पेचप्रसंगांत युरोप कसा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता, ते आपण पाहिले. १९१२ आणि १९१३ मध्ये बाल्कन प्रदेशात दोन अत्यंत महत्त्वाची युद्धे झाली. त्यात साहजिक जीवितहानी, तह, वाटाघाटी सर्व काही झाले. पण या युद्धाचे पडसाद युरोपभर तितक्या तीव्रतेने उमटले नाहीत. पण महाविनाशक युद्धाची नांदी, ही दोन युद्धे ठरली यात शंका नाही.
पहिल्या बाल्कन युद्धाची ठिणगी पडायचे कारण झाले ते म्हणजे इटली आणि ओट्टोमान साम्राज्यातील युद्ध. ते सप्टेंबर १९११ मध्ये सुरू झाले. (हे म्हणजे पहिले बाल्कन युद्ध नव्हे.) खरे तर इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया हंगेरी यांच्या त्रिसदस्यीय करारातला तिसरा मित्र देश. जर्मनी आणि तुर्कस्तानचे काही वाकडे नव्हते (उलट कैसरने म्हटल्याप्रमाणे तो तुर्कस्तान आणि जगभरातल्या मुसलमानांचा मित्र आणि हितचिंतक/संरक्षक), पण इटली या तिघांतला सगळ्यात अशक्त कमकुवत आणि मुख्य म्हणजे असंतुष्ट देश. मोरोक्कन आणि बोस्नियन तिढ्याच्या वेळी त्याने जर्मनी आणि ऑस्ट्रियाला उघड पाठिंबा द्यायचे टाळले होते. इटलीलादेखील जर्मनीप्रमाणेच आपल्या वसाहती वाढवण्याची अपार इच्छा होती, पण तो फार कमकुवत होता. त्याची ही अवस्था लक्षात घेऊन फ्रान्स आणि इंग्लंडने त्याला चुचकारण्याचे धोरण अवलंबले. १९०९ साली त्यांनी आणि रशियाने बोस्नियन पेचप्रसंगात इटलीने जर रशियाची बाजू उचलून धरली किंवा फक्त गप्प बसणे जरी पसंत केले तर ते इटलीने ओट्टोमान साम्राज्याचा एखादा लचका तोडला तर त्या कृतीकडे कानडोळा करतील, असे आश्वासन दिले.
१९०८ साली ऑस्ट्रियाने सहज पचवलेला बोस्निया हर्जेगोवानियाचा घास आणि त्यानंतर फ्रान्सने तोडलेला मोरोक्कोचा लचका पाहून इटलीच्या तोंडाला पाणी सुटले. १८७८पासून त्याचा ओट्टोमान साम्राज्याचा भाग असलेल्या लिबियावर डोळा होता, पण जर्मनीचा धाक असल्याने तो त्यांचा मित्र असलेल्या तुर्कस्तानवर हल्ला करायला घाबरत होता. नेमके हेच हेरून ब्रिटिश परराष्ट्र सचिव सर एडवर्ड ग्रे यांनी इटलीने जर लीबियावर हल्ला केला तर आपण त्याला पाठिंबा देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे हिंमत वाढून इटलीने जर्मनी आणि ऑस्ट्रिया या मित्र देशांना अंधारात ठेवून सप्टेंबर १९११ मध्ये लिबियात फौजा घुसवल्या.
इटलीने घेतलेला लिबियाचा घास आणि त्याचे भौगोलिक महत्त्व- इटली -तुर्की युद्ध १९११
वरचे दोन नकाशे नीट पहिले तर ब्रिटिश चाल कळून येते. एकदा का इटली त्रि-सदस्य करारातून फोडला की, भूमध्य समुद्राचा अख्खा दक्षिण किनारा जर्मनविरोधी बनतो आणि उत्तरेकडून त्याच्या गळ्याभोवती तर सहजच फास आवळता येतो.
तसा लष्करीदृष्ट्या इटली काही फार मोठा ताकदवान देश नव्हता आणि ही गोष्ट काही गुपितही नव्हती. पण ओट्टोमान फौजा त्याच्यापुढे संख्येने कितीही जास्त वाटल्या तरी मागासलेल्या आणि असंघटित होत्या. पाहता पाहता इटलीने ओट्टोमान फौजांची धूळदाण उडवली.
या युद्धाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १ नोव्हेंबर १९११ रोजी जगाच्या इतिहासात प्रथमच शत्रू सैन्यावर आकाशातून बॉम्बफेक केली गेली. इटालियन विमानाच्या पायलटाने तुर्की रसद पुरवणाऱ्या काफिल्यावर आपल्या विमानातून चक्क हात बॉम्ब फेकले.
या युद्धाने आणि त्यात सहज मिळालेल्या यशाने आतापर्यंत तुर्कस्तानला दबून असलेल्या बाल्कन देशांची हिंमत वाढली. सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथे तैनात असलेल्या रशियन राजदूत निकोलस हार्त्विगने परिस्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. तो तुर्कस्तानाचा द्वेष्टा होता असे नव्हे, पण उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन ऑस्ट्रिया काही गडबड करेल, या भयाने त्याने सगळ्या बाल्कन राष्ट्रांची एकत्र मोट बांधून ओट्टोमान-तुर्कविरोधी आघाडी स्थापन केली. तिचे नाव ‘बाल्कन लीग’.
पहिले बाल्कन युद्ध
८ ऑक्टोबर १९१२ रोजी पहिले बाल्कन युद्ध सुरू झाले. अजून तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य इटलीबरोबर युद्धात गुंतलेले होते. आधी मोंटेनेग्रोने तुर्कस्तानबरोबर युद्ध पुकारले. लगेचच बल्गेरिया, सर्बिया आणि ग्रीस या बाल्कन लीगच्या इतर सदस्य देशांनीही तुर्कस्तान विरोधात युद्ध पुकारले. आधीच इटलीबरोबर युद्धात वर्षभर मार खात असलेल्या ओट्टोमान फौजांची पुरती दैना उडाली आणि ते माघार घेत घेत अगदी राजधानी इस्तंबुलच्या बंदरापर्यंत येऊन पोहोचले. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मार खाल्लेल्या तुर्कस्तानने आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन तंटा सोडवायची मागणी केली (म्हणजे त्यांनी तसे करावे ही गळ इंग्लंडनेच घातली). त्याप्रमाणे लंडन इथे परिषद भरली.
सर्बिया बाल्कन लीगचा सदस्य असला तरी त्याचे इरादे वेगळेच होते. जन्मल्यापासून सर्बिया हा एकमेव असा बाल्कन देश होता, ज्याला समुद्रकिनारा लाभला नव्हता. त्यामुळे त्याचा डोळा दुरास (किंवा दुरात्सो) या एका महत्त्वाच्या तुर्की अधिपत्याखालील बंदरावर होता. (नकाशा पहा) या युद्धाच्या निमित्ताने दुरास बंदर आणि आसपासच्या किनारपट्टीचा प्रदेश हस्तगत करण्याचा त्याचा इरादा होता. त्याप्रमाणे त्याने तिथे फौजा घुसवल्याही होत्या, पण अर्थात त्यांच्या या अगोचरपणाला परिषदेत ऑस्ट्रियाने खोडा घातला. त्यांनी दावा केला की, हा भाग सर्बियाला मिळावा असे काहीच तेथे नाही. ना तेथे सर्ब लोकांची वस्ती आहे, ना स्लाव लोकांची. तेथे राहतात प्रामुख्याने मुस्लीम धर्मीय आणि ते वंश, भाषा, चालीरीती या बाबत सर्ब लोकांपेक्षा भिन्न आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे जर ते तुर्की अंमलाखाली राहत नसतील तर त्यांना स्वतंत्र राष्ट्र बनवू द्यावे.
आश्चर्य म्हणजे या प्रस्तावाला इटलीनेही दुजोरा दिला. त्यांनादेखील भांडकुदळ सर्बिया समुद्री शेजारी म्हणून नकोच होता. नेहमीप्रमाणे रशिया सर्बियाच्या पाठीशी उभा राहिला, पण या वेळी फ्रान्सने मात्र त्याची साथ दिली नाही. अखेर सर्वानुमते तिथे अल्बानिया हे छोटे राष्ट्र बनवले गेले. जे आजतागायत आहे. शांतपणे आपण बरे आपले काम बरे असे धोरण ठेवून राहणारे ते कदाचित एकमेव बाल्कन राष्ट्र असेल...
तर बराच खल होऊन शेवटी मे १९१३ मध्ये समझोता झाला. सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण गोष्टी इतक्यावरच थांबल्या नाहीत, थांबणार नव्हत्याच.
दुसरे बाल्कन युद्ध
बल्गेरिया हा खरे तर बाल्कन लीगमधला सगळ्यात शक्तीशाली देश. या युद्धात त्याने सगळ्यात जास्त म्हणजे सहा लाख सैनिक उतरवले होते. त्याचा मुख्य उद्देश होता थ्रेस आणि मासिडोनिया प्रांत. तो त्याने पदाक्रांतही केला, पण समझोत्यात त्यातला काहीभाग ग्रीसला आणि काही भाग सर्बियाला दिला गेला. त्यामुळे तो भडकला आणि त्याने बाल्कन लीगमधील देशावरच चढाई केली. हे दुसरे बाल्कन युद्ध.
या कृतीने चवताळून सर्बिया आणि ग्रीस हे तर एकत्र येऊन बल्गेरियाच्या विरोधात उभे ठाकले. आतापर्यंत तटस्थ राहिलेला रोमानियादेखील बल्गेरियाच्या विरोधात युद्धात उतरला. या संधीचा फायदा घेत तुर्कस्ताननेदेखील बल्गेरियावर हल्ला करून थ्रेसचा काही भाग परत जिंकून घेतला आणि आपली राजधानी आणि मोक्याच्या जागी असलेले बंदर सुरक्षित करून घेतले. बल्गेरियाच्या सीमा अगदी इस्तंबुलला भिडल्या होत्या.
अखेर ऑगस्ट १९१३ मध्ये बुखारेस्ट इथे तह झाला आणि बल्गेरियाला सर्बिया व ग्रीसकडून घेतलेला प्रदेश मे१९१३च्या लंडन समझोत्याप्रमाणे परत करावा लागला. शिवाय रुमानियाने उत्तरेकडचा जो भूभाग पादाक्रांत केला होता, त्यावरही पाणी सोडावे लागले. तुर्कस्तानने जिंकलेला प्रदेश त्यांच्याकडेच राहिला.
या दोन बाल्कन युद्धांत तशी हानी काही कमी झाली नाही. सगळीकडचे मिळून साधारण पाच लाख सैनिक आणि नागरिक या युद्धात कामी आले (त्यात नंतर उफाळलेल्या वांशिक हिंसाचाराचा आणि धार्मिक दंगलींचाही हातभाग होता.). पण तरीही मुख्यत: तंटा बाल्कन आणि तुर्की प्रदेशातच राहिला.
यात जर्मनी शांतच होता. त्याला कमवायचं काहीच नव्हतं आणि एकमेकांच्या विरुद्ध उभ्या असणाऱ्या इटली आणि ऑस्ट्रियापैकी एक कुणी निवडायचे टाळायचे होते. अशी कुंपणावरची बैठक घातक असते आणि ते नाराज झालेल्या इटलीने नंतर दाखवून दिले.
बाल्कन लीगचा घाट घातलेल्या रशियालाही मोठा डावपेचात्मक फटका बसला. बल्गेरियाच्या आततायी कृतीने बाल्कन राष्ट्रांची एकी कायमची फुटली. रशियाने सर्बियाला पाठिंबा दिल्यामुळे बल्गेरिया इतका नाराज झाला की, पुढे पहिल्या महायुद्धात तो जर्मनीच्या बाजूने उतरला. या तंट्यात सर्बियाचा फायदा सगळ्यात जास्त झाला, पण अजूनही समुद्र किनाऱ्याचा लहानसा तुकडादेखील हाती न आल्याने तो नाराज राहिला.
बोस्नियन पेच प्रसंगावेळी आणि आता या दुरास (किंवा दुरात्सो)चा घास घेताना ऑस्ट्रियाने त्यात विघ्न आणल्याने तो ऑस्ट्रियाचा हाडवैरी बनला. सर्बियात असे अनेक जण होते, जे ऑस्ट्रियावर सूड उगवण्याची संधी शोधत होते, ती त्यांना लवकरच मिळाली.
इंग्लंड-फ्रान्सने या प्रकरणात बाहेरून मध्यस्थी करणाऱ्याची भूमिका बजावली. बाल्कन प्रदेशातला तंटा आपण स्वत: त्यात भाग न घेता फक्त न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन सोडवू शकतो आणि युरोपातले सत्ता संतुलन सांभाळू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. हा आत्मविश्वास नंतर घातक ठरला.
असो तर २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ही अशी पाच प्रकरणं उद्भवली की, ज्यांची परिणती एखाद्या मोठ्या युद्धात सहज होऊ शकली असते, पण तसे झाले नाही.
या सगळ्या पेचातल्या एक महत्त्वाचा भिडू म्हणजे रशिया.
रशिया
आकाराने रशिया फक्त युरोपच नाही तर अख्या जगात सर्वांत मोठा देश आहे. इतका की, त्याचे ‘युरोपियन रशिया’ व ‘आशियाई रशिया’ असे भाग कल्पिले जातात. रशिया हा देश किंवा राज्य म्हणून सातव्या शतकापासून अस्तित्वात आहे. मध्य आशियातल्या गवताल स्टेप्स पट्ट्यातल्या निरनिराळ्या भटक्या टोळ्यांशी सतत संघर्ष करत तो आपले अस्तित्व टिकवून आहे. १५४७ साली इव्हान द टेरिबल हा रशियाचा पहिला झार बनला. झार हे रोमन सीझर या शब्दाचेच रशियन रूप. त्यानेच रशियाला रशिया हे नाव दिले. त्याने पूर्वेकडे साम्राज्य विस्तार करत सायबेरिया आपल्या पंखांखाली आणला. १६१३ मध्ये रोमोनाव्ह घराण्याकडे रशियाची सत्ता गेली.
त्यांच्यातला पिटर द ग्रेट हा सगळ्यात प्रसिद्ध आणि कर्तबगार झार. त्याने रशियाचे नौदल, लष्कर युरोपच्या धर्तीवर आधुनिक केले. त्यानेच युरोपात म्हणजे पश्चिमेकडे रशियाचा साम्राज्य विस्तार केला आणि रशियाच्या सीमा काळ्या समुद्रापासून बाल्टिक सागरापर्यंत नेऊन भिडवल्या. त्याने प्रसिद्ध पिटस्बर्ग हे शहर वसवून त्याला रशियाची राजधानी बनवले.
त्याच्यानंतर आलेली राणी कॅथरीनही मोठी कर्तबगार आणि धोरणी/ कुटील वृत्तीची होती. तिच्या काळात रशियाचा भूविस्तार प्रचंड झाला, पण त्याबरोबरच रशियन जनतेच्या हालअपेष्टांत, दैन्यात प्रचंड वाढ झाली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आलेल्या नेपोलियनच्या वादळी कारकिर्दीत इतर युरोपीय देशांप्रमाणे रशियाही होरपळून निघाला. नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव करत मोस्को जिंकून घेतले आणि जाळून बेचिराख केले. पण रशियाने शरणागती पत्करली नव्हती, ते फक्त माघार घेत होते. माघार घेताना दग्धभू धोरण अवलंबत होते.
इतर युरोपीय देशांपेक्षा रशियाची ही जमेची बाजू होती की, त्यांच्याकडे जमीन (क्षेत्रफळ) प्रचंड आहे, मनुष्यबळही प्रचंड आहे. त्यामुळे माणसे मेली तर माघार घेत घेत जमीन सोडत आत सरकले तरी त्यांना फरक पडत नाही, उलट आक्रमण करणाऱ्यांचीच दमछाक होते, रसद लांबली जाते आणि रशियन हिवाळा, तो तर भयानक जीवघेणा.
रशिया शरणागती पत्करत नाही फक्त माघार घेतोय हे पाहून शेवटी नेपोलियननेच माघार घेतली, पण उशीर झाला होता. जे युरोपातले कोणतेही सैन्य करू शकले नाही, ते रशियन हिवाळ्याने करून दाखवले. नेपोलियनचे जवळपास सगळे सैन्य मारले गेले. हा फटका जीवघेणा होता आणि मग रशिया फ्रान्सवर उलटला. ऑस्ट्रिया-प्रशिया इंग्लंडबरोबर मिळून त्यांनी नेपोलियनचा पराभव केला, पण रशियाची भूक एवढ्यावर शमली नाही. त्याने पोलंड गिळंकृत केला. चेचन्या, अझरबैजान, कोकेशस हे भागही गिळंकृत केले.
आता पुढचा घास ठरणार होता तुर्कस्तान, पण युरोपात रशियाचे वाढत चाललेले प्रभुत्व आता इंग्लंडला स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते. त्यामुळे जेव्हा रशिया-तुर्कस्थानच्या ओट्टोमान साम्राज्यात क्रिमियन युद्ध सुरू झाले, तेव्हा इंग्लंड-फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्धात उडी घेतली. युद्धात रशियाचा निर्णायक पराभव जरी झाला नाही, तरी त्यांच्या युरोपातल्या साम्राज्य विस्ताराला काहीशी खीळ बसली आणि आपल्या प्रतिस्पर्धी युरोपियन देशापेक्षा आपण उद्योग, दळणवळण, नौदल, आधुनिक शस्त्रास्त्रं आणि कवायती सैन्य, सैन्य तंत्रज्ञान यात मागे आहोत, हेही लक्षात आले.
या वेळी रशियाचा राजा होता झार अलेक्झांडर दुसरा. त्याने रशियात उद्योगाला चालना देणे, रेल्वे रस्ते यांचे जाळे उभारणे, शेतीपद्धतीत सुधारणा करणे असे कार्यक्रम हाती घेतले, पण रशियाचा आकार पाहता त्याला बराच वेळ लागणार होता. त्यांच्या युरोपातल्या भूविस्ताराला जरी खीळ बसली तरी रशियाचा मध्य आशियातला साम्राज्य विस्तार चालूच होता. त्याने चीनला नमवून पूर्वेकडे वालाडीवोस्टओक हे बंदर काबीज केले. आता पूर्वेला प्रशांत महासागर ते पश्चिमेला युरोपमधील बाल्टिक समुद्र, काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्रापर्यंतचा सलग भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली होता आणि दक्षिणेला सरकत सरकत ते अफगानिस्तानपर्यंत येऊन पोहोचले होते.
हा इंग्लंडच्या आशियातल्या साम्राज्याच्या गळ्यालाच फास होता. त्यातून सुरू झाले १९व्या शतकातले शीतयुद्ध- ज्याला ‘द ग्रेट गेम’ म्हणून ओळखले जाते. रशियाने अफगाणिस्तानात इंग्लंडला भरपूर दमवले, पण पुरते नामोहरम करू न शकल्याने हा सामना तसा अनिर्णित राहिला. यामुळे परत एकदा धीर वाढून त्याने आता दुबळ्या झालेल्या ओट्टोमान साम्राज्यापासून मुक्त होऊ पाहणाऱ्या बाल्कन राष्ट्रांना मदत करायला सुरुवात केली. ही सगळी राष्ट्रे बहुसंख्येने स्लाव वंशीय होती अन पश्चिम रशिया किंवा युरोपियन रशियात ही स्लाव वंशीय बहुसंख्य होते. त्यामुळे आपल्या कच्छपी असलेली स्लाव वंशीय राष्ट्रफळी दक्षिण युरोपात तयार झाली, तर ते त्यांना हवेच होते.
आता हे काही सहजासहजी होणार नव्हतेच.
.............................................................................................................................................
या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -
१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3952
२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3977
३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.
https://www.aksharnama.com/client/article_detail/3992
४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4007
५) जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4022
६) रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4039
७) ऑस्ट्रिया-हंगेरी, सर्बिया आणि इतर बाल्कन राष्ट्रे
https://www.aksharnama.com/client/article_detail/4051
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment