पोर्नोग्राफी : प्रकृती, विकृती आणि संस्कृती
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Fri , 13 January 2017
  • लैंगिक मनोरंजन साहित्य Erotic literature पोर्नोग्राफी Pornography स्त्री-पुरुष असमानता Gender inequality लैंगिकता sexuality लिंगभाव Gender

‘लैंगिकतेचे राजकारण’च्या या दुसऱ्या भागात एक अपरिहार्य चर्चेचा विषय असू शकतो, तो म्हणजे ‘लैंगिक मनोरंजन साहित्य’ किंवा ‘पोर्नोग्राफी’. आपल्याला हे साहित्य काही नवीन नाही. भारतात मानवी लैंगिक व्यवहाराचे शास्त्र वात्स्यायनाने लिहिलेल्या ग्रंथाच्या रूपात अस्तित्वात आहे. त्यात माणसांचे आपापसातले लैंगिक व्यवहार निकोप, आरोग्य संपन्न कसे राहावेत यासाठी काही ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ मूल्यसंकल्पनांचा विचार मांडला आहे. त्यामुळे आज आपण कामशास्त्राविषयीच्या ज्ञानाला निषिद्ध मानत नाही. परंतु कामशास्त्र शिकवण्याच्या निमिताने एक प्रकारच्या आक्रमक, हिंसक अशा लैंगिक व्यवहाराचे जे चित्र पोर्नोग्राफीच्या रूपात आपल्या समोर उभे ठाकले आहे, ते भयावह आहे. गेल्या दोन दशकांत स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराने जे काही उग्र रूप धारण केले आहे, त्याचे कोणत्याही स्वरूपाचे नियमन न करता जे बाजारू स्वरूप धारण केले आहे ते निषेधार्ह आहे, असे अनेक स्त्रीवाद्यांना वाटते.

आज तुम्ही युट्युबवर एखादा व्हिडिओ पाहायला गेलात तर त्या विंडोच्या शेजारच्या पट्टीत त्या विषयाशी संबंधित अनेक सुचवलेले व्हिडिओ तर दिसतातच, पण त्या सोबत एखादी प्रणयप्रसंग दाखवणारी व्हिडिओ क्लिपची लिंकसुद्धा दिलेली असते. जेणेकरून स्वत:च्या लैंगिक प्रेरणांवर पूर्ण नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीलादेखील ती लिंक उघडून पाहण्याचा मोह व्हावा. भांडवलशाही बाजारव्यवस्था माणसांना उपभोक्ता बनवत असते. माणसाच्या शरीरासहित प्रत्येक लैंगिक व्यवहारालासुद्धा ती बाजारात खेचून आणते आणि त्याच्या पूर्तीसाठी उद्युक्त करते. म्हणूनच मानवी लैंगिक व्यवहाराची पूर्ती करणाऱ्या सेवेलाही भांडवलशाहीत व्यावसायिक म्हणजे ‘कमर्शियल सेक्स वर्कर’ असे संबोधले आहे.

अँन्ड्रीया डॉरकीन, कॅथरीन मॅक्विनॉन आणि गेल डायने यांनी या लैंगिक मनोरंजन सेवा उद्योगाचा कडाडून विरोध केला. त्यांनी असे म्हटले की, आभासी लैंगिक मनोरंजनाच्या व्यवहारात विकृती, हिंसा आणि स्त्रियांचे शोषण तर आहेच, पण यात काम करणाऱ्या मॉडेल स्त्रिया या पुरुषसत्ताक मूल्य संकल्पनाच्या बळी असतात. त्यांच्या लैंगिक व्यवहाराच्या संकल्पना अतिशयोक्त असून पुरुषी आक्रमकतेला खतपाणी घालणाऱ्या आहेत. पुरुषांच्या लैंगिक वासनांची पूर्ती स्त्रियांच्या  शरीराला पीडा देऊनच होऊ शकते. स्त्री-पुरुषांचे लैंगिक व्यवहाराचे नाते सुंदर, सुखकारक असावे, विषम पायावर आधारलेले असता कामा नये, असे त्याचे मत होते.

आज भारतात पोर्नोग्राफी इंडस्ट्री ही जवळ जवळ १५ हजार कोटी रुपयांचा गल्ला जमवते (ज्याची नोंद केली गेली आहे). ज्याची नोंद नाही, त्याची गणती नाही. या लैंगिक मनोरंजनाच्या उद्योगात काम करून आपला चरितार्थ चालवणाऱ्या स्त्रिया या बहुतांशी दलित बहुजन आणि शोषित जाती- जमातीतून येणाऱ्या असतात. आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या परिस्थितीतून त्या या व्यवसायाकडे खेचल्या गेलेल्या असतात. हा व्यवसाय पोट भरण्याचे साधन असला तरी त्यात मानवी आत्मसन्मान नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

२०१५ साली आम्ही काही स्त्री संघटनांतर्फे पुण्याला एक मर्दानगी विरोधी पुरुषभान परिषद घेतली होती. त्यावेळी तरुणांच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय गटचर्चेसाठी ठेवले होते. त्यात एक विषय होता- ‘पोर्नोग्राफी आणि मी’. त्या चर्चेच्या वेळी एका स्त्रीवादी समाज कार्यकर्त्याने दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणाबद्दल असे सांगितले की, जवळ जवळ ८७ टक्के भारतीय पुरुष आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर एकदा तरी लैंगिक साहित्य नजरेखालून घालतात. मग ते गुपचूप पाहिलेले फोटो असतील किंवा कथा, कादंबरी, व्हिडीओ अथवा वेबसाईट असतील. यातले ७० टक्के पुरुष १८ ते ३४ वयोगटातील पुरुष असतात. ते इंटरनेटवर नियमितपणे पोर्नोग्राफी पाहतात. त्यात सॉफ्टकोअर आणि हार्डकोअरचे प्रमाण कमी असले तरी ते पाहावेसे वाटणे यात चूक काहीच नाही. कारण शृंगार हा माणसाच्या नैसर्गिक जैविक प्रेरणेचाच एक अपरिहार्य भाग आहे. पण या नैसर्गिक लैंगिक प्रेरणांची ‘आभासी स्वरूपाची’ तृप्ती करून घेणे ही अपरिहार्य गरज बनते. ती गरज मग नैसर्गिक राहत नाही तर ती कृत्रिम रितीने डिवचलेली, पेटवलेली होते. जिच्या तृप्तीसाठी अनिर्बंधपणे तो पावले टाकू लागतो किंवा लैंगिक गरजांच्या शमनार्थ हिंसाचाराचा मार्ग अवलंबतो.

भिन्नलिंगी संबंधांमध्ये आक्रमकता असते, हिंसा असते, विषमता असते, असे १९८५च्या दरम्यान सातत्याने मांडणाऱ्या स्त्रीवादी प्रवाहाने पहिली मोहीम उघडली ती लैंगिक साहित्याविरुद्ध. त्यांनी पोर्नोग्राफीबद्दल आक्षेप घेतले ते असे –  १) त्यात स्त्रीला उपभोगाची वस्तू मानले जाते. २) पितृप्रधान व्यवस्थेची आणि स्त्रियांवरील लैंगिक नियंत्रणाची सगळी मूल्ये उदात्तरूप देऊन मांडली जातात. ३) पुरुषांच्या लैंगिक आक्रमकतेला उघड मान्यता दिलेली असते. ४) अतिरंजित ‌वर्णंनामुळे पुरुषांची लैंगिक प्रेरणा अपरिहार्यपणे हिंसात्मक बनते. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराचे मूळ पोर्नोग्राफीमध्ये आहे. त्यात पुरुषी लैंगिक अहंकाराला चिथावणी दिलेली असते, असा हिंसा आणि पोर्नोग्राफीचा अभेद्य संबंध आहे. लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली आक्रमक मूल्ये पुरुषांच्या मनात बिंबवली जातात. उदा. स्त्रियांच्या लैंगिक अवयवांना दिलेली पिडा काही स्त्रियांना आवडते, लैंगिक क्रियेत पुरुषांनी आक्रमक वा धुसमुसळेपणाने वर्तन केलेले आवडते वगैरे अनेक गैरसमज पसरवण्याचे काम पोर्नोग्राफी करते. १९८० मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरात एका दिवसात १९३ बलात्काराच्या केसेस, १७८ लैंगिक हल्लाच्या घाणेरडे फोनकॉल्सच्या केसेस नोंदवल्या गेल्या. आज सायबर सेक्समुळे या हिंसाचाराने टोक गाठल्याचे लक्षात येते.

आज मनोरंजन आणि पोर्नोग्राफी यांच्यातील विभागणी धूसर होत चालली आहे. कारण हिंदी सिनेमासृष्टीमध्ये दिसणारी अनेक गाणी उघडपणे ‘लैंगिक भावना’ चाळवणारी असली तरीही त्यांना तांत्रिकदृष्ट्या पोर्नोग्राफी म्हणता येत नाही. उदा. ‘सरकायलो खटिया’ किंवा ‘चोली के पिछे’ वगैरे. याचे कारण त्याचे सांस्कृतिक अस्मितांशी जुळलेले अभेद्य रसायन. त्यांचे अर्थशास्त्रही मजेशीर आहे. कारण ‘लोकांना आवडते म्हणून’, ‘त्यांची मागणी आहे म्हणून’ असे म्हणत चित्रपट निर्मितीच्या अवाढ्य खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ही गाणी घातली जातात.

पोर्नोग्राफीमुळे पर्यायी तृप्तीचा आनंद मिळतो म्हणून गरज आहे, असे म्हणणारा एक प्रवाह, तर ‘अहिंसक’ समपातळीवरील ‘निर्भेळ’ लैंगिक अनुभव कसा असू शकतो हे सांगणारा शृंगारिक साहित्याचा पर्याय दिला पाहिजे असे म्हणणाराही एक प्रवाह आहे. काही स्त्रीवादी गटांना स्त्रियांना स्वत:च्या लैंगिक प्रेरणांची जाणीव करून देणारी समलिंगी संबंधांतील आनंद प्रक्रियेविषयीची माहिती द्यायला हवी असे वाटते. म्हणून पर्यायी शृंगार वाङ्मयाचा भर मुख्यत: स्व-शरीराची ‘स्व-सन्मान’ युक्त प्रतिमा तयार करण्यावर असावा, तरच सर्व लैंगिक संबंध समानता प्रस्थापित करणारे असतील.

स्त्रियांवरील अत्याचार आणि हिंसाचार वाढवण्याला कारणीभूत ठरणाऱ्या पोर्नोग्राफीवर बंदी आणावी की, न आणावी यावर प्रचंड वाद आहेत. प्रत्येक मनुष्याला आपले विचार, भावना आणि अनुभव मांडण्याचा मूलभूत हक्क आहे, असे मानणारी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशिपच्या विरुद्ध असायला हवी. परंतु एखाद्याच्या आविष्कार स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनावर अतिक्रमण होत असेल तर या आविष्कार स्वातंत्र्याचे नियमन झाले पाहिजे. नियमन, नियंत्रण आणि बंदी या संकल्पना प्रत्येकानेच नीट तपासून पाहायला हव्यात. परंतु नियमन कोठे संपते आणि नियंत्रण कोठे सुरू होते, यातील सीमारेषा धुसर असल्यामुळे त्यावर नेहमीच वादंग होत आले आले. नियमनाच्या कक्षा आणि निकष या गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत.

यासंदर्भात ८०च्या दशकात स्त्री आणि माध्यम या गटाच्या सभासद गीता सेशू यांनी दिलेला पोर्नोग्राफी केसच्या संदर्भातील लढा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हा लढा गीता सेशू या व्यक्तीचा नाही तर तुम्हा आम्हा सर्वांच्या संवेदनाविश्वाचा आहे. या लढ्यातून खूप शिकण्यासारखे आहे आणि सावधही होण्यासारखे आहे. पोर्नोग्राफी विरुद्धच्या लढ्याला आलेले अपयश सर्व स्त्री चळवळीच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले, कारण आम्ही आमच्या शत्रूचा नीट अभ्यास केला नव्हता. आम्ही कायद्याच्या तंत्रांच्या आधारे बाजारू जगाच्या क्लृप्त्या आत्मसात केल्या नव्हत्या. या क्लृप्त्यांबाबतची अनभिज्ञता हीच आमच्या अपयशाची शेवटची पायरी आणि यशाची पहिली पायरी ठरेल.

काही वर्षांपूर्वी स्त्री पत्रकारांच्या हातात अनिल थत्ते यांनी लिहिलेले ‘बलात्कार कसा करतात’ हे पुस्तक पडले. हे पुस्तक त्यांच्या ‘लैंगिक शिक्षण (?)’ मालिकेतील तिसरे पुस्तक होते. पाहताक्षणी रक्त तापून उठावे अशी चित्रे त्यात होती. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट (बीयुजे)मध्ये जमलेल्या सर्वच स्त्री पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी संघटनेतर्फे यावर आक्षेप घ्यायचे ठरवले. पहिली गोष्ट म्हणजे बाजारातून त्या पुस्तकाच्या प्रती काढून घेतल्या गेल्या पाहिजेत. त्याकरता पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने लेखी तक्रार देण्यास सांगितले. तक्रार सर्वांनी मिळून लिहिली. गीता सेशू त्यावेळी बीयुजेच्या सचिव होत्या. त्यांना सचिव म्हणून तक्रारपत्रावर सही करावी लागली आणि त्याक्षणी गीता सेशू यांचा व्यवस्थेविरुद्धचा लढा सुरू झाला. त्याक्षणी तरुण, उत्साही गीता सेशूला कल्पनाही नव्हती की, भविष्यात तिचे आणि चळवळीचे नैतिक बळ खच्ची करणारे किती मोठे आघात सहन करावे लागणार आहेत. सुरुवातीला संपूर्ण स्त्री चळवळीचा पोर्नोग्राफी विरुद्धचा लढा हळूहळू पुढील सहा-सात वर्षांच्या काळात गीता सेशूपुरताच मर्यादित राहिला. 

स्त्री गटाने तक्रार नोंदवल्यानंतर बाजारातून या पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त केल्या गेल्या. अनिल थत्ते यांना काही होऊ शकले नाही, परंतु त्यांच्याविरुद्ध केस नोंदवली गेली. भारतीय संविधानातील कलम २९२च्या अंतर्गत केस नोंदवली गेली. हे कलम ब्रिटिशांच्या काळातील हॅकलिन केसच्या संदर्भात तयार केले गेले होते. त्यामुळे यात ओंगळवाणेपणाच्या, अश्लीलतेबद्दलच्या व्याख्या खूपच भोंगळपणे दिलेल्या होत्या. परंतु या तुटपुंज्या तरतुदीच्या आधारावर अनिल थत्ते आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांना स्त्री शरीराचा बाजार मांडण्याबद्दल शिक्षा व्हावी या उद्देशाने जिवाचा आटापिटा सुरू झाला. सरकारी वकील बदलायचे ठरवले. 

मुंबईतील तरुण नवख्या वकील मित्राने केस चालवायचे ठरवले. जसजशी केस न्यायालयात उभी राहिली, तसतशी अत्यंत कौशल्याने चुटकीसरशी त्याची वासलात लावली गेली. कारण विरोधी पक्षाची भूमिका स्त्रीचे नैतिक बळ खच्ची करण्याचे हजारो मार्ग वापरण्याची होती. एखादी गोष्ट अतिशय ओंगळ आहे, अश्लील आहे, अपमानकारक आहे, हिंसात्मक आहे, या गोष्टी कायद्याने वास्तवात सिद्ध करणे अशक्य होते. कारण व्याख्या द्यायची म्हटले तर, शब्दांना प्रवाही अर्थ होते; वास्तव सिद्ध करायचे म्हटले तर वास्तवाच्या नाण्याला दुसरी बाजू होती. या केसमध्ये आलेल्या अपयशात कोंडी कायद्याची नव्हती तर पुरुषी वर्चस्ववादी समाजव्यवस्थेत सुसंवादाचे, समतेचे, न्यायाचे जीवन मागणाऱ्या विचारसरणीची ती कोंडी होती. दमनकारी व्यवस्थेने केलेली ‘सत्य’ या मूल्यसंकल्पनेची ती कोंडी होती. भवितव्याकडे सावधतनेने पाहायला लावणारी ती पहिली पायरी होती.

आज मोबाईलवर नुसत्या एका बोटाच्या हालचालीने ‘बलात्कार कसा करावा’ याच्या चित्रफिती, व्हिडिओ गेम्स, प्लेस्टेशन, चांगले वाईट, विचित्र, विकृत साहित्य कोणत्याही नियमनाशिवाय, असंतुलित स्वरूपात उपलब्ध होते. या साहित्यातील विकृती, हिंसा, रोगट स्पर्धा, हिडीस विनोद स्त्री ही तुच्छ, टाकावू आणि उपभोग्य वस्तू असते हे बिंबवते. हे ई-साहित्य का व कशासाठी वापरावे याबद्दलची कोणतीही विवेकशील जाणीव आपण समाजात विकसित केली गेली नाही.

आज एखाद्या ‘रोड रॅश’ नावाच्या संगणक खेळात बाईक चालवताना रस्ता क्रॉस करणाऱ्या वृद्ध स्त्रीला ठोकर मारून वेगात पुढे जाऊन आनंदाने खिदळणारी मुले आहेत. मोबाईलमध्ये बलात्काराचे व्हिडिओ पाहून चित्कारणारी सर्व गटातील मुले आहेत. या मुलांना स्त्री ही एक स्वतंत्र मन शरीर असलेली, त्या शरीरावर स्वत:चाच हक्क आहे असे सांगत नकार देऊ शकणारी एक जिवंत माणूस आहे, हे आपण कसे समजावून सांगणार आहोत? ‘बिडी जलाईले...’ असे म्हणत किंवा ‘हुस्न की तिलीसे बिडी, चिलम जलाने आई’ असे म्हणत अत्यंत किळसवाण्या लैंगिक हालचाली करत नाचणाऱ्या स्त्रिया मोबाईलवर पाहताना या मुलांच्या मनात कोणती मानसिकता रुजत असेल? ‘टेररिस्ट’ हा व्हिडिओ गेम खेळताना बॉम्ब पेरत जाणाऱ्या आणि ते बॉम्ब फुटल्यावर आनंदाने ओरडणारा तरुण कोणत्या हिंसक मानसिक आजारांना बळी पडणारा आहे याची आपण कल्पना तरी केलीय का? हिंसक आणि ‘खटियातोड’ टाईप आक्रमक संभोगक्रियेचे धडे देणाऱ्या या लैंगिक साहित्यातून नव्या पिढीला कोणता संदेश आपण देत आहोत?

या सगळ्या माहितीच्या श्रोताचे काहीच नियमन आज अस्तित्वात नाही. नव्या तंत्रज्ञानाच्या नियमनाचा विचार मांडणे म्हणजे ते नियंत्रणच आहे अशी गल्लत केली जाते. नियंत्रण, नियमन आणि दमन या तीन संकल्पनांमधला फरक समजून घेतला तर भारतीयांची सामूहिक मानसिकता घडवायला निश्चितच मदत होईल. प्रवीण पाटकर यांनी ‘आपला परममित्र’ (२०१४)च्या दिवाळी अंकातील आपल्या लेखात म्हटले आहे – “जैविक लैंगिक प्रेरणा असणे ही झाली ‘प्रकृती’, तिला अनिर्बंधपणे वाहू देणे वा विचारशून्यपणे तिचे दमन करणे ही झाली ‘विकृती’ व साकल्याने विचार करून वैयक्तिक सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने तिचे ‘नियमन’ करणे ही झाली ‘संस्कृती’. समाज म्हणून जगायचे असेल तर मानवी जैविक प्रेरणांचे ‘नियमन’ करणे अपरिहार्य आहे, यातूनच आपण संस्कृती निर्माण करतो. ते केले नाही तर दुसरी कोणती तरी सत्ता विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण करीत राहील, भारतीय मानसिकता घडवत राहील आणि आपल्याकडे मात्र प्रवाह पतित असल्यासारखे त्यासोबत वाहत जाण्याशिवाय काही उरणार नाही.” 

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com     

Post Comment

Ashutosh

Fri , 13 January 2017

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......