अजूनकाही
महेश काळेंनी केलेलं ‘हे सुरांनॊ चंद्र व्हा’चं वादग्रस्त आणि प्रचंड टीकेचा भडीमार झालेलं फ्युजन, कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलेलं संततीप्राप्तीबद्दलचं सम-विषम तारखांबद्दलचं वादग्रस्त विधान आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड गाजलेली भारत भेट, या विषयांनी समाजमाध्यमांवर (विशेषतः मराठी समाजमाध्यम) चर्चेचा धुरळाच धुरळा उडवला.
या सगळ्या विषयांना जोडणारे दोन समान दुवे होते. एक म्हणजे देशातल्या कुठल्याही मुद्द्यावर हल्ली पडते, तशी या विषयावरच्या चर्चांमधली पुरोगामी आणि प्रतिगामी फूट आणि उभी-आडवी दुफळी. दुसरं म्हणजे या विषयांवर आलेला मिम्सचा महापूर. काही वर्षांपूर्वी जवळपास अज्ञातवासात असलेले मिम्स सध्या सोशल मीडियामध्ये परवलीचा शब्द झाला आहे. मिम्स शेयर केली नाहीत, मिम्सवर रिअॅक्ट झाला नाही किंवा खळखळून हसला नाही, असा माणूस सोशल मीडियावर सापडणं अशक्य आहे, इतकं मिम्सनी आपलं व्हर्च्युअल आयुष्य व्यापून टाकलं आहे.
सध्याचा राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक भवताल अनागोंदीचा, प्रचंड गोंगाटी आहे. रोज अनेक घटना आजूबाजूला घडत आहेत आणि प्रत्येकाला त्या घटनांवरच आपलं मत -प्रतिक्रिया द्यायची आहे. आपल्या वर्तुळातल्या लोकांना मला काय वाटतं हे कळवायचं आहे. त्यासाठी लोक काय करतात? काही लोक वर्तमानपत्रात लेख लिहितात, न्यूज चॅनल्सवर मत मांडतात. पण ही लक्झरी बोटावर मोजण्याइतपत लोकांना उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे आता माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात आलीच, पण स्वतःचा आवाज मांडायला प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. मग अनेकांनी स्वतःचे ब्लॉग सुरू केले आणि स्वतःचं लिखाण तिथं करायला सुरुवात केली. अनेकांनी फेसबुक-ट्विटरवरच स्वतःचं (कुठल्याही फॉर्मचा मोहताज नसणारं) लिखाण सुरू केलं.
मिम्स हा या लोकशाहीकरण झालेल्या अभिव्यक्तीचाच एक हुंकार आहे. एकूणच सोशल मीडियावर ट्रोल्सचं साम्राज्य असल्यामुळे, मिम्स म्हणजेच ट्रोलिंग असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण मिम्स म्हणजे नेहमीच ट्रोलिंग असंच असतं का? मिम्स कल्चरला गांभीर्याने घ्यायला पाहिजे की, हा रिऍक्ट करून सोडून द्यायला पाहिजे? मिम्स हे तत्कालीन असंतोषाचं दस्तऐवजीकरण करतात का? का त्यांना फक्त हशे आणि टाळ्या गोळा करण्यातच जास्त रस आहे? खरं तर इंटरनेट आणि मिम्स क्रांती हा एका प्रबंधाचा विषय आहे. लेखाच्या मर्यादेत या मिम कल्चरच्या विविध अंगांना फक्त वर वर स्पर्श करता येईल. हा तसाच एक प्रयत्न आहे.
मिम हा शब्दप्रयोग रिचर्ड डॉकिन्स याने ‘The selfish gene’ या त्याच्या पुस्तकात सर्वप्रथम केला. डॉकिन्सच्याच भाषेत सांगायचं तर ‘memes as small cultural units of transmission, analogous to genes, which are spread from person to person by copying or imitation.’ त्यातही आज आपल्या सगळ्यांना परिचित असणाऱ्या इंटरनेट मेमेची संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचं श्रेय माईक गॉडवीनचं (माहिती स्रोत -इंटरनेट). फेसबुक भारतात भारतात आलं २००४ च्या आसपास. फेसबुकबरोबरच मिम्सनी पण आपल्याकडे चंचुप्रवेश केला. काही फेसबुक पेजेस (चटकन आठवणारं पेज म्हणजे रजनीकांत वर्सेस सीआयडी जोक्स पेज) या मिम्सचा वापर करत होते. पण भारतात जसा जसा इंटरनेट डेटा स्वस्त व्हायला लागला, तसं मिम्स बनवण्याचं प्रमाण पण वाढायला लागलं.
माझं वैयक्तिक निरीक्षण असं आहे की (चूक भूल द्या घ्या), अण्णा हजारे यांचं तत्कालीन युपीए सरकारविरुद्ध झालेलं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हा भारतातल्या मिम्स कल्चरच्या इतिहासातला एक मैलाचा दगड आहे. माझ्या फेसबुकीय आयुष्यात मिम्सशी माझा आणि माझ्यासारख्या अनेकांचा परिचय झाला तो याच टप्प्यावर. तत्कालीन युपीए सरकारविरुद्ध खऱ्या खोट्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवण्यात आली. त्यातून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर बनवलेले शेकडो मिम्स इंटरनेटवर फिरायला लागले.
नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपचा आयटी सेल जोमात आला. भाजपसारखी संघटित शिस्तबद्ध यंत्रणा प्रचारात आणि पर्यायाने मिम्स तयार करायला लागल्यावर मिम्सचा महापूर येणं स्वाभाविकच होत आणि तसंच झालं. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यावर तयार होणारे मिम्स कसे होते? तर ते निर्विष नव्हते. ते अतिशय विषारी, कंबरेखाली वार करणारे, अश्लील, जिला कुठलाही आधार नाही, अशी खोटी माहिती पसरवणारे होते. सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात या मिम्सनी खारीचा वाटा उचलला.
आपल्या देशात एखादी गोष्ट होते किंवा होत नाही यामागे नेहमी राजकारण असतं. मिम कल्चरची देशभरातल्या लोकांना ओळख होण्यामागे अशा प्रकारे हे एक राजकीय कारणंच. हळूहळू विरोधी पक्षांनी, कार्यकर्त्यांनी, त्यांच्या आयटी सेल्सनी पण मिम्स निर्मितीचं तंत्रज्ञान आत्मसात केलं. आता पंतप्रधान मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, देवेंद्र फडवणीस आणि इतर भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर मिम्स बनत आहेत. यातले बहुतेक मिम्स कंबरेखाली वार करणारे, अश्लील प्रकारचे आणि वैयक्तिक आयुष्यावर टीकाटिपण्णी करणारे आहेत. आता याला काय म्हणावं? इतिहासाची पुनरावृत्ती होणं? का आपणचं निर्माण केलेलं हत्यार आपल्यावरच उलटणं? का दोन्ही? पण राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या साठमारीमुळे आपल्याकडे मिम्सला सुगीचे दिवस आले आहेत.
पक्ष समर्थकांमुळे मिम्सला ट्रोलिंगचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी मिम्स म्हणजे फक्त ट्रोलिंग असं म्हणणं त्या फॉरमॅटवर थोडा अन्याय केल्यासारखं होईल. कधीकधी हजार शब्दांच्या लेखामुळे जे काम होत नाही, ते एखाद्या मार्मिक मिममुळे होते. फक्त राजकीयच नाही तर साहित्य, चित्रपट, क्रिकेट, पुस्तकं, नाटक, संगीत आणि इतर मराठी माणसांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर पण मोठ्या प्रमाणावर मिम्स तयार होतात. मिम्स म्हणजे फक्त पॉलिटिकल मिम्स हा गैरसमज मोडून काढणारे. मध्यंतरी मराठी प्रकाशक, मराठी साहित्य विश्वाचा अर्थव्यवहार, लोकांची पुस्तक वाचायला नेऊन वापस न करण्याची वाईट खोड या गोष्टींवर फेसबुकवर अनेक भन्नाट मिम्स बघण्यात आले होते. अनेकदा मिम्स कुणावर तरी विनोद करण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. त्यामुळे ट्रोलिंग आणि एखाद्यावर मिम्स करणं यांच्यातली सीमारेषा खूप धूसर आहे.
मिम्स आणि सिनेमे यांचा संबंध फार जवळचा आहे. सिनेमाच्या शॉटचे /संवादाचे टेम्प्लेट्स वापरून अनेक परिस्थितींवर भाष्य करणारे मिम्स मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात. पण तीन सिनेमे मिम्स जगतात लोकप्रियतेचं अढळ स्थान पटकावून बसलेले आहेत. ‘फिर हेराफेरी’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘अशी ही बनवाबनवी’ हे ते तीन सिनेमे. मिम क्रियेटर्स मध्ये हे सिनेमे लोकप्रिय असण्याची कारण काय असावीत? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, या सिनेमांतली पात्रं. ती अतिशय स्वार्थी, हावरट आणि स्वयंकेंद्री आहेत. त्यांना जगाचा उद्धार करायचा नाहीये की, त्यांच्या जगण्याला कुठलाही उद्दात्त हेतू नाहीये. ‘फिर हेराफेरी’मधले राजू, श्याम आणि बाबूभैय्या ही पात्र ‘ईझी मनी’साठी काहीही करू शकतात. त्यांना आलिशान आयुष्य जगायचं तर आहे, पण त्यासाठी कुठलीही मेहनत घेण्याची त्यांची तयारी नाहीये. त्यांच्या पैशासाठी ‘शॉर्ट कट’ घेण्याच्या सवयीतून हास्यकल्लोळ तयार होतो. राजू, श्याम आणि बाबूभैय्या ही पात्रं कुठंतरी आपल्यात दडलेल्या ‘शॉर्ट कट’ मारण्याच्या प्रवृत्तीच प्रतिनिधित्व करतात.
‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधल्या पात्रांचे व्यवहार पण उघडेनागडे आहेत. पॉवर, बाई आणि पैसा याभोवती या पात्रांचे व्यवहार फिरतात. नैतिकता-अनैतिकता या मध्यमवर्गीय पुळचट संकल्पनांना वासेपूरच्या क्रूर-निष्ठूर जगात स्थानचं नाहीये. अनुराग कश्यपच्या युनिव्हर्समधली पात्रंही कळत-नकळत यशराज-करण जौहरच्या सिनेमातल्या चकचकीत गुळगुळीत पात्रांचं विडंबन करतात. कुठं नायिकेला बिचकून असणारा नायक आणि कुठं पहिल्याच भेटीत बिनदिक्कत मुलीचा हात पकडून ‘बियाह हो गया है तुम्हारा?’ असा रोकडा सवाल विचारणारा सरदार खान कुठं? कुठं यशराजच्या सिनेमातला हळुवार रोमान्स आणि कुठं फैसलचा धसमुसळा रांगडा रोमान्स? ‘वासेपूर’मधली पात्रं आपल्यात आत दडून बसलेल्या वखवखलेल्या जनावरांचं प्रतिनिधित्व करतात.
‘अशी ही बनवा बनवी’मधली पात्रं बिंदास घरात राहण्यासाठी अनेकांना फसवत असतात. त्यांना याचा पश्चाताप होतोय खरा, पण शेवटी स्वार्थ त्या पश्चात बुद्धीला पुरून उरतोच. सिनेमा माणसाला-प्रेक्षकाला पडद्यावर त्याची फॅन्टसी जगायला मदत करत असतो. वर उल्लेखित सिनेमातील पात्रं पण अनेक लोकांना त्यांची फॅन्टसी पडद्यावर जगायला मदत करतात आणि त्यामुळेच देशातल्या मिम कल्चरमध्ये या सिनेमांना ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान आहे. अक्षय कुमार, अनुष्का शर्मा आणि रजनीकांत ही मंडळी मिम्स तयार करणाऱ्या मंडळींचा प्राणवायू आहेत. शिवाय ‘कौन है ये लोग, कहाँ से आते है लोग’ असं कपाळावर आठ्या आणून बोलणारा अर्शद वारसी आहेच.
मिम्सबद्दलचं अजून एक निरीक्षण म्हणजे ती प्रस्थापित आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बनवली जातात. मिम्सचा तडाखा जितका प्रस्थापितांना बसतो, तितका त्यांना आवाहन देत असणाऱ्या अंडरडॉग्जना बसत नाही. महेश काळे, इंदुरीकर महाराज, मोदी-ट्रम्प हे सगळे त्यांच्या क्षेत्रातले प्रस्थापितच आहेत. त्यामुळे हे मिम्स सत्ताधारी पक्षाच्या धोरणांना-निर्णयांना विरोध करण्यासाठी वापरले जातात. नीना सिमॉन म्हणते- ‘how can you be an artist and not reflect the times?’
एक ‘प्रोटेस्ट आर्ट’ नावाची संकल्पना आहे. कलेचा वापर एखाद्या चळवळीसाठी किंवा अन्यायकारी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध करणे म्हणजे प्रोटेस्ट आर्ट. मॅक्झिम गॉर्कीच्या ‘आई’ या महाकादंबरीचा रशियातल्या बोल्शेव्हिक चळवळीला प्रचंड फायदा झाला होता. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी अनेक अमेरिकन कलावंतांनी सरकारच्या रोषाची तमा न बाळगता आपल्या कलेच्या माध्यमातून या अन्यायकारी युद्धाचा विरोध केला होता. रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांच्याविरुद्ध ‘Pussy Riot’ या गटाने केलेले जाहीर कार्यक्रम पण असंच एक उदाहरण. भारताला पण प्रोटेस्ट आर्टची एक खूप मोठी परंपरा आहे. दिल्लीमधले नाट्यकर्मी सफदर हाश्मी हे भारतीय प्रोटेस्ट आर्टमधलं अग्रगण्य नाव. हाश्मीची राजकीय गुंडांनी हत्या केली. मंजुलसारखा एखादा कार्टूनिस्ट आपल्या कार्टूनमधून सर्वपक्षीय भ्रष्टाचारावर कोरडे ओढणारा कलावंत तरी दुसरं काय करत असतो? भारतीय प्रोटेस्ट आर्टचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड फॉर्मात असणाऱ्या ‘मिम्स’चा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. कारण सरकारच्या अनेक निर्णयांवर लेख - न्यूज चॅनेलीय चर्चा काही वेळाने सुरू होतात, पण मिम्स अगोदर बनतात आणि सोशल मीडियावर वायरल पण होतात. सध्या चालू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरुद्ध आंदोलनात मिम्सनी पण मोठा वाटा उचलला आहे. हे एक नजीकचं उदाहरण.
खूपजणांना ‘मिम्स’ला इतकं महत्त्व देणं खटकू शकतं किंवा आश्चर्यजनक वाटू शकतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकूणच जे जे काही विनोदी म्हणून आहे, त्याकडे काहीशा तुच्छतेने बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टीकोन. विनोदी साहित्य, विनोदी सिनेमे, विनोदी कलावंत, विडंबन या सगळ्यांकडे एकूणच आपल्याकडे फारसं आदरानं बघितलं जातं नाही. यातूनच एरवी अतिशय कलासक्त आणि आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचणारा यशवंतराव चव्हाणांसारखा मोठा राजकारणी आणिबाणीविरुद्ध भूमिका घेतो म्हणून पु.ल. देशपांडे यांना जाहीर सभेत ‘विदूषक’ म्हणून संबोधतो. दादा कोंडकेंसारख्या महान कलावंताला कायम ‘सोंगाड्या’ म्हणून हिणवण्यात आलं. गोविंदासारख्या श्रेष्ठ अभिनेत्याला पण त्याचा due न मिळण्याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचं कारण त्याचं सातत्याने विनोदी भूमिका करणं हे आहे. तर ‘टवाळा आवडे विनोद’ अशी एकूणच मानसिकता असणाऱ्या समाजात ‘मिम्स’कडे आणि ‘मिम्स’ बनवणाऱ्या कलाकारांकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही, हे तसं साहजिकच.
लोकांना दोन घटका खळखळून हसायला आवडतं तर खरं, पण ते मिम्स बनवणाऱ्याना जितकं इतर लेखक किंवा कलावंतांना गांभीर्यानं घेतलं जात तितकं गांभीर्यानं घेतलं जात नाही, हे खरं. हातात स्मार्ट फोन, भरपूर डाटा आणि अॅप असल्यावर कुणीही मिम्स बनवू शकतं, हे विधान दीडदमडीची भांग घेतल्यावर वाटेल तितक्या कल्पना सुचतात या विधानाइतकंच अज्ञानमूलक आहे. मार्मिक आणि चपखल मिम्स बनवण्यासाठी जी तुफान कल्पनाशक्ती लागते, ती फार कमी लोकांकडे असते. मराठी फेसबुकवर पण अफाट मिम्स बनवणारी मंडळी आहेत. फैजल खान (हा तोच वासेपूरमधला) नावाचं एक पॅरोडी अकाउंट आहे. ते अकाउंट प्रो-राष्ट्रवादी असलं आणि एका राजकीय अजेंड्यानं चालवलं जातं असलं तरी त्या अकाऊंटवरून शेयर केले जाणारे मिम्स खळखळून हसवणारे असतात. कोल्हापूरचा सुमीत पाटील, नाशिकचा चिन्मय देशपांडे, पुण्याचा प्रदीप बिरादर ही मंडळी त्यांनी तयार केलेले मिम्स बघण्यासाठी आवर्जून फॉलो करावीत. मिम्सची एक अर्थव्यवस्था पण तयार झाली आहे. अनेक कंपन्या मार्केटिंग टूल म्हणून मिम्सचा त्यांच्या फेसबुक-ट्विटर पेजवरून वापर करत आहेत. नेटफ्लिक्सचं फेसबुक पेज फार अमेझिंग मिम्स त्यांच्या पेजवरून शेयर करत असतं. जाहिरात क्षेत्रात पण मिम्सना सुगीचे दिवस आहे.
पण सगळ्या आर्थिक-राजकीय-सामाजिक कारणांपलीकडे मोठ्या प्रमाणावर मिम्स तयार होण्याचं एक वैयक्तिक कारण असावं. आपल्या पाऊलखुणा मागे सोडून जाण्याची माणसाची प्रेरणा ही आदिम असावी. मी जितक्या रूम आणि फ्लॅट्स बदलले तिथे मागे माझ्या अस्तित्वाचा पुरावा ठेवून जाण्याचा प्रयत्न करतो. का? तर वर उल्लेख केलेली आदिम प्रेरणाच असावी. एका रूमच्या भिंतीवर मी कर्कटकने माझं नाव कोरून ठेवलं होतं. एका फ्लॅटवर मी टेक केयर ऑफ धिस प्लेस असं खडूने लिहून आलो होतो. अजूनही बरेच अतर्क्य प्रकार केले होते. मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करताना शहरात शिरल्यावर मोठ्या ठळक फॉण्टमध्ये दिसणारी ‘दादू हल्या पाटील’ ही अक्षर असो की ‘शॉशांक रेडिम्पशन’मधला रेड असो ही आपल्या पाऊलखुणा मागं ठेवण्याची प्रेरणा जितकी आदिम आहे तितकीच सर्वव्यापी. मिम्स बनवून आपली डिजीटल फूटप्रिंट मागे सोडून जाण्याची प्रेरणा सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रेरणांना व्यापून उरणारी असू शकतेच. कदाचित का होईना. ‘जितकं वैयक्तिक तितकं वैश्विक’ असा नियम आहेच की!
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 03 March 2020
नमस्कार अमोल उदगीरकर!
कंबरेखालची व खोटारडी अविष्के ( = मीम्स) बनवणं अजिबात समर्थनीय नाही. पण याची सुरुवात मुख्य धारेतल्या माध्यमांनीच केली नव्हे काय? ज्या मोदींना न्यायालयाने २००२ च्या दंगलींत आरोपी मानायला नकार दिला त्यांच्या विरोधात सतत गरळ ओकणं कोणत्या नीतिमत्तेत बसतं? आसारामबापूंवरचा आरोप सिद्ध झालेला नसतांना त्यांना बलात्कारी म्हणणं हही कंबरेखालचा वारच आहे ना? हे प्रमाद कोणाचे? आंतरजालावारल्या सर्वसामान्य माणसाचे नक्कीच नाहीत. ही पापं संघटित प्रसारमाध्यमांची आहेत.
आपला नम्र,
-गामा पैलवान