अजूनकाही
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या मराठी सिनेमाने विविध स्तरावर चर्चा घडवून आणली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केले होते. पहिल्याच सिनेमाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी २०१४ साली ‘आजोबा’ हा सिनेमा केला. पुढे २०१६ साली सायन्स फिक्शनवर आधारित ‘फुंतरू’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. या तिन्ही सिनेमांचे विषय परस्परभिन्न आणि कमी-अधिक फरकाने नव्या वळणाचे होते.
दिग्दर्शनाच्या नावीन्यपूर्ण शैलीमुळे आणि कथानकाच्या दृष्टीने डहाके नेहमी नवनवीन प्रयोग करू पाहतात. ‘केसरी’ हा यालाच पूरक ठरणारा पण व्यावसायिक गणितं लक्षात घेऊन केलेला सिनेमा आहे. त्याचं संगीत आणि दृश्य रचना पाहिली तरी ही बाब स्पष्ट होते. हा सिनेमा फक्त कुस्तीत अडकून पडत नाही. तर त्यापुढे जाऊन गाव, नातेसंबंध, भूतकाळाचं ओझं, खेळातले डावपेच आणि राजकारण अशा विविध विषयाला सहज स्पर्शून जातो. त्यामुळे तो शेवटपर्यत उत्साह टिकून ठेवतो.
या सिनेमाच्या नावातून आणि ट्रेलरमधून नेमकं कथानक काय आहे याचा पूर्णतः अंदाज येऊन जातो. ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी धडपड करणाऱ्या एका तरुण पैलवनाची ही कथा असून त्यात रोमांचक पद्धतीने मिसळलेली पात्रं खिळवून ठेवतात. विशेष म्हणजे सिनेमाचा शेवट काय असणार, याचा अंदाज सिनेमाच्या सुरुवातीलाच येतो. मात्र तरीही कथानक अपवाद वगळता फार निरस होऊ देत नाही. तेवढी सुसूत्रता दिग्दर्शकाने साधली आहे.
सिनेमाचं कथानक एका गावापासून सुरू होतं. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीसाठी ओळखला जातो. त्याच भागातील हे कथानक आहे. बलराम (विराट मडके) या तरुणाला कुस्तीची प्रचंड आवड असते. त्याचे आजोबा (विक्रम गोखले) कधीकाळी कुस्तीच्या आखाड्यातले तगडे कुस्तीपटू असतात. मात्र ‘महाराष्ट्र केसरी’च्या मॅचमध्ये त्यांच्यावर फिक्सिंगचे आरोप ठेवले जातात. त्यातून त्यांच्यावर बंदी आणली जाते. याचं दुःख पाठीवर घेऊन ते आयुष्य कंठत असतात. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या वाट्याला पदोपदी अपमान सहन करावा लागतो. बलरामचे वडील (उमेश जगताप) या अपमानापायी कुस्तीला विरोध करू लागतात. त्यामुळे बलरामची घुसमट व्हायला लागते. पुढे बलरामची वस्तादशी (महेश मांजरेकर) भेट होते. ते त्याला कुस्तीचं प्रशिक्षण देऊ लागतात. कुस्तीमुळे त्याला बरंच काही गमवावं लागतं. आणि पुढे बलराम ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत निवडला जातो.
सिनेमा सुरू होतो तेव्हा कुस्तीपटू खशाबा जाधव यांच्या कारकिर्दीचा उल्लेख येऊन जातो. तोच धागा धरून कथानक पुढे जायला लागतं. पार्श्वभूमीला वाजणारं संगीत कुस्तीचा स्पर्धात्मक सूर सांगून जातं. यातील कॅमेऱ्याची प्रत्येक फ्रेम प्रभावी आहे. कुस्तीच्या आखाड्यात उतरलेला नायक अंगावर माती घेताना असो वा पैलवानाचं पिळदार शरीर तेलाने चमकत राहणारं दृश्य असो! त्याचा सकारात्मक प्रभाव टाकतो.
प्रत्येक पात्रं आपल्या भूमिकेची खास ओळख घेऊन वावरतं. त्यात संवादाची साथ तर आहेच, पण त्याचबरोबर भाषेचा लहेजा अस्सल कोल्हापूर भागातील आहे. बलरामच्या आयुष्यात येणारे चढउतार त्याच्या अभिनयाला साजेसे आहेत. त्यात त्याच्या भाषेचा मोठा वाटा आहे. एका दृश्यात त्याला त्याचे वडील कुस्तीच्या आखाड्यात उतरल्यामुळे रागावतात. शेजारी बलराम जेवत असतो. पण त्याच्या जेवणावर काहीही परिणाम होत नाही. जेवण करून बाहेर आल्यास मित्र त्याला विचारतात, वडील रागवल्यामुळे तू जेवलास का? त्यावर बलराम म्हणतो, “फादर किती का अंगावर चढेना का, आपण पाच भाकरी खाल्याशिवाय उठत नसतोय!” अशा गमतीदार पण पात्रांचं स्वभाव वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या संवादांनी कथानकाची उंची वाढवली आहे.
गावगाड्यात राहणाऱ्या बलरामची घुसमट त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे होते. तरुण वयात घेतलेला निर्णय एका झटक्यात तुकडा पाडतात. पैलवान होण्यासाठी घेतलेली मेहनत आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची आस, यामुळे तो गावगाड्यापेक्षा वेगळा ठरतो. हे सर्व करताना बलरामच्या भूमिकेला विराटने पुरेपूर न्याय दिला आहे. महेश मांजरेकर, विक्रम गोखले, छाया कदम आणि उमेश जगताप यांनी भूमिकांचं आव्हान बखूबी पेललं आहे.
हा सिनेमा एका बाबतीत जरा निरुत्साही करतो, ती म्हणजे त्याची खूपच संथ आहे. पण ते एवढंच! बाकी, ‘केसरी’ ही एका तरुणाची आणि कुस्तीतल्या रोमांचक डावपेचाची कहाणी आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment