नगाऱ्यासारखी गाजत असलेली कविता - सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा
पडघम - देशकारण
आमीर अझीज
  • आमीर अझीज
  • Fri , 28 February 2020
  • पडघम देशकारण आमीर अझीज Aamir Aziz सब याद रखा जाएगा सब कुछ याद रखा जाएगा Sab Yaad Rakha Jayega Sab Kuch Yaad Rakha Jayega

सध्या भारतात आणि भारताबाहेर आमीर अझीझ या भारतीय कवीची कविता गाजतेय. त्या कवितेचे शीर्षक आहे - सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. अनेकांना ती विचार करायला भाग पाडतेय. काहींनी ही कविता ऐकून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतची आपली भूमिकाही बदलली आहे. कवितेचे शब्द नगाऱ्यासारखे वाजायला लागले की, ते माणसाचं मन, मेंदू व्यापून टाकतात. या कवितेतील प्रत्येक शब्द तेच करतो. या कवितेतील प्रत्येक शब्द तुम्हाला हादरवून टाकतो, पेटवतो आणि भानावरही असतो.

त्या कवितेचा हा मराठी अनुवाद...

.............................................................................................................................................

लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

तुझ्या लाठ्या काठ्या गोळ्यांनी जे माझे यार मेलेत

त्यांची याद माझ्या काळजाला सदैव बरबाद ठेवील

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

चांगलंच जाणून आहोत आम्ही,

तू शाईचे रकानेच्या रकाने भरून खोटं नाटं लिहिशील

आम्ही आमच्या रक्तानं खरं काय ते लिहू

सगळं लक्षात राहील...सगळं सगळं लक्षात राहील

दिवसा ढवळ्या मोबाईल इंटरनेट टीव्ही बंद करुन टाकलंस तू

आणि गर्द रात्रीत अख्ख्या शहरालाच नजरबंद करून टाकलंस तू

घरावर हल्ले झाले अचानक हातोड्यांचे

फुटली डोकी, आयुष्याची तोडफोड झाली अख्या

माझ्या कलेज्याच्या तुकड्याला भर चौकात मारलं जात होतं,

तेव्हा मारेकऱ्यांच्या झुंडीत तू मंद हसत उभा होतास

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

दिवसा गोड गोड बोलायचं

म्हणायचं सगळं काही ठिक आहे,

आणि रात्र होताच हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांवर लाठ्या बरसवायच्या, गोळ्या चालवायच्या

आमच्यावर हल्ले करुन

आम्हीच हल्लेखोर असल्याची बतावणी करायची,

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

आणि हे ही लक्षात राहील की

तू किती किती प्रकारे मायदेशाला तोडायचे प्रयत्न केलेस

आणि हेही लक्षात राहील की

आम्ही मायदेशाला एकत्र आणायची किती आस मनी बाळगली

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

आणि जेंव्हा भेकडपणाची चर्चा होईल तेव्हा तुझे काम आठवेल

आणि जेव्हा जिंदायुगाची बात होईल तेंव्हा आमची आठवण निघेल

होते काही लोक

ज्यांचे इरादे भंगले नाहीत लोखंडाच्या हातोड्यांनी

होते काही लोक

ज्यांचा आत्मा विकला गेला नाही

काही लोक तुफान शमण्याची वाट बघत होते तर

काही लोक जिते राह्यले त्यांच्या मौतीचा सांगावा आला तरी

पापण्या एकवेळ डोळे मिटणे विसरतील

पृथ्वी विसरेल आपल्याच अक्षावर फिरणे

आमच्या कापलेल्या पंखांच्या झेपेला

आमच्या फाटलेल्या गळ्यातून निघालेल्या चित्काराला

विसरणार नाही कोणी

आणि तू रात्र लिही

आम्ही चंद्र लिहू

तू जेलमध्ये टाक 

आम्ही भिंती फोडून लिहू

तू एफ आय आर लिही

आम्ही तयार आहोत असं लिहू

तू आम्हांला जीवे मार

आम्ही भूत होऊन लिहू

हत्यांचे सारे पुरावे लिहू

तू न्यायाच्या नावाखाली फुटकळ विनोद लिही

आम्ही न्याय भिंतींवर मांडू

बहिरे ऐकतील इतक्या जोरात बोलू

आंधळ्यांनाही दिसेल इतके साफ लिहू

तू काळे कमळ लिहिशील आम्ही लाल गुलाब लिहू

तू जमिनीवर जुलूम लिही, आम्ही आकाशात इन्किलाब लिहू

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

तुझ्या नावाला काळं फासण्यासाठी

तुझं नाव जिंदा ठेवलं जाईल

सगळं लक्षात राहील

सगळं सगळं लक्षात राहील

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - भक्ती चपळगावकर

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 29 February 2020

उत्तम अनुवाद!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......