अजूनकाही
६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट याच महिन्यात ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.
अमर देवकर लिखित/दिग्दर्शित/अभिनित (कार्यकारी निर्माताही) या चित्रपटातील दोन बालकलाकार रमण देवकर व यशराज कऱ्हाडे यांनाही अभिनयाचा विशेष राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.
याशिवाय पुणे व कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल्समध्येही या चित्रपटाने बालकलाकार, छायाचित्रण, यासह पटकथेचाही पुरस्कार मिळवलाय, शिवाय प्रेक्षक पुरस्कारही!
इतक्या पुरस्कारांसोबत समीक्षकांनाही या चित्रपटाला किमान तीन चांदण्या (STAR) दिल्या आहेत.
तरीही हा चित्रपट किती लोकांपर्यंत पोहचला हा प्रश्नच आहे. खुद्द लेखक/दिग्दर्शकाने चित्रपटाच्या मर्यादित प्रदर्शन व वितरणाबद्दल खंत व्यक्त केली. याचे कारण चित्रपट प्रदर्शन, वितरण व जाहिरात यासाठी येणारा प्रचंड खर्च. हा खर्च बऱ्याचदा चित्रपट निर्मिती खर्चापेक्षा जास्त येतो. निर्माता हा खर्च पेलू शकत नाही. त्यामुळे आज अनेक तयार चित्रपट प्रदर्शनाअभावी पडून आहेत.
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ प्रभात काळात होता किंवा अनंत मानेंचे तमाशापट, त्यानंतर दादा कोंडकेंचे डबलमिनिंग चित्रपट व सचिन पिळगावकर, महेश कोठारेंचे हिंदी चित्रपटाशी साधर्म्य साधू पाहणारे लो-बजेट चित्रपट यात होता, हे आता तोंडपाठ झालंय.
पण विसावं शतक संपलं आणि चित्रपट क्षेत्रासह एकुणच मनोरंजन क्षेत्रात जी तंत्रज्ञान क्रांती झाली, त्याने सिनेमा निर्मितीचं अंदाजपत्रकच बदलून टाकलं.
मुख्य धारेतला हिंदी चित्रपट नायकप्रधान राहूनच बिगबजेट झाला. निर्मिती भव्य, प्रदर्शन भव्य व कमाईही भव्य. त्यातूनच ‘शंभर करोड क्लब’ अशी संज्ञा तयार झाली.
या मोठ्या उलाढालीला समांतर अशी मध्यम वा लो-बजेट चित्रपटांचीही निर्मिती सुरू राहिली. या चित्रपटाचे आशय वेगळे. यातील कलावंत निव्वळ हिरो-हिरोईन या पठडीबाहेर येऊन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करून लोकप्रिय झाले, तर अनेक नवीन कलाकार तंत्रज्ञ या निमित्तानं प्रकाशात आले.
मराठीत ‘श्वास’नंतर विषयात, मांडणीत नावीन्य आले. ‘डोंबिवली फास्ट’ने मराठी बोलपट चित्रभाषेत आणला. त्यानंतर ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांनी वेगळी वाट दाखविली. संदीप सावंत, निशिकांत कामत, संजय जाधव, रवी जाधव, आदित्य सरपोतदार, परेश मोकाशी, असे नव्या दमाचे दिग्दर्शक आले.
मधल्या काळात कांचन नायक, संजय सूरकर, सतीश रणदिवे अशा दिग्दर्शकांनीही चांगले चित्रपट दिले, पण फिल्मकडून डिजिटल माध्यमाकडे परावर्तित व्हायच्या सीमारेषेवर त्यांचा चित्रपट नंतर मागे पडला. त्या परिवर्तनात मराठीत महेश मांजरेकरांनी स्वत:ची एक नवीच शैली विकसित करून यशस्वी केली.
एकविसाव्या शतकात माध्यम क्रांतीने वेग घेतला व डिजिटल माध्यम, संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन ते डिजिटल कॅमेरा या सर्वांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कॄतिक जगातही उलथापालथ केली. इंटरनेटने जग हे खेडं बनवले असे जे म्हटले जायचे, त्याचा जिताजागता पुरावा नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने दिला.
या चित्रपटानं मराठी चित्रपटसॄष्टी कांशीराम यांच्या थेअरीप्रमाणे पूर्ण उलटसुलट केली.
नागराजने आपल्या पहिल्या ‘पिस्तुल्या’ या लघुचित्रपटापासूनच परिघाबाहेरची माणसं चित्रपटात आणली. त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी केली की, या परिघाबाहेरच्या व्यक्तिरेखा साकारायला त्याने माणसंही परिघाबाहेरची निवडली. काही प्रसिद्ध कलाकार घेतले, पण नॉन अॅक्टर ना संधी देऊन त्याने मराठी चित्रपटाची दृश्य व बोलीभाषाही बदलली.
वरच्या वर्ग, वर्णात बंदिस्त शिक्षण जसं महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन व दलित वंचित वर्गात नेले; तसाच नागराजने मराठी सिनेमाला खराखुरा बहुजन दलित, वंचित, भटके यांचा संमिश्र तोंडवळा दिला. यामुळे नागराज मंजुळे नावाचं विद्यापीठच तयार झालं.
भाऊसाहेब खराडे, अमर देवकर हे या विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणता येतील. नागराजच्याही आधी शिवाजी लोटन पाटील यांनी ही वाट खुली केली, पण नागराजमुळे ती खोलवर रूजत गेली.
या वाटेवरचा ‘म्होरक्या’ चित्रपट आपल्याला शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या मुलाचं भावविश्व, स्वप्न दाखवतो. त्याचे शाळेच्या झेंडावंदनाच्या परेडचे म्होरक्या व्हायच्या स्वप्नाच्या या प्रवासात येणाऱ्या अडचणी, गावातला वेडा, वर्गमित्रांची दादागिरी, घरची नाजूक परिस्थिती, अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत, हा सिनेमा संपतो, तेव्हा आपल्या स्वप्नांचं काय काय होऊ शकतं, हे प्रेक्षक स्वत:शीच तपासू शकतो.
चित्रपटाच्या कथेचा जीव तोळामासा आहे, तरीही पटकथेत अनेक वळणं घेत चित्रपट पुढे सरकत राहतो. मध्यंतरापर्यंत तो एका वेडात गुरफटतो व वेग मंदावतो. मात्र मध्यंतरानंतर चित्रपट पटपट पुढे सरकतो. शेवटाबद्दल मतमतांतरं होऊ शकतात. तरीही म्होरक्या का महत्त्वाचा?
तर तो नव्या डिजिटल भारतात जो नवा प्रेक्षक वर्ग तयार होतोय. जो परिघाबाहेर होता, तो आता निर्मितीही करू लागलाय. वेगवेगळे विषय, भावना, पडद्यावर सशक्तपणे आणू लागलाय. त्यांना काय म्हणायचेय, का म्हणायचेय हे माहीत आहे. पण ज्यांच्यासाठी म्हणायचेय त्यांच्यापर्यंत पोहचण्यात प्रचंड अडचणी आहेत. एखादा नागराज, शिवाजी लोटन पाटील हे आव्हान समर्थपणे पेलवू शकतात. कारण त्यांनी आपल्या पहिल्या कलाकृतीतूनच ती चमक दाखवली होती. अमोल देवकरसारख्या नव्या दिग्दर्शकांसाठी हे आव्हान थोडं खडतर आहे. त्यासाठी गरज आहे बहुजन, दलित, वंचितांच्या सांस्कृतिक क्रांतीची.
त्यासाठी या वर्गातील राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील नेतत्वाने पुढाकार घेऊन ‘म्होरक्या’सारखे चित्रपट रूजवले पाहिजेत. समाजवादी कलापथके, आंबेडकरी जलसे व इप्टासारख्या संस्थांनी जी भूमिका निभावली, तीच भूमिका हे नवे चित्रकर्मी निभावताहेत. त्यांना प्रोत्साहन परिघाबाहेरूनच मिळायला हवं.
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment