अजूनकाही
१. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या ठाणे-पुणे-मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह धरला असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
ही बातमी शिवसेनेबरोबरच्या युतीच्या संदर्भात आहे, अशीच तुमची समजूत झाली आहे ना? तसं नाहीये. शिवसेनेशी युती केल्याने फारसं काही बिघडत नाही. या निवडणुका स्वबळावर म्हणजे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीटं देऊन लढवाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयात केलेल्या उसन्या बळावर लढवू नयेत, असं म्हणायचंय कार्यकर्त्यांना. आता 'इलेक्टोरल मेरिट' कधी असतं का सामान्य, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये? मुख्यमंत्री तरी बिचारे काय सांगणार?
…………………………..…………………………..
२. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आणि बिमल जलान यांच्यापाठोपाठ आता नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणारे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेत आहेत, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.
अहो सेनसाहेब, देशात सर्वांत मोठे अर्थतज्ज्ञ कोण आहेत? सर्वांत मोठे देशभक्त कोण आहेत? सर्वांत कर्तबगार, धडाडीचे नेते कोण आहेत? सर्वांत विद्वान कोण आहेत? सगळ्यांमध्ये निडर, बेडर कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांचं जर एकच उत्तर असेल, तर मग निर्णय कोण घेणार? नरेंद्र मोदीच घेणार ना?
…………………………..…………………………..
३. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात गांधीजींचा फोटो नसलेल्या दोन हजारांच्या नोटा एका शेतकऱ्याला एटीएममधून मिळाल्या होत्या. यावेळी त्याच राज्यातल्या एका रहिवाशाला एटीएममधून एक बाजू पूर्णपणे कोऱ्या असलेल्या नोटा मिळाल्या आहेत.
अहो, घाईघाईत होतं असं. एवढ्या नोटांच्या प्रिंटिंगमध्ये किरकोळ मिस्टेक तर होणारच ना? उलट ही बेस्टच आयडिया सापडली. एकदम वेगळ्या प्रकारच्या नोटांचं डिझाइन होईल हे. बनावट नोटा बनवणारेही गोंधळात पडतील, एकच बाजू छापायची तर कोणती बाजू छापायची म्हणून. शिवाय नोटा कॅन्सल करण्याची वेळ आली की, तेही काम सोप्पं. दोन बाजू रद्द करायला नकोत, एकच बाजू रद्द करायची. म्हणजे निम्म्या खर्चाची बचत. आहे ना खरी अर्थक्रांती!
…………………………..…………………………..
४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मानवी तस्करीला म्हणजे देहविक्रयासाठी होणाऱ्या स्त्रियांच्या बेकायदा वाहतुकीला, लहान मुलांच्या वाहतुकीला आळा बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. पण, या व्यवसायात आता २००० रुपयांच्या नोटेचा सर्वाधिक वापर होत आहे, अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.
नोबेल पुरस्कार मिळालेला असला आणि आपल्या अभ्यासाचा विषय असला म्हणून काहीही बोलत सुटतात हे लोक. मानवी तस्करीशी कसलाही संबंध नसलेल्या वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे सांगितलंय ना की, नोटाबंदीमुळे मानवी तस्करीला आळा बसलाय! मग बसलाय म्हणजे बसलाय! तुम्ही काय त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहात का?
…………………………..…………………………..
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवरची चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधीजींची छबी उडवून त्याजागी आपल्या छबीची प्रतिष्ठापना केली आहे. खादीच्या आणि चरख्याच्या रूपाने स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी प्रतीकं मिळवून देणाऱ्या राष्ट्रपित्याच्या या गच्छंतिविरोधात खादी ग्रामोद्योग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांधीजींच्याच मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशाला उगाच वेळ घालवतायत ही मंडळी? तो जुना इतिहास विसरा आता. भारताला खरं स्वातंत्र्य मिळालंय २०१४ साली. आता आपले राष्ट्रपती, राष्ट्रपिता, राष्ट्रदादा, राष्ट्रकाका, राष्ट्रमामा सगळं काही एकच आहेत. लवकरच नोटांवरही नव्या राष्ट्रपित्याची छबी विराजमान होईल पाहा.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment