अजूनकाही
साने म्हणजे विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या ज्ञानशाखांचा गाढा अभ्यास असणारे, राजीव साने.
भागवत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत.
मुंजे म्हणजे डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे, स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि डॉ. बळीराम केशव हेडगेवार, रा. स्व. संघाचे संस्थापक यांचे मार्गदर्शक.
मुसोलिनी म्हणजे इटलीमध्ये फॅसिझमची पायाभरणी करणारा राजकीय नेता, बेनिटो मुसोलिनी.
राजीव साने यांनी पुढील दोन पोस्ट फेसबुकवर प्रसारीत केल्या.
१. दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी
भगवा इस्लाम नको आहे—राजीव साने यांची पोस्ट
२. दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी
सावध ऐका पुढल्या हाका!
चीन AI bio-tech, killer drones इत्यादीत जोरदार प्रगती करतो आहे. पण आंतरराष्ट्रीय दंडकाना तो अजिबात जुमानत नाही. नव्या तंत्रानं विकृत वळण देण्याचा धोका चीन पासून सर्वात जास्त आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच लोकशाही देशांना चीन प्रमाणेच इस्लामिक मूलतत्त्ववादाचा (मुस्लिम जनता नव्हे) धोका आहे. हा धोका आणि चीनपासून असणारा धोका टाळण्यासाठी सर्व लोकशाही राष्ट्रांना एकत्र यावेच लागेल. या आघाडीत एक महत्त्वाचा पार्टनर भारत असणार आहे. त्यामुळे भारत समृध्द आणि समर्थ बनणे ही मानवजातीचीच गरज आहे. अंतिमतः राष्ट्रवादाची गरजही संपेल असा आशावाद दीन दयाळ उपाध्याय, वीर सावरकर अशा राष्ट्रवादी म्हणून महत्त्वाच्या असणाऱ्या मंडळींनीही म्हटलेच आहे. जागतिक शांततेचा मार्ग सध्यातरी राष्ट्र्वादातूनच जातो, ही ऐतिहासिक स्थिती आहे. हे आव्हान खरे महत्त्वाचे आहे. कालबाह्य रूढींना चिकटून गतकातरता बाळगण्याने या आव्हानात आपण कमी पडू.
समृध्द आणि समर्थ आधुनिकतावादी भारत ही मानवजातीची गरज म्हणून पहायला पाहिजे यात कोणत्याही धर्माच्या व जातीच्या नागरिकांना तितकेच स्वारस्य निर्माण झाले पाहिजे व जन्मत घडविणाऱ्यांनी प्रथम स्वतः याबाबत स्पष्ट बनले पाहिजे.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक, मोहन भागवत यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी रांची येथे भाषण करताना पुढील विधान केलं.
“नॅशनॅलिझम शब्द का उपयोग मत किजिये, नेशन कहेंगे चलेगा, नॅशनल कहेंगे चलेगा, नॅशनॅलिटी कहेंगे चलेगा, नॅशनॅलिझम मत कहो. नॅशनॅलिझम का मतलब होता हैं हिटलर, नाझीवाद.” त्यांनी पुढे अशीही पुस्ती जोडली की भारतामध्ये असलेला असंतोष मूलतत्त्ववादामुळे आहे. परंतु भारतातील प्रत्येक नागरिक विविधता असूनही एकमेकांशी जोडलेला आहे. कुणाचंही गुलाम बनू नये आणि कुणालाही गुलाम बनवू नये, हे भारताचं धोरण राह्यलं आहे. सर्वांना एकत्र जोडणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. प्रत्येक भारतीय नागरिक एकमेकांशी जोडलेला आहे, विविधता असली तरीही. भागवत यांनी पुढे असंही म्हटलं की, भारताकडे जगाचं पुढारीपण यावं या उद्दिष्टासाठी रा. स्व. संघांचा विस्तार होतो आहे. देशाची प्रगती होते आहे आणि त्यासोबतच हिंदुत्वाच्या आधारे देशाची जोडणी करण्यासाठी संघ पुढे सरकतो आहे. भारत जगाचा पुढारी बनला तर अवघ्या जगाला मदत होईल, असंही ते म्हणाले.
राजीव साने यांचा संघाशी वा सरसंघचालकांशी काही संबंध असेल असं नाही. परंतु त्यांच्या फेसबुक पोस्ट आणि सरसंघचालकांनी केलेली विधानं यामध्ये विलक्षण एकवाक्यता आहे. मात्र संघाचा इतिहास तपासला तर वेगळीच वस्तुस्थिती हाती लागते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, डॉ. हेडगेवार. १९२६ ते १९३१ ते संघाचे सरसंघचालक होते आणि हिंदू महासभेचे सेक्रेटरीही होते. एकाच वेळी दोन पदांवर कार्य करत होते. दिनांक ३१ मे १९३४ साली पुण्यामध्ये फॅसिझमच्या समर्थनार्थ परिषद झाली. या परिषदेला हिंदू महासभा आणि संघाचा पूर्ण पाठिंबा होता. डॉ. हेडगेवारही उपस्थित होते. या परिषदेमध्ये झालेल्या विचारमंथनामध्ये भारताला एका प्रबळ हुकूमशहाची गरज आहे, अशी मांडणी करण्यात आली. हा हुकूमशहा शिवाजीमहाराजांसारखा असावा, अशीही मागणी एका वक्त्याने केली होती. हुकूमशहा जर तयार करता येत नसेल तर अशी संघटना हवी की, जी हुकूमशाही पद्धतीने चालेल. हे संघटनतंत्र हिंदू महासभेचे नेते डॉ. मुंजे यांनी इटलीच्या दौर्यात इटलीमध्ये फॅसिस्ट पार्टीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनी याच्याकडून आत्मसात केलं. एकचालकानुवर्ती संघटनेचं हे सूत्र भारतात इटलीतून आलेलं आहे. ते भारतीय भूमीत अंकुरलेलं नाही. त्यावर संघाची संघटन बांधणी बेतलेली आहे. फॅसिझमची माहिती देणारे लेखन त्यावेळी ‘केसरी’त प्रसिद्ध झालं होतं. मुसोलिनीने केलेल्या सुधारणांची वारेमाप स्तुती त्या वेळच्या ‘केसरी’ने केलेली आहे. या सुधारणा कोणत्या? सर्व स्त्रियांचा मतदानाचा अधिकार रद्द केला, सर्व बायकांना गृहिणी बनवलं, कोणत्याही माणसाचा अविवाहित राहण्याचा अधिकार काढून घेतला, देशासाठी सैनिकच जन्माला घातले पाहिजेत, नागरिक आणि सैनिक यांच्यात फरक असता कामा नये. मुसोलिनीच्या या सुधारणांचं कौतुक ‘केसरी’ने ३४-३५ साली केलेलं आहे. ‘केसरी’चा वाचकवर्ग बहुसंख्येने ब्राह्मण समाजातला होता. तेच लोक पुढे संघ, हिंदू महासभा यामध्ये सक्रीय होते. १९३८ साली हिंदू महासभेचा ठराव आहे की, गांधींना काय भारत कळलाय, आम्हाला कळलाय भारत. ते हिटलरला सांगत होते गांधी, नेहरूंकडे लक्ष देऊ नका, किरकोळ लोक आहेत ते. १ ऑगस्ट १९३८ चा हा ठराव आहे.
मार्जिया कॅसोरोली नावाच्या इटालियन विदुषीने इटलीतील फॅसिझम आणि भारतातील हिंदुत्ववादी यांच्यासंबंधात ‘इन द शेड ऑफ स्वस्तिका : द एम्ब्युगस रिलेशनशिप बिटविन इंडियन नॅशनॅलिझम अँण्ड नाझी-फॅसिझम’ हा ग्रंथ लिहिला आहे. मुसोलिनीच्या राजवटीमधील भारतीय दूतावास हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ यांच्या संपर्कात होता, तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या गुप्तहेरखात्यानेही त्याची दखल घेतली होती. यासंबंधातील पुरावे सदर ग्रंथात देण्यात आले आहेत. त्यावरून संघ आणि फॅसिझमचं नातं स्पष्ट होतं.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या घटना परिषदेने स्वीकारलेल्या राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. केवळ नशिबाने सत्तेवर आलेल्या लोकांनी तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून आपल्या हाती ठेवलेला असला तरीही हिंदूंनी तो कधीही स्वीकारलेला नाही. तीन हा आकडाच अशुभ आहे. त्यामुळे तिरंगी राष्ट्रध्वजाचा लोकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल आणि ते देशाला घातक असेल, अशा शब्दात ‘ऑर्गनायझर’ या रा.स्व. संघाच्या मुखपत्राने (२२ जुलै १९४७) घटना परिषदेच्या निर्णयावर टीका केली होती.
भारतीय राज्यघटनेने ‘मनुस्मृती’ची दखल घेतलेली नाही, याबद्दल संघाच्या मुखपत्राने टीका केली होती. मनुचे कायदे लोक उत्स्फूर्तपणे पाळतात, असा गौरव करून ‘ऑर्गनायझर’चं संपादकीय घटनातज्ज्ञांवर ताशेरे मारतं.
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नव्हता. ती एक चळवळ होती. त्यामध्ये विविध विचारांचे लोक सहभागी होते. समाजवादी, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, हिंदुधर्मवादी, मुस्लिम, जातीचा अभिमान बाळगणारे, इत्यादी. मात्र काँग्रेस सदस्यांना रा. स्व. संघामध्ये कार्य करता येणार नाही, असा ठराव काँग्रेसने केला होता.
भारतातील सर्वसामान्य माणूस- हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख इत्यादी, धार्मिक असतो. त्याला स्वतःच्या धर्माबद्दल प्रेम असतं, आपल्या धर्माचा अभिमानही असतो. मात्र आपल्यापेक्षा वेगळ्या श्रद्धा असणारे लोक आहेत, त्यांच्या सांस्कृतिक परंपरा भिन्न आहेत आणि त्या सर्वांचा आपण आदर करायला हवा, ही बाब सर्व धार्मिक लोकांनी आत्मसात केलेली आहे. राजकीय कारणांमुळे त्यांच्यामध्ये संघर्षही होतो. देशाची फाळणी झाली त्या वेळी काही लाख लोकांचं शिरकाण झालं. मात्र अशा रक्तरंजित काळातही हिंदूंनी मुसलमानांना आणि मुसलमानांनी हिंदूंना आश्रय देण्याची, त्यांचं रक्षण करण्याची हजारो उदाहरणं आहेत. जर्मनीमध्ये ज्यूंच्या शिरकाणाची मोहीम राबवली गेली, तेव्हा अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. आशिष नंदी या समाजमानसशास्त्रज्ञाने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
बहुप्रवाही हिंदू धर्माचं रूपांतर एकजिनसी समूहामध्ये करणं, त्यातील विविधता संपवून टाकून एका वेगळ्या धर्माची उभारणी करणं, त्यासाठी ‘हिंदू’ या शब्दाचा वापर करणं, हे संघ परिवाराचं राजकारण आहे. धार्मिक बहुसंख्याकांचं रूपांतर राजकीय बहुसंख्याकांत करून राज्यघटनेला धक्का न लावता राज्यव्यवस्था ताब्यात घेणं, हा या कार्याचा पहिला टप्पा २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संघ-भाजप परिवाराने गाठला आहे.
इटलीचा मुसोलिनी आणि जर्मनीचा हिटलर दोघांनाही आपआपली राष्ट्रं—इटली आणि जर्मनी, जगाच्या केंद्रस्थानी असावीत ही आकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी नाझीवाद, फासीवादाचा पुरस्कार केला होता. हिंदुस्तानला जागतिक शक्ती बनवण्याची प्रेरणा आणि नाझीवादाची विचारधारा हिंदू महासभा व रा. स्व. संघ यांनी त्यांच्याकडूनच घेतली. व्यक्तीने आपलं अस्तित्व राष्ट्रामध्ये संपूर्णपणे विसर्जित करणं, हा नाझीवादाचा गाभा आहे. सत्ताधारी म्हणतील ते देशहित, ते ठरवतील तो देशाचा शत्रू आणि ते म्हणतील तो कार्यक्रम कायावाचामने अंमलात आणणं हा नाझीवादाचा वा फासीवादाचा आशय आहे.
राजीव साने तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांना या बाबी माहीत असाव्यात. पण तेही मोहन भागवत यांच्याप्रमाणेच वेड पांघरून पेडगावला जात आहेत. साने असोत की भागवत, ते कोणते शब्द वापरतात हे महत्त्वाचं नाही, तर त्यांना कोणता अर्थ अभिप्रेत आहे, हे जाणून घ्यायला हवं. अन्यथा हिंदू राष्ट्रवाद्यांनी केलेल्या झुंडबळींची, भाजप खासदार प्रज्ञा सिंग यांच्या नथुराम भक्तीची, ‘पोषाखावरून दंगेखोर ओळखता येतात’, या पंतप्रधानांच्या विधानाची वा ‘...गोली मारो सालोंको’ या केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या चिथावणीची उकल करता येणार नाही.
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vivek Date
Sun , 01 March 2020
You are absolutely right in detailing the link between RSS and Fascists as in the article by Marzia Casolari in Economic and Political Weekly issue of January 22 2000 that I have sent you by e-mail. The Ekchalakanuvarti principal of RSS has its origin in Musolini rule in Italy.
Vivek Date
Sun , 01 March 2020
You are absolutely right in detailing the link between RSS and Fascists as in the article by Marzia Casolari in Economic and Political Weekly issue of January 22 2000 that I have sent you by e-mail. The Ekchalakanuvarti principal of RSS has its origin in Musolini rule in Italy.
Vivek Date
Sun , 01 March 2020
You are absolutely right in detailing the link between RSS and Fascists as in the article by Marzia Casolari in Economic and Political Weekly issue of January 22 2000 that I have sent you by e-mail. The Ekchalakanuvarti principal of RSS has its origin in Musolini rule in Italy.
Avadhut Raja
Fri , 28 February 2020
सांनेंची नोटबंदीवरची लोकमानसमधली प्रतिक्रिया वाचतानाच त्यातले तर्कदोष उघडपणे दिसत होते. ते दाखवून देणार्या सविस्तर प्रतिक्रिया इतर वाचकांच्या आल्याच. आज ३ वर्षांनी पाठी वळून पाहताना तर ते तर्कदोष अजून ठळकपणे दिसतात.
Sham Patil
Fri , 28 February 2020
वरील पत्रकार हे पूर्वग्रह दूषित आहेत त्यामुळे मुक्त म्हणून घेणे टाळावे, वरील लेख पूर्वग्रहदूषित मानसिकता दर्शविते,राजकिय लोकशाही मार्गाने निवडुन आलेलं सरकार किंवा संघप्राणित विचार धारेच सरकार जेव्हा फॅसिस्ट वाटायला लागतं तेव्हा समजून घेणे आवश्यक आहे अश्या विचार करणाऱ्या पत्रकारांच्या मुक्त विचारांचा..
Gamma Pailvan
Thu , 27 February 2020
Vividh Vachak यांच्याशी सहमत!
-गामा पैलवान
Vividh Vachak
Tue , 25 February 2020
सुनिलजी, भाजपच्या अलीकडच्या दोन निवडणुकांमधल्या यशाचे कोडे उलगडण्यासाठी आपल्यासारखे पत्रकार ओढून ताणून १९३० आणि १९४० च्या दशकातल्या घटना आणि भारतीय राजकारण्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका, या शिळ्या कढीला ऊत आणून त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या मार्गाने नेहेमीच आपल्याला केवळ सत्तर वर्षांमागे काय घडले याचेच अवलोकन करता येईल, पण सध्याचे चित्र दिसणार नाही. पण ह्या मनोर्यातून बाहेर येऊन जर सभोवताल पहिले तर दिसेल की भाजपचा सध्याचा मतदार ह्या इतिहासाकडे पाहून त्यांना मत देतो आहे, किंवा देईल किंवा ते बदलेल ह्याची विशेष शक्यता नाही. याचे कारण म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी आपला चेहरा या सत्तर वर्षांमध्ये बदलला आहे, तसाच भाजपने सुद्धा, आणि सामान्य माणूस निर्णय गतकाळातील परिस्थिती पाहून घेत नाही तर आजचे चित्र पाहून घेतो. कसे दिसते हे आजचे चित्र? यासाठी नजर भूतकाळातून काढून जरा वर्तमानात आणणे आवश्यक आहे. आपण भाजप आणि संघ यांच्या फॅसिस्ट मुळांचा सतत उल्लेख करण्याऐवजी जर सद्यस्थितीतल्या विरोधी नेत्यांच्या नैतिकतेचा शोध घेतलात तर आपल्याला भाजपच्या दोन विजयांचे कारण कळेल. मुळात मतदार मूर्ख आहे, त्याला लबाडीने फसवून निवडणूक जिंकली आहे, हे ठोकताळे आता जुने झाले. मतदार आता चांगला शहाणा झालाय, सोशल मीडिया आणि जगात इतर पुढारलेल्या देशांमध्ये काय चालते याचे घर बसल्या ज्ञान, यामुळे मतदाराला पूर्वीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करून कसे आपल्याला गंडवले हे समजते आहे. इतिहास हा केवळ पाठ्यपुस्तकांमधून न वाचता आता विविध मार्गांनी माहित करून घेता येतो आहे. म्हणून तो विचारपूर्वक एका पक्षाला मत देतो आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आणखी एक, अलीकडच्या दिल्ली निवडणुकांमधून हेही दिसले की, भाजपालासुद्धा अमरपट्टा मिळालेला नाही. केजरीवाल यांनी कारभार सुधारून दाखवला आणि त्यांचे मागील बालिश राजीनाम्याचे नाटक विसरून त्यांना पुन्हा निवडून देण्यात आले. थोडक्यात, मतदार कुणाचा मिंधा नाही, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मते चोरणे अधिकाधिक अवघड होते आहे आणि त्यामुळे बेलाशक हवे त्यालाच मत देता येते, आणि त्यामुळे जो काम करून दाखवेल त्याला लोक संधी देतील.