‘जोजो रॅबीट’ : हा सिनेमा जोजो या दहा वर्षीय मुलाच्या नाझीकरणावरचं प्रहसन आहे!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अलका गाडगीळ
  • ‘जोजो रॅबीट’चं पोस्टर
  • Sat , 22 February 2020
  • कला-संस्कृतीKala-Sanskruti इंग्रजी सिनेमा English Movie जोजो रॅबीट JOJO RABBIT

दहा वर्षांच्या जोजो या जर्मन मुलाची स्वप्नं काय असतात पाहा- ज्यूंना हुडकून काढणं, मुलींशी दोस्ती करणं आणि युद्धकार्याला जमेल तशी मदत करणं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतील एका लहान शहरात राहणारा जोजो बेट्झल्र हा मुलगा ‘हिटलर यूथ’मध्ये सामील झालेला असतो. पण पोरंच ते, त्यामुळे त्याचा बराचसा वेळ या गटाच्या इतर उत्सुक मुलांसोबत रानात दंगामस्ती करण्यात आणि काल्पनिक ज्यूंवर गोळीबार करण्यात जातो.

तायका वाटीटी दिग्दर्शित ‘जोजो रॅबीट’ हा सिनेमा जोजो या दहा वर्षीय मुलाच्या नाझीकरणावरचं प्रहसन आहे.

नाझी राजवटीमध्ये जर्मनीच्या सर्व शाळांतून राष्ट्रवाद, जर्मन/आर्यन वंशश्रेष्ठत्व, युद्धखोरी, ज्यू़ तिरस्कार, लोकशाही मूल्यांचा धिक्कार, लिंग असमानता, एकाधिकारशाही आणि हिटलर भक्ती ही मूल्यं राजरोस बिंबवली जात असत. निखळ मनाचा जोजोही या मायावी जालात ओढला जातो. त्याच्या मनावर हिटलरची मोहिनी पडते आणि तो ‘हिटलर यूथ’चा सदस्य बनतो. त्यांच्या सैनिकी प्रशिक्षण शिबिरात जोजो दाखल होतो. युद्धात जर्मनीची सरशी होणार यावर त्याचा ठाम विश्‍वास असतो. पण ‘अमेरिकन, ब्रिटिश, रशियन, फ्रेंच आणि चायनीज जर्मनीचा पिच्छा पुरवतायत’ असं त्याचा मित्र यॉर्की मात्र त्याला सांगत असतो.

‘जर्मन सैन्याला दररोज कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं याची झलक तुम्हाला या सैनिकी प्रशिक्षणात मिळेल’, शिबिराचे सूत्रधार कॅप्टन क्लेन्झेन्डॉफ मुलांना सांगतात. शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणाबरोबर पुस्तकं जाळण्याचा कार्यक्रमही पार पडतो. त्यात प्रशिक्षक आणि मुलं कॅम्प फायरमध्ये धपाधप पुस्तकं टाकतात आणि त्याच्या शेकोटीची उब घेत असताना जळती पुस्तकं बघून हुर्यो करतात.

नाझी विचारांच्या विरोधी असलेलं साहित्य जाळण्याचे उपक्रम जर्मनीत जागोजोगी हाती घेण्यात आले होते. ‘जर्मनसंस्कृती विरोधी साहित्याची होळी’ या नावाचा हा कार्यक्रम जर्मन स्टुडंटस् युनियननी हाती घेतला होता. तो नंतर इतर अनके संस्था-संघटनांनी राबवला. या पुस्तकांमध्ये प्रगत जर्मन साहित्यासोबत, कार्ल मार्क्स, फ्रॉईड, ब्रेख्त, आइन्स्टाईन आणि इतर अनेक साहित्यिक विचारवंतांची पुस्तकं जाळण्यात आली. नाझींनंतर हा तिरस्काराचा आणि अज्ञान स्वीकारण्याचा कार्यक्रम अनेक समाजांनी आणि देशांनी राबवला, तसा तो भारतातही राबवला गेला.   

जोजोची आई रोझी त्याला युद्ध आणि हिटलरच्या मोहिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. ‘एक दिवस तू मोठा होशील अणि तुला कोणी तरी भेटेल... खास कोणीतरी... आणि तुझ्या पोटात आनंदाच्या लहरी येतील’.

‘पण मला तू हे का सांगतेयस?’ जोजो आपली नाराजी व्यक्त करतो. 

‘मी सोडून कोण सांगणार हे तुला? प्रेम ही एक सुंदर आणि जगातली सर्वश्रेष्ठ भावना आहे.’

‘इट्स अ स्टुपिड आयडिया. धातू- लोह सर्वात बळकट गोष्ट असते, प्रेम नाही. धातूपासून दारूगोळा बनवता येतो. त्याच्या खालोखाल डायनामाईट आणि मग शस्त्रात्रं.’ नाझी प्रचार यंत्रणेने जोजोच्या मेंदूचा पूर्ण ताबा घेतलेला असतो.

जोजोची आई हे सर्व हसून सोडून देते. पण घराघरात दुफळी माजण्याचा तो काळ होता. कुटुंबं आणि मित्रपरिवारात वितुष्ट निर्माण होत होतं. नाझी पार्टीचे हस्तक बारीक लक्ष ठेवून होते. विरोधाचा सूर निघताक्षणी त्याला संपवण्याचे आदेश होते.   

स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची उर्मी जोजोला येत असते. पण दुसऱ्या बाजूला त्याचं मन साशंक होत असतं, अनेक प्रश्‍न पडतात. मेंदूमध्ये युद्धज्वर आणि ज्यू द्वेष भरलेला, पण मन साथ देत नसतं. अशा वेळेला त्याचा हिटलरशी मानसिक संवाद सुरू होतो. हिटलर त्याच्या समोर अवतरतो. 

चित्रपटाचे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक तायका वाटीटी यांनी उभा केलेला हिटलर वर्णाने निमगोरा, वृत्तीने आनंदी, आणि मार्ग सुचवणारा मित्र आहे. जर्मनवंशवादी, मुठी आपटून, उच्चस्वरात थुंकी उडवून बोलणारा ‘खौफनाक दरिंदा’ आणि नरसंहार करणारा सर्वोच्च सेनापती हिटलर इथे दिसत नाही.

सैनिकी प्रशिक्षणात जोजोला एका सशाची मान मुरगळून मारून टाकण्यास सांगितलं जातं. जोजोला ते जमत नाही आणि सशाला का मारायचं असे प्रश्‍न त्याच्या डोक्यात येत असतात. शिबरात त्याची यथेच्छ टवाळी होते. ‘भित्रा ससा’, शिबिरातली मुलं घोष करतात.

दु:खी झालेला जोजो हिटलरला म्हणतो- ‘ते माझी टवाळी करतात, मला भित्रा ससा म्हणतात. पण सशाला का मारायचं?’

‘अरे, तू दहा वर्षांचा असूनही तुला बुटाची नाडी बांधता येत नाही... तू हाडकुळा आहेस... मलासुद्धा लोकांनी नावं ठेवली होती. बरं ते जाऊ दे. ससा पण सामर्थ्यवान असतो. त्याची शिकार करण्यासाठी प्राणी टपलेले असतात. पण तो कौशल्याने आपला जीव वाचवतो.’ ‘मित्र’ हिटलर सल्ला देतो.

सैनिकी शिबिरात विस्फोटक फेकण्याचं प्रशिक्षण सुरू असतं. ते फेकत असताना जोजो जखमी होतो. शस्त्र नीट न चालवता येणाऱ्या जोजोची टवाळी होते. शिबिरातून त्याची बदली प्रचार पत्रकं वाटण्याच्या कामात होते. त्या काळातच ज्यूंची टवाळी करणारं एक सचित्र पुस्तक तयार करण्याच्या कामाला तो लागतो. नाझी कालखंडातील शाळकरी मुलांमध्येही ज्यूंबद्दलच्या विचित्र कल्पना रूजलेल्या होत्या. ‘ज्यू वटवाघुळासारखे टांगत्यास्थितीत खाली डोकं वर पाय असे झोपतात, त्यांना शिंगं असतात जी त्यांच्या केसाखाली दडलेली असतात आणि त्यांना लोकांचं मन वाचता येतं.’

ज्यूंबद्दलचे हे आणि असे अनेक भ्रम नाझी प्रचार यंत्रणेने पसरवलेले असतात.

चित्रपटाचा प्रहसनात्मक बाज लवकरच गळून पडतो. जवळच बॉम्ब फुटल्याचे आवाज ऐकू येतात. ‘काहीतरी’ करणारी आई नाहिशी होते, दिसेनाशी होते. घरात खायला काहीही राहिलेलं नसतं. लोकांमध्ये अस्वस्थता पसरलेली असते.

ज्यू द्वेष बाळगणाऱ्या जोजोच्या धारणांना आव्हान मिळेल आणि त्याला त्या पुन्हा तपासून घ्याव्या लागतील अशा काही घटना पुढे घडतात. जोजो पुन्हा गोंधळतो, धडपडतो. बाबा नाझी सैन्यात आहेत आणि युरोपातील एका देशात लढतायत असं त्याला सांगितलेलं असतं. याच काळात त्याला हिटलर दिसेनासा होतो. आई काही कामासाठी बाहेर पडलेली असते, पण बराच काळ लोटला तरी ती परतलेली नसते. अशा संभ्रमाच्या काळात त्यांच्या घरावर पोलिसांची धाड पडते. ‘कागदपत्र दाखवा, शाळेचा दाखला कुठेय? बर्थ सर्टिफिकेट कुठेय? हे घर कोणाच्या नावावर आहे?’ या धाडीमुळे जोजो घाबरून हतबुद्ध झालेला असतो. पोलीस पुन्हा दरडावतात- ‘दाखव कागद, ही पुस्तकं इथे काय करतायत? कोण वाचतं ही?’ घराची पूर्ण झडती घेतली जाते. सोफा उचकटला जातो. कपाटातील सामान बाहेर काढून तपासणी केली जाते.

सिनेमा पाहताना या घटना फार दूरच्या- महायुद्धाच्या काळातल्या वाटत नाहीत. त्यांचा प्रत्यय वर्तमान काळातल्या भारतातही मिळतोय. 

नाझी विचारांच्या नॅशनल सोशलिस्ट पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर हिटलर यूथ ही संघटना उभारण्यात आली. लहान मुलांवर लवकर संस्कार करता येतात हे नाझींनी ओळखलं, पण मुलांवर घरातही संस्कार होतात. त्यांच्यापासून मुलांना कसं दूर ठेवायचं हा प्रश्‍न होता. आई-वडिलांच्या संस्कारापासून मुलांना मुक्त करण्याची जरूरी भासू लागली. मुलांसाठी संघटना बांधणीची सुरुवात झाली. मुलांवर संस्कार करून कुटुंबात नाझी विचार पोचवण्याचा हा कार्यक्रम होता. पार्टीच्या मूल्यांपासून वेगळा असलेला विचार, घरातील विरोधातील चर्चा किंवा कृती यावर मुलं लक्ष ठेवू लागली. पार्टीच्या पुढा-यांकडे त्यांनी तक्रारी केल्या. परिणामी कुटुंबियांना ‘समज’ देण्यासाठी पार्टीचे पदाधिकारी गृहभेटी करू लागले. हिटलर यूथची दहशत निर्माण झाली.

मुलींच्या गटांना जिम्नॅस्टिक, नर्सिंग प्रशिक्षण आणि सामाजिक कार्यात गुंतवण्यात आलं.

मुलांना फ्यूरर (हिटलर) भक्तीचे डोस पढवण्यात आले. हिटलर यूथमधून तयार झालेली मुलं नंतर जर्मन सैन्यात दाखल झाली.         

दुसऱ्या महायुद्धाचा अखेरचा टप्पा सुरू झालेला असतो. पण जर्मनी हरण्याच्या मार्गावर आहे, ही बातमी जर्मन नागरिकांपर्यंत नीटशी पोचलेली नसते. जोजोलाही जर्मनीची सरशी होणार आहे, असं वाटत असतं.

प्रत्यक्षात अन्नधान्याचा तुटवडा झालेला असतो. घरी पुरेसं खायला मिळत नसतं. शहराच्या चौकात फाशी दिलेल्या माणसांची शरीरं लटकत असतात. जोजो हे सारं पाहात असतो, पण या घटनांचा नीटसा बोध त्याला होत नाही. अशी दृश्यं त्याच्या अंगवळणी पडलेली असल्याने त्याला त्याचं काही वाटत नाही.

‘खरोखरचा ज्यू समोर आला तर मी मारून टाकीन’, जोजोने यॉर्कीला सांगितलेलं असतं.

‘अरे, पण तू त्याला ओळखणार कसा? ते तर आपल्यासारखेच दिसतात’, यॉर्कीने उत्तर दिलेलं असतं. 

दोस्त राष्ट्रांचं सैन्य शहरात पोचलेलं असतं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. आपल्या बदललेल्या संवेदना घेउून जोजो परिसरातील पडझड बघत असतो. अशा क्षणी जिवलग मित्र यॉर्की त्याला पुन्हा भेटतो. आजूबाजूच्या मलब्यातून वाट काढत ते एके ठिकाणी उभे राहतात आणि एकमेकांना मिठी मारतात. जोजोला हिटलर दिसणं कधीच बंद झालेलं असतं आणि यॉर्कीच्या आलिगंनातच त्याला सर्वस्व मिळतं.  

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 27 February 2020

अलका गाडगीळ,

तुम्हांस एक गलिच्छ, किळसवाणा व हिडीस विनोद सांगतो. पण तो अश्लील आजिबात नाही. चारचौघात सांगता येण्याजोगा आहे. जरा कान करा इकडे.

त्याचं काये की जोजोचं बेत्झलर हे आडनाव आहे ना, ते किनई ज्यू आहे.

कसा वाटला विनोद? आवडला? मी नाही केलाय. हा विनोद चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केलाय. आणि तो तुमच्यासारख्या बहुसंख्य भाबड्या (unsuspecting) प्रेक्षकांवर केलाय. दिग्दर्शक तायका वातिती (खरं नाव तायका डेव्हिड कोहेन) हाही त्याच्या आईकडून ज्यू आहे. पहा तरी, प्रेक्षकांना कसं मूर्ख बनवलंय ते.

बेत्झलर हे आडनाव पोलंडातल्या एका यहुदी दफनभूमीवर सापडतं : http://www.jewishepitaphs.org/wp-content/uploads/2018/10/Bagnowka-Cemetery-Guidebook-English.pdf (कृपया पीडीएफ पान क्रमांक १० बघा).

जे आहे ते असं आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......