‘तत्ताड’ : ग्रामीण विनोद आणि कौटुंबिक ड्राम्याने भरलेला सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘तत्ताड’चं पोस्टर
  • Sat , 22 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie तत्ताड TATTAD ज्योती सुभाष Jyoti Subhash चेतन डी. के. Chetan D.K मानसी पाठक Manasi Pathak

राहुल ओव्हाळ दिग्दर्शित ‘तत्ताड’ हा सिनेमा मराठी सिनेमाच्या पठडीबद्ध परंपरेत भर घालणारा आहे. हे विधान वाचून असं वाटेल की, सिनेमात अत्यंत अनावश्यक गोष्टींचा भरणा असावा. पण असं नाही. कथानक पाहून की, ९० च्या दशकातील रोमँटिक हिंदी सिनेमा आठवायला लागतो, ज्यात नायक आणि नायिकेचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं. पण त्याचबरोबर कथानकाला रोमँटिक, रहस्य, विनोदीपणा आणि गाणी यांचा तडका दिलेला असतो. मात्र तरीही ‘तत्ताड’चं पठडीबद्ध मराठी असणं झाकून पडत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे दिग्दर्शकाने निवडलेली पात्र. इथलं प्रत्येक पात्र कलात्मक पातळीवर उभं राहतं. म्हणजे पडद्यावर त्यांचा नुसता चेहरा दिसला तरी तो एका गावगाड्यातला आहे, हे सहज पटतं.

कथा ग्रामीण भागातली आहे. संताजी (चेतन डी. के.) हा एका बँडमध्ये पिपाणी वाजवत असतो. त्याच लग्नाचं वय झालंय म्हणून त्याची आज्जी (ज्योती सुभाष) स्थळ शोधायला लागते. दहा-बारा मुली पाहून झाल्या तरी संताजीला एकही मुलगी आवडत नाही. दुसरीकडे बबितासाठी (मानसी पाठक) तिचे आई-वडील स्थळ शोधत असतात. शेवटी तिचे आई-वडील संताजीला मुलगी द्यायला तयार होतात. एक दिवस संताजी आणि आजी बबिताला पाहण्यासाठी जातात आणि लग्नाचं ठरवतात. पुढे बबिताच्या मामाला (अनिल नगरकर) घडला प्रकार कळतो. संताजीच्या बँडमध्ये पिपाणी वाजवून पैसे कमवण्यावर त्यांच्या गरजा पूर्ण कशा होतील, असा प्रश्न त्याला पडतो. ठरलेलं लग्न मामामुळे मोडतं आणि मग सिनेमाचं कथानक संताजी आणि बबिताच्या प्रेमाची कथा सांगतं.

‘तत्ताड’ हा शब्द बँडबाजावरून घेतला असावा. बँडबाजात वाजल्या जाणाऱ्या वाद्याचा तत्ताड असा आवाज येतो. म्हणून सिनेमाचं नाव अशा पद्धतीने दिलं असावं. सिनेमाचा गाभा प्रेमकथा असला तरी त्यावर रंगवलेली विनोद तेवढेच प्रभावी आहेत. दोघांचं लग्न मोडल्यानंतर जे काही संगीत वाजतं, ते गंभीर घटनेवर अप्रतिम पद्धतीने केलेला विनोद सहजतेने दाखवून जातं. त्यामुळे विनोदाचा हलकासा स्पर्श अशा अनेक दृश्यात होताना दिसतो. संताजीच्या मित्रांचे विनोद ग्रामीण बोली भाषेतील ठसकेबाज संवाद आहेत. त्यामुळे कथानकात विनोदाला निर्माण झालेल्या जागेचा चांगला वापर करून घेतला आहे. इथल्या विनोदातही द्विअर्थी असा प्रकार दिसत नाही. सिनेमात काही ठिकाणी स्लो मोशन आहे. त्याचा सर्वांत जास्त वापर गाण्यात दिसतो. त्यामुळे पडद्यावर एक परिणामकारक चित्र तात्पुरतं तयार होतं जातं. त्याचा फार काळ परिणाम जाणवत नाही.

सिनेमातल्या जशा प्रभावी गोष्टी आहेत, तशाच काही अप्रभावी आहेत. एका दृश्यात संताजी मित्रांसोबत दारू प्यायला गच्चीवर बसलेल्या आहे. संपूर्ण दृश्य कॅमेरात टॉप अँगलने घेतले आहे. त्याचा परिणाम दृश्य संपेपर्यत पडद्यावर काहीच हालचाल होताना दिसत नाही. तिथे चार मिनिटं सलग संवाद ऐकावे लागतात. जे मुळात निरस आहेत. मात्र त्यानंतरच्या गाण्यातल्या चित्रीकरणाच्या फ्रेम उत्तम वापरल्यात आहेत.

जसं हे कॅमेऱ्याच्या बाबतीत घडतं तसंच काही दृश्यात घडताना दिसतं. संताजी आणि बबिताचं लग्न मोडल्यानंतर संताजी बबिताला भेटायला जातो. एकतर लग्नाची तयारी सुरू असताना ते एकेमकांना साधे दोन शब्द बोलत नाहीत. आणि लग्न मोडल्यानंतर अचानक ते एकाच ठिकाणी रात्री भेटायला येतात. इथे दोन्ही बाजूने कुणीच कुणाशी कुठल्याच पद्धतीने संपर्क न साधतासुद्धा रात्री अचूक वेळी एकाच ठिकाणी ते कसे येतात,, या मागचं कारण कळत नाही. अशी तार्किक पातळीवर न पटणारे काही दृश्यंसुद्धा सिनेमात येत राहतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर सिनेमा मनोरंजन घडून आणतो.

सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कथानकाच्या बाजूने जुळून येतात. त्यामुळे लयबद्धता टिकून राहते. दोन्ही भागात अभिनय शैली तितकीच प्रभावी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काही अपवाद वगळता सिनेमा कलात्मक आणि तांत्रिक पातळीवर परिणामकारकता टिकून ठेवणारी मांडणी करतो. परिणामी अभिनय शैली, कलात्मकता आणि तांत्रिक बाजूंची सांगड सिनेमात दिसून येते. सर्वच कलाकारांनी तगडा अभिनय केला आहे. त्यामुळे सिनेमा मनोरंजनाच्या स्तरावर फार निरस होऊ देत नाही. आणि त्यातला ड्रामा दोन तास गुंतून ठेवतो. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख