दैवतीकरण आणि उदात्तीकरण हे हळव्या भावस्थितीचे मोठे आधार ठरतात. या दैवतीकरणाचे आणि उदात्तीकरणाचे उत्तराधिकारी म्हणविणारे अख्खा समाजच वेठीस धरू पाहताहेत.
पडघम - सांस्कृतिक
रवींद्र शोभणे
  • रवींद्र शोभणे
  • Fri , 21 February 2020
  • पडघम सांस्कृतिक रवींद्र शोभणे प्रतीक मिथक देव गौतम बुद्ध महात्मा फुले

आजपासून चंद्रपूर येथे तीन दिवसीय (२१,२२ आणि २३ फेब्रुवारी) ‘राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव’ सुरू झाला आहे. चांदा क्लब, चंद्रपूर आणि विदर्भ साहित्य संघ आयोजित या महोत्सवाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ कथा-कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.              

आज आपण २०२० मध्ये वावरत आहोत. याला  इंग्रजीत  आणि  क्रिकेटच्या  भाषेत ‘twenty twenty’ असेही  आपण म्हणू  शकू. कारण आजचा जमाना तोच आहे. थोडं गंभीरपणे याकडे पाहिलं तर असं दिसतं की, आपण पाहता पाहता एकविसाव्या शतकाची दोन दशकं ओलांडून पुढं चाललो आहोत. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारूनही जवळ  जवळ  तीस  वर्षे  आता  उलटून  गेली  आहेत. एखाद्या  पिढीचा कार्यकाळ हा  तीस  ते पस्तीस वर्षे एवढा असतो. म्हणजे एक पिढी या काळात उलटून गेली असे जरी म्हटले तरी या एका  पिढीसोबत  साधारणतः तीन  पिढ्या  बांधलेल्या  आहेत. पहिली  मावळती, दुसरी  कर्ती आणि तिसरी उगवती. कुठल्याही काळाचे संचित या तीन पिढ्यांभोवती गुरफटलेले असते. या मधल्या तीन दशकाच्या संदर्भात विचार  करायचा  झाला तर आमच्या पिढीच्या मागची पिढी, आमची पिढी आणि आमच्या मागून येणारी पिढी असा हा तीन पिढ्यांचा एक मोठा पट आहे.

या काळात आमच्या पिढीने या समाजात फार मोठे बदल पाहिले. हे बदल जसे  सामाजिक-भौतिक होते,  तसेच ते भावनिक, मानसिकही होते. या बदलांनी आम्ही अंतर्बाह्य ढवळून निघालो. भरडून निघालो. हे ढवळणं बाह्य आक्रमणांनी झालेलं होतं; पण त्याचे पडसाद  अधिकाधिक आंतरिक पातळ्यांवर उमटू लागले. ही बाह्यं आक्रमणे धार्मिक कारणांनी होते, जातीय कारणांनी होते, पंथीय-गटातटाच्या कारणांनी होते. देव दैवतांच्या विभाजनांनी होते. या आक्रमणांचे परिणाम जसे त्यासंबंधींच्या पुरस्कर्त्यांना भोगावे लागले, तसेच ते त्याविरुद्ध  उच्चरवाने बोलणाऱ्यांनाही भोगावे लागले. प्रसंगी त्यांना त्याची किंमत अधिक मोजावी लागली.

हे सगळे का झाले? कसे झाले? या मागच्या दृश्य आणि अदृश्य शक्तींना आपण ओळखतो. हे का घडते हेही आपल्याला ठाऊक आहे; पण त्यापलीकडे आपण केवळ हतबल असतो. कुठला तरी एक अदृश्य, अजस्त्र हात आपल्या तोंडावर जबरीपणे आवळला जातो. आणि तरीही आपण त्याविषयीच पुन्हा पुन्हा बोलत असतो. हे आपलं  बोलणं इतिहास घडवू पाहतं. तो आपल्या कृतीनं आपण अप्रत्यक्षपणे का होईना, पण घडवत जातोच.

याचे एक इतिहासातलेच उदाहरण म्हणजे महानुभाव कवी नरेंद्र यांचे देता येईल. देवगिरीच्या रामदेवराय राजाने त्यांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’ हे काव्य वाचून ते आपल्या नावे करावे म्हणून त्यांना सोन्याच्या मोहरांचे आमीष दाखवून तसा निरोप पाठवला, तेव्हा त्याने दिलेले उत्तर - ‘ना ना राजे हो ऽ ऐसियाने आमुचिया कविकुलासी कलंक’ लागेल म्हणून बाणेदार उत्तर देऊन देवगिरी सोडले.

आपण शब्दकुळीचे साधक म्हणून या इतिहासाची साक्ष देतो; पण आज ही अशी साक्ष देणेच केवळ आमच्या हातात आहे. आम्ही  कुठल्याही अर्थान यापुढे जाऊ शकत नाही. कारण त्यापुढे  कवी  नरेन्द्रानंतर  कित्येक शतके  महानुभाव  साहित्य सांकेतिक लिपीत दडवून ठेवावे लागले हा साहित्याला राजकीय व्यवस्थेने आवळून धरणारा इतिहास आम्हाला ठाऊक आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याकडे ठळकपणे आणि उघड उघड झाली, याकडे आपण सोयीस्करपणे डोळेझाक करतो.

आणीबाणीच्या काळात शासनाच्या आणि तत्कालीन सरकारच्या विरोधात जाणाऱ्या म्हणून ओळखल्या गेलेल्या ‘सिंहासन’ आणि ‘जनांचा प्रवाहो चालला’ या  दोन पुस्तकांना महाराष्ट्र  शासनाचे वाङ्मयपुरस्कार द्यावेत म्हणून परीक्षकांनी शिफारशी करूनही शासनाने ते पुरस्कार नाकारले होते. आणि शासनाच्या त्या निर्णयाची तत्कालीन आदरणीय, पूज्यनीय  नेतृत्वानेही, पाठराखण  केली होती, हा काहीसा आपल्या विस्मरणात गेलेला इतिहास इथे मला पुन्हा एकदा आठवतो आहे.

आज आपण द्वैती समाजरचनेत वावरतो आहोत. अर्थात ही स्थितिगती आजचीच आहे, असेही नाही. माणूस आपापल्या सोयीनुसार आपापल्या भूमिका बाळगून, बदलून वावरताना दिसतो. समाजाची ही द्वैती प्रकृती तशी सनातन आहे. तशीच  ती  कालातीतही  आहे. त्याचमुळे  आपण  अकारण असे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतो. आपण कोणाविरुद्ध असे  उभे  आहोत? का उभे आहोत? कुणाच्या  सांगण्यावरून असे उभे आहोत? हेही त्यातल्या सक्रिय घटकांना  सांगता  येत नाही. कारण ते स्वत:साठी कधीच असे उभे राहत नाहीत. ते कुणाकरिता तरी उभे राहिलेले असतात. एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे आपले हे सजातीय या ध्रुवीकरणासाठी बळ देणारे स्त्रोत ठरावे यापरता दुसरी शोकांतिका नाही, असे खेदाने म्हणावे लागते.

२.

आपल्या समाजात राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता अशा सत्तासमूहात आम्ही सर्जनशील कलावंत आणखी एक सत्ता महत्त्वाची मानतो. ती म्हणजे शब्दसत्ता. या सगळ्या सत्तांपेक्षा आम्ही शब्दसत्तेला अंतिम आणि स्वयंभू मानत असलो तरी शेवटी ही शब्दसत्ता या पूर्वोक्त सत्तांवर निर्धारित असते, हेही नाकारता येत नाही. या सत्तेची बटिक म्हणून जरी आपण आपल्या या शब्दसत्तेकडे पाहत नसलो  तरी  आपल्याला सर्जनाच्या पातळ्यांवर या सत्तांच्या मुळांशी जाऊन आपल्या स्रोतांचा विचार करावा लागतो. त्या अर्थाने आपली ही शब्दसत्ता या सत्तांच्या परिघातच कुठेतरी आपले सत्त्व शोधत असते. त्याअर्थाने आपण स्वयंभू नसतोच कधी; पण या  सत्तेवर जर अन्य सत्तांची कुरघोडी होत असेल तर आपल्या सत्तांच्या अस्मितेचे टोकदार भाले आपण सरसावून उभे राहतोच. ही अशी परिस्थिती का निर्माण होते? त्यामागची कारणे कोणती असू शकतात, याचीही उत्तरे शोधणे गरजेचे होऊन बसते.

या ठिकाणी मला केशवसुतांचा ‘नवा शिपाई’ आठवतो. आपण शब्दसत्तेचे पायिक त्याच  भावनेने उभे राहण्याचा प्रयत्न करतो. राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता किंवा शब्दसत्ता या  कुठल्याच सत्ता सुट्या किंवा स्वयंभू नसतात असे मी आताच विधान केले. या सत्ता एकमेकींवर स्थिरावलेल्या असतात. आणि एकमेकीत गुंतलेल्याही असतात. हा गुंता, हा तिढा सोडवणे  सोपे नसतेच कधी. तसा प्रयत्न कुणी करीतही नाही. पण या गुंत्याचा, या तिढ्याचा  आपापल्यापरीने अर्थ लावण्याचा प्रयत्न शब्दशक्तीचे शिलेदार करीत असतात.

माणूस  जगायला लागला  तेव्हापासून  या  अशा  गुंत्याचा  अर्थ  शोधण्यात  तो  गुंतून  पडला. शब्दांना लिपीचा आधार मिळाला तेव्हा या प्रक्रियेला  अधिक  अर्थ  प्राप्त  झाला. मातृसत्ताक  समाजरचनेतून पितृसत्ताक समाजरचनेपर्यंत येईस्तोवर आपण आपल्या या प्रवासाचा एक मोठा टप्पा गाठला होता. तथापि सर्जनाची प्रक्रिया सुरू झाली, ती या टप्प्यानंतरच. वेद, उपनिषदे, रामायण-महाभारतासारखी आर्ष काव्ये याच प्रक्रियेचा भाग होती, हे पुन्हा सांगायची गरज नसावी. हा सगळा इतिहास तपासून पाहताना आपल्याला असे दिसून येईल की, या सत्तात्रयींचं नातं शब्दसत्तेशी किती अतूट होतं याची  साक्ष  पटते. आज या निमित्ताने याच  नात्याचे  पदर वेगळ्या संदर्भात आपल्याला तपासून पाहायचे आहेत. 

हे सगळं सांगताना मी भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषांवर वावरत होतो. तसेही आपण आपल्या इतिहासापासून कितीही विलग होण्याचा प्रत्यत्न केला तरी विलग होऊ शकत नाही. कारण आपला एक पाय इतिहासात आणि एक पाय वर्तमानात असतो, हेही तेवढेच खरे. पण म्हणून इतिहासातच रमण्याची आणि त्याचे उदात्तीकरण करण्याची चूक आपण  करू नये. पण  ती आपण  प्रत्येक टप्प्यावर करीतच आलो आहे. इतिहास-पुराणकथांतून आपण दैवते शोधून त्याच त्या भ्रामक कल्पनांच्या जंजाळात अडकून अख्खा समाजच वेठीस धरण्याचा हट्टीपणा करणार असू तर त्याविषयी  बोलण्याचा, प्रतिक्रिया  मांडण्याचा अधिकारही आपल्याला म्हणजे शब्दशक्तीच्या उपासकाला आहेच. कलेच्या पुजाऱ्याला आहेच. आपण निर्माण केलेली  प्रतीके-प्रतिमा आपल्या  प्रगतीच्या कुठल्या  टप्प्यावर  निर्माण  झाल्यात  याचा विचार होणेही तेवढेच गरजेचे आहे.

इथे पुन्हा मी केशवसुतांकडे येतो. देवदानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या असे केशवसुत आजपासून किमान सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणाले होते, हे आपण समजून घ्या. आणि त्यांचे ते मतही तेवढ्याच सहिष्णूपणे सव्वाशे वर्षांपूर्वी स्वीकारले होते, हेही नाकारता येत नाही. ही अशी मते आज आपण स्वीकारायला का तयार नाहीत? आणि अशी मते मांडणाऱ्याची आपण कशी वासलात लावतो, हेही तपासून पाहणे गरजेचे आहे.

सहिष्णुभाव हा कधीही एकपक्षीय नसतो हे खरे असले तरीही त्याचे उत्तर नृशंस हत्त्या हे नसतेच नसते, हा समज आपण आज सोयीस्करपणे विसरत चाललो आहोत की काय, याचा शोध आणि बोध घ्यायची वेळ आलेली आहे. कलावंताला आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रसंगी लक्षणेचा आणि व्यंजनेचाही आश्रय घेणे गरजेचे असते. अशा वाटेने समकालाविषयी अधिक कठोरपणे बोलता येऊ शकते.

याचे मोठे उदाहरण म्हणजे गिरीश कार्नाडांचे देता येईल. रूपकांच्या-प्रतीकांच्या, फँटसीच्या भाषेत या लेखकाने बोलता बोलता समकालावर थेट हल्ला चढविला आहे. गिरीश कार्नाड  कन्नड भाषेत असा उंच स्वर पकडून काही  सांगू  पाहत होते, नेमके  त्याच वेळी  आमचे  मराठी लेखक इतिहासाच्या आणि पुराणांच्या उदात्तीकरणात अडकून पडले होते.

धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा अन्वय वेगळ्या अर्थाने मांडू पाहणारे टी.एस. इलिएटचे ‘अ मर्डर इन अ कॅथेड्रल’  तोवर  आपल्यापर्यंत आले होते. सर्जनशील  लेखकाने  इतिहास  घडविणाऱ्यांच्या  बाजूने उभे न राहता इतिहास भोगणांऱ्याच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे ठरते, हा सुप्रसिद्ध पाश्चात्य विचारवंत नित्शेने दिलेला इशाराही आपणापर्यंत आला होता. आणि  तरीही आपण पुराणातील-इतिहासातील रम्यत्वच शोधत होतो. पुराणकथा-मिथकांचा वेगळा असाही काही अन्वयार्थ असू शकतो या विचारापर्यंत आपण आलोच नव्हतो. आजचे  असहिष्णुतेचे  तण  माजण्यामागे  काही  अर्थाने  हीही  स्थिती  कारणीभूत असू  शकते का, असाही प्रश्न संवेदनाशील मनाला पडला तर नवल नाही.

दैवतीकरण आणि उदात्तीकरण हे हळव्या भावस्थितीचे मोठे आधार ठरतात. आपण त्याशिवाय आपल्या जीवनात मन:शांतीने जगू शकत नाही, राहू शकत नाही; हे जेवढे खरे आहे, तेवढेच या दैवतीकरणाचे आणि उदात्तीकरणाचे उत्तराधिकारी म्हणविणारे अख्खा समाजच वेठीस धरू पाहतात हेही नाकारता येत नाही. यामुळे काय घडते, त्याचे परिणाम काय होतात याचा विचार कधी होत नाही. कारण हे उत्तराधिकारी राजसत्तेच्या आणित्याहीपेक्षा धर्मसत्तेच्या परिघाच्या विस्ताराचा विचार करणारे असतात. त्यादृष्टीने त्यांना सर्वसामान्य माणूस वस्तुजात आणि उपयोजित असाच वाटत आलेला असतो. हे आपल्या पूर्वसुरीच्या काही महत्त्वाच्या  व्यक्तींनी तेव्हाच ओळखले होते.

हे ज्यांनी ओळखले त्यात चार्वाक होते, गौतम बुद्ध होते, महात्मा फुले होते, राजर्षी शाहू महाराज होते, महात्मा गांधी होते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. या  महात्म्यांनी  आपल्या  समाजातील आणि मनातील जळमटं झटकून आपली दृष्टी अधिक स्वच्छ कशी होईल, यासाठी  आपली आयुष्ये पणाला लावली. त्यातून त्यांचीही एक मोठी परंपरा निर्माण झाली. पण या परंपरेच्या वाटेने जाणे म्हणजे काटेरी पायवाट तुडवीत पुढे जाणे असे होते. त्यापेक्षा दुसरी  मोठी पण सोपी परंपरा स्वीकारणे अधिक सोपे होते.

देव हयात आहे, हे सांगायला कष्ट पडत नाहीत; पण देव नाही हे सांगायला मात्र आपल्याला आयुष्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि अनेकांनी ही किंमत मोजूनही आजतागायत आपण आपल्याभोवती फक्त देवत्वाचाच एल्गार ऐकत आलो आहे. देव ही  संकल्पना ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार आकाराला आलेली असते हेही खरे आहे; पण ती पुढे ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार न जाता कुणा एका शक्तीच्या मगदुरानुसार जेव्हा आकाराला येते, तेव्हा मात्र आपण भयभीत होत जगायला लागतो. देव आपल्या मनाला शांती देणारा आहे की, समाजाला भयभीत करणारा आहे, माणसाला मुळातून उखडून टाकणारा आहे, या वादविवादापर्यंत आपल्याला यावे लागते.

देवतत्त्वाची निर्मिती ही मिथकांच्या माध्यमांतून आकाराला आलेली असते. मुळात मिथके हीच काळानुसार बदलणारी असतात. कारण काळाच्याच गरजेतून ती  निर्माण झालेली असतात. त्यामुळे ही मिथके आणि त्याची कालसंगती कशी लावायची हे तपासून पाहण्याचे काम बुद्धिवंतांचे असते. भारतीय समाजातील परंपरेतील ही मिथके तपासून पाहण्याचे आणि त्यांची मोडतोड करण्याचे महत्त्वाचे कार्य पहिल्यांदा महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्यांचे ‘शेतकऱ्याचा असूड’ समजणे सोपे होते; पण ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’मधून मांडलेले त्यांचे विचार मात्र अद्यापही आपल्या पचनी पडले नाहीत. त्यामुळे म.जोतीराव फुले म्हणजे शेतकऱ्यांच्या दुरवस्थेविषयी किंवा वर्णवर्चस्वाविरुद्ध बोलणारे, अशीच त्यांची प्रतिमा आपण स्वीकारली. कारण ती सर्वच पातळ्यांवर स्वीकारार्ह अशी होती. पण त्यापलीकडे त्यांनी  मांडलेली पुराणांविषयीची आणि मिथकांविषयींची मते मात्र आपण फारशी स्वीकारली नाहीत. कारण ती रोखठोक होती. तार्किक आणि बौद्धिकदृष्ट्या सुस्पष्ट होती. त्यामुळेच ही मते सामान्यत: समजून  घ्यायला कठीण होती.

म्हणून त्यांच्या कार्याला  पायाभूत मानणारी मंडळीही दुसरीकडे त्यांच्या विचारांना छेद देणाऱ्या परंपरांना कवटाळताना दिसतात. त्यामुळे आज देवभोळा दिसतो आहे तो बहुश: आमचा बहुजन समाज. बौद्धिक पातळीवर हेच काम जोतीरावांनंतर पंडित राहुल सांस्कृत्यायन यांनी केले. मिथकांची उभी-आडवी तपासणी करीत त्यांनीही आपल्या संस्कृतीवरील ही जळमटं साफ करण्याचा प्रयत्न केला; पण कालप्रवाहात आम्हाला राहुल सांस्कृत्यायन यांचाही विसर पडतो,चार्वाक इतिहासात पुसला जातो, जोतीराव फुले आपल्या सोयीपुरते आपण तपासून पाहतो.

या वेगळ्या परंपरेचा उच्चार मी इथे अधिक ठळकपणे यासाठी करतो की, आजच्या आपल्या समाजात काही अनवट प्रश्नांनी आपल्या जगण्याला जे विळखे घातलेले आहेत, त्यांची उत्तरे या  समांतर विचारधारेत होती आणि आहेत, असा माझा स्पष्ट समाज आहे. तेव्हा आजच्या  विचारवंतांच्या, प्रतिभावंताच्या पुढे या निमित्ताने आणखी मोठी आव्हाने आहेत. ती केवळ देशी म्हणण्याइतपत सोपी नाहीत. तशीच कृषिसंस्कृतीच्या आणि कृषिवलांच्या जगण्याच्या  वर्तुळापुरतीही मर्यादित नाहीत. पण असे असूनही कृषिवलांच्या आणि कृषिसंस्कृतीच्या  दैनंदिन जगण्याच्या आणि त्यांच्या मूलभूत समस्यांच्या मुळाशी जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातून सापडतात.

३.

परंपरा स्वीकारणारे आणि परंपरा नाकारणारे असे ढोबळपणे आपण विभाजन करीत असतो. अर्थात असे ते असतेही. यात मधलाही एक गट असतो. तो खूपदा संभ्रमात असतो. त्याला अनेक प्रश्नांनी व्यथित केलेलं असतं. मी या मधल्या गटाच्या बाजूनं विचार करतो. कारण आपल्याला, आहे या व्यवस्थेतले सगळेच घटक स्वीकारता येत नाही. किंवा सगळेच घटक नाकारताही येत नाहीत. या स्वीकार-नकारांच्या झगड्यात आपण आपल्यालाच पुन्हा पुन्हा  तपासून पाहावे लागते. आणि असे तपासून पाहण्याच्या  प्रक्रियेत आपल्या हातात काही लागते का, हेही तपासून पाहण्याचा हा आपला प्रवास आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

नवता कधीही आकाशातून अवतरत नाही. ती परंपरेतूनच जन्माला येते. परंपरेतल्या काही  स्फुल्लिंगांतून आपल्याला नव्या दिशा शोधण्यासाठी काही पलिते पेटवावे लागतात. जुने चित्र पूर्णतः पुसून नवे चित्र काढता येत नाही तर जुन्याच चित्रांतून नव्याची निर्मिती करायची असते. आपण समाजात वावरतो तेव्हा हा समाज नाकारून नवा समाज निर्माण करणे हे काहीसे स्वप्नाळू ठरावे. आणि हे अशक्यही आहे. कधीतरी ही पृथ्वी निर्मनुष्य होईल अशी भीती वर्तविली जाते. पूर्णतः पृथ्वी कधीही नष्ट झाली नाही आणि होणारही नाही. तेव्हा आहे त्या भूमीवर आपल्याला आपली जमीन कसायची असते, हेही आपण नाकारायला नको. 

आपल्या मनात सातत्याने भीती वास करीत असते. ही भीती अनेक प्रकारची असते. आपल्या अस्तित्वाची भीती, सामाजिक मूल्यऱ्हासाची भीती, भाषेची भीती, निसर्गाच्या ऱ्हासाची भीती, पराभवाची भीती, मृत्यूची भीती आणि आणखी अशाच अनेक प्रकारच्या भीती. आपण  याप्रकारच्या भीती घेऊनच समाजात वावरत असतो. असेही म्हणता येईल की या भीती आहेत, म्हणूनच माणूस उभा आहे. तो नेटाने आणि रेट्याने आपले जीवन जगतो आहे. इथे  अक्षय  असं  काहीही  नसतं. पण  आहे त्याला जपण्याचा आणि त्यातून नव्या उन्मेषांना जन्म देणाऱ्या गोष्टींना  आपण जीवापाड जपण्याचा प्रयत्न करीत असतो. लेखक-कलावंत, तत्त्वज्ञ, संशोधक, समाजसुधारक हे सगळे  एकाच वेळी  या  असण्याच्या  प्रेमात पडून त्यातून आपल्याला जे हवे ते वेचण्याचा प्रयत्न करीत असतात. यात प्रत्येकाच्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी त्यांच्या समोरचे उद्दिष्टमात्र समान असते. ते म्हणजे समाजासाठी, या भवतालासाठी आपली  जबाबदारी, दक्षता, नैतिकतेची बूज. आणि यात जर काही त्रुटी किंवा भेगा पडताना दिसत असल्यास आपण आतून अस्वस्थ होतो. त्या भेगा बुजविण्याचा प्रयत्न करतो.

हा प्रयत्न लेखक कलावंतही आपापल्यापरीने करताना दिसतो. हा प्रयत्न करताना निकराने आपण प्रतिकूलतेशी झगडतो. त्या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये कसे परावर्तीत करता येईल, याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. या प्रक्रियेत काही प्रश्न अतिशय तीव्रतेने आपल्या  समोर  येऊन आपला जबडा पसरवूनउभे राहतात. असे प्रश्न आजही आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरे कालच्या प्रश्नांत अडकून पडलेली आहेत. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 25 February 2020

रवींद्र शोभणे,

नीत्शेचा हा इशारा विशेष लक्षवेधक वाटला :

सर्जनशील लेखकाने इतिहास घडविणाऱ्यांच्या बाजूने उभे न राहता इतिहास भोगणांऱ्याच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे ठरते,


काश्मिरी हिंदूंचा भीषण वंशविच्छेद होत असतांना कोणीही लेखक भोगणाऱ्यांच्या बाजूने लिहित नव्हते. आणि गप्पा मात्र विश्वबंधुत्वाचा आणि संविधानाच्या मारायच्या. आणि बोंबा ठोकायच्या त्या हिंदूंच्या पुराणांच्या विरोधात. काय तर म्हणे मिथकं आहेत. कोणाचं काय बिघडलं मिथकांमुळे ?

तुम्ही म्हणता तो विचारवंत वर्ग लोकांपासून तुटलेला आहे. ही एक शोकांतिका आहे, जी तथाकथित विचारवंतांच्या लक्षातही येत नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......