मुख्यमंत्री शरद पवार यांच्या केबिनबाहेर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण फाईल घेऊन ताटकळत बसले होते...
पडघम - राज्यकारण
कामिल पारखे
  • शंकरराव चव्हाण, शरद पवार, इंदिरा गांधी, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सत्यसाईबाबा
  • Thu , 20 February 2020
  • पडघम राज्यकारण शंकरराव चव्हाण Shankarrao Chavan शरद पवार Sharad Pawar इंदिरा गांधी Indira Gandhi पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan उद्धव ठाकरे Uddhav Thackeray अशोक चव्हाण Ashok Chavan सत्यसाईबाबा Sathya Sai Baba

१) माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण नंतर त्यांना ज्युनियर असलेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामिल झाले, मासोळी पाण्याबाहेर काढल्यावर तडफडते, तसे राजकीय नेते सत्तेबाहेर पडल्यास त्यांचे होते, हे यामागचे कारण. 

२) “मी आज जो काही आहे, तो केवळ यांच्या कृपेने आणि आशीवार्दाने आहे!” असे शंकरराव चव्हाण यांनी त्या लोकांना ठणकावून सांगितले. ते छायाचित्र पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबा यांचे होते!

३) महाराष्ट्रातील सत्तेतून अगदी अनपेक्षितरीत्या पायउतार झालेल्या भाजप नेत्यांचा तळपळाट आज आपण सगळे अनुभवतो आहोतच! अशोक चव्हाण यांनी आपले वडील शंकरराव चव्हाण यांनी सुरू केलेला एक पायंडा चालू ठेवला आहे!

या तिन्ही विधानांचे संदर्भासह स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे - 

............................................................................

१.

ही घटना तशी बरीच जुनी आहे. शरद पवार यांचे पुलोदचे (पुरोगामी लोकशाही दल) सरकार महाराष्ट्रात १९७८ साली स्थापन झाल्यानंतर मुंबईत, मंत्रालयात झालेली ही घटना. त्यानंतर १० - ११ वर्षांनंतर मी औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार असताना, त्याचे निवासी संपादक एम. एच. जाधव यांनी बातमीदारांच्या एका बैठकीत ही आठवण सांगितली होती. ती घटना घडली तेव्हा जाधव कुठल्या तरी दैनिकाचे मुंबईतील बातमीदार होते आणि मंत्रालय हे त्यांचे बीट होते. एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर फाईल घेऊन ताटकळत बसलेली एक व्यक्ती पाहून जाधवांना धक्का बसला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी, मुख्यमंत्री त्यांना कधी आपल्या दालनात बोलावतील याची वाट पाहत बसलेली ती व्यक्ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि त्या वेळी कॅबिनेट मंत्री असलेले शंकरराव चव्हाण!

७०-८०च्या दशकांत मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार ही व्हीआयपी मंडळी विधानमंडळ कव्हर करणार्‍या अनेक बातमीदारांना व्यक्तिश: ओळखत असत. या बातमीदारांची संख्याही त्या काळात खूप कमी होती. पत्रकार परिषदांत अनेकदा या नामदार व्यक्ती काही पत्रकारांना नावानं हाक मारत असत. पणजी येथील गोवा सचिवालयात पत्रकार कक्षामध्ये या काळात मी बसत असल्यानं मलाही हा अनुभव होताच.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सलग ११ वर्षं राहण्याचा विक्रम करणार्‍या वसंतराव नाईक यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५मध्ये तडकाफडकी काढून त्यांच्याऐवजी शंकरराव चव्हाण यांची नेमणूक केली होती. शंकरराव चव्हाण यांनी या काळात ‘झिरो बजेट’ची संकल्पना राबवली. तसेच प्रशासनातील शिस्त आणि दरारा यामुळे ‘हेडमास्तर’ असा लौकिकही कमावला. मात्र आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्याशी वागताना त्यांनी स्वीकारलेल्या लाळघोटेपणामुळे त्यांना कठोर टीकेचेही धनी व्हावे लागले होते. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या मंत्रिमंडळात शरद पवार हे ऐन तिशीतील सर्वांत तरुण मंत्रीही होते.

एका माजी मुख्यमंत्र्यावर मंत्रालयात ताटकळत बसण्याची वेळ कशी आली, हे समजण्यासाठी त्या काळातील वेगवान राजकीय घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील. आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींचा आणि त्यांच्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण वगैरे नेत्यांनी काँग्रेसमधून इंदिरा गांधींची हकालपट्टी केली आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखाली ‘अर्स काँग्रेस’ पक्ष स्थापन केला. या दरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी स्वत:चे पक्ष निर्माण केले. उदाहरणार्थ जगजीवन राम आणि नंदिनी सत्पथी यांचा ‘लोकशाहीवादी काँग्रेस पक्ष’. महाराष्ट्रातही शंकरराव चव्हाण आणि खासदार बाळासाहेब विखे यांनी इंदिराबाईंची काँग्रेस सोडून ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस’ स्थापन केली होती. या पक्षाला उपहासाने ‘मस्का’ या आद्याक्षराने ओळखले जायचे.

(हेच शंकरराव चव्हाण पुढे काँग्रेस पक्षांतर्गत शरद पवार यांच्या विरोधात असलेल्या इंदिरानिष्ठ वा पक्षश्रेष्ठी निष्ठावंतांचे म्होरके म्हणून ओळखले जात असत! पवारांच्या तुलनेत ‘निष्ठावंत’ समजले जाणारे ज्येष्ठ खासदार सुरेश कलमाडी वा महाराष्ट्रात काँग्रेसचे नऊ वर्षे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनीसुद्धा अनुक्रमे लोकसभेची आणि विधानपरिषदेची निवडणूक भाजप-सेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली होती, याची किती लोकांना आज आठवण आहे?)

आणीबाणी पर्वानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या वेळी राज्यात जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र एकमेकांविरुद्ध लढलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या ‘अर्स काँग्रेस’ आणि ‘इंदिरा काँग्रेस’ यांनी निवडणूक निकालानंतर एकत्र येऊन ‘अर्स काँग्रेस’च्या वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या मंत्रिमंडळात असलेल्या शरद पवार यांनी वसंतदादा पाटील सरकारविरुद्ध बंड करून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांची मस्का वगैरे पक्षांना एकत्र आणून स्वत:च्या नेतृत्वाखाली ‘पुरोगामी लोकशाही दला’चे वा ‘पुलोद’चे सरकार स्थापन केले होते.

याच पुलोद सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण एक मंत्री म्हणून सामिल झाले होते. आता भूमिका बदलल्या होत्या. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले शरद पवार आता मुख्यमंत्री होते आणि एकेकाळचे मुख्यमंत्री चव्हाण आता पवारांच्याच हाताखाली मंत्री म्हणून काम करत होते. त्यामुळे आपल्या खात्यासंदर्भातली फाईल घेऊन चव्हाण आता मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर वाट पाहत बसले होते!

याचे पत्रकार जाधव यांना खूपच वैषम्य वाटले. न राहवून त्यांनी म्हटले - “अहो चव्हाणसाहेब, हे काय? तुम्ही सरळसरळ मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जायचे की नाही? त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेण्याची काय गरज आहे? अन मुख्यमंत्री पवार खरेच खूप बिझी असतील तर इथे ताटकळत न बसता तुम्ही नंतर भेटायला या की!’’ यावर शंकरराव चव्हाणांचा काय प्रतिसाद वा कृती होती, हे आता आठवत नाही.

शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव आणि एके काळी स्वत:ही राज्याचे मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झाले आहेत, त्यावरून ३० वर्षांपूर्वी ऐकलेला वरील किस्सा आठवला.

सत्तेच्या कॉरिडरमध्ये घडलेल्या आणि ‘याला जीवन ऐसे नाव’ या पंक्तीची आठवण करून देणार्‍या अशा अनेक किश्शांना पत्रकार साक्षीदार असतात. मात्र या सर्वच घटनांना वृत्तपत्रांच्या कॉलमांत जागा मिळत नाही.

२.

संपादक जाधव यांनीच शंकरराव चव्हाण यांच्यासंबंधीचा सांगितलेला आणखी एक किस्सा आहे. (हेच जाधव नंतर ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’चे पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम करत असत.) चव्हाण महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री झाले, अनेक वर्षे त्यांनी केंद्रात महत्त्वाची खाती सांभाळली. असे असले तरी महाराष्ट्रात ते लोकनेते वा मास लीडर कधीही नव्हते. मात्र ते काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचे ‘दरबारी नेते’ही नव्हते.

एक उत्तम प्रशासक आणि हेडमास्तर म्हणूनच ते अधिक गाजले. संपादक जाधव सांगत होते की, एकदा नांदेडहून काही काँग्रेस कार्यकर्ते आपल्याबरोबर मतदारसंघातील काही लोकांना घेऊन चव्हाणसाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीत त्यांच्या शासकीय निवासस्थानात गेले. बहुधा त्यांचा पाहुणचार फारसा चांगला झाला नसावा. त्यामुळे त्या लोकांच्या म्होरक्याने आपली नाराजी चव्हाण यांच्यासमोर बोलावून दाखवली. तो म्हणाला, “साहेब, हे काही बरं नाही. तुम्ही आज जे काही आहात, ते आम्हासारख्या तळागाळात राबणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहात!” यावर काहीही न बोलता चव्हाण यांनी त्या सर्व लोकांना हॉलमधून आतल्या दालनात नेले आणि त्यांना तिथले एक मोठे छायाचित्र दाखवले. “मी आज जो काही आहे, तो केवळ यांच्या कृपेने आणि आशीवार्दाने आहे!” असे त्यांनी त्या लोकांना ठणकावून सांगितले. ते छायाचित्र पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबा यांचे होते!

शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हे विलासराव देशमुख यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबा यांचे स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले होते. ही तशी अगदी अलीकडची घटना, त्यामुळे अनेकांना ती आठवत असेलच.

३.

माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण नंतर त्यांना ज्युनियर असलेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामिल झाले, मासोळी पाण्याबाहेर काढल्यावर तडफडते, तसे राजकीय नेते सत्तेबाहेर पडल्यावर त्यांचे होते, हे यामागचे कारण. महाराष्ट्रातील सत्तेतून अगदी अनपेक्षितरीत्या पायउतार झालेल्या भाजप नेत्यांचा तळपळाट आज आपण सगळे अनुभवतो आहोतच!

शंकरराव चव्हाण हे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सामिल झाले, तेव्हा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आपली सत्ता गेल्यानंतर दुसर्‍या नेत्याच्या मंत्रिमंडळात साधा मंत्री होण्याची देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी! मात्र शंकरराव चव्हाण यांचा हा कित्ता महाराष्ट्रात लवकरच इतरांनीही गिरवला. मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर आपल्या मुलीला एम. डी. परीक्षेत मार्क वाढवून दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर त्यांना आपले पद सोडावे लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांनी महसूलमंत्री पद सांभाळले. तामिळनाडूमध्येही आधी तीनदा मुख्यमंत्री असलेले ओ. पन्नीरसेल्वम आता पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सामिल झाले आहेत.

काँग्रेस सत्तेवर असताना मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांनी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात सत्ताकेंद्र असलेल्या ‘प्राईम मिनिस्टर्स ऑफिस’ किंवा ‘पीएमओ’मध्ये अत्यंत महत्त्वाचे पद सांभाळले होते. पण मंत्रिपदाच्या या शर्यतीत केवळ अशोक चव्हाण यशस्वी ठरले.

याबाबतीत आपले वडील शंकरराव चव्हाण यांनी सुरू केलेला एक पायंडा त्यांनी चालू ठेवला आहे!

.............................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......