अजूनकाही
१. श्रीनगरच्या लष्करी तळांच्या जवळपास राहणाऱ्या सामान्य जनतेला लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बाजारापेक्षा निम्म्या दराने सामान मिळतं, असं उघडकीला आलं आहे. पेट्रोल, डिझेल यांच्यासोबतच खाण्याच्या काही वस्तू अधिकाऱ्यांकडून बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीला मिळतात; तांदूळ, मसाले आणि भाज्यांचीदेखील विक्री केली जाते, अशीही माहिती खुद्द या स्थानिकांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे.
गोपनीयतेच्या नावाखाली पवित्र गायी पाळून ठेवल्याचे हे परिणाम. सैनिक म्हटलं की आपण नुसते गहिवरतो आणि लष्करातल्या भ्रष्टाचाराचा फटका त्याच सैनिकांना, सामान्य जवानांना बसत असेल, हे विसरतो. लष्कराच्या कँटीनमधून जवानांना मिळणाऱ्या कोट्याचंही काय होतं, हे राष्ट्रीय उघड गुपित आहे.
…………………………
२. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल ‘व्हायब्रंट गुजरात’ संमेलनात सहभागी होण्यासाठी गांधीनगरमध्ये गेले असता महात्मा मंदिरात पत्रकारांना पाहताच त्यांनी चक्क पळ काढला. पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करणार, याचा अंदाज आल्यावर त्यांनी मंदिराच्या मागील दरवाज्याने पळ काढला. पत्रकार येत असल्याचे पाहताच उर्जित पटेल वेगाने धावू लागले. काही पायऱ्या सोडत अगदी ट्रेन पकडण्यासाठी धावल्याप्रमाणे ते गाडीजवळ पोहोचले. पटकन् गाडीचा दरवाजा उघडला, गाडीत बसले आणि गाडी वेगाने निघून गेली.
याला म्हणतात प्रसिद्धीपराङ्मुखता. इतक्या क्रांतदर्शी आणि अभूतपूर्व यशस्वी निर्णयाचं श्रेय घेण्याचं सोडून पटेल सरळ निघून गेले. अशी सालस माणसं आजकालच्या काळात दुर्मीळ. देशाच्या शीर्षस्थानी जेव्हा एखादा रत्नपारखी विराजमान असतो, तेव्हाच अशी झळझळीत रत्नं आपल्या तेजाने लोकांचे डोळे दिपवून टाकतात (कोण रे तो, कोण म्हणतोय, लोकांचे डोळे पांढरे करतात!!!)
…………………………
३. भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या संकेतस्थळावर विकणाऱ्या अॅमेझॉनला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. अॅमेझॉनने तात्काळ या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी. अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील, अशी तंबीच स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली आहे.
देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या उपरण्याने जाहीरपणे तोंड पुसणाऱ्या, घाम टिपणाऱ्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातल्या एका सहकारी मंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याचं पाहून ऊर अभिमानाने आणि देशभक्तीने भरून ५६ इंचाचा झाला!!
…………………………
४. मुंबईत वाहतूक पोलिसांची अनोखी गांधीगिरी. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांना दंड भरायचा नसल्यास 'हेल्मेटसक्तीचे फायदे आणि तोटे' या विषयावर निबंध लिहायची शिक्षा.
ही शिक्षा त्यांना काही 'शिक्षा' देईल, अशी शक्यता वाटत नाही. लहानपणी शाळेत असे किती निबंध लिहिले असतील. पण, शाळेत नागरिकशास्त्रात जे काही शिकलो, ते व्यवहारात विसरून जायचं असतं, हीच शिकवण अधिक प्रबळ ठरलेली आहे ना आजवर?
…………………………
५. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये बँक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, अशी विनंती राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने (एनओबीडब्ल्यू) निवडणूक आयोग आणि अर्थ खात्याकडे केली आहे.
हो ना, बिचाऱ्यांनी नोटाबंदीच्या काळात दोन महिन्यांतच जवळपास तीनेक वर्षांचं काम करून झालेलं आहे. काही बँक कर्मचाऱ्यांनी तर इन्कम टॅक्स, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आपणच आहोत, अशा थाटात ग्राहकांशी दुर्व्यवहार करून झालाय. त्यामुळे बँकेतलेच हे चेहरे मतदान केंद्रात दिसले, तर लोकांना त्या रांगा आणि बँकेतले मनस्ताप आठवून त्याचा मतदानावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment