शासनाने पूर्ण विचारांती १९ फेब्रुवारी ही तारीख ‘शिवजयंती’ म्हणून स्वीकारली आहे. तिचा यथायोग्य मान आपण राखला पाहिजे.
पडघम - सांस्कृतिक
आदित्य कोरडे
  • शिवाजी महाराजांची रायगडावरील मेघडंबरी
  • Tue , 18 February 2020
  • पडघम सांस्कृतिक शिवाजी महाराज Shivajai Maharaj शिवजयंती Shivjayanti

१.

तारखांचा आणि तिथ्यांचा घोळ यावर आजकाल लोकांच्या भावना आणि इतर बरंच काय काय दुखायला लागलंय. पु.लं.नी ‘असा मी असा मी’मध्ये म्हटलंय की, “सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीची भांडणं सुरू होत नाहीत...” हे वाक्य आठवायला कारण झाले ते १२ मार्च २०२० रोजी आलेल्या वर्षातल्या दुसऱ्या शिवजयंतीचे. सरकारी (!) शिवजयंती १९ फेब्रुवारीला आहे. पण अजून एक शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी होते. आता ही गोष्ट कोणीही मान्य करेल की, छत्रपती शिवाजी महाराज एकदाच जन्माला आले होते. मग हा दोन दोन शिवजयंत्यांचा घोळ काय आहे? आणि इतकी वर्षे हा अव्याहत चालू का आहे?

त्याचे खरे कारण म्हणजे याचे राजकारण्यांनी चालवलेले घाणेरडे राजकारण. राजकारणी आणि त्यांचे पित्ते ज्या गोष्टीचा आधार घेतात- ती गोष्ट म्हणजे आपले पंचांग, आपण सध्या वापरत असलेले इंग्रजी कॅलेंडर आणि त्यांच्यामधील तफावत.

आता आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १० एप्रिल १६२७ रोजी झाला की, १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला यावर वाद होता आणि त्यावरून इतिहासकारांमध्ये टोकाचे मतभेद होते. पण आता १९ फेब्रुवारी १६३० किंवा फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख/तिथी आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की, १९ फेब्रुवारी १६३० रोजी जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या दिवशी हिंदू किंवा भारतीय पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ ही तिथी होती. आता या तारखा आणि तिथ्या दरवर्षी काही एकमेकांशी जुळत नाहीत, हेही आपल्याला माहिती आहे.

उदा. या वर्षी १९ फेब्रुवारी २०२० रोजी फाल्गुन वद्य तृतीया नसून माघ कृ. एकादशी ही तिथी आहे. असे का होते? एवढेच नाही तर गुगलवर पंचांग दाखवणारे जे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्यात जर आपण फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ ही तिथी टाकून त्या दिवशी इंग्लिश कॅलेंडरमध्ये कोणती तारीख येते, हे पाहिले तर ती येते ९ मार्च १६३०. आहे की नाही कटकट? (हे मी दोन-तीन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये करून पाहिलं आहे. मग हा घोळ आहे काय?)

या मागची शास्त्रीय कारणं जरा समजावून घेऊ. (पहा https://calendarhome.com/calculate/convert-a-date/)

त्याचे मुख्य कारण आहे कालगणना करण्याची पद्धत. सध्या भारतात दोन प्रकारच्या कालगणनेच्या पद्धती प्रचलित आहेत. त्यांच्यातील मूलभूत फरक आधी समजावून घेऊ. आपण भारतीय लोक पूर्वीपासून कालगणना करताना दिवस-महिने-वर्ष हे चंद्राच्या अवस्थेप्रमाणे म्हणजे कलेप्रमाणे मोजत आलो आहोत. यालाच ‘चांद्र-वर्ष’ असे म्हणतात. साध्या माणसालाही रात्री आकाशात चंद्राकडे पाहून तिथी कळते. दिवसागणिक चंद्राच्या स्थिती आणि कलेत फरक पडतो. (चंद्र जसा पृथ्वीभोवती फिरतो, तसाच स्वत:भोवतीही फिरतो, पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याची एक बाजू कायमची पृथ्वीकडे रोखलेली असते. यालाच ‘gravitational lock’ असे म्हणतात. अर्थात याचा आपल्या कालगणनेशी संबंध नाही.) त्यामुळे तिथी कळणे सहज सोपे होते. हे आता आतापर्यंत फार महत्त्वाचे होते. आज आपल्याकडे कालदर्शिका, अगदी सहज आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत, पूर्वी हे नव्हते. त्यामुळे चंद्राच्या कला पाहून कालनिश्चिती करणे निरक्षर आणि गरीब माणसालाही अत्यंत सोपे होते. तर चंद्र पृथ्वीभोवती आपली फेरी साधारण २७.३२३ दिवसांत पूर्ण करतो, पण चंद्र स्वयंप्रकाशित नाही. आपण चंद्राचा सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला भाग फक्त बघू शकतो आणि तो रोज थोडा थोडा बदलत असतो. त्या हिशेबाने पाहिले तर २९.५५ दिवस चंद्राला आपल्या कलांचे आवर्तन पूर्ण करायला लागतात. हाच ‘चंद्र महिना’!

आता असे का होते? पृथ्वी आणि सूर्य यांच्या केंद्राला जोडणारी एक काल्पनिक रेषा काढली आणि त्याच रेषेवर चंद्राचाही केंद्र आहे असे गृहीत धरले (ही अमावस्या किंवा पौर्णिमा असेल) तर त्याच ठिकाणी परत म्हणजे तिन्ही गोलाकांचे केंद्रबिंदू एकाच रेषेत यायला २७.३२३ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल - जरी चंद्र आपली पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा २७.३२३ दिवसांत पूर्ण करत असला तरीही. कारण आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत थोडी पुढे गेलेली असते. त्यामुळे सुरुवातीला असणारी पृथ्वी-सूर्य केंद्र जोडणारी रेषा आपला कोन थोडा बदलून पुढे गेलेली असते. हे जास्त अंतर कापायला चंद्राला थोडा अधिक कालावधी लागतो आणि हे अंतर प्रत्येक महिन्याला थोडे थोडे वेगळे येते. कारण पृथ्वी सूर्याभोवती गोल नाही तर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्यामुळे सूर्यापासून लांब लंबवर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून जवळ लंबवर्तुळाच्या कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होतो. म्हणून हा जो २९.५ दिवसांचा कालावधी सांगितला आहे, तो सरासरी आहे. काही महिने यापेक्षा जास्त कालावधीचे, तर काही महिने कमी कालावधीचे असतात.

तर चंद्र आपल्या सर्व कलांचा(!) हिशेब जमेला धरून ३५४ दिवसांत आपले १२ महिने पूर्ण करतो. हेच ते ‘चंद्र वर्ष’! पण पृथ्वीला आपली सूर्याभोवतीची नियोजित फेरी पूर्ण करायला अजून ११ दिवस जास्त लागतात (जास्त अचूक सांगायचे तर ११.२५ दिवस). तुम्ही म्हणाल अख्ख्या वर्षात ११.२५ दिवस मागे-पुढे म्हणजे काय विशेष! पण याचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. दर वर्षी ११.२५ दिवस मागे पडत काही वर्षांनी श्रावण महिना उन्हाळ्यात आणि मग हिवाळ्यात जाईल. कारण पृथ्वीवरचे ऋतू सूर्याच्या आणि पृथ्वीच्या परस्पर स्थितीमुळे घडतात, चंद्राच्या नाही. म्हणून मग आपण अधिक मासाची निर्मिती करून हे त्रांगडे निस्तरून घेतले आहे. त्यामुळे आपले महिने आणि त्यांच्याशी निगडीत ऋतू आणि पर्यायाने येणारे सण स्थिर राहतात. मुसलमानी कालगणनेत ही सोय नसल्याने त्यांचा रमजानचा महिना (म्हणजे सगळेच महिने खरे तर) सरकत सरकत हिवाळा ते कडक उन्हाळा असा प्रवास करतो. ऐन उन्हाळ्यात रोजे ठेवताना त्यांना किती त्रास होत असेल त्याची कल्पना करा, म्हणजे हे compensation कसे आणि किती महत्त्वाचे हे समजेल.

२.

आता दुसऱ्या प्रकारची कालगणना म्हणजे सौर वर्ष. सध्या सौर वर्षावर आधारलेल्या दोन कालदर्शिका प्रचलित आहेत. एक, ज्युलिअन कालदर्शिका आणि दोन, ग्रेगरीयन कालदर्शिका. या दोन्ही प्रकारच्या कालदर्शिका पाश्चात्य\ख्रिश्चन लोकांनी वापरत आणल्या. ग्रेगरीयन कालदर्शिका इंग्रजांनी १७५२ साली स्वीकारली. त्या आधी ते जुलिअन कालदर्शिका वापरत होते. त्यांनी असे का केले? काय फरक आहे या दोन प्रकारच्या कालदर्शिकांमध्ये?

पृथ्वी स्वत:भोवतीची प्रदक्षिणा २४ तासांत पूर्ण करते. (हा एक दिवस हे आपण जाणतो, पण तिने एक प्रदक्षिणा पूर्ण केली, हे आपण कसे ओळखणार? सूर्याच्या स्थानावरून. म्हणजे उदा. सूर्य अगदी माथ्यावर असताना दिवस सुरू केला, तर परत जेव्हा तो बरोबर माथ्यावर येईल, तेव्हा एक दिवस पूर्ण होईल. बरोबर? नाही, कारण जेव्हा असे होईल तेव्हा पृथ्वीने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून ती (३६० अंशाच्या) थोडी पुढे गेलेली असते. कारण स्वत:भोवती फिरताना ती सूर्याभोवतीही फिरत असते. त्यामुळे सूर्य बरोबर परत माथ्यावर यायला तिला थोडा अजून वेळ लागतो. खालच्या आकृतीमध्ये हे नीट कळून येईल.

या आकृतीमध्ये हिरव्या रंगाचे वक्र मार्ग सूर्याला परत माथ्यावर यायला लागणारा जास्तीचा कालावधी दाखवतात. इथे पृथ्वीच्या दोन ठिकाणच्या अवस्था मुद्दाम दाखवल्या आहेत. कारण पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते आणि लंबवर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून जवळ लंबवर्तुळाच्या कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होतो. थोडक्यात हा जास्तीचा कालावधी काही स्थिर नसतो. या फरकाचा आपल्या आताच्या विवेचनाशी संबंध नाही, फक्त अवांतर माहिती म्हणून विषयांतराचा दोष पत्करून ती इथे दिली आहे.)

समजा १ मार्चला दुपारी १२.०० वाजता आपण दिवस मोजायला चालू केले, तर बरोबर ३६५.२५ दिवसांनी २८ फेब्रुवारीला पृथ्वी त्याच ठिकाणी परत येईल. पण आपण वरचा ०.२५ दिवस न मोजता वर्ष ३६५ दिवसांनी पूर्ण झाले असे मानतो आणि हा जो पाव दिवसाचा जास्तीचा वेळ आहे, तो आपण दर चार वर्षांनी फेब्रुवारीत एक दिवस जास्त वाढवून compensate करतो. त्याला ‘लीप वर्ष’ म्हणतात.

एखादे वर्ष लीप वर्ष आहे, हे कसे ठरवायचे? अगदी सोपे आहे. त्या वर्षाच्या संख्येला चारने पूर्ण भाग जायला हवा. उदा २०१६, २०१२ वगैरे. पण खरी गंमत पुढे आहे. आपण वर पाहिले की, पृथ्वी ३६५.२५ दिवसांत एक फेरी पूर्ण करते, पण ते खरे नाही. खरा कालावधी आहे ३६५.२४२१८१ दिवस, म्हणजे ३६५.२५ दिवसांचे जे एक वर्ष आपण मोजतो, त्यापेक्षा ०.००७५ दिवस किंवा ११ मिनिटे कमी. आता इतक्या कमी कालावधीचा फरक असल्याने याचा परिणाम लगेच जाणवत नाही, पण जुलिअन कालदर्शिका सुरू झाल्यानंतर जवळपास १५०० वर्षांनी याचा फरक जाणवू लागला होता. इस्टर हा ख्रिश्चनांचा मोठा सण. त्या दिवशी वसंत ऋतू चालू होतो, म्हणजे आकाशात सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे सरकू लागतो. जुलिअन कालदर्शिकेप्रमाणे ५ एप्रिलला हे होते, पण प्रत्यक्षात असे दिसले की, सूर्याने विषुवृत्त आधीच ओलांडले आहे, ते पण २३ मार्चला म्हणजे तब्बल ११ दिवस आधी. याला त्या काळी धार्मिक महत्त्व असल्याने हा घोळ कसा होतो, याच्यावर खूप विचार केला गेला.

तेव्हा खगोलशास्त्रज्ञांना जाणवले की, गेल्या साधारण १५०० वर्षांत आपले वर्ष मोजणे थोडे थोडे पुढे पुढे सरकत गेल्याने हे घडले आहे. म्हणून त्यांनी अफलातून युक्ती शोधली. दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. आणि १०० ला चारने पूर्ण भाग जातो, म्हणून प्रत्येक १००वे वर्ष पूर्वी लीप वर्ष असायचे. पण आता नवीन नियमानुसार कोणतेही १००वे वर्ष जर ४००ने पूर्ण भाग जाणारी संख्या असेल तर आणि तरच लीप वर्ष असेल. म्हणून १७००, १८००, १९०० ही लीप वर्षे नव्हती, पण २००० हे लीप वर्ष होते. २१०० लीप वर्ष असणार नाही.

हा घोळ निस्तरला गेला, पण आधी जी ११ दिवसांची चूक झाली होती, त्याचे काय? म्हणून मग ख्रिश्चनांचा धर्म गुरू पोप ग्रेगरी याने ४ ऑक्टोबर १५८२ला ही चूक दुरुस्त करून घेतली आणि एक फर्मान काढून सांगितले की, उद्या म्हणजे ५ ऑक्टोबरला ‘५ ऑक्टोबर’ न म्हणता ‘१५ ऑक्टोबर’ म्हणण्यात यावे! स्पेन, पोर्तुगाल वगैरेंनी हे ऐकले, पण इंग्रज आधीच पोपपासून काडीमोड घेऊन लांब झाले होते. त्यांचे चर्च ऑफ इंग्लंड आणि आर्च बिशप ऑफ कॅनटरबरी काही ऐकायला तयार नव्हते. पण अखेरीस त्यांना याचे महत्त्व कळले आणि त्यांनी १७५२च्या सप्टेंबरमध्ये ही सुधारणा केली आणि ग्रेगेरियन कालदर्शिका स्वीकारली.

तर अशा प्रकारे (भारतीय) चंद्र वर्ष आणि सौर वर्ष या कालगणनेतील फरक आहे.

३.

श्रावण वद्य चतुर्दशी शालिवाहन शके १८६९ किंवा माघ शुक्ल अष्टमी शालिवाहन शके १८७१ या दिवसांना भारतीयांच्या जीवनात काय महत्त्व आहे? हे दिवस आहेत १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५०. या दिवसांचे महत्त्व काय विषद करून सांगणार! पण आपण आज इंग्रजी कॅलेंडर अंगिकारले आहे आणि ते फक्त आपणच नाही तर सगळ्या जगाने अंगीकारलेले आहे.

राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वत:चा शक चालू केला होता, पण आपण तो आज वापरत नाही. तसे करणे अजून गोंधळ वाढवणारे होईल. महाराजांनी स्वत: अनेक जुन्या प्रथा-रूढींचा त्याग केलेला आहे. शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या आणि त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी कमीत कमी याबाबतीत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रागतिक विचारसरणी अंगीकारायला हरकत नसावी.

हिंदूंचे सगळे सण, देवदेवतांचे जन्मदिवस तिथीने साजरी करायची प्रथा आहे, हे खरे, पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करायचे आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर पुरुष होते हे खरेच, पण त्यांचे दैवतीकरण करून आपण त्यांना आपले प्रेरणास्थान न मानता मर्मस्थान मानू लागलो आहोत. त्यांच्या चरित्राचे, कार्याचे मूल्यमापन, संशोधन आणि चिकित्सा करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अशात त्यांच्या कार्याची महती आणि प्रासंगिकता सोडून देऊन जयंतीचा वाद घालत बसणे, हे समाजाच्या दृष्टीने अजिबात हितावह नाही.

तज्ज्ञांच्या सहमतीने आणि शासनाने पूर्ण विचारांती १९ फेब्रुवारी ही तारीख ‘शिवजयंती’ म्हणून स्वीकारली आहे. तिचा यथायोग्य मान आपण राखला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढायला, त्यांच्या चरित्रापासून स्फूर्ती घ्यायला कोणताही दिवस शुभ आणि योग्यच आहे, त्या दिवशी शिवजयंती असो वा नसो.

.............................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

शिवाजी महाराजांचा नेमका जन्मदिनांक कोणता? - डी. व्ही. आपटे – एम. आर. परांजपे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3011

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......