अजूनकाही
इंदुरीकर महाराजांची कीर्तनं महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. हजारो, लाखो लोकांनी त्यांच्या कीर्तनाला हजेरी लावतात. तरुण, प्रौढ, बुजुर्ग सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना इंदुरीकर महाराजांची कीर्तनं आवडतात. भजन, कीर्तन, पोथी वाचन, हरिनाम सप्ताह, भागवत कथांचं निरुपण इत्यादी सर्व कार्यक्रम मुखी संस्कृतीतले आहेत. ज्या काळात छपाई तंत्राचा शोध लागला नव्हता, त्या काळातले आहेत. आजही ते विलक्षण लोकप्रिय आहेत. किंबहुना त्यांची संख्या वाढली आहे. या कार्यक्रमांच्या आयोजनावर ग्रामीण महाराष्ट्रात किती खर्च केला जातो, याचं विश्वसनीय सर्वेक्षण करण्याची गरज आहे. आपल्या समाजाच्या वाचनसंस्कृतीचं मोजमाप करण्यासाठी अशी सर्वेक्षणं उपयुक्त ठरतील.
एकमेकांशी नुसते बोलून ज्ञान व माहिती जमा करण्याची अवस्था म्हणजे मौखिक संस्कृती. लिपी नव्हती, त्यामुळे लिखाण वा वाचनाचा प्रश्न नव्हता. या युगामध्ये बोलणारा आणि त्याचं बोलणं ऐकणारा हे आमने-सामने असतात जे काही बोललं-ऐकलं जातं ते एकमेकांना समजतं आहे का, याची पक्की खात्री करून घेता येई. बोलण्या-ऐकण्याची ही प्रक्रिया सामाजिक होती. बोलणारा आणि ऐकणारा यांच्या क्रिया-प्रतिक्रियांतून ही प्रक्रिया पुढे जायची. त्यामुळे बोलण्या-ऐकण्याचे यम-नियम होते. काही प्रकारच्या प्रतिक्रिया त्याज्य समजल्या जात. बोलणारा आणि ऐकणारा यांची मूल्यं, धारणा एकच असत. भक्तीभाव असल्याखेरीज असे जाहीर कार्यक्रम शक्य नव्हते. या कार्यक्रमातला विनोद रांगडा असायचा. नक्कल, अतिशयोक्ती, उपहास, उपरोध यांमधून विरोधी विचाराची खिल्ली उडवणं, राजकीय टीका-टिप्पणी करणं हा प्रकार तमाशामधील बतावणीमधून या कार्यक्रमातही झिरपला. मुखी संस्कृती समूहजीवनाला पोषक आहे. मोकळ्याढाकळ्या, जाहीरपणे व्यक्त होणार्या जीवनाला गरजेचीही आहे. समाजात मिळून-मिसळून वागण्याचा कल असलेली व्यक्तीला मुखी संस्कृती पसंत असते.
या उलट लिपी संस्कृती. ही संस्कृती अंतर्मुख व वैयक्तिक आहे. समाजापासून फटकून वागणार्या, दुरावलेल्या व्यक्ती लिपी संस्कृतीच्या निकट असतात. लिपी संस्कृतीत साक्षरता मर्यादित होती. कारण साक्षरतेचे फायदे मर्यादित होते. कागद व शाई महाग होती. त्यामुळे जाहीरपणे वाचन केलं जात असे. जे लोकप्रिय आहे त्याच मजकुराचं वाचन करण्याची प्रथा होती. मुखी संस्कृतीत ज्ञान देणारा व घेणारा माणसांच्या घोळक्यात, कल्लोळात ज्ञान संपादन करतो.
मुद्रण संस्कृती म्हणजे छपाईचा शोध लागल्यावर लेखक आणि वाचक एकमेकांपासून अलग झाले. आपण जो मजकूर वाचतो तो अमूर्त खुणांनी बनलेला असतो. त्या मजकुराचा अर्थ लावण्याची क्षमता वाचकाच्या अंगी असावी लागते. मुखी संस्कृतीत अमूर्त खुणांचा अर्थ लावण्याची गरज नव्हती. हे ज्ञान प्रत्यक्ष म्हणजे वर्तमानकाळात होतं. मुद्रण संस्कृतीत वाचकाला भेटणारं ज्ञान भूतकाळातून येतं.
‘क’ कमळातला असं आपण म्हणतो तेव्हा ‘क’ या ध्वनीची आणि ‘क’ या खुणेची कमळापासून फारकत झालेली असते. ‘क’ या अक्षराला एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं. संदर्भापासून फारकत झालेल्या अमूर्त खुणांचा अर्थ लावणं ही किचकट, तापदायक प्रक्रिया असते. वाचलेल्या मजकुराचं विवरण करणं, त्याचा योग्य अर्थ लावणं ही अवघड बाब असते. कितीही अर्थ लावला तरीही थोडी-फार अनिश्चितता राहतेच. त्यामुळे कार्यक्षम वाचनासाठी एकांत व शांतता गरजेची असते. आपण जो मजकूर वाचतो तो दूर असतो, गूढ असतो. त्याला आपण एकाकीपणे सामोरं जातो.
वाचनसंस्कृती युरोपमध्येच रुजली. तिथेच वाढली. कारण ज्ञानाची ओढ तिथे होती. निसर्गाचे नियम जाणून घ्यायचे तर प्रयोग करायचे, ते लिहून प्रसिद्ध करायचे, जेणेकरून त्याचा पडताळा कुठेही घेता येईल. या नियमांवर आधारित तंत्रज्ञान रचायचं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. गरजेच्या वा बिनगरजेच्या वस्तूंचं उत्पादन पुरेशा प्रमाणात झालं की लोक सुखी होतील. निसर्गाप्रमाणेच समाजाचेही नियम असतात. व्यक्तींनी मिळून समाज बनतो. म्हणजे व्यक्तीचेही नियम असले पाहिजेत. त्याचा शोध समाजशास्त्रे आणि विविध कला घेऊ लागल्या. जे अज्ञात आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे कारण त्यामुळे मानवी जीवन सुखी-समाधानी होईल, ही ज्ञानाची प्रेरणा होती व आजही आहे. या प्रेरणेतून वाचन, अभ्यास याला चालना मिळाली.
अरब लोक वर्षातून फक्त ६ मिनिटं वाचन करतात, अशी बातमी अल अरेबिया या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाली होती. चिनी लोक वर्षातून ४.३ छापील पुस्तकं तर २.३५ डिजिटल पुस्तकं वाचतात अशी बातमी चायना डेली या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. वाचनसंस्कृती युरोपमध्येच रुजली तिथेच वाढली. कारण ज्ञानाची ओढ तिथे होती. निसर्गाचे नियम जाणून घ्यायचे तर प्रयोग करायचे, ते लिहून प्रसिद्ध करायचे, त्यावर आधारित तंत्रज्ञान रचायचं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल.
निसर्गाप्रमाणेच समाजाचेही नियम असतात, व्यक्ती हा समाजाचा भाग असते म्हणून तिचेही नियम असले पाहीजेत, त्याचा शोध समाजशास्त्रे आणि विविध कला घेऊ लागल्या. जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून वाचन, अभ्यास याला चालना मिळाली. १५ व्या शतकाच्या मध्यावरती गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला. त्यानंतर पुस्तकांची छपाई सुरू झाली. हस्तलिखिते नकलणारा लेखनिक एका वर्षात दोन ग्रंथ नकलीत असे. छापखाने सुरू झाल्यावर १४५० नंतरच्या ५० वर्षांत १० ते १५ हजार ग्रंथ प्रसिद्ध झाले. प्रत्येक ग्रंथाच्या किमान ५०० प्रती छापल्या जात. म्हणजे पन्नास वर्षात ७५ लाख पुस्तकांची छपाई झाली.
१६९५ साली इंग्लडमध्ये २० छापखाने होते. १७७५ साली त्यांची संख्या १२४ झाली. छापखाना काढण्यासाठी सरकारी परवाना लागत असे. या काळात अनेक पुस्तके छापली जाऊ लागली. वाचकांना डोळ्यासमोर ठेवून पुस्तके लिहिली जाऊ लागली. व्यावसायिक लेखक, पुस्तक विक्रेते ह्यांचीही संख्या वाढली. १७२० साली इंग्लडमधील मुद्रक आणि पुस्तक विक्रेत्यांची संख्या सुमारे नऊ हजार होती. १८०० साली ही संख्या दोन लाख झाली.
पुस्तक आणि वाचकांच्या वाढत्या संख्येमुळे समाजात खळबळ माजली. समाजातील चुकीच्या वर्गात वाचनाचं वेड वाढू लागलं आहे आणि या वाचनवेडाला लगाम घालायला हवा, अशी चर्चा प्रस्थापित व सत्ताधारी वर्गामध्ये सुरू झाली. जोनाथन स्विफ्ट (गलिव्हर्स ट्रॅव्हल्स)ने लिहिलेली ‘बॅटल ऑफ बुक्स’ ही कादंबरी याच विषयावर आहे. स्विफ्टचं असं म्हणणं होतं की, वाचकांची ही वाढती संख्या म्हणजे लोकशाहीवादी झुंड आहे, हे वाचक प्रस्थापित व्यवस्था उखडून टाकतील. मानवाच्या नैसर्गिक हक्कांचा उद्घोष करणारा तत्वज्ञ जॉन लॉक हाही या वाचनवेडाच्या विरोधात होता. समाजातील तळागाळातल्या लोकांना शिक्षण देण्याची गरज नाही असं त्याचं मत होतं. तळागाळातले लोक अज्ञानी राहिले तरच त्यांना दुःखाचा विसर पडू शकतो, म्हणून त्यांना साक्षर करू नये, असं प्रस्थापितांचं म्हणणं होतं.
अठराव्या शतकाच्या अखेरीस ही परिस्थिती बदलली. साक्षरता रोखणं अवघड आहे, हे ध्यानी आल्यावर शिक्षण सार्वत्रिक करण्यात आलं. तळागाळातल्या लोकांना ख्रिश्चन धर्माची शिकवण देणं हा त्यामागचा हेतू होता. पण एकदा का लोक वाचायला शिकले की, केवळ धार्मिक पुस्तकं वाचणार नाहीत तर वाट्टेल ती पुस्तकं वाचू लागतील याचं भय प्रस्थापितांना होतं. १७९५ साली इंग्लडमध्ये एक पुस्तिका प्रसिद्ध झाली. प्रमाणाबाहेर वाचन केल्याने सर्दी, पडसं, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, त्वचेचे विकार, बद्धकोष्ठ, गाऊट, मूळव्याध, दमा, पक्षाघात, फुप्फुसाचे रोग होतात, अशा अनेक रोगांची व व्याधींची यादीच त्या पुस्तिकेत दिली होती.
स्मरणशक्ती हा मौखिक संस्कृतीचा गुण होता. कारण त्याशिवाय ज्ञानाचा साठा करताच आला नसता. त्यामुळे छंदोबद्ध रचनांमध्ये माहिती, दृष्टी, ज्ञान अभिव्यक्त केलं जात असे. गद्य लिखाणाचं प्रमाण फारच कमी होतं. मुक्तछंदातल्या कविता फारशा पसंत नसत. गुटेनबर्ग क्रांतीमुळेच मुक्तछंदातल्या कविता शक्य झाल्या.
जगातील अन्य संस्कृतीत अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा नाही. त्यामुळे तिथे वाचनसंस्कृती रुजली नाही. किंबहुना नवी संस्कृतीही घडली नाही. युरोपातील प्रगत संस्कृती (उत्पादन वाढ हा प्रगतीचा निकष) तिथे पोचल्यावर काही बदल घडले. युरोपातील तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले, त्यातून अन्य संस्कृतींमध्ये बदल घडले पण ते आपापल्या समाज-संस्कृतीच्या साच्यातच. त्यांच्यामध्ये मूलगामी परिवर्तन झालं नाही कारण ज्ञानाची, शोधाची प्रेरणा असणार्या व्यक्ती फारच कमी निपजल्या किंवा अशा व्यक्तींना त्यांच्या समाज-संस्कृतीत वाढायला वा फुलायला वाव मिळाला नाही.
महाराष्ट्रातील मतदारांची संख्या सुमारे सात कोटी आहे. परंतु पाठ्यपुस्तकं वगळता मराठी पुस्तकांचा किती आहे? कोणत्याही पुस्तकाची पहिली प्रत सामान्यतः एक हजार प्रतींची असते. कवितासंग्रहाची आवृत्ती तीनशे वा पाचशे प्रतींची असते. एकूण मतदारांच्या दहा टक्के लोकही पुस्तकं विकत घेत नाहीत, असा त्याचा अर्थ झाला. ही बहुसंख्य जनता मुखी संस्कृतीत आहे. संपूर्ण देशात कमी-अधिक फरकाने हीच स्थिती असावी.
त्यामुळे इंदुरीकर महाराज, आसाराम बापू, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वा अन्य व्याख्याते, भाषणबाज यांना उदंड लोकप्रियता लाभते. एकेका व्याख्यानाला एक लाख रुपये घेणारे भाषणबाजही महाराष्ट्रात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु ज्ञानाच्या प्रसारानेच अंधश्रद्धा दूर होते आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी भाषणं नाहीत तर वाचनाची गरज असते. आपल्या विचाराच्या विरोधी वक्त्याच्या जाहीर भाषणाला वा कार्यक्रमाला आपण कदाचित उपस्थित राहणार नाही, परंतु त्याचं पुस्तक वा लेख वाचण्याची क्षमता आपल्या अंगी वाचनाने येते. कारण एकाच दिशेने सरळ रेषेत पुढे सरकणं आणि सुसंवाद ही छापील ग्रंथाची वैशिष्ट्यं असतात. बहुसंख्य लोक मुखी संस्कृतीत असतील तर त्या समाजात आधुनिक ज्ञानाचा प्रसार संथपणे होईल. असा समाज कायद्याच्या बडग्याने सुधारण्याची शक्यता नाही.
.............................................................................................................................................
लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत.
suniltambe07@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
???? ?????
Mon , 17 February 2020
लेखातील एक परिच्छेद दोन वेळा छापला गेला आहे...बाकी लेख फारच मुद्देसुद आणि विश्लेषणात्मक वाटला