भाजपला उशीरा झालेली उपरती
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • Sat , 15 February 2020
  • पडघम देशकारण अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal आम आदमी पार्टी AAP आप भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी केलेली वक्तव्यं भोवली, ही केंद्रीय गृहमंत्री आणि या निवडणुकीचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे. शहा हे काही भाजपचे साधे नेते नाहीत, तर नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत, निवडणुका जिंकून देणारे म्होरके आहेत, जे. पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी अजूनही पक्ष तेच चालवतात. हे लक्षात घेता शहा यांनी आता भाजपचे  कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनाही दिल्ली विधानसभेच्या निकालाबाबत जरा सबुरी आणि जबाबदारीनं व्यक्त होण्याचा सख्त आदेश दिला पाहिजे.

लोकशाहीत निवडणुका ही कधीही खंड न पडणारी प्रक्रिया आहे. निवडणुकीत विजयी होण्याची संधी एकाच पक्षाला असते, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला सलग दुसरा दारुण पराभव भाजपचे नेते कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांच्या फारच जिव्हारी लागला असल्याचं व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांतून दिसतं आहे. जिव्हारी लागण्याची ही प्रक्रिया खरं तर निकालाआधीच सुरू झाल्याचं भाजपकडून येणाऱ्या बेताल वक्तव्यातून दिसत होतं. ‘गोळी मारो’, ‘भारत-पाक क्रिकेट सामना’, ‘दहशतवादी’ या जहरी आरोपातून ते जाणवत होतं. आपल्या देशातलं राजकारण, राजकारण्यांतला समंजस आणि सुसंस्कृतपणा हरवत चालला असल्याचं हे लक्षण आहे.

हे असंच सुरू राहिलं तर उद्या निवडणुकांत ‘बॅलेट’ऐवजी ‘बुलेट’ येण्याचा धोका आहे. कारण केवळ भाजपच नाही  तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांत अशी जहरी वक्तव्यं करणाऱ्या नेत्यांचं पीक फोफावलं आहे. आज मुखी जहर आलंय, उद्या हाती शस्त्र येण्याचंच भयकंपित करणारे हे संकेत आहेत.

सत्ताधारी पक्षानं तर निवडणुकीच्या प्रचारातच नाही तर दैनंदिन व्यवहारातही डोळ्यात तेल घालून भान बाळगावं लागतं. म्हणूनच या संदर्भात भाजपची जबाबदारी जास्त आहे. पण विशेषतः २०१४ला सत्तेत आल्यापासून विरोधकांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवण्याचा एक अत्यंत घातक पायंडा भाजपनं पाडला आहे. विरोधकांना गोली मारो, निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे, अशी वक्तव्यं करण्याची सवय भाजप नेत्यांना, त्यातही प्रामुख्यानं मोदी-शहा या जोडगोळीला, गुजरात निवडणुका लढवताना लागलेली होती. त्या सवयीचं आता राष्ट्रीयीकरण करण्यात आलेलं आहे. दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधित करण्यापर्यंत भाजपच्या प्रकाश जावडेकर या केंद्रीय मंत्र्यांनी मजल मारावी, हा तर प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर जावी याचा नीच्चांक आहे.

त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ झाला होता, असं स्मरण करून दिलं जात असलं तरी, त्या वक्तव्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागलेली आहे, याचा विसर न पडू दिलेला बरा. कुत्रा माणसाला चावला म्हणून काही माणूस लगेच कुत्र्याला चावत बदला घेत नाही, हे संस्कृतीच्या नावानं सतत उमाळे काढणाऱ्या भाजपचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी लक्षात घ्यायला हवं.

केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीनं दिल्लीकरांना अनेक सोयी-सवलती दिल्या म्हणून उमाळ्यावर उमाळे काढणाऱ्या भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी दिल्लीकरांना ‘फुकटे’ म्हणून संबोधनं हा निव्वळ भंपकपणा आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती, ते काय आमिष नव्हतं? आणि ते पाळलं नाही, ही काय फसवणूक नाही का?

गरिबांना गॅस  कनेक्शन, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर विशिष्ट रक्कम जमा करणं, या आणि अशा अनेक सवलती म्हणजे सरकारच्या खजिन्यातून मतं मिळवण्यासाठी केलेली खैरातच होती, हे भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी विसरू नये. महाराष्ट्रात शिवसेनेच्या दहा रुपयांत भोजन देण्याच्या घोषणेला शह म्हणून ‘मी परत येणार’ असा दावा करणाऱ्यांनी पाच रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होतीच की!

फार लांब कशाला दिल्लीच्या निवडणुकीत गव्हाचं एक किलो पीठ दोन रुपयांत, मोफत स्कुटी अशा अनेक सवलतींचं आमिष मतदारांना दाखवणारा भाजपच होता. ‘आपलं ते धोरण आणि दुसऱ्याच मात्र विटलेलं वरण’, असं हे वागणं असून भाजपच्या समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांचा तो भंपकपणाच आहे. मोदी यांनी जाहीर केलेल्या अनेक सवलती दिल्या आणि अनेक अजून दिलेल्या नाहीत तरी, देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मात्र दिल्लीकरांना इतक्या सवलती देऊनही केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिल्लीची तिजोरी रिकामी होऊ दिलेली नाही, हेही लक्षात घेण्याचं भान भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी दाखवायला हवं.

आठवण जुनी आहे, १९९६मधली. दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीसाठी मी तेव्हाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती. पवार यांच्या कुटुंबात न घडलेल्या एका बाबीची घोर कुजबूज तेव्हा राजकीय वर्तुळात सुरू करण्यात आली होती. त्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते, ‘रा. स्व. संघाची अफवा पसरवण्याची क्षमता फारच मोठी आहे.’ त्याच संघाचं अपत्य असल्यानं तो अफवा पसरवण्याचा  गुण भाजपमध्ये कसा आलाय, याचा मासला म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पसरवल्या गेलेल्या एका माहितीचा आहे.

भाजपच्या आयटी सेलने पसरवलेल्या या माहितीनुसार भाजपचे ८ उमेदवार केवळ १०० मतांच्या फरकानं पराभूत झाले, १९ उमेदवार केवळ १ हजार आणि ९ उमेदवार केवळ २ हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले आहेत. या माहितीतून दिल्या जाणाऱ्या आकड्यांची बेरीज करा – विजयी ८ + थोडक्यात पराभूत झालेले ८ + १९ + ९ म्हणजे संपूर्ण बहुमताचा आकडा येतो. थोडक्यात काय तर भाजपने फारच निसटत्या फरकानं दिल्लीची सत्ता गमावली आहे, असा या माहितीचा अर्थ आहे.

एका भक्ताकडून ही माहिती आली, तेव्हा उत्सुकता चाळवली म्हणून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली तर ही माहिती सपशेल खोटी निघाली! बिजवास मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ७५३ तर आदर्श नगर मतदारसंघातला भाजपचा उमेदवार १५८९ मतांनी पराभूत झाला. हे दोन अपवाद वगळता १०० मतांच्या फरकानं भाजपचा एकही उमदेवार पराभूत झालेला नाही. भाजपचे सर्व उमेदवार किमान सात हजार मतांनी पराभूत झालेले आहेत. केवढा हा खोटारडेपणा आणि आत्मवंचनाही! ज्यांना पराभव खिलाडूवृत्तीनं स्वीकारता येत नाही, ते विजयी झाल्यावर उन्मत्तच होतात!

म्हणूनच उशीरा का असेना अमित शहा यांना दिल्ली विधानसभेच्या  निकालाबद्दल झालेल्या उपरतीचं स्वागत करायला हवं. पराभव मान्य करताना झालेल्या चुकाही मान्य करण्याचा उमदेपणा शहा यांनी दाखवलेला आहे. असाच उमदेपणा भाजपचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनीही दाखवायला हवा. ते जर दाखवत नसतील तर तसा सख्त आदेशच शहा यांनी द्यायला हवा. शहा यांचा आदेश नाकारण्याची हिंमत पक्ष आणि कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांत नाही. शहा यांचा आदेश न पाळून त्यांचा अवमान नक्कीच कुणी करणार नाही. कारण हा पक्ष तसंच त्याचे समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तही शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक आहेत. शिवाय अशा आज्ञाधारकांकडून आदेशाच्या झालेल्या पालनातून देशभक्ती उजाळून निघते, हा आणखी एक फायदा आहेच!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Sun , 16 February 2020

The writer has again used the following furphy namely नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती if the author removes blinker of BJP hatred he will remember that Modi only said that if all the black money is brought back it will amount to Rs. 15 lakhs in every Indians account. In this assertion Modi was wrong because that much money was not overseas. I agree that Kejariwal won this election grandly. The author does not care to consider the impact of Muslim vote. He also fails to acknowledge that BJP's vote went up but it did not reflect in seats. I wish Aksharnama's contributors live by its headline assertion.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......