‘लव्ह आज कल’ : इम्तियाज अलीचे भूतकाळातील यशाच्या पुनर्निर्मितीचे तोकडे प्रयत्न 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘लव्ह आज कल’चं पोस्टर
  • Sat , 15 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie लव्ह आज कल Love Aaj Kal इम्तियाज अली Imtiaz Ali सारा अली खान Sara Ali Khan कार्तिक आर्यन Kartik Aaryan रणदीप हूडा Randeep Hooda

इम्तियाज अलीच्या चित्रपटांमधील पात्रांमध्ये काहीशी विचित्र असतात. हा विचित्रपणा त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक स्तरांवर प्रतिबिंबित होत असतो. हा विचित्रपणाच त्यांची खरी खासीयत असतो. हे चित्र त्यांचा अनेकदा सामाजिक, मानसिक, पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारा दृष्टिकोन, हटकून त्याच्या विरुद्ध वागण्याच्या कृतींमधून निर्माण होतं. ‘जब वुई मेट’मधील (२००७) गीतला हटकून पळून जाऊन लग्न करायचं असतं, ‘तमाशा’मधील (२०१५) वेद जेव्हा कॉर्सिकामध्ये असतो, तेव्हाचा त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक विविधरंगी, विविधढंगी असतो. ही पात्रं एका निराळ्या अर्थाने अधिक जिवंत भासतात. ‘लव्ह आज कल’मध्ये या सगळ्याच्या केवळ छटा दिसतात. मात्र, एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यास तो केवळ अलीच्या आधीच्या कामाचं, यशाचं पुनर्निर्माण करण्याचा एक प्रयत्नच राहतो. 

जगाच्या पाठीवरील बऱ्याचशा चित्रपटकर्त्यांबाबत बोलत असताना अनेकदा ते कसा एकच चित्रपट, मग तो संकल्पनात्मक पातळीवर असो, मांडणीच्या पातळीवर की आशयाच्या पातळीवर, पुनर्निर्मित करत राहतात हा मुद्दा येतो. असं करणारे चित्रपटकर्ते वाईट असतात/ठरतात की नाही, हा मुद्दा नसून ही बाब चांगल्या-वाईट सर्वच लेखक-दिग्दर्शकांच्या कामात सर्वत्र आढळते हा आहे.

इम्तियाज अलीदेखील याहून फारसा वेगळा नाही. त्याने ‘जब वुई मेट’पासून ते ‘तमाशा’पर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये संकल्पना, आशय, विषय अशा अनेक पातळ्यांवर समांतर बाबी हाताळल्या असल्याचं म्हणता येतं. अर्थात ‘हायवे’सारख्या (२०१४) चित्रपटाचा समावेश या यादीत करण्याचा विचार अजिबातच नाही. सांगायचा मुद्दा असा की, ‘लव्ह आज कल’च्या निमित्ताने त्याने लेखक-दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा २००९ मधील याच नावाच्या त्याच्या चित्रपटातील संकल्पना आणि मांडणीच्या धर्तीवरील कलाकृती निर्माण केलेली आहे. इथे कमी-अधिक फरकाने त्याच्या सगळ्याच चित्रपटांचे उल्लेख आले आहेत नि पुढेही येतील, कारण त्याने आताच्या ‘लव्ह आज कल’मध्ये त्याच्याच चित्रपटांचे पुनर्निर्मितीचे यशस्वी-अयशस्वी ठरणारे अनेकविध प्रयत्न केलेले आहेत. 

झोई (सारा अली खान) दिल्लीत राहणारी तरुणी आहे. व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करणं, वैयक्तिक आयुष्य आणि त्यातही पुन्हा प्रेमजीवनाला, गंभीर नात्याच्या विचारांना आपल्या आयुष्यात थारा न देणं याभोवती तिचं विश्व फिरतं. तिचे हे विचार तिच्या आईच्या सांगण्यातून, किंबहुना हे विचार तिच्यावर लादू पाहण्यातून आलेले आहेत. तिच्या आईने कधी काळी प्रेमात पडून व्यावसायिक आयुष्य आणि यशापासून दूर जाण्याची जी चूक केली, ती तिने करू नये, असं तिला वारंवार सांगण्यात आलेलं असतं. प्रेम आणि व्यावसायिक कारकीर्द यांत होणारी फरफट ही क्लासिक इम्तियाज अली समस्या इथं दिसते.

झोई एका अर्थी ‘तमाशा’मधील वेदच्या पात्राचं स्त्रीरूप आहे. त्यात वडिलांनी आपले विचार त्यावर लादू पाहणं इथं आईच्या पात्रानं ही कृती करण्यात रूपांतरीत होतं. ‘तमाशा’मध्ये व्यावसायिक आयुष्यात गुरफटून त्या ताणातून आलेली चीड प्रेमाच्या विरुद्ध उभी ठाकली होती. इथं ताणाऐवजी व्यावसायिक कारकिर्दीत रममाण होणं, या कृतीतून द्वंद्व निर्माण होतं. 

वीर (कार्तिक आर्यन) हा आयुष्यात एकदाच होणारं आणि चिरंतर टिकणारं प्रेम या संकल्पनेवर विश्वास असणारा तरुण आहे. तो झोईच्या प्रेमात पडतो, तिच्यासोबत एका डेटवरही जातो. मात्र, खरं प्रेम हे शारीरिक गरजांच्या पलीकडे जाणारं आहे, असं मत असल्याने पहिल्याच वेळी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देतो. तिला इतकं गंभीर नातं नको असल्यानं साहजिकच ती त्यापासून दूर राहू लागते, आणि तो तिचा माग ती असेल तिथं जात काढत राहतो. इथं स्टॉकिंग या संकल्पनेचं रूप सर्वच स्तरांवर दिसतं. त्याच्या मनातील प्रेमाची व्याख्या ही ‘सात्त्विक प्रेम’ या शब्दांत व्यक्त केली जाऊ शकते. याउलट झोई प्रेम किंवा गंभीर नातं याऐवजी तात्कालिक लैंगिक, शारीरिक गरजा भागवणं अधिक योग्य समजते. इथले अनेक विचार हे इम्तियाजची आपण कालसुसंगत आहोत, हे सांगू पाहणारी आर्त हाक म्हणून गणले जाऊ शकतात. 

इम्तियाजच्या चित्रपटातील स्त्री-पुरुष पात्रांची इथं अदलाबदल होते. वेदऐवजी झोई प्रेमापासून दूर पळणारी असते, ताराऐवजी वीर झोईच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो. एरवी अलीच्या चित्रपटात पुरुषाला वाचवण्यासाठी स्त्रीची, तिच्या आधाराची आणि काही वेळा त्यागाची गरज भासते. ती इथं पुरुषाने स्त्रीचा विचार करण्याच्या, तिला हवं असलेलं अवकाश देण्यात रूपांतरीत होते.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे इथं पुनर्निर्माण अधिक आहे. २००९ मधील ‘लव्ह आज कल’मध्ये तिथल्या पात्राला प्रेम या संकल्पनेवरील विश्वास पुनरुज्जीवित/दृढ करण्यासाठी जशी ऋषी कपूरच्या पात्राची गरज भासते, तसंच इथंही घडतं. राज (रणदीप हूडा) इथं आपल्या १९९०च्या दशकातील प्रेमकथा सांगतो (ज्यात काही कारणानं तो कार्तिक आर्यनसारखा दिसतो). ‘लव्ह आज कल’मधील सर्वोत्तम दृश्यं आणि अविस्मरणीय क्षण हे हूडाचं पात्र आणि तो सांगत असलेल्या कथेतून येतात. एका अर्थी तोच या चित्रपटातील खरा ‘ड्रायव्हिंग फोर्स’ आहे. त्याच्या कथेत असलेली लीना (मिनिमलिस्टिक सौंदर्य असलेली आरुषी शर्मा) आणि तो शाळेतील वार्षिक सोहळ्यात नृत्य करत असल्याचा एक मंत्रमुग्ध करणारा अतिशय सुंदर सीक्वेन्स आहे. चित्रपटाचे जे काही भाग अधिक उत्तम आहेत, त्यांपैकी बरेचसे भाग हे हूडाशी निगडीत तरी आहेत, किंवा मग इर्शाद कामिलच्या बऱ्यापैकी विचारपूर्वक लिहिलेल्या गाण्यांशी निगडीत तरी आहेत. 

‘लव्ह आज कल’मधील मुख्य अभिनेत्यांची निव्वळ स्वीकारार्ह ठरणारी कामगिरी चित्रपटाला अधिक त्रासदायक ठरवणारी आहे. जिथं अलीच्या इतरही चित्रपटांतील काहीसे लांबलेले भाग तिथल्या कलाकारांच्या कामगिरीमुळे अनावश्यक वाटत नाहीत, तिथं ‘लव्ह आज कल’मध्ये प्रमुख जोडीच अप्रभावी आणि कित्येकदा लाऊड ठरते. इथल्या काही प्रमाणात रंजक असलेल्या पात्रांना समोर चितारण्यात आवश्यक असणाऱ्या सहजतेचा इथं अभाव जाणवतो, तो या जोडीमुळे. अन्यथा चित्रपटात इतरही अनेक दोष असले तरी तो चांगल्या अभिनेत्यांच्या जोरावर काही अधिक काळ मनात रेंगाळणारा ठरण्याइतपत चांगला होण्याची शक्यता होती. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......