अजूनकाही
रत्नाकर मतकरींनी संपादित केलेला ‘पॉझिटिव्ह’ हा एड्स केंद्रस्थानी असलेल्या कथांचा संग्रह वाचला, त्याला पंधरा वर्षं उलटली. ‘गावात सिंह आला की कुणी हलकेच इशारा देत नाही, बोंब ठोकतात. एड्सबद्दल कळलं तेव्हा म्हटलं बोंबाबोंबच करायला हवी...’ हा युगांडाचे तत्कालीन अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा उद्गार त्यात सुरुवातीला दिला आहे.
याच्याच आसपास कधीतरी किशोर कदम यांनी ‘मटा’त लिहिलेले चार लेख (गेस्टरूम?) वाचले होते. त्यात एका लेखातल्या युवकाचे लग्न ठरले आहे, तर त्याआधी एड्स चाचणीसाठी त्याने प्रयोगशाळेत रक्त सोपवले आहे. रिपोर्ट यायचा आहे, त्या मन:स्थितीचे चित्रण होते. तपशील विरून गेले आहेत तरी ती जीवघेणी घालमेल अजून आठवते.
‘काळे आकाश निळा प्रकाश’ (ग्रंथाली, डिसेंबर २०१९) वाचताना मनात हे दोन्ही अनुभव पुन्हा जागे झाले. हे आत्ता आलेलं डॉ. प्रमोद सलगरकर यांचं पुस्तक एड्ससंबंधात जवळपास दोन दशकं उपचार, त्याहीपेक्षा कौन्सिलिंग करताना आलेल्या अनुभवांचं गाठोडं उलगडतं. व्यापक अर्थानं हे यातनांचं गाठोडं आहे. ‘पॉझिटिव्ह’मधल्या नामवंत कलाकारांच्या कथा काय किंवा किशोरच्या लेखातला अनुभव काय, हे फिक्शन होतं. वास्तवाचा, त्याच्या निरीक्षणांचा आधार त्याला असणारच, तरी ते कथात्म साहित्य होतं. पण सलगरकरांचे साध्या, अनलंकृत भाषेतले अनुभव वाचताना ‘facts are stranger than fiction’चा भोवळ आणणारा अनुभव येतो.
अनुभव सांगतानाच हे पुस्तक एकुण मानवी लैंगिकतेसंदर्भात वेगवेगळ्या संदर्भात मौलिक चर्चा करते.
The sky was blue
Now it's black
People hate each other
And die one after the another
Because of HIV AIDS...
What an illness...
हा दक्षिण आफ्रिकेतल्या एका शाळकरी मुलीचा काव्यमय उद्गार त्यात सुरुवातीला दिलाय. एड्सच्या भस्मासुरामुळे जवळपास दोन दशकांत कंठाळी बोंबाबोंब करावी, असं वाटण्याइतपत हायपर असणारी अभिव्यक्ती आता ‘निळे असलेले आकाश काळे झाले आहे...’ अशी बरीचशी व्यक्तिगत असलेल्या उदासीपर्यंत बदलली आहे. धोका अजून संपलेला नाही, पण यापेक्षा या काळात त्याने मानवी नैतिकतेचे बुरखे ज्या पद्धतीने फाडले, त्यावर सलगरकर गांभीर्यानं काही विचार मांडतात.
लैंगिक जीवनाचं लोकशाहीकरण अद्याप नाही.
लैंगिक व्यवहार पुरुषकेंद्रीत, त्याला धार्मिक, तात्त्विक, कायदेशीर अनुमोदन.
घराघरातील समागमाचं स्वरूप कुरूप आहे.
व्यक्तींच्या सार्वजनिक, खासगी आणि मानसिक जगण्यात गुप्तता आणि विसंवाद, त्यातील ताणांसह माणसं जगतात.
समाजातले लैंगिक व्यवहार इतके गुंतागुंतीचे की, (ते समजून घेताना) आपण अंडरवर्ल्डमध्ये प्रवेशतोय असं वाटतं.
ही त्यातली त्यांची काही निरीक्षणं.
व्यापक अर्थानं लैंगिकतेनं जीवनातील सर्व क्षेत्रं व्यापून टाकली आहेत. एड्स हा त्याचा छोटा (दृश्य) आविष्कार आहे. मानवी लैंगिकतेचे मूलभूत आणि नवीन आकृतीबंध तरुणांसमोर ठेवत, निकोप लैंगिकतेचा परिचय करून देणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
नैतिक मूल्यांकन होण्याच्या सार्थ भीतीमुळे एड्स रुग्णांशी संवाद अवघड होतो. सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोनातून आत्मचिंतनाकडे घेऊन जाण्याचं आव्हान, त्यातूनच कामवासनेचा दबाव आणि मृत्यूचं भय यांच्याशी यशस्वी सामना शक्य होतो. मुळात स्खलनशीलता समजून घेतली तरच हे शक्य होतं. सलगरकर त्याची अनेक उदाहरणं सांगतात. टॉलस्टॉय म्हणतो तशी प्रत्येक दुःखाची वेगळी कथा...
आपण शेण खाल्लंय. लायकी आणि जरुरीपेक्षा जास्त पैसा, त्याला गैरवाटा दाखवणारे दोस्त, कामातूर मनःस्थिती (या भुताला कंट्रोल करायला काही मंत्र निघाला नाही बघा!) अशी खुली कबुली... आता संवाद व सेक्स दोन्ही बंद आणि मानगुटीवर मरणाचं भय या परिस्थितीचा उतारवयात यशस्वी सामना करणारे वयस्कर गृहस्थ सर्वांच्या ‘अण्णासाहेब’ या संबोधनाला पात्र होतात.
बांधकामावर सेंट्रींग मिस्त्री म्हणून काम करणारा तो, जीवाची मुंबई करताना सोबत एड्स घेऊन गावी येतो. सोबत दारू आहेच. संध्याकाळी अंधारात नशेत विहिरीत पडतो, मांडीचं हाड बाहेर येतं. ते दिसत असूनही नशेत वेदना जाणवत नाही. दारू सोड म्हटल्यावर म्हणतो, ‘तसं नव्हं डाक्टर, दारू तारी त्याला कोण मारी. हा एड्सचा जंतूपण दारू पिऊन मरंल बघा एक दिवस...’
कैक मती गुंग करणारे अनुभव. सलगरकरांकडे सहृदयता आहेच, पण रुग्णाचं ऐकून घेण्याची अद्भुत म्हणावी अशी क्षमता आहे.
‘वूमन इज माय वीकनेस अॅण्ड सेक्स इज आज माय स्ट्रेंथ. एचआयव्हीनं दांडी उडाली साहेब, आऊट होऊन परत निघालो. आता खालमानेनं रडत जायचं का बॅट फिरवत वर तोंड करून शिट्टी मारत जायचं हे आपणच ठरवणार. मी शिट्टी मारत जायचं ठरवलंय...’ म्हणणारा सिनेमात एक्स्ट्रॉची कामं करणारा तो, मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करणारा जयवर्धन, किरकोळ तपासणीत एड्सचं निदान झाल्यावर त्याचं सगळं जग उलटंपालटं होतं. नोकरी, परिवार, मित्र दुरावतात, आर्थिकबरोबर लैंगिक उपासमार. कड्याच्या टोकावर आल्यावर तो शरीरातल्या व्हायरसशीच बोलायला लागतो.
माझे शरीर पोखरू नकोस
मला मरू नको देऊस
मी जाताना तुला घेऊन जाईन ,
तेव्हा माझा मित्र होऊन राहा, शेवटपर्यंत..
(सलगरकर ही युरोपातल्या एका एचआयव्ही पेशंटची कविता इथं उद्धृत करतात) त्याची जीवनशैली सकारात्मकतेनं बदलून जाते.
असे १५-१६ वेदनेचे वेगवेगळे चेहरे या पुस्तकात आहेत. निदानाचा धक्का, बदनामी आणि मृत्यूचा पायरव, यामुळं थिजलेली जाणीव, हतबलता, कालांतरानं नाईलाजानं स्वीकार, जबरदस्तीची लैंगिक उपासमार, सगळीकडून वेगळे - सुटे होत जाणं, तरी अमीट जीवनेच्छा हे सगळं वाटून घेण्यासाठी समदुःखींचा शोध, असे आणि या पलीकडचंही अकल्पनीय असं बरंच काही या अनुभवांत आहे. ‘जॉय ऑफ एड्स’, ‘शी गाईड हॅपिली देअर आफ्टर’, ‘चंदूची आई’, ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ अशी त्यांची शीर्षकंही बोलकी आहेत. या आणि अशा व्यापक अर्थानं सामाजिक तरी व्यक्तिगत दुःख-यातनांच्या कथा आहेत. त्याही पलिकडे त्यात अदृश्यं असणारी स्त्रियांच्या शोषणाची नस सलगरकर अचूक पकडतात, त्यातली निरिक्षणं जास्त महत्त्वाची आहेत.
या पुस्तकात एकुण ३३ लेख आहेत. यात उपचारांदरम्यान लक्षात राहून गेलेल्या रुग्णांचे अनुभव आहेत, तसे एड्सनं ऐरणीवर आणलेल्या निकोप लैंगिकतेची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा करणारे लेखही आहेत. खरं तर पुस्तक या दृष्टीकोनातून दोन भागात संपादित व्हायला हवं होतं, असं वाटतं.
या दोन दशकांत एड्स केंद्रावरून काहीसा परिघावर सरकला याचं कारण यावर जगभरात झालेलं मंथन आणि संशोधन. या संदर्भात झालेल्या परिषदा, त्यात वाचले गेलेले निबंध, झालेली सर्वेक्षणं या सगळ्याची नोंद करत त्यातल्या तथ्यांची आपल्या अनुभवांशी सांगड घालत मानवी लैंगिकतेची सलगरकर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडणी करतात.
‘देहविक्रय करणाऱ्यांसाठी ‘कमर्शियल सेक्स वर्कर’ या शब्दालाच आक्षेप घेत हे बहुतेक जणी पोटापाण्यासाठीच करत असल्यानं ‘सर्व्हायवल सेक्स वर्क’ आहे म्हणत ‘हा काही वेगळाच ग्रुप आहे. त्याची स्वच्छता केली की झालं, या आणि अशा त्यामागच्या दृष्टीकोनालाच सुरुंग लावणाऱ्या स्त्रिया यात आहेत.’ (देवदासी ते देशदासी)
‘स्त्री आणि पुरुष दोघांनाही एड्स होत असला तरी स्त्रियांवर होणारे त्याचे परिणाम भयानक आणि अधिक व्यापक आहेत. त्याचे कारण जीवशास्त्रीय नव्हे तर समाजशास्त्रीय आहे, असं सांगत आपल्या समाजात स्त्री असणं म्हणजे काय असतं आणि पुरुष असणं म्हणजे काय असतं, याची तपशीलवार मांडणीच सलगरकर करतात. हे तसे माहीत असलेलेच पण या प्रकाशात वेगळेच भासते.’ (सेक्शुअल पॉलिटिक्स आणि एड्स)
‘ते आणि आम्ही’ यात तृतीयपंथीयांशी बोलण्याचा अनुभव येतो, तो काहीसा अंजन घालणारा आहे.
राजकारण, धर्म, अध्यात्म अशी अशी अनेक संदर्भात लैंगिकतेची मांडणी करत सलगरकर लैंगिक व्यवहारावर नव्या युगाचं मूल्यनियंत्रण असावं अशी अपेक्षा व्यक्त करतात. एड्सचा प्रसार काहीसा आटोक्यात आला, तसे लैंगिक वर्तनावर आलेले निर्बंध सैलावत आहेत, ‘बाजारपेठ’ पुन्हा ‘बहरते’ आहे, यावरून त्याचं महत्त्व कळावं. खरं तर एड्ससारख्या अशा कुठल्या कारणा-निमित्तापलिकडे जाऊन याचा विचार व्हावा असं त्यांना वाटतं. पण जगभर सगळेच व्यवहार बाजारपेठीय मूल्यांवर चाललेले असताना आणि एड्सची तिथली जागा पहिल्या रांगेतून काहीशी मागे सरकलेली असताना आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकणारी ही चिकित्सा कशी व्हावी?
या पुस्तकाला डॉ. यश वेलणकर यांची छोटी पण अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. त्यात या पुस्तकाचं महत्त्व सांगतानाच ‘सैराट’ वागण्यावर नियंत्रण आणायचं असेल तर काय करायला हवं यावरही चर्चा आहे. तीही वाचावी अशी आहे.
शिरीष घाटे यांचं मुखपृष्ठही पुस्तकाची नेमकी नस पकडणारं आहे.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Fri , 14 February 2020
अतिशय नेमके परीक्षण. डॉ. सलगरकर यांनी सामान्यपणे तुम्ही-आम्ही कानकोंडे होऊ असा विषय घेऊन अनेक सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न अतिशय नेटाने केला आहे. नितीन वैद्य यांनी हे सर्व खूपच नेमकेपणाने लिहिले आहे. अभिनंदन नितीन वैद्य. हे पुस्तक वाचणार्या पर्यंत गेले पाहिजे, या साठी या लेखाचा उपयोग होईल असे वाटते. ---जयंत राळेरासकर,