गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे!
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • गोव्याच्या कार्निव्हलचे एक संग्रहित छायाचित्र
  • Wed , 12 February 2020
  • पडघम सांस्कृतिक कार्निव्हल Carnival गोवा Goa किंग मोमो King Momo गोवा कार्निव्हल Goa Carnival

कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसमजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम असतो. त्याची जनताही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाट्याने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळते.

ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांच्या उपवासकाळाच्या म्हणजे लेंट सिझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवार वा अ‍ॅश वेन्सडे या दिवसापासून हा उपवासकाळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाच्या दिवसापर्यंत म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होते.

या लेंट सिझनमध्ये भाविक लोक आत्मक्लेश म्हणून उपवास करतात, मदिरा, मांस वा अनेक आवडीचे खाद्यपदार्थ वर्ज्य करतात, म्हणून या दीर्घ उपवासकाळाआधी मनसोक्त खाऊन-पिऊन घ्यावे, अशी कार्निव्हलमागची कल्पना आहे. भस्म बुधवाराच्या आधी येणाऱ्या शनिवारी या कार्निव्हलची सुरुवात होते आणि मंगळवारी रात्री हा उत्सव संपतो. भस्म बुधवारी चर्चमध्ये धर्मगुरू भाविकांच्या कपाळावर राखेने क्रुसाची खूण करत ‘माती असशी, मातीत मिळशी’ (यु आर डस्ट अँड टु डस्ट यु शाल रिटर्न!) असे ‘बायबल’मधील वचन म्हणत मानवाच्या मर्त्यपणाची जाणीव करून देतात. 

काळाप्रमाणे या उपवासकाळातील व्रतवैकल्याचे स्वरूप बदलले आहे. माझ्या लहानपणी श्रीरामपूर येथील आमच्या घरातील सर्व सज्ञान व्यक्ती या चाळीस दिवसांतील बुधवारी आणि शुक्रवारी उपवास करत. म्हणजे दिवसातून केवळ एकदा (दुपारी वा रात्री) जेवण व्हायचे, दिवसभर चहा आणि पाण्याशिवाय इतर कुठलाही आहार नसायचा. बाई आणि दादा यांचे तर वर्षभर आठवड्यातून दोन वार उपवासाचे असत, येशू ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा शुक्रवार आणि शनिवार मार्याबाईचा म्हणजे मारीयामातेचा. या उपवासकाळात बुधवारच्या उपवासाची भर पडायची. (दादांना ९० वर्षांचे आणि बाईला ८० वर्षे इतके आयुष्य लाभले.) लेंट सिझनमध्ये बुधवारी आणि शुक्रवारी घरात बीफ पूर्णत: वर्ज्य असायचे. मात्र का कुणास ठावूक अंडी, ताजे मासे वा बोंबील, सुकट, सुकलेले मासे वगैरेंवर संक्रांत नसायची.

माझ्या एका भावासारखे अनेक भाविक लोक भस्म बुधवारपासून थेट गुड फ्रायडेपर्यंत म्हणजे चाळीसहून अधिक दिवस उपवास पाळायचे. काहीजण मांसाहार वा मद्यपान टाळत वा दाढी राखत. आता या उपवास पद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. हल्ली असे चाळीस दिवस कडकडीत उपास करणारे भाविक मला तरी क्वचितच दिसतात. लोकांचा कल पाहून कॅथोलिक चर्चनेसुद्धा हल्ली संपूर्ण लेंट सिझनमधील फक्त भस्म बुधवार आणि गूड फ्रायडे हे दोनच दिवस ऑब्लिगेटरी वा सक्तीच्या उपवासासाठी राखून ठेवले आहेत! त्याशिवाय या उपवासाचे स्वरूपसुद्धा अगदी ऐच्छिक असे असते.

अशा या उपवासकाळाशी कार्निव्हल सण जोडला गेला आहे. या वर्षी गोव्यात पणजी येथे किंग मोमोचा अंमल पुढच्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुरू होईल आणि मंगळवार २५ फेब्रुवारीच्या रात्री संपेल. गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उत्सवाची सध्या जय्यत तयारी चालू आहे.

मात्र गेल्या काही शतकांत युरोप आणि इतर देशांत कार्निव्हल साजरा होण्याचे स्वरूप पाहता कॅथोलिक चर्चने या उत्सवापासून आपले हात पूर्णत: झटकून टाकले आहेत. चर्चच्या वार्षिक कॅलेंडरात कार्निव्हलचा उल्लेखही नसतो! सांताक्लॉज आणि चर्चचा नाताळ सण यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो, तरी त्यांचा परस्परसंबंध कायम राहिला आहेच!

कार्निव्हल आणि चर्चचेही असेच आहे. आज युरोपात, लॅटिन अमेरिकेत आणि पोर्तुगीज, स्पॅनिश वगैरे देशांच्या जुन्या वसाहती असलेल्या अनेक देशांत कार्निव्हल हा लोकोत्सव म्हणून अगदी उत्साहाने साजरा केला जातो. भारतात केवळ गोव्यात कार्निव्हल साजरा होतो. कारण हे राज्य पोर्तुगीजांच्या अंमलाखाली तब्बल साडेचारशे वर्षे होते. पंतप्रधान पंडित नेहरूंनी १९६१ साली लष्करी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश भारताच्या ताब्यात घेतला. या पोर्तुगीज राजवटीचा गोव्यातील एक सांस्कृतिक वारसा म्हणजे हा कार्निव्हल उत्सव. 

गोव्यातला कार्निव्हल मी अगदी पहिल्यांदा सत्तरच्या दशकात पाहिला. तेव्हा हा उत्सव बऱ्यापैकी एक लोकोत्सव होता. पणजीच्या प्रासा म्हणजे मुख्य बसस्टँडपासून दुपारी चारच्या दरम्यान कार्निव्हलची मिरवणूक सुरू होई. त्यानंतर त्या काळात म्हापसा आणि उत्तर गोव्याला पणजीला जोडणारा एकमेव दुवा असणाऱ्या साडेचारशे वर्षे जुना असलेल्या छोट्याशा पाटो ब्रिजवरून ही मिरवणूक पणजीत येई. (पणजीत आज अनेक फ्लायओव्हर झाले असल्याने हा ऐतिहसिक पाटो ब्रिज आता अगदी दुर्लक्षित आणि अडगळीत पडल्यासारखा दिसतो. असे असले तरी रूआ दी ओरेम या रस्त्याकडे आणि पाटो कॉलनीत जाण्यासाठी हा पूल इमानेइतबारीत आपली सेवा आजही पुरवत आहे.)

पणजीत कार्निव्हलची मिरवणूक मांडवीच्या तीरावरून त्या काळच्या सचिवालय वा जुन्या आदिलशाह पॅलेसमार्गे आझाद मैदानापाशी येई. त्यानंतर उंच टेकडीवर असलेल्या पणजी चर्चच्या पायऱ्याजवळ ही मिरवणूक संपायची. तेथे आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक देखण्या युवतींनी घेरलेला किंग मोमो समोर असलेल्या हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा वाचून गोव्यात आपला चार दिवसांचा अंमल सुरू होत असल्याचे तो टाळ्यांच्या गजरात जाहीर करत असे.  

मिरामार येथल्या धेंपे कॉलेजात मी शिकत असताना प्रतापसिंह राणे सरकारच्या काँग्रेस मंत्रिमंडळात फ्रान्सिस्को सार्दिन्हा हे शिक्षणमंत्री होते. उंचेपुरे आणि देखणे असलेल्या सार्दिन्हा यांनी शिक्षक असताना आणि आमदार होण्याआधी कार्निव्हल सणात किंग मोमोची भूमिका पार पाडली होती. (काही काळानंतर याच सार्दिन्हा यांनी बंडखोरी करून गोव्यात भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले आणि भाजपला गोव्याच्या राजकीय सत्तेत चंचूप्रवेश मिळवून दिला. सार्दिन्हा सध्या काँग्रेसचे उत्तर गोव्याचे खासदार आहेत!) तर किंग मोमोच्या भूमिकेसाठी निवड होण्यासाठी रुबाबदार व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक असते. फ्रान्सिस्को सार्दिन्हा यांच्या मुलानेही - शालोम सार्दिन्हा यांनीही- चार वर्षांपूर्वी किंग मोमोची भूमिका केली होती.             

धेम्पे कॉलेजात बीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझ्याच वर्गात असलेल्या सोनालिता  (रॉड्रिग्रस किंवा फर्नांडिस) या मुलीला किंग मोमोची कॉन्सॉर्ट होण्याचा बहुमान मिळाला होता. कॉलेजात मी स्टुडंटस युनियनची निवडणूक लढवताना समान मते मिळाल्याने फेरनिवडणूक जाहीर होऊन थोडीशी चुरस आणि कॉलेजमध्ये तणावही निर्माण झाला होता. या वेळी मी फेरप्रचार करताना सोनालिताशी संभाषण झाले होते. त्यानंतर मिरामारच्या आमच्या प्री-नोव्हिशिएट (पूर्वसेमिनरी) मध्ये राहणाऱ्या आणि आम्हा दोघांचाही मित्र असणाऱ्या बेनी फरीयाशी बोलताना सोनालिताने म्हटले होते, “कामिलो इज स्स्सो क्युट!’’ कॉलेजातील ब्युटी क्वीन असलेल्या सोनालिताने माझ्याबद्दल वापरलेले हे विशेषण अगदी उदार मनाने बेनीने माझ्यापर्यंत पोहोचवले होते. ते ऐकताच (मूळ मराठी माध्यमातील असल्याने) ‘क्यूट’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी मला अनेक मित्रांशी बोलावे लागले होते. आजही ‘क्युट’ हा शब्द ऐकताना, वापरताना सोनालिताची हमखास आठवण येते!

त्याच काळात ‘नवहिंद टाइम्स’ या त्या वेळच्या गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावरच्या जाहिरातीत सोनालिताचे मॉडेल म्हणून छायाचित्र छापून येत असे. तर त्या वर्षी कार्निव्हलच्या मिरवणुकीत केंद्रस्थानी असलेल्या सजवलेल्या चित्ररथात सोनालिता किंग मोमोबरोबर होती. अर्थात नेहमीप्रमाणे किंग मोमोच्या आजूबाजूला अनेक रंगीबेरंगी पोशाखातील इतर अनेक युवती होत्याच. 

मिरवणुकीत रांगेने एकामागे एक येणारे सजवलेले चित्ररथ, दोन चित्ररथांमध्ये रंगीबेरंगी कपडे, डोनाल्ड डक, मिकी माऊस यासारख्या पात्रांचे पोशाख केलेले अनेक युवक आणि युवती आणि त्यांना तालावर नाचवण्यासाठी ट्रकवर असलेले लाइव्ह बँड असे कार्निव्हलचे स्वरूप असायचे. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला कार्निव्हलचे आतासारखे बाजारीकरण झाले नव्हते आणि विविध कंपन्यांनी आपापले चित्ररथ मिरवणुकीत आणण्याची प्रथा आजच्याइतकी बोकाळली नव्हती.  त्या काळात गोव्याच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब या मिरवणुकीत दिसत असे. या मिरवणुकीचे बाजारीकरण होण्याआधी केवळ एखादी व्यक्ती किंवा चार-पाच जणसुद्धा आपली कला आणि अभिनय यांचे प्रदर्शन या उत्सवात करू शकत असत.

थोडक्यात गोव्याच्या समाजजीवनावर आधारीत असलेल्या मारिओ मिरांडा यांच्या कुठल्याही व्यंगचित्रांत दिसणारी अनेक दृश्ये आणि पात्रे कार्निव्हलच्या या मिरवणुकीत दिसत असत. उदाहरणार्थ, चर्चमध्ये लग्नसोहळ्यासाठी थ्री-पीस सूट घातलेला नवरदेव आणि सफेद गाऊनमधील वधू, एखाद्या गावातील टॅव्हर्नमध्ये फेणी वा उर्राक पित बसलेला एखादा बेबदो, केसात ताजे फूल अडकवून आणि टोपलीत मासळी घेऊन आलेली कोळीण, दामूच्या लग्नाला दागदगिने घालून निघालेली आणि नावाड्याला पलिक़डच्या तीरावर नेण्याची विनंती करणारी, त्याबदल्यात आपले दागिने ‘घे घे घे घे घे रे, घे रे सायबा’ म्हणणारी देखणी, काळी टोपी, सदरा, कोट आणि धोतर घातलेले बाप्पा, पांढऱ्या झग्यातील पाद्री आणि माद्री, घराच्या बाल्कनीत गिटार वाजवणारे तरुण-तरुणी, पाश्चात्य आणि गोमंतकीय संस्कृतीचा मिलाप असलेले मांडो नृत्य करणारे पथक किंवा ‘तियात्र’ (कोकणी नाट्य) मधील काही पात्रे! गोव्याच्या या समाजजीवनाचे कार्निव्हलच्या मिरवणुकीत प्रतिबिंब दिसत असे.

नंतरच्या काळात हळूहळू या मिरवणुकीत बदल होत गेला. विविध कंपन्यांनी प्रायोजित केलेल्या चित्ररथांत महागडे पोशाख घातलेले पन्नास-साठ कलाकार दिसू लागले. कलाकारांच्या आणि वाद्यांच्या संख्येत भर पडत गेली. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारतर्फे पर्यटन खात्यातर्फे कार्निव्हल सणाचे प्रमोशन केले जात असे. मिरवणुकीच्या मार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्यामागे म्हणजे तेव्हाच्या पणजी टुरिस्ट हॉस्टेलपाशी बसून मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि इतर मंत्री मिरवणूक पाहत असत. कार्निव्हल या सणात ख्रिस्ती समाजातील बहुतांश लोक भाग घेत असत. त्यामुळे शिगमो हा हिंदू समाजाचा लोकप्रिय उत्सवही याच धर्तीवर सरकारतर्फे साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.  

कार्निव्हल या सणाचा ख्रिस्ती धर्माशी काहीही सबंध नाही अशी भूमिका गोव्याच्या कॅथोलिक चर्चने अनेकदा घेतली. मला आठवते एकदा तर रांपणकारांच्या (रांपण म्हणजे मासेमारीचे जाळे)  वा कुठल्या तरी आंदोलनाच्या काळात या सोहळ्यावर बहिष्कारच टाकण्याचे आवाहन गोव्याच्या चर्चने लोकांना केले होते. मात्र महसूलाच्या दृष्टीने या उत्सवाकडे एक सोन्याची कोंबडी म्हणून पाहाणाऱ्या सरकारकडून चर्चच्या या भूमिकेकडे कानाडोळा करण्यात आला. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या भाजपाच्या सरकारनेही पाश्चात्य संस्कृतीच्या कार्निव्हलला उत्तेजन दिले, याचे कारण हेच होते. (जुन्या गोव्यातील संत फ्रान्सिस झेविअर यांच्या अवशेषाचे दर दहा वर्षांनी प्रदर्शन केले जाते आणि या महिन्या-दीड महिन्यांच्या काळात देशभरातील लाखो भाविक गोव्याला भेट देतात. या धार्मिक पर्यटनामुळे गोव्याच्या महसूलात भर पडत असल्याने भाजप सरकारच्या काळातही अगदी धर्मनिरपेक्ष वृत्तीने या अवशेषांच्या प्रदर्शनाचे प्रमोशन केले गेले.)

भस्म बुधवारच्या आधल्या शनिवारी पणजीत कार्निव्हलची सुरुवात झाल्यानंतर रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी कार्निव्हलच्या या मिरवणुका मडगाव, वॉस्को, केपे, म्हापसा वगैरे शहरांत होतात. पणजीत पहिल्या दिवशी होणाऱ्या मिरवणुकीत सामील होणाऱ्या चित्ररथांच्या पथकांतील विजेत्यांना बक्षीसे दिली जातात. या संदर्भात पत्रकार म्हणून अनुभवलेली एक घटना आठवते.

ते बहुधा १९८३ साल असावे. त्या वेळी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये मी बातमीदार होतो. मुख्य बातमीदार प्रमोद खांडेपारकर यांनी त्या शुक्रवारच्या संध्याकाळी घरी जाण्याआधी टाईप केलेली एक दोन पानी बातमी माझ्याकडे सोपवली. विषयांतर होण्याचा दोष पत्करून खांडेपारकर यांच्याविषयी थोडी माहिती सांगणे उचित होईल. आमच्या ऑफिसमध्ये केवळ खांडेपारकर यांनाच सिंगल स्पेसमध्ये बातम्या टाइप करण्याची मुभा होती. याचे कारण म्हणजे अचूक इंग्रजी स्पेलिंग, लिहिलेल्या घटनेची सत्यता आणि बातमीत एकही शब्द गाळण्यासारखा नसणार ही त्यांच्या बातम्यांची खास वैशिष्ट्ये होती. आपल्या मिशीला एकदा पीळ देऊन शंभर-सव्वाशे शब्दांची सलग दोन पॅरा बातमी ते न थांबता टाइप करत असत. आणखी एक विशेष म्हणजे राजकीय विश्लेषक असूनही त्यांचा कल रमाकांत खलप आणि डॉ. काशिनाथ जल्मी यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे आहे कि मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडे आहे, हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या हाताखाली नऊ वर्षे काम करूनही मला कधीच समजले नाही. तर त्या दिवशी खांडेपारकर यांनी ती बातमी माझ्याकडे सोपवली आणि सांगितले- “उद्या संध्याकाळी साडेसातनंतर ही बातमी डेस्ककडे दे.”

ती बातमी पाहून मी चक्रावलोच. दुसऱ्या दिवशी पणजीत होणाऱ्या कार्निव्हलच्या मिरवणुकीची ती आजच लिहिलेली बातमी होती. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या त्या मिरवणुकीतील चित्ररथांमधील विजेते निवडणाऱ्या परीक्षक समितीत खांडेपारकर यांचा समावेश होता. त्यामुळे बातमी लिहिण्यासाठी त्यांना वेळ मिळणे शक्य नव्हते. म्हणून उद्या होणाऱ्या मिरवणुकीचा वृतांत आदल्या दिवशीच त्यांनी लिहून ठेवला होता. मिरवणुकीचा मार्ग, चित्ररथांचे धुंद करणारे संगीत, त्या संगीताच्या तालावर नाचणारे कलाकार आणि त्यांचा पोशाख, प्रेक्षकांचा प्रतिसाद, पोलिसांचा बंदोबस्त, वगैरे सर्व तपशील त्या बातमीत होते.

“गेली पंचवीस वर्षे मी कर्निव्हलच्या मिरवणुकांच्या बातम्या देत आहे. त्यामुळे मी दिले आहे त्यापेक्षा वेगळे काही उद्या घडणार नाही. काही अनुचित घटना झाली तरच यापेक्षा वेगळी बातमी द्यावी लागेल. तू फक्त उद्या संध्याकाळी जाहीर होणाऱ्या विजेत्यांची नावे या बातमीला जोडून दे!” खांडेपारकरांनी मला सांगितले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे आयोजकांनी दिलेल्या बक्षीसविजेत्यांची यादी जोडून ती बातमी मी डेस्ककडे सोपवली. कार्निव्हलच्या त्या बातमीमुळे आवश्यक त्या सर्व खबरदारी घेऊन दिवाळी-नाताळ वगैरे नेहमीच्या सणांच्या आणि घटनांच्या ‘टेबल-न्यूज’ बातम्या कशा करावयाचा याचा मला वस्तुपाठच मिळाला. उदाहरणार्थ, गोव्यात वादळ-वाऱ्याच्या पावसात कुठे ना कुठे झाडे पडतातच, पावसाच्या पाण्याने जमिनीतून साप बाहेर येतात, वाहतूक व्यवस्था कोलमडते, फायर ब्रिगेडला अनेक ठिकाणी बोलावले जाते, त्यांच्याशी आणि पोलिसांशी बोलून त्यांचा हवाला देऊन अशा प्रकारच्या टेबल न्यूज करता येतात, हे मला समजले.  

भारतात केवळ गोव्यातच कार्निव्हल साजरा होत असला तरी या राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारा तो प्रमुख उत्सव नाही. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि लांबलेल्या वीक-एन्डला गोव्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. गेल्या काही वर्षांत तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी म्हणजे थर्टी-फर्स्ट डिसेंबर कुटुंबियाबरोबर वा मित्रमंडळीबरोबर घालवण्यासाठी देशभरातील पर्यटकांसाठी गोवा हे एक आवडते ठिक़ाण बनले आहे. या काळात सर्वाधिक संख्येने गोव्यात पर्यटक येतात. पण पूर्णत: पाश्चात्य संस्कृतीचा असलेला कार्निव्हल हा उत्सव त्या तुलनेत भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे! 

.............................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Rajat Khamkar

Mon , 17 February 2020

खूप सुंदर लेख आहे सर, गोव्याच्या सणाच सुरेखपणे वर्णन केलय .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......