जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • मोरोक्कोचा नकाशा
  • Wed , 12 February 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War ओटो फॉन बिस्मार्क Otto von Bismarck बिस्मार्क Bismarck कैसर विल्हेल्म दुसरा Kaiser Wilhelm II

आपण मराठीत किंवा हिंदीत नेहमी ‘पहिले महायुद्ध’, ‘दुसरे महायुद्ध’ असे म्हणतो. दोन्ही विश्वयुद्धेच असल्याने त्यांना पहिले किंवा दुसरे विश्वयुद्ध म्हणणे चूक नाही. परंतु युरोपियन इतिहासकार पहिल्या विश्वयुद्धालाच ‘महायुद्ध’ म्हणतात. The Great war\महायुद्ध हे एकमेव आहे, ते म्हणजे १९१४ ते १९१८ झालेले पहिले विश्वयुद्ध. दुसरे विश्वयुद्ध हे दुसरे महायुद्ध नाही. अर्थात हा तपशिलातला फरक असल्याने (आणि मुख्य म्हणजे सवय) आपणदेखील ‘पहिले महायुद्ध’ अशीच संज्ञा सरसकट वापरली आहे.

.............................................................................................................................................

पहिले महायुद्ध सुरू झाले त्याच्या आधी दिवंगत झालेले, पण ज्यांचा फार मोठा प्रभाव या महायुद्धावर पडला, अशी दोन(च) व्यक्तिमत्त्वे आहेत. योगायोगाने ते दोघे जर्मन आहेत. पहिला म्हणजे प्रिन्स ऑटो फॉन बिस्मार्क आणि दुसरा जर्मन सेनाध्यक्ष आल्फ्रेड फॉन श्लीफेन. म्हणून बिस्मार्कबद्दल दोन भाग खर्ची घालावे लागले. ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी जर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा (पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा, पण घशाच्या कर्करोगाने आजारी असल्याने फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८रोजी तो वारला. त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. खरे तर फ्रेडरिक तिसरा हा एक समंजस माणूस होता आणि युद्ध, त्याचे भयावह दुष्परिणाम, राष्ट्रवादाचा अगदी उगम ते हिंसक राष्ट्रवादापर्यंतची उत्क्रांती याचा तो साक्षीदार होता. त्याला अजून काही काळ अगदी १०-१२ वर्षे राज्य करायला मिळाली असती तर युरोपचा आणि जर्मनीचा इतिहास वेगळा असता, पण...

‘जर तर’च्या गोष्टींना इतिहासात अर्थ नसतो, म्हणून हे स्वप्नरंजन बाजूला ठेवून आपण परत १८८८ नंतरच्या जर्मनीकडे येऊ...

खरे तर इंग्लंड आणि फ्रान्सचे काही बरे नव्हते, तसे रशिया-इंग्लंडचेही वैरच होते, पण १९०४-५च्या सुमारास घटना अशा काही घडल्या की, नियतीचे दानदेखील युद्धाच्या बाजूने पडले असे म्हणावे लागते. १९०४-५च्या सुमारास रशिया-जपानमध्ये युद्ध सुरू झाले. इंग्लंडसारख्या मोठ्या भिडूला ग्रेट गेममध्ये दमवणारा रशिया जपानला सहज चिरडेल असे वाटले, पण जपान भलताच चिवट निघाला. त्याने रशियालाच जेरीला आणले. रशियाचा पराभव होणार अशी चिन्हे दिसू लागली. फ्रान्स आणि रशिया मैत्री करार असल्याने फ्रान्सला आता काही करणे भाग होते. पण जपान आणि इंग्लंडचे व्यापारी संबंध होते आणि भारत-चीनमधील आपल्या वसाहतीबाबत इंग्लंड हळवे असणार, हे ओळखून फ्रान्सने इंग्लंडला वाटाघाटीला बोलावले. दोघांनी मिळून रशिया आणि जपानला समजावून सामोपचार घडवून आणला.

खरे तर रशियाचा या युद्धात दारुण पराभव झाला होता, पण अब्रू वाचवत माघार घेता आल्याने तो शांत बसला आणि एक छोटेखानी आशियाई साम्राज्य प्रथमच या सत्तास्पर्धेत चमकले म्हणून जपान खूश झाले. मोठ्या भावाची भूमिका घेऊन आपण मोठी हानी टाळतो आणि आपले हितसंबंधही त्याने सुरक्षित राहतात, हे लक्षात आल्याने आता इंग्लंडदेखील फ्रान्सशी असलेले जुने वैर जरा बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीने फ्रान्स आणि रशिया मैत्री कराराकडे आणि युरोपच्या जर्मनीमुळे बिघडत चाललेल्या सत्तासमतोलाकडे बघू लागले. आणि मग फ्रान्स-रशियाच्या करारात १९०४ साली इंग्लंडही भागीदार झाले. जर्मनी विरुद्ध तीन मोठी राष्ट्रे एकत्र आली. त्याला ‘त्रिराष्ट्र संघ(Triple entente) असे संबोधले गेले. दोस्त राष्ट्रे/ किंवा allied nations हे नामाभिधान नंतरचे. अमेरिका युद्धात आल्यानंतरचे.

याच सुमारास आणखी एक नाटक घडले. त्यामुळे फ्रान्स-इंग्लंड युती बळकट झाली. ते आणि जर्मनी यांच्या मध्ये असलेली अविश्वासाची खाई रुंदावली.

मोरोक्कोचे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि आफ्रिकेतल्या जर्मन वसाहती

मोरोक्को हा उत्तर आफ्रिकेतला एक देश. तसा जवळपास सगळा आफ्रिका युरोपियन सत्तांच्या वसाहतींनी व्यापलेला, पण हा देश मात्र कुठल्याही युरोपियन सत्तेकडे नव्हता. त्याला कारण होते. भूमध्य समुद्रातून पश्चिमेकडून बाहेर पडून अटलांटिक महासागरात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अगदी चिंचोळी अशी जिब्राल्टरची सामुद्रधुनी. ती या मोरोक्कोजवळ होती. त्यामुळे जो देश या मोरोक्कोचा ताबा घेईल, तो या समुद्र मार्गाचेही नियंत्रण करेल. मग अशा देशाविरुद्ध इतर देशही लगेच एकत्र येणार (हे असे पूर्वी अनेक वेळा झालेही होते.) म्हणून सगळ्यांनी मिळून समजुतीने हा देश गिळंकृत केलेला नव्हता (तसा या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीचा उत्तरेकडचा किनारा स्पेनकडे होता, पण १९व्या शतकात स्पेन अगदीच कमकुवत राष्ट्र होते आणि त्यांचा युरोपातल्या मोठ्या देशांना दुखवायचा कोणताही हेतू नव्हता). 

या नकाशावरून समजून येईल की, यात इंग्लंडचे हितसंबंध किंवा व्यापारी संबंध फारसे धोक्यात येत नसत, फक्त युरोपातल्या सत्तासमतोलच्या संघर्षात ते या भागाचा प्यादे म्हणून वापर करत. जर्मनीचे तसे नव्हते. खाली दाखवलेल्या दुसऱ्या नकाशात जर्मनीच्या आफ्रिकेतल्या वसाहती दाखवल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवायाचा तर जर्मनीकरता जिब्राल्टरची सामुद्रधुनी हा एकमेव समुद्री मार्ग होता. पूर्वेकडचा सुवेझ कालवा आणि इजिप्त इंग्लंडकडे होते. पण रशिया-जपानच्या युद्धानंतर एकत्र आलेल्या इंग्लंड-फ्रान्स्मुळे समीकरण बदलू लागले. इजिप्त आधी नेपोलियनच्या साम्राज्याचा भाग, पण नंतर त्याचा कब्जा इंग्लंडने घेतला. इजिप्त आणि सुवेझ कालवा त्यांच्या ताब्यात होता. पूर्वेकडील देशांशी व्यापार आणि त्याच्या पूर्वेकडील आणि महत्त्वाच्या वसाहतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे होते. पण त्याला फ्रान्सने कायम आक्षेप घेतला होता. आता फ्रान्सने मोरोक्कोचा कब्जा केला तर इंग्लंड त्याला हरकत घेणार नव्हते. त्या बदल्यात फ्रान्स इजिप्त आणि सुवेझबद्दल गप्प बसणार होते. म्हणजे जर्मनीचे डोळे पांढरे करायची उत्तम संधी, उत्तरेकडून इंग्लंड-फ्रान्स-रशिया हे तीन देश प्रत्यक्ष अन दक्षिण, पूर्व, पश्चिमेकडून त्यांच्या वसाहती, अशी अभूतपूर्व कोंडी होत होती. जर्मनी शांत थोडाच बसणार होता!

मोरोक्को-टँजियर-अगादिरचा तिढा (१९०५-१९११)

१८७८च्या बर्लिन काँग्रेससमोर भाषण करताना बिस्मार्क म्हणाला होता की, ‘आजचा युरोप म्हणजे दारूगोळ्याने भरलेले, अत्यंत स्फोटक असे कोठार बनले असून मोठ-मोठे नेते त्याच कोठारात बसून चिरूट ओढत आहेत. हे फार काळ शांत राहणार नाही, राहू शकत नाही. भडका नक्की कधी आणि कसा उडेल, हे मला सांगता येणार नाही. पण मी एवढे नक्की सांगू शकेन की, त्या कोपऱ्यातल्या बाल्कन देशात घडलेली एखादी लहानशी घटना, कुणाचे तरी एखादे वेडगळ कृत्य, हा वणवा पेटवायला पुरेसे ठरेल.’

आणि खरोखर ३६ वर्षानंतर याच दूरवरच्या कोपऱ्यातल्या एका बाल्कन प्रदेशात ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनावरून महाभयंकर युद्ध पेटले. आता बिस्मार्कच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटावे की, याच ब्लाकन प्रदेशात २०व्या शतकाच्या सुरुवातीला घडलेल्या तीन अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर घटनांनी ते पेटले नाही, याचे  आश्चर्य वाटावे, हे सांगता येणे कठीण आहे.

या तिन्ही घटनांमध्ये नक्की काय घडले (आणि मुख्य म्हणजे काय घडले नाही) ज्याने शांतता टिकून राहिली ते पाहणे उद्बोधक ठरावे. या तीन पैकी १९०५ व १९११ साली घडलेल्या दोन घटना मोरोक्कोशी संबंधित आहेत.

२०व्या शतकाच्या सुरुवातीला मोरोक्को हा कुणाही बड्या युरोपीय देशाची वसाहत नव्हता. तेथे इसवि सनाच्या आठव्या शतकापासूनच हसन घराण्याच्या सुलतानांची सत्ता होती आणि १९०५मध्ये मोरोक्कोचा सुलतान होता अब्दुल हफीझ. १९०४ साली झालेल्या त्रिराष्ट्र संघ करारामुळे (Triple entente cordial) फ्रान्सचा धीर वाढला. स्पेनला चुचकारून, त्यांना मोरोक्कोच्या शिकारीतला थोडा तुकडा देऊन गप्प करायचे आणि उर्वरित मोरोक्को आपण गिळायचा हे पक्के झाले. त्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली, पण जर्मनीने त्यात कोलदांडा घातला. जर्मनीला मोरोक्कोच्या स्वातंत्र्याची फार चाड होती अशातला भाग नव्हे, त्यांना स्वत:ला मोरोक्कोचा घास हवा होता असेही नाही, पण मागच्या वर्षी झालेला त्रिराष्ट्र संघ (Triple entente) करार किती दृढ आहे, हे पाहणे आणि जमल्यास त्यात खिंडार पाडणे, हे त्यांचे अंतस्थ हेतू होते. अर्थात बिस्मार्कसारखा मुत्सद्दी साथीला नसल्याने त्यांनी केलेले कृत्यही फारसे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे उत्तम उदहरण ठरेल असे नव्हते. उलट ‘आदर्श आंतरराष्ट्रीय धसमुसळेपणा’ कसा असतो, ते दाखवणारेच होते.

झाले असे की, भूमध्य समुद्रात नौका विहार(!) करण्यासाठी निघालेला कैसर विल्हेल्म आपला शाही जहाजांचा ताफा घेऊन अचानकच मोरोक्कोच्या उत्तर सीमेवरील आणि जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळील टँजियर या बंदरावर उतरला. तेथे त्याने सुलतानाची भेट घेतली आणि मोरोक्कोच्या स्वतंत्र राष्ट्र असण्याच्या हक्काला उघड मान्यता दिली. आपण मोरोक्कोच्या स्वातंत्र्य अन सार्वभौमत्वाचे संरक्षक असून जर्मनी मोरोक्कोशी व्यापार वाढवण्याठी उत्सुक असल्याचे जाहीरपणे सांगितले.

झाले! यामुळे फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये खळबळ माजली. लवकरच जर्मनी मोरोक्कोच्या सुलतानाला फशी पडून मोरोक्कोत एखादा नाविक तळ उभारणार, अशा अफवा पसरल्या. इंग्लंड आणि फ्रान्सच्या वृत्तपत्रांनी तशा आणि जर्मनीची निंदा करणाऱ्या बातम्या देण्याचा सपाटा लावला. याला तितकेच तिखट उत्तर जर्मनीच्या वृत्तपत्रांतून दिले गेले. तणाव एवढा वाढला की, आता लवकरच १८७१ प्रमाणे फ्रान्स-जर्मनी दरम्यान युद्ध होणार अशी हवा तयार झाली. या वेळी १८७१ प्रमाणे आपण तटस्थ न राहता फ्रान्सला पाठिंबा देऊ, मदतही करू अशी भूमिका रशिया आणि इंग्लंड दोघांनी घेतली. आश्चर्य म्हणजे आधीच चुचकारल्यामुळे म्हणा किंवा धमकावल्यामुळे म्हणा, स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला. फक्त काहीशा नाराजीने ऑस्ट्रिया जर्मनीच्या बाजूने उभा राहिला.

एकंदरीत हा जर्मनीचा डावपेचात्मक पराभव होता. या वेळी जर्मनीचा चान्सेलर होता प्रिन्स फॉन ब्युलो. त्याला जसे वाटले, तसे फ्रान्सला एकटे पाडणे, जमल्यास इंग्लंड-फ्रान्सच्या नव्यानेच झालेल्या मैत्रीत खिंडार पडणे राहिले दूर, उलट जर्मनीच एकटा पडला. शिवाय यामुळे जर्मनीबद्दल उत्तर युरोपीय राष्ट्रांना वाटणारा संशय बळावला.

फ्रान्सने त्याच्या सैनिकांच्या रजा तडकाफडकी रद्द करून सैन्य दलांची जर्मन सीमेजवळ जमवाजमव सुरू केली. जर्मनीनेही तसेच केले, शिवाय राखीव सैनिकांना सेवेत रुजू व्हायचे आदेश काढले. (तेव्हा अनेक देशांच्या नागरिकांना सक्तीची सैन्य सेवा करावी लागत असल्याने, दोन-पाच वर्षे अशी सेवा करून निवृत्त झालेले सैनिक राखीव म्हणून गणले जात अन त्यांना वेळ पडली की, त्यांच्या रेजिमेंटमध्ये रुजू व्हायला सांगितले जात असे.)

शेवटी मोरोक्कोच्या सुलतानानेच कोंडी फोडली. त्याने आंतरराष्ट्रीय लवाद बोलावला आणि त्यात आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सर्वाभौमत्वाला युरोपियन देशांनी मान्यता देण्याची मागणी केली. स्पेनचे शहर अल्जेसिरास येथे ही परिषद जानेवारी ते एप्रिल १९०६ अशी चालली. त्यात सुलतानाची मागणी मान्य केली गेली, पण त्याबदल्यात फ्रान्स-स्पेनला मोरोक्कोत व्यापाराचे विशेष हक्क(!) प्रदान केले गेले. यात जर्मनीलाला काही मिळाले नाही, पण त्यांनी दिलेली मोरोक्कोच्या स्वातंत्र्य अन सार्वभौमत्वाची ग्वाही मान्य करून त्याची जबाबदारी सगळ्यांनी उचलली.

अशा प्रकारे कसाबसा जर्मनी यातून आपली अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या कराराला ‘अल्जेसिरास करार म्हणतात. पण हे नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता. या राजकीय नाट्याचा दुसरा अंक रंगला १९११ साली. त्याबद्दल पुढच्या भागात.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4007

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Nitin

Tue , 18 February 2020

nice, keep it up.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......