अजूनकाही
‘यंत्राने कां बेकारी वाढते?’ हा स्वा. सावरकरांचा एक विज्ञाननिष्ठ निबंध, ‘हो आणि नाही’ हे दोन अर्थ लक्षात ठेवून लिहिलेला. त्यांनी त्या वेळी या विषयावर केलेलं चिंतन जितकं सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं मूलगामी होतं, तितकंच आजही आहे. या विषयाच्या अनुषंगानं आता बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत, जशी- ‘फेक वर्क’, ‘होमो डेउस’ किंवा ‘न्यू डिजिटल एज’ इत्यादी.
जगभरात आजकाल तंत्रज्ञान गतिमान झालं आहे. त्याची जी गती आता आपण अनुभवत आहोत, ती यापेक्षा भविष्यात कधीच कमी असणार नाही, असं या विषयातील तज्ज्ञांचं मत आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानानं प्रभावित होणार आहे. हा गतिरथ आपण वैयक्तिक, सामाजिक किंवा राष्ट्रीय पातळीवर थोपवू शकणार नाही. शेती, सेवा आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत तंत्रज्ञान वेगवेगळ्या पातळीवर व्यापून राहणार आहे. आज कुठे जे घडते, ते उद्या दुसरीकडे वास्तवात येईल, एवढाच काय तो फरक!
थोडक्यात, आज एखाद्या उद्योगात पत्र्यांना रंग देण्याचं जे काम कामगार करतात, तिथं ‘रोबोट’ असतील किंवा आज जिथं टेलिफोनवर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी लोक आहेत, तिथं ‘बॉट्स’ असतील. आज शेतीची हातानं होणारी कित्येक कामं यंत्रानं केली जातील. आणि हे होणं सुरू झालं आहेच, पण हा बदल अतिजलदगतीनं होण्याची चिन्हं जगभर दिसत आहेत. डिजिटलायझेशन, इंटरनेट, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), विदागार (डेटा लेक), इंडस्ट्री ४.०, नवीन संगणकीय प्रणाली, यावर जगभरात प्रयोग चालू आहेत.
साधारणतः जी कामं पुनरावृत्त (Programmed) होणारी असतात, म्हणजे त्याच पद्धतीनं पुनःपुन्हा केली जातात, त्यांची जागा नवीन तंत्रज्ञान घेतं. मग तिथं माणसांची गरज उरत नाही. अशा वेळी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या पण परिवर्तनशील देशात दोन शक्यता प्रामुख्यानं ध्यानात येतात.
एक, हा बदल पूर्णतः अंगीकारणं आणि दुसरी, तो जशास तसा न स्वीकारता त्यातील जे हवं तेवढंच स्वीकारणं. तिसरी शक्यता म्हणजे, या बदलाचा तिरस्कार आणि यापासून दूर राहणं. यासाठी नवीन काम जुन्याच पद्धतीनं करत राहणं, हा पण एक उपाय असू शकतो. तो अगदीच प्रवाहाविरुद्ध असला तरी त्याची शक्यता आपल्यासारख्या एकाच वेळी अनेक युगांतून वावरणाऱ्या देशात नाकारता येणार नाही.
कारण फ्रेड रिग्स या विचारवंतानं सांगितल्याप्रमाणे विकसनशील देशात ‘आपलं ते खरं’, करणाऱ्या लोकांचे समूह असतात. त्यांना तो ‘क्लेक्ट’ (Clect) म्हणतो. असे समूह लोकशाही मार्गानं आपल्याला हवं ते करण्यात समर्थ असतात, म्हणून ही तिसरी शक्यता पूर्णतः अविकसित किंवा विकसित नसलेल्या समाजात त्याच्या अस्तित्वावर घाला घालणारं तंत्रज्ञान मूळ धरू लागल्यास बलवान ठरू शकते.
क्रांतिकारी बदल मात्र जशास तसा स्वीकारला जाण्याची शक्यता भारत देशातील प्रगत व विकसित भागात अधिक आहे आणि त्यात बदल करून हवं ते स्वीकारण्याची शक्यता निमशहरी भागात अधिक आहे किंवा दोन्ही भागांत ही शक्याशक्यता काही प्रमाणात राहील. त्यामुळे यावर नेमकं भाष्य आताच करणं एकांगी होईल. एक मात्र खरं, सध्या अशा वेगवान हालचालींचा परिणाम नवीन संधी तयार होण्यात आणि जुन्या संधी नष्ट होण्यात होईल, असं दिसतं.
म्हणजे जी कामं आज दिवसभर एखादा माणूस करतो आणि रोजगार कमावतो, ती कामं माणसांसाठी उरणारच नाहीत. मग प्रश्न येतो तो माणसं काय करणार? ती अजून खालच्या पायदानावरील कामं करणार, जिथं अजून तंत्रज्ञान विकसित करणं परवडणारं नाही. का? तर राबणारी माणसं यंत्रापेक्षा स्वस्त पडतात. किंवा ती वरच्या पायदानावरील कामं करतील, जिथं अजून यंत्र किंवा विदा बनायच्या आहेत.
पण सगळ्यांनाच या नव्या व्यवस्थेत जागा असेल का, तर त्याची शक्यता कमी आहे. मग अशी माणसं तंत्रज्ञानाचा स्वीकार करणार नाहीत आणि जे हवं तेवढंच स्वीकारतील, जे नको त्याचा त्याग करतील.
यंत्रानं किंवा सॉफ्टवेअरनं माणसाचं काम संपवण्याची प्रक्रिया अव्याहत चालणारी आहे. यावरून नवी क्षेत्रं आणि संधी जशा उपलब्ध होतील, तसंच वर्तमान क्षेत्रं आणि संधी संपुष्टात येतील. थोड्या माणसांचा विकास होईल आणि अधिकांचा ऱ्हास. तेव्हा या अधिकांनी कुठं जायचं, हा स्वाभाविक प्रश्न उभा राहील.
याचं उत्तर अधिक शोधतीलच, कारण ते आर्थिक पर्याय नसल्यामुळे थोडक्यात, स्थितिशीलतेत समाधान मानतील आणि निमशहरी वा ग्रामीण भागांत स्थलांतरित होऊन कष्टाची कामं करतील. हा काळ पण संपुष्टात येईल, कारण त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवणंच अवघड होऊन जाईल. म्हणून अशा ठिकाणी काही देशांना त्यांचा अधिवास सुरक्षित करावा लागेल, तरच ही माणसं टिकतील आणि समाधानी राहतील. अन्यथा त्यांच्या जमिनींची मालकी आर्थिकदृष्ट्या सधन लोकांकडे गेलेली असेल. म्हणजे आता जसं आपण आदिवासींना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसं अधिकांश लोकसंख्येच्या बाबतीत करावं लागेल. म्हणून ‘तंत्रज्ञानानं आर्थिक समृद्धी आणि आर्थिक मागासलेपण दोन्हीही वाढत असतात’, असा कयास बांधण्यास प्रत्यवाय नसावा.
साहजिकच तंत्रज्ञान किती स्वीकारायचं आणि किती नाही, याचा सारासार विचार होणं आवश्यक आहे. प्रत्येक देशाचं याबाबतीत वेगळं मत असू शकतं. भारतासारख्या लोकसंख्येनं मोठ्या आणि अजूनही बहू-अशिक्षित असलेल्या देशात तंत्रज्ञानाच्या सर्वंकष स्वीकारानं माणसाचं जीवनच संपुष्टात येण्याचा धोका अधिक आहे. म्हणून आपण जिथं गरज नाही, तिथं अती महाग-तंत्रज्ञान स्वीकारण्याचा मोह टाळला पाहिजे. याचा अर्थ तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा नाही, असा अजिबात नाही. भौतिक प्रगतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान जरूर स्वीकारायचं, पण त्याचा अतिमोह टाळायचा. कारण जर दळणवळणासाठीदेखील गरज नसताना ‘ड्रोन’ वापरण्याऐवजी अधिक स्वस्त माणसांचा वापर केला, तर ते आपल्या सामाजिक दृष्टीनंदेखील अधिक हितावह असणार आहे. जे कदाचित लोकसंख्येची कमी घनता असलेल्या ऑस्ट्रेलियाला मानवणारं नाही. त्यामुळे एखादी अस्तित्वात असलेली व्यवस्था जर अधिक रोजगार आणि अधिक सामाजिक स्थैर्य देणारी असेल तर केवळ तंत्रज्ञानाच्या हव्यासापायी तिला नष्ट करणं दीर्घकालीन हित सांभाळणारं असणार नाही.
तसंही वर्तमानातलं आपलं बहुतांश काम भविष्याच्या दृष्टीनं ‘फेक’ असतं. त्यातील स्थितीशील भाग भविष्यात नष्ट होतो. त्याची जागा यंत्र किंवा संगणकीय प्रणाली घेतं. म्हणून माणसानं गतिशील असणं आवश्यक आहे आणि अशा गतीशीलांवरच संपूर्ण मानवी समाजाच्या भविष्याची आणि नेतेपणाची जबाबदारी असते. गतिशीलांना आपण ‘स्टेट्समन’ म्हणू किंवा ‘व्हिजनरी’. त्यांना इतरांपेक्षा अधिक लवकर, अधिक कळतं म्हणून त्यांनी इतरांनी कुठं जायचं, याबाबत दिशादर्शन करायचं असतं. त्यांनी आपलं धुरीणत्व समाजाच्या, राष्ट्राच्या आणि जगाच्या कल्याणासाठी वेचायचं असतं, तंत्रज्ञानाला मानवी चेहरा द्यायचा असतो, तो ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ यासाठी!
.............................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिल्लीस्थित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment