अजूनकाही
मोहित सूरी दिग्दर्शित ‘मलंग’ अशा चित्रपटांमध्ये मोडतो, ज्यांत (तथाकथित) प्रेमगीतं ही नंतर प्रेयसी किंवा प्रियकराच्या मृत्यूनंतर तिचं/त्याचं प्रेत समोरून नेलं जात असतानाच्या हृदयद्रावक प्रसंगांत वापरली जातात. किंवा एखाद्या पात्राच्या मृत्यूनंतर किंवा मोठ्या (आणि प्रेक्षकांना चकित करणं अपेक्षित असलेल्या) रहस्याच्या खुलाशानंतर, ट्विस्टनंतर आधी घडून गेलेल्या घटनांचा कोलाज समोर मांडला जातो. अनेकदा रहस्य/थरार प्रकारात मोडणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या बौद्धिक पातळीचा अंदाज लावत अतिसुलभीकरण केलं जातं. मोहित सूरीच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीकडे पाहिल्यास, ‘मर्डर २’पासून (२०११) ते ‘एक व्हिलन’पर्यंत (२०१४), व्हाया ‘आशिकी २’ (२०१३), त्याच्या चित्रपटांत वर उल्लेखलेल्या बहुतेक सर्व गोष्टी आलटूनपालटून दिसून येतात. ‘मलंग’देखील त्याहून फारसा वेगळा नाही.
या मध्ये त्याच्या कथानकात अभाव असलेलं नाट्य भडक आणि गिमिकरी दृश्यशैलीतून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. चकाकणारे निऑन लाइट्स, काहीतरी थरारक, चित्तवेधक घडत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं संकलन इथं आहे. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. कारण खुद्द चित्रपटाचं कथानक आणि मुख्यत्वे त्याची मांडणी थरार निर्माण करणारी नाही. कथा अनेकदा चावून चोथा करून झालेली आहे. कथानक दोन स्तरांवर उलगडत जातं. वर्तमानात घडणाऱ्या कथानकात नुकताच तुरुंगामधून सुटलेला अद्वैत (आदित्य रॉय-कपूर) गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे खून करत सुटलेला आहे. असं करण्यापूर्वी तो अनजनेय आगाशे (अनिल कपूर) या एन्काऊन्टरसाठी प्रसिद्ध असलेल्या अधिकाऱ्याला खून करत असल्याची पूर्वकल्पना देत असतो.
तर, या वर्तमानातील घडामोडींना समांतर अशा पद्धतीने पाच वर्षांपूर्वी घडलेला घटनाक्रम उलगडत जात असतो. ज्यात अद्वैत आणि सारा (दिशा पटनी) हे दोघे गोव्यातील एका पार्टीत एकमेकांना शब्दशः ‘धडकतात’. साराने हातावर एक धागा बांधलेला आहे. ज्यावरील प्रत्येक गाठ ही तिनं आयुष्यात पूर्ण करणं अपेक्षित असलेल्या प्रत्येक कृतीचं, इच्छेचं प्रतिनिधित्व करते. साहजिकच अद्वैतला भेटल्यावर या इच्छा ज्याच्यासोबत पूर्ण करता येतील, असा जोडीदार तिला मिळतो. अद्वैतचं नात्यापासून दूर पळणं वगैरे गोष्टी सोडल्यास नाही म्हटलं तरी सगळं काही सुरळीतपणे सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यात एक घटना घडते, जी वर्तमानातील हत्याकांडामागील कारण ठरणार असते. साहजिकच या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने उलगडत जातात की काय घडलं असावं, हे चित्रपटकर्त्यांनी थराराचा आभास निर्माण करत सांगण्यापूर्वीच लक्षात येईल इतपत साधंसोपं असतं.
‘मलंग’बाबत समस्या अशी की, इथं प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट प्रकारची कृत्रिमता आहे. ज्यामुळे यातील कथानकाला गंभीरपणे घेणं शक्यच होऊ शकत नाही. ही कृत्रिमता अगदी सुरुवातीच्या, तुरुंगातील मारधाड दृश्यापासून सुरू होते. याखेरीज चित्रपटाचा पूर्वार्ध हा निरर्थक अशा प्रेमकथेच्या विस्तृत चित्रणानं व्यापला जातो. ‘मलंग’ला गडद छटा असलेला थरारपट आणि प्रेमकथा असं दोन्हीही बनायचं असल्याने शेवटी मांडणीच्या स्तरावर सगळा गोंधळ उडतो नि या दोन्हींपैकी काहीही एका विशिष्ट प्रमाणाबाहेर जाऊन परिणामकारक ठरत नाही.
अद्वैत आणि सारा ही दोन्ही पात्रं आणि त्यांच्याभोवती घडणारे प्रसंग तर सरळसरळ कंटाळवाणी आहेत. याउलट अनजनेय आगाशे आणि मायकल रॉड्रिगेझ (कुणाल खेमू) ही चित्रपटात काहीशी दुर्लक्षिली गेलेली पात्रं, ती करत असलेल्या कृती अधिक खिळवून ठेवणाऱ्या आहेत. आगाशे हा पोलीस अधिकारी कुणाचंही एन्काऊन्टर करत असताना ‘आज की रात कोई आने को हैं रे बाबा’ असं गातो. त्याचा परिचय करून देणाऱ्या दृश्यात तो कॅरिओकेवर हे गाणं गात असतो, आणि शेवटी जेव्हा तो एका व्यक्तीला गोळ्या घालतो तेव्हा पडद्यावर लाल रंगाच्या पटलावर या गाण्याचा व्हिडिओ आणि बोल उमटलेले असताना मधे येऊन बसलेल्या आगाशेच्या चेहऱ्यावर लाल रंग आणि हे शब्द उमटतात.
हेच मायकलबाबत. तो असलेल्या बऱ्याचशा प्रसंगांत लाल आणि हिरव्या रंगाच्या भडक प्रकाशयोजनेचा वापर केलेला आहे. चित्रपटात निऑन लाइट्सचा वापर हा सढळ हातानं केलेला असला तरी ही दोन्ही पात्रं पडद्यावर असताना ही प्रकाशयोजना खऱ्या अर्थानं न्याय्य ठरते.
‘आज की रात…’ पार्श्वभूमीवर सुरू असताना घडणारे हे प्रसंग थेट श्रीराम राघवनच्या एखाद्या गडद थरारपटात शोभून दिसू शकतात. अर्थातच, चित्रपटभर असं घडत नाही आणि चित्रपट थेट मिलन मिलाप झवेरीच्या चित्रपटांच्या रांगेत शोभणारा ठरतो. थरारपट म्हणून सूरीचा ‘एक व्हिलन’ याहून जरा अधिक बरा होता. ‘मलंग’ हा खरोखर झवेरीच्या ‘सत्यमेव जयते’ (२०१८) किंवा ‘मरजावां’ची (२०१९) आठवण करून देणारा आहे.
एकुणात ‘मलंग’मध्ये वर उल्लेखलेली दोन पात्रं आणि काहीएक प्रसंग वगळता काहीच खिळवून ठेवणारं नाही. शिवाय, हे प्रसंगही त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपट सहन करावा इतके उत्तम नसल्याने हा चित्रपट पाहण्याची कारणं तशी सांगता येणार नाहीतच.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment