अजित नरदे : खाउजा धोरणाचा प्रचार-प्रसार करण्याचं व्रत घेणारा शेतकरी, कार्यकर्ता
सदर - #जेआहेते
सुनील तांबे
  • अजित नरदे
  • Mon , 10 February 2020
  • सदर #जेआहेते सुनील तांबे उस उसशेती साखर कारखाना शरद जोशी अजित नरदे Ajit Narde

डाळ, ज्वारी, साखर, कांदा, बटाटा इत्यादी शेती उत्पादनांवर मी एक लेखमालिका ‘साधना’ साप्ताहिकात लिहिली होती. या शेती उत्पादनांचा इतिहास, अर्थकारण, राजकारण यांचा मनोरंजक आढावा त्या लेखमालेत होता. ज्वारी या विषयावरील लेखामध्ये ज्वारीपासून मद्यनिर्मिती या मुद्द्यालाही मी स्पर्श केला होता. शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढत असेल तर ज्वारीपासून मद्यनिर्मिती करण्यात काहीही गैर नाही असं मी म्हटलं होतं. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘साधना’चे संपादक होते. ज्वारीपासून मद्यनिर्मितीचा विषय त्या वेळी राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता. दस्तुरखुद्द दाभोलकर व्यसनमुक्ती केंद्र चालवायचे, एन. डी. पाटील यांच्यासारखे महर्षी ज्वारीपासून म्हणजे धान्यापासून मद्यनिर्मितीच्या विरोधात होते. ‘साधना’ परिवाराशी संबंधित डॉ. अभय बंग दारूबंदीचे पुरस्कर्ते होते. तरीही डॉ. दाभोलकरांनी माझ्या लेखातील मद्यनिर्मितीचा मुद्दा गाळला नाही वा संपादित केला नाही. माझ्या लेखावर टीका करणारी पत्रं ‘साधना’मध्ये प्रकाशित झाली. या वाचकांचा प्रतिवाद करणारी पत्रंही ‘साधना’ साप्ताहिकाला आली. ही पत्रं शेतकरी संघटनेशी संबंधित वाचकांनी पाठवली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी अजित नरदे यांचा मला फोन आला.

अजीत नरदे जयसिंगपूरचे. त्यांची उसाची शेती होती. ‘दिनांक’ साप्ताहिकात ते नियमित लिखाण करायचे. १९७७-८० या काळात. त्या वेळी ते रत्नाप्पा कुंभार आणि अन्य साखर सम्राटांवर टीका करणारे लेख लिहायचे. मुंबई-पुण्याच्या वाचकांना हे लेख आवडत असत. साखर सम्राट, शिक्षण महर्षी हे मुंबई-पुण्याच्या वाचकांच्या टिंगलटवाळीचे, टीकेचे विषय होते. विलेपार्ले येथे राहणारे डॉ. नरदे, अजित नरदेंचे काका होते. अजित नरदेंवर राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी पक्षाचे राजकीय संस्कार झाले होते. मात्र शेतकरी म्हणून अजित नरदे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडे ओढले गेले. समाजवादी धोरणांमुळे शेतकर्‍यांची दुरवस्था झाली आहे, या शरद जोशी यांच्या मांडणीचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. समाजवादाकडून मुक्त बाजारव्यवस्थेपर्यंत त्यांचा वैचारिक प्रवास झाला.

शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान विभागाचे ते प्रमुख होते. श्रीपाद दाभोलकरांची शेती, सुभाष पाळेकरांची झिरो बजेट शेती, जैविक शेती इत्यादी शेती प्रकारांची ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने चिरफाड करत. शेती हा शेतकर्‍याचा व्यवसाय आहे. त्यातून येणार्‍या उत्पन्नातून शेतकर्‍याला सुखवस्तू जीवन जगता यायला पाहिजे. त्यासाठी नवं तंत्रज्ञान वापरून शास्त्रोक्त शेती करायला हवी, शेतमालाच्या बाजारपेठेवरचे निर्बंध उठले पाहिजेत, सिलिंगचा कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा इत्यादी कालबाह्य कायदे रद्द झाले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. या भूमिकेचा हिरिरीने प्रचार करणं, केंद्र व राज्य सरकारच्या शेती धोरणांवर या विचाराचा प्रभाव पाडणं यासाठी ते कार्यरत होते.

एन्‍रॉन कंपनीच्या दाभोळ प्रकल्पाचे ते समर्थक होते. कोल्हापूर येथे झालेल्या एका चर्चासत्रात या विषयावर ते आणि राजीव साने यांच्याशी माझे मतभेद झाल्याचं स्मरतं. माझा मुद्दा केवळ वैचारिक नव्हता, तर तंत्रज्ञानाशी संबंधित होता. एन्‍रॉन कंपनी नैसर्गिक वायूच्या व्यवसायातली होती. नैसर्गिक वायूचं द्रवात रूपांतर करून त्याची वाहतूक रेफ्रीजरेशनची व्यवस्था असलेल्या बोटींमधून करावी लागते. या द्रवाचं रुपांतर वायुमध्ये करण्याचा प्रकल्प उभारावा लागतो. त्यानंतरच त्या वायूचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग करता येतो. द्रवरूपातील नैसर्गिक वायूची जलवाहतूक आणि त्याचं वायुरूपात रूपांतर करण्याचा प्रकल्प, यामुळे दाभोळ प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही, असा इशारा विश्व बँकेने दिला होता याकडे मी त्यांचं लक्ष वेधलं. ‘डेक्कन हेराल्ड’ या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून दाभोळ प्रकल्पाचं वृत्तसंकलन मी प्रदीर्घ काळपर्यंत केलं होतं. त्यामुळे माझ्याकडे ही माहिती होती. ती मी साधार त्यांच्यापुढे मांडली. चर्चा अनिर्णीतच राहिली. परंतु त्यानंतर नरदे यांनी माझ्याशी असलेला संपर्क वाढवला. ते मला कोणत्या ना कोणत्या चर्चासत्राला वा शिबिराला आमंत्रित करत असत. कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवण्याचा प्रयत्न करत. विरोधी विचाराच्या व्यक्तीसोबत संवाद तोडायचा नाही, आपली भूमिका आग्रहानेच मांडायची, मात्र संपर्कातल्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घेण्याचा प्रयत्न अथकपणे करायचा, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण थक्क करणारा होता.

नरदेंना भाषणाची कला अवगत नव्हती. चार-सहा जणांसोबत चर्चा, वादविवादातात भूमिका मांडणं, लिखाण करणं ही त्यांची खासीयत होती. कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीशी त्यांचे हितसंबंध नव्हते. परंतु खाजगीकरणाचा, बाजारपेठ नियंत्रित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी ते विविध प्रकल्पांच्या समर्थनार्थ लेख लिहीत वा कार्यक्रम आयोजित करत. लवासाच्या संदर्भातही त्यांनी कार्यक्रम घेतल्याचं मला स्मरतं. वस्तुतः त्यांचा आणि लवासा कंपनीचा, शरद पवारांचा काहीही संबंध नव्हता. जनुक तंत्रज्ञानाचं समर्थन ते हिरिरीने करत. बीटी कापसाच्या बियाण्यामुळे कोणतेही विपरीत परिणाम पर्यावरणावर वा मानवी आरोग्यावर झालेले नाहीत. उत्पन्न वाढीसाठी प्रगत तंत्रज्ञान हा शेतकर्‍यांचा हक्क आहे, प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर रॉयल्टी वा स्वामीत्व हक्क मिळाला पाहिजे, तरच त्या कंपन्या तंत्रज्ञानाच्या विकासात भांडवल गुंतवणूक करू शकतात, विकसित केलेलं बियाणं कंपन्यांनी कोणत्या दरानं विकावं हा त्यांचा अधिकार आहे, त्यामध्ये सरकारने ढवळाढवळ करू नये, शेतकर्‍यांना परवडलं तर ते बियाणं विकत घेतील, अशी त्यांची भूमिका होती. आणि या भूमिकेचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. नव्या बीटी बियाण्याची लागवड करण्याचा कायदेभंग करण्यासाठी ते हरयानातल्या हिस्सार येथेही गेले होते.

उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यांचा प्रचार-प्रसार करण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं, मात्र त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक हितसंबंध नव्हते. ‘साखर डायरी’ नावाचं त्यांचं प्रकाशन होतं. साखर उद्योगासंबंधातील भरपूर माहिती त्या डायरीत असे. या डायरीला अर्थातच साखर कारखाने व संबंधितांच्या जाहिराती मिळत. परंतु या हितसंबंधांची सांगड त्यांच्या आर्थिक भूमिकेशी घालता येत नाही. म्हणून या अर्थाने ते व्रतस्थ होते.

भारतीय जनता पक्षाचा हिंदूराष्ट्राचा कार्यक्रम त्यांना पटणारा नव्हता. मात्र हिंदूराष्ट्रवादाला विरोध करण्यासाठी समाजवादाचा वा साम्यवादाचा पुरस्कारही त्यांना पटत नसे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत ते आग्रही होते. राजकारणातून मुक्त बाजारव्यवस्थेचा विचार पुढे नेण्यासाठी ते राजकीय भूमिका घेत, परंतु राजकारणाशी त्यांचा संबंध तेवढाच होता.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुली बाजारपेठ हवी आहे, पण खुला व्यापार नको आहे. चीनला खुली बाजारपेठ, खुला व्यापार हवा आहे, पण राजकीय व्यवस्था खुली म्हणजे लोकशाहीप्रधान नको आहे.

समाजवादाचा युटोपिया असतो, त्याप्रमाणेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यांचाही युटोपिया आहे. १९९० च्या दशकात समाजवादाचा युटोपिया कोसळून पडला. २१ व्या शतकात मुक्त भांडवलशाहीचा- खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा, युटोपियावरील लोकांचा विश्वास ढळला आहे. परंतु कोणता का कोणता युटोपिया अर्थातच कल्पनेतलं जग वा आदर्श बाळगल्याशिवाय जीवनाला अर्थ देता येत नाही. माझ्या या विधानाशी अजित नरदे सहमत झाले नसते. त्यांनी अर्थातच प्रतिवाद केला असता. आमचं एकमत कधीही झालं नसतं, परंतु समन्वयाचे मुद्दे शोधून मला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात जोडण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही सोडला नसता. अशा मित्राचं अचानक निघून जाणं चटका लावणारं आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......