अजूनकाही
साल २००१. कॉलेजचे नवलाईचे दिवस. थिएटरमध्ये लागलेला प्रत्येक सिनेमा बघायचाच असतो, असा नियम असायचा. अशाच एका रविवारच्या संध्याकाळी आम्ही मित्र ‘दिल चाहता है’ सिनेमा बघायला गेलो. सिनेमा बघून बाहेर पडल्यावर माझं जग खूप बदलून गेलं होतं. सिनेमा असा पण असू शकतो, असा प्रश्न निमशहरी भागात आयुष्य गेलेल्या मला राहून राहून पडत होता. या सिनेमात पडद्यावर दिसणारी पात्र, त्यांचं अगदी सहज कुठलाही आवेश न दाखवता बोलणं, त्यांची विचित्र वाटणारी वेशभूषा आणि केशरचना, प्रेक्षकांचं सरासरी वय चौथीतल्या मुलाच्या बुद्धीएवढं असतं, या नियमाला फाटा मारणारी थोडी अनवट स्टोरीटेलिंग हे सगळं त्यावेळेस अनोळखी तर होतंच, पण हवंहवंसं ही वाटतं होत. त्या सिनेमाबाबतची अजून एक अफाट सुंदर गोष्ट म्हणजे त्याचं संगीत आणि पार्श्वसंगीत. मी लहानपणापासून नदीम श्रवण, आनंद मिलिंद, सानू, समीर, दादा कोंडकेंच्या सिनेमातलं संगीत, अल्ताफ राजा, परभणीमधल्या उरुसातल्या लावण्या ऐकत आलो होतो. माझ्यासारख्या असंख्य लोकांचा सांगीतिक पिंड हा या शुद्ध देशी ठेकेदार भारतीय मेलडीवर पोसला गेलेला होता.
‘दिल चाहता है’मध्ये जे ऐकलं होतं हे या सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. खूप वेगळं. सीड, समीर, आकाश या तिन्ही पात्रांना स्वतःची थीम होती. ‘हम है नये अंदाज क्यू हो पुराना’मधली झिंग जबरी होती. तारा सगळ्यात पहिले सिडच्या घरी येते आणि त्याचे पेंटिंग्ज बघून त्याच्या मनोव्यापाराचं अचूक विश्लेषण करते, तेव्हा सिडच्या चेहऱ्यावरच्या बदलत जाणाऱ्या भावनांप्रमाणे बदलत जाणारं पार्श्वसंगीत गूढरम्य होतं. आपल्या प्रेमाला आकाश प्रतिसाद देत नाही म्हणून दुःखी झालेल्या दीपाची बिचवर बसून समजूतदार सिड समजूत घालताना मागे हलकीच वाजणारी एकांडी गिटार झपाटून टाकणारी होती. प्रेमाच्या बाजूने आणि प्रेमाच्या विरोधात बाजू मांडताना आकाश आणि शालिनीमधली टवटवीत जुगलबंदीसारखं पूर्वी काही ऐकल्याचं आठवतं नव्हतं.
पहिल्या काळातले दिग्दर्शक ‘अब एक हिरो हिरोईन को छेडता है’ किंवा ‘अब एक सेक्सी गाना डालते है’ अशा एकोळी गाण्यांच्या सिच्युएशन संगीतकारांना द्यायचे आणि गाणी बनायची. पण ‘दिल चाहता है’मध्ये तसं नव्हतं. प्रत्येक गाण्यामागे, पार्श्वसंगीताच्या प्रत्येक तुकड्यामागे एक थॉट प्रोसेस होती. ती जितकी दिग्दर्शक फरहान अख्तरची होती, तितकीच संगीत दिग्दर्शकांची होती. मग कळलं की संगीत दिग्दर्शक कुणीतरी शंकर-एहसान-लॉय अशा विचित्र नावाचे त्रिकुट होते. शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’च्या गाण्यामुळे माहीत होताच. मग तो संगीत दिग्दर्शक कधी झाला? संगीत देणाऱ्या जोड्या माहीत होत्या, पण संगीतकार त्रिकुट हा प्रकार पहिल्यांदाच बघण्यात आला होता. मग नंतर कळलं- हल्ली प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्यदिनाला वाजणार ‘सुनो गौर से दुनियावालो, बुरी नजर ना हम पे डालो’ हे गाणं पण त्यांच्या अप्रदर्शित सिनेमातलंच आहे. २००१ साली पडलेलं शंकर-एहसान-लॉय नावाचं गारुड हे आता कायमचंच राहणार, याची नांदी ‘दिल चाहता है’मधूनच झाली.
जागतिकीकरण भारतात येऊन २००१ला बरोबर एक दशक पूर्ण झालं आणि त्याच वर्षी भारतीय चित्रपटांचा चेहरा मोहरा बदलणारे दोन चित्रपट ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ प्रदर्शित झाले, हा योगायोग नसावा! भारतात दशकभर रुजलेल्या जागतिकीकरणात लहानाचं मोठं झालेली पिढी देशाच्या अर्थकारणात, राजकारणात, समाजकारणात पाऊल टाकू लागलेली होती. या पिढीचा पाश्चात्य, अमेरिकन आणि इतर देशातील साहित्य, सिनेमा, संगीताशी परिचय झाला होता. जागतिकीकरणाच्या वावटळीत आपल्या देशाची कवाडं किलकिली झाली होती. त्यातून ही नवीन वावटळ आत शिरली होती. या पिढीला आपल्याला भावणारं संगीत, सिनेमा आजूबाजूला दिसत नव्हता. त्यांना देशी-विदेशी भेसळीचं स्वतःच असं काही फ्युजन ऐकण्याची आस होती. ‘दिल चाहता है’ आणि पर्यायाने शंकर-एहसान-लॉय हे याचं उत्तर होतं.
जागतिकीकरणाच्या वावटळीत वाढलेल्या पिढीच्या समस्या वेगळ्या होत्या. त्यांना आलेलं एकाकीपण नवीन होतं, त्यांची अस्वस्थता वेगळी होती. शंकर-एहसान-लॉय यांची फिल्मोग्राफी बघितली तर या पिढीच्या मानसिक स्थित्यंतराचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या सिनेमात आणि सिनेमातल्या गाण्यात पडलेलं आहे. त्यातले बहुतेक सिनेमे फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटचे आहेत. ‘दिल चाहता है’मधले आकाश, समीर, सिड हे प्रचंड गोंधळलेले आहेत. समीर समोर येईल त्या मुलीच्या प्रेमात पडतोय, आकाशचा प्रेमावर विश्वासचं नाहीये, तर संवेदनशील सिड आपल्याहून वयाने मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला आहे. ‘And they lived happily after’चं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या प्रेमकथा ही खासीयत असणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीत हा वेगळाच बदल होता. ‘जिसे ढुंढता हू मै हर कही’, ‘जाने क्यू लोग प्यार करते है’ आणि ‘कैसी हे ये ऋत थी जिसने’ या तीन वेगवेगळ्या जातकुळीच्या गाण्यांमधून जणू एका पिढीच्या भावनांना आवाजच दिला होता.
कॉलेज, शाळा, हॉस्टेलमध्ये निर्माण झालेलं मैत्र आयुष्यभर टिकतं. तुलनेने कामाच्या ठिकाणी मैत्र होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्यवत. बालपणीच्या -टीनएजर काळातली मैत्री हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हळवा कोपरा असतो. या काळात आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या लोकांसोबत आपण अजून गेट टुगेदर करतो. या जानी दोस्तीला ट्रिब्यूट देणारं ‘यारो दोस्ती बडी ही हसीन है’ हे केकेचं (सिनेमा- रॉकफर्ड) गाणं एका झटक्यात भूतकाळात घेऊन जातं आपल्याला. हे गाणं शंकर-एहसान-लॉयचंच. ‘लक्ष्य’मधला करण शेरगील बेजबाबदार, आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यास असमर्थ आहे. पण आयुष्यात एक असा झटका बसतो की, तो एका रात्रीत बदलतो. स्वतःला आमूलाग्र बदलण्याचा त्याचा खडतर प्रवास दाखवणारं ‘पायेगा जो लक्ष्य है तेरा’ हे गाणं अशा गोंधळलेल्या बेजबाबदार लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून इन्स्पायर करत आलंय.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये पण आयुष्यातला गोंधळ आणि भूतकाळातली भूत मानगुटीवर बसलेली आहेतच. प्रेमात हरलेल्या अर्जुनने स्वतःला कामात बुडवून घेतलंय आणि मित्रांपासून स्वतःला तोडून घेतलंय. इम्रानला आपल्या जन्मदात्या वडिलांबद्दल आकर्षण आहे, पण त्यांच्या जवळ जाणं आपल्याला शक्य नाही या भावनेनं पोखरून काढलंय. तर जिच्यासोबत आपल्याला लग्न करायचं, तिच्यावर आपलं खरच प्रेम आहे का, या गोंधळात कबीर आहे. या सिनेमातली गाणी आणि जावेदसाबच्या कविता या फार अप्रतिमपणे तीन मित्रांच्या मनात खोलवर दडलेल्या भितींना आणि त्यांच्या त्या भीतीवर मात करण्याच्या प्रक्रिया उजळून टाकतात. ‘रॉक ऑन’ या चित्रपटातली पात्र आपला उज्वल सांगीतिक भूतकाळ जमिनीत गाडून त्यावर निवडुंगाचं रोपटं लावून एक निरस वाळवंटासारखं आयुष्य जगत आहेत. पण जादूची एक कांडी फिरते आणि हे इतस्ततः विखुरलेले चार मित्र पुन्हा स्टेजवर ‘मॅजिक’ निर्माण करायला लागतात. ‘सिंदबाद द सेलर’ हे गाणं म्हणजे ‘रॉक ऑन’चा कळसाध्याय.
शंकर-एहसान-लॉय यांनी एक्सेल प्रोडक्शनच्या खालोखाल करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत सर्वोत्कृष्ट काम केलं आहे. गोंधळला, दिशाहीन नायक हा शंकर- एहसान -लॉयच्या सिनेमातला महत्त्वाचा घटक पुन्हा ‘वेक अप सिड’मध्ये आहेच. ‘वेक अप सिड’ मला व्यक्तिशः शंकर-एहसान-लॉय यांच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक वाटतो. ‘आज कल जिंदगी’, ‘वेक अप सिड’, ‘बुंदो के मोतीयो से’ ही गाणी निव्वळ अफाट आहेत. अगदी एका मिनिटापुरतं येणार ‘यहा से चल’ गाणं पण खणखणता बंदा रुपया आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी केलेल्या ‘कभी अलविदा ना कहेना’मधलं एक पण गाणं असं नाही, जे ऐकताना तुम्हाला बोर होईल. विशेषतः ‘मितवा’ आणि ‘तुम्ही देखो ना’ ही गाणी पुन्हा लुपवर ऐकण्यासारखी. कधी कधी एखाद्या चित्रपटावर दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्यांइतकाच संगीत दिग्दर्शकाचा ठसा असतो. रहमान आणि ‘दिल से’ हे एक उदाहरण. ‘कल हो ना हो’ जितका शाहरुख, प्रीती झिंटा, सैफ आणि दिग्दर्शक निखील अडवाणीचा आहे, तितकाच किंबहुना किंचित जास्त शंकर-एहसान-लॉयचा आहे. सिनेमाचं टायटल साँग, ‘प्रिटी वूमन’, ‘कुछ तो हुआ है’ आणि प्रत्येक गाणं शंकर एहसान लॉयची लखलखती मोहोर मिरवत आहे. सिनेमाच्या काहीशा मेलोड्रॅमॅटिक कथानकात ही गाणी दुधात केशर विरघळून जावं तशी विरघळून गेली आहेत. ‘माय नेम इज खान’मधली गाणी विशेषतः ‘नुरे खुदा’ प्रचंड आवडतं.
यशराजच्या ‘बंटी और बबली’चा अल्बम हा पण एक परिपूर्ण अल्बम आहे. असं म्हटलं जातं की, ‘कजरारे’ हे गाणं त्या दशकातलं सर्वाधिक ऐकलं गेलेलं गाणं होतं. आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा अल्बम शंकर-एहसान-लॉयच्या कारकिर्दीतला फार महत्त्वाचा अल्बम आहे. त्यातलं ‘माँ’ हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी येत नाही, तो माणूस दगडाचा बनलेला असू शकतो! प्रसून जोशींच्या गहिऱ्या भावपूर्ण शब्दांना शंकर-एहसान-लॉय यांनी तितकाच सुंदर सूर दिला आहे. ‘जॉनी गद्दार’ या श्वास रोखून ठेवणाऱ्या सिनेमातलं टायटल साँग कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. ‘लक बाय चान्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘राजी’, ‘सलाम ए इष्क’, ‘क्यू हो गया ना’, ‘मिशन काश्मिर’ हे शंकर एहसान लॉयचे अजून नोंद घेण्यासारखे अल्बम.
शंकर-एहसान-लॉय यांच्या फारशा न गाजलेल्या सिनेमातली तितकीशी माहित नसलेली गाणी हा स्वतंत्र दर्द विषय आहे. ‘दिल जो भी कहे’ नावाचा डब्बड सिनेमा कधी येऊन गेला ते कळलं पण नाही. पण त्या सिनेमात सोनू निगमने गायलेलं ‘कितनी नरमी से, कितने धीरे से’ हे गाणं निव्वळ कहर आहे. ‘अरमान’ नावाच्या सिनेमात ‘जाने ये क्या हो गया’ नावाचं अफाट मधाळ गाणं आहे. हंसल मेहताने ‘दिल चाहता है’ची नक्कल करण्याच्या नादात ‘ये क्या हो रहा है’ नावाचा रद्दड सिनेमा तयार केला होता. सिनेमाला ‘दिल चाहता है’च्या नखाची पण सर नसली तरी ‘गीत गाता है ये समा’ नावाचं अफाट गाणं युट्युबवर आवर्जून शोधून एका. ‘लक बाय चान्स’च्या शेवटी येणार ‘ओ राही’ हे गाणं चित्रपटाच्या शेवटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. अक्षय कुमारच्या ‘चांदनी चौक टू चायना’ या टुकार सिनेमातलं ‘तेरे नैना’ हे गाणं पण टॅबलेरॉनच्या चॉकलेटसारखं गोड. शंकर-एहसान-लॉयच्या कारकिर्दीत अशी अनेक फारशी न गाजलेली अप्रतिम गाणी आहेत.
जागतिकीकरणानंतर जातीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता अजूनच टोकदार अणकुचीदार होत चालल्या आहेत. अशा काळातच एकप्रकारे जागतिकीकरणाचं बायप्रॉडक्ट असणाऱ्या शंकर-एहसान-लॉय यांचं दोन दशकापासून एकत्र राहून संगीतनिर्मिती करणं सुखावणारं आहे. शंकर हा तमिळ ब्राह्मण हिंदू. दाक्षिणात्य मूळ असणारा शंकर श्रीनिवास खळेंच्या सहवासात येतो काय आणि संगीताच्या प्रेमात पडतो काय आणि त्याच्या आयुष्याचा मार्गच बदलून जातो. खास जागतिकीकरणाचे प्रॉडक्ट असणाऱ्या आयटी क्षेत्रात कार्यरत असणारा शंकर नंतर पूर्णवेळ संगीताकडे वळतो. ‘रॉक ऑन’मधल्या आदित्य, रॉब आणि जो सारखा. एहसान नूरानी आणि लॉय मेंडेस या जिंगल्स कंपोज करणाऱ्या जोडगोळीसोबत त्याची गाठ पडली आणि त्यांची सांगीतिक भागीदारी सुरू झाली. इंडस्ट्री आणि चाहते प्रेमाने त्यांना ‘अमर-अकबर-अँथनी’ म्हणतात.
या तीन वेगळ्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांचं एकत्र असणं हेच खूप सुखावणारं आहे. शंकरमुळे या त्रिकुटाची नाळ मराठीशी पण जोडली गेलेली आहे. ‘कट्यार काळजात घुसली’सारखा सिनेमा दुसऱ्या कुठल्या मेनस्ट्रीम बॉलिवूडच्या संगीत दिग्दर्शकांनी केला असता. शंकर-एहसान-लॉय यांची एकत्रित सांगीतिक भागीदारी आशादायक असणारी. जी ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे, तिला या ध्रुवीकरणाच्या काळात बळकटी देणारी. ही सांगीतिक भागीदारी टिकणं फार महत्त्वाचं आहे. फिल्म इंडस्ट्रीसाठी, रसिकांसाठी, वेगवेगळ्या प्रयोगांसाठी आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’साठी पण.
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment