अजूनकाही
‘पाडा’, ‘चालणारे अनवाणी पाय’, ‘अथक’, ‘गाभा’, ‘तंतोतंत’ या कवितासंग्रहांमुळे कवी डॉ. केशव सखाराम देशमुख परिचित आहेत. ‘ग्रामशिदोरी’ हा त्यांचा ललितलेखसंग्रह नुकताच सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. दै. ‘ॲग्रोवन’मध्ये साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.
या पुस्तकात एकूण सत्तेचाळीस लेखांचा समावेश असून त्यातून जुन्या आठवणी, मातीचा गंध, अस्वस्थ करणारे वर्तमान, चिंतनशीलता, नकळत केलेला उपदेश, परिवर्तनाचा ध्यास, शिक्षणाचे महत्त्व, माणसाचे ममत्व, स्वभावातील अंतरंग, गावशिवाराचे नातेसंबंध आणि जगण्यातील दिलखुलासपणे अशा जीवन अनुभूतीच्या विविध पैलूंचा आविष्कार घडतो.
साधी भाषा, छोटी वाक्यं, प्रभावी उदाहरणं, पाच-दहा मिनिटांत वाचून पूर्ण होणारे लेख हे या संग्रहाचे वेगळेपण आहे. लेखक मुळात कवी असल्यामुळे प्रत्येक लेखात काव्यमय तरलता आहे.
लेखकाने ज्या जुन्या आठवणी नोंदवलेल्या आहेत, त्यांनी एकूण पुस्तकाचा एक तृतीयांश भाग व्यापला आहे. चुलीवरच्या भाकरी, बालपणी जत्रेत घेतलेला आनंद, गावातील पंचांनी दिलेला न्याय, आठ दिवस चालणारे लग्नसमारंभ, म्हशीच्या पाठीवर बसून रुबाबदार फिरणे, गाई-म्हशी-बैल-कोंबड्या-शेळ्या-कुत्रे-मांजर हा गोतावळा, पावसात मनसोक्त भिजणे, आलटून-पालटून घातलेला सदरा किंवा पैसे नसतानाही साजरी केलेली दिवाळी... या सगळ्या अनुभूती आपल्याला नकळत बालपणात, भूतकाळात घेऊन जातात. आणि हे अनुभव आपलेच आहेत असे वाटू लागते. आणि हेच या लेखांचे सामर्थ्य आहे. याचा अर्थ लेखक फक्त आठवणी सांगून थांबत नाही, तर जीवन व जगणे अतिसुंदर होण्यासाठी नकळत उपदेशही करून जातो. उदाहरणार्थ- छोट्या छोट्या गोष्टींमुळे जी माणसे अबोलपणा धरतात, त्याविषयी लेखक अतिशय मार्मिक भाष्य करतो. तो म्हणतो-
“येता-जाता नमस्कार केला नाही म्हणून अबोला धरणे, नवरा-बायकोमध्ये खटका उडाला म्हणून अबोला धरणे, उसने पैसे दिले नाही म्हणून, लग्नात मानपान दिला नाही म्हणून, त्यालाच का बोलतो मला का बोलत नाही म्हणून, अशा अबोला धरण्याला फारसा अर्थ नसतो. संवाद हे जगण्याचं छान औषध आहे.” (पृ.८५)
तसाच ‘शिक्षणातील भावना व शिक्षणातील भूमिका स्वच्छ असली पाहिजे.’ (पृ.६९), ‘रिकामटेकडेपणा आणि आळस हे दोघे एकत्र आले की आयुष्याचा नाश व्हायला फार वेळ लागत नाही’ (पृ.७७), ‘तुमच्या डोक्यामध्ये असलेले प्रश्न घेऊन लोकांत जाऊ नका, लोकांत जा आणि तेथील प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा.’ (पृ.८२), ‘भाकर यंत्रामधून जन्म घेत नाही, फ्लॅटच्या गच्चीवर निर्माण होत नाही. माती बिगर भाकरीची निर्मिती होऊ शकत नाही’ (पृ.४९) यांसारख्या अनेक विधानांतून वाचक चिंतनशील बनतो. ते हे या लेखनाचे बलस्थान आहे.
दर शनिवारी वाचकांसाठी तयार केलेली ही ‘शिदोरी’ असल्याने काही लेखांत पुनरुक्तीचा दोष आलेला आहे. पण हा दोष भाषिक अंगाने असला तरी संवेदनशील मन संस्कारशील करण्यासाठी या दोषाच्या ‘डोसा’ची गरज वारंवार जाणवते. विषयानुरूप आलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार आणि कविता यांमुळे हे पुस्तक मनाला आनंद देणारे, भावसौंदर्य टिपणारे ठरले आहे.
ही ग्रामशिदोरी वाचकांना चिंतन करायला भाग पाडणारी व दिशा देणारी आहे. मुख्य म्हणजे ग्रामसंस्कृती समजून घेण्यासाठी ही ‘ग्रामशिदोरी’ दिशा देणारी ठरेल.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment