दुसरे ट्विटर मराठी साहित्य संमेलन : ट्विटरवर मायमराठीचा जागर
पडघम - साहित्यिक
चिन्मय पाटणकर
  • ट्विटर मराठी साहित्य संमेलन
  • Thu , 12 January 2017
  • पडघम साहित्यिक ट्विटर मराठी साहित्य संमेलन Twitter Marathi Sahitya Sammelan मराठी वर्ल्ड MarathiWord स्वप्नील शिंगोटे Swapnil Shingote

डोंबिवलीत ९०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असतानाच ट्विटरवरही मराठी भाषा आणि साहित्याचा जागर होणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला अधिक व्यापक करण्यासाठी ३ ते ते ६ फेब्रुवारी दरम्यान ‘ट्विटर मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलं आहे. यंदा या संमेलनाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी झालेल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. @MarathiWord या ट्विटर हँडलने हे संमेलन आयोजित केलं आहे. 

मराठी साहित्य व्यवहारासह साहित्य संमेलनातही डिजिटल माध्यमांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाचे चाकोरी मोडणारे काही प्रयत्न झाले. युनिक फीचर्सतर्फे ई-साहित्य संमेलन सातत्याने आयोजित केलं जातं. त्याशिवाय फेसबुकवरही साहित्य संमेलनाचा प्रयत्न झाला होता. ट्विटरवर संमेलन आयोजित करण्याची कल्पना गेल्या वर्षी प्रत्यक्षात आली.

विस्मरणात गेलेल्या मराठी शब्दांना पुन्हा व्यवहारात आणण्यासाठी @MarathiWord हे ट्विटर हँडल प्रयत्नशील आहे. पुण्यातील स्वप्नील शिंगोटे हा तरुण हे हँडल चालवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संगीतकार कौशल इनामदार आदी मान्यवरांनीही पहिल्या ट्विटर मराठी साहित्य संमेलनाची दखल घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर पिंपरी चिंचवड येथील ८९व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमातील भाषणात ट्विटर संमेलन ही काळाची गरज आणि तरुणाईच्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे. साहित्यिकांनी ट्विटर संमेलनात आवर्जून सहभागी व्हावं, असे गौरवोद्गार काढले होते. 

ट्विटरवरील संमेलनाविषयी स्वप्नीलने माहिती दिली की, 'सोशल मीडियात मराठी वापरणाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी संमेलन आयोजित करण्याचा विचार बराच काळ करत होतो. त्याला मागच्या वर्षी मूर्त स्वरूप मिळालं. या संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ट्विटरसंमेलन हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या संमेलनामुळे तरुण साहित्यिकांना खुलं व्यासपीठ मिळालं. ट्विटरवर मराठी वापरणाऱ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध झाली. देशविदेशातील भाषा-साहित्यप्रेमींनी या संमेलनात सहभाग घेतला. यंदाचे संमेलनही साहित्य-भाषाप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागाने नक्कीच यशस्वी होईल.'

दुसऱ्या ट्विटर मराठी साहित्य संमेलनाविषयी -

यंदाच्या ट्विटर मराठी संमेलनासाठी १२ हॅशटॅग्ज तयार करण्यात आले आहेत. #ट्विटरसंमेलन या हॅशटॅगसह खालील हॅशटॅग वापरून तुम्हीही संमेलनात सहभागी होऊ शकता. 

#माझीकविता
तुमची स्वतःची कविता किंवा तुम्हाला आवडलेल्या इतर कविता ‘#माझीकविता’ वापरून तुम्ही ट्विट करू शकता. कविता मोठी असेल तर ती कागदावर लिहून किंवा मोबाईलवर टंकित करून त्याचं छायाचित्र काढून ट्विटावं. मागील संमेलनातील निवडक कवितांचं ई-बुक तयार करण्यात आलं होतं. यंदाही तसंच ई- बुक करण्याचा प्रयत्न आहे.

#माझीकथा
शंभर अक्षरांमध्ये लिहा कथा आणि ट्विट करण्यासाठी वापरा ‘#माझीकथा’. तुम्ही एखादी दीर्घ कथासुद्धा आपल्या ब्लॉगवर लिहून ‘#माझीकथा’ वापरून ब्लॉगची लिंक ट्विट करू शकता.

#माझाब्लॉग
तुम्ही लिहिलेल्या ब्लॉगबद्दल चर्चा ‘#माझाब्लॉग’ वापरून करू शकता. ब्लॉगची लिंक देऊन ट्विटमध्ये ब्लॉगबद्दल थोडक्यात माहिती लिहावी.

#माझीबोली
महाराष्ट्रात आपण जरी मराठी बोलत असलो, तरी राज्यातील प्रत्येक भागात मराठीच्या वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत .प्रत्येक बोली ही समृद्ध ज्ञानभांडार आहे. या बोली डिजिटल युगात टिकल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. त्या बोलीने वर्षानुवर्षं सांभाळून ठेवलेलं ज्ञान जगासमोर येणं गरजेचं आहे. म्हणून ‘#माझीबोली’ वापरून आपण आपल्याला माहीत असलेल्या बोलींबद्दल तुम्ही ट्विट करू शकता. बोलीतील शब्द, गाणी, म्हणी, अभंग, ओवी, काव्य आणि तिचं व्याकरण इतरांना समजावून सांगू शकता.

#साहित्यसंमेलन 
डोंबिवली साहित्य संमेलनात व्यक्त झालेल्या विचारांवर, इतर घडामोडींवर आणि अध्यक्षीय भाषणावर आपण आपलं मत ‘#साहित्यसंमेलन’ वापरून नोंदवू शकता.

#वाचनीय
तुम्हाला कुठलं पुस्तक आवडलं? सध्या तुम्ही काय वाचत आहात? कुठले लेखक/लेखिका तुम्हाला विशेष आवडतात? तुमच्या वाचन प्रेमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. समृद्ध मराठी साहित्याबद्दल ‘#वाचनीय’ वापरून तुम्ही चर्चा करू शकता.

#हायटेकमराठी
मराठीच्या कक्षा आता रूंदावत आहेत. आता मराठी संगणकावर दिसते, मोबाईलवर दिसते. मात्र, मराठीसाठी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी मराठी तयार करण्यासाठी अजूनही कल्पक प्रयत्नांची गरज आहे. मराठीला हायटेक आणि डिजिटल माध्यमांवर यशस्वी करण्यासाठी तुमच्या डोक्यातील कल्पना तुम्ही ‘#हायटेकमराठी’ वापरून ट्विट करू शकता. मराठी संकेतस्थळ, अॅप्स, फाँटसबद्दल माहिती तुम्ही ‘#हायटेकमराठी’ वापरून देऊ शकता.

#बोलतोमराठी
आपण जाल तिथं मराठी बोलता का? तुमचे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार मराठीत करता का? तुम्हाला कुठल्या अडचणी येतात? महाराष्ट्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी काय करायला हवं? तुम्ही प्रतिकूल वातावरणातही मराठी आवर्जून वापरली त्याचे किस्से आणि वरील प्रश्नांवर चर्चा तुम्ही ‘#बोलतोमराठी’ वापरून करू शकता.

#मराठीशाळा
मराठी शाळांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची ‘#मराठीशाळा’ वापरून आपण चर्चा करू शकता.आपल्या भागांतील यशस्वीपणे चालणाऱ्या मराठी शाळांची ओळख आम्हाला करून देऊ शकता. मराठी शाळेत शिकून आज विविध ज्ञानशाखांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींची ओळख करून देऊ शकता. मराठी शाळेत शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आणि आठवणी आपण ‘#मराठीशाळा’ वापरून ट्विट करू शकता.

#भटकंती
तुम्ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असणारे गडकिल्ले, मंदिरे, जंगले, डोंगरदऱ्यांबद्दलची चर्चा ‘#भटकंती’ वापरून करू शकता. आपल्या भागातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देऊ शकता. ‘#भटकंती’ प्रवासाची आवड असणाऱ्या पावलांच्या अभिव्यक्तीसाठीचं व्यासपीठ आहे.

#खमंग
खवय्यांसाठीचा हा खास हॅशटॅग. महाराष्ट्र आणि जगात इतर कुठेही बनवल्या जाणाऱ्या स्वादिष्ट पाककृतींची चर्चा आपण ‘#खमंग’ वापरून करू शकता. आपण पदार्थ आणि तो बनवण्याची कृती कागदावर किंवा मोबाईलमध्ये मराठीत लिहून, त्याचं छायाचित्र काढून ते या हॅगटॅगखाली टाकू शकता.

#माझाछंद
तुमच्या छंदाविषयी तुम्ही ‘#माझाछंद’ वापरून चर्चा करू शकता. तुम्ही काढलेलं छायाचित्र, रांगोळी, चित्र आम्हाला ट्विट करू शकता. तुम्ही एखादे गायलेलं गाणं ट्विट करू शकता. मन रमवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या छंदाविषयी व्यक्त होण्यासाठी ‘#माझाछंद’ हे व्यासपीठ आहे.

संमेलनातील इतर उपक्रम :
1. ट्विट व्याख्यान : वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचं व्याख्यान.
2. मराठी भाषेसाठीचे ठराव मांडणं.
3. मराठी भाषेसंबंधीच्या प्रश्नांवर चर्चासत्र 
4.शब्दकोडी, प्रश्नमंजुषा, नवशब्द निर्मितीचे उपक्रम.

 

chinmay.reporter@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......