कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • कैसर विल्हेल्म दुसरा - विकलांग आणि काहीसा छोटाच राहिलेला डावा हात झाकून घेत. याची बहुतेक सगळी छायाचित्रं अशीच आहेत
  • Wed , 05 February 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War ओटो फॉन बिस्मार्क Otto von Bismarck बिस्मार्क Bismarck कैसर विल्हेल्म दुसरा Kaiser Wilhelm II

नुकतीच पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हे नवेकोरे साप्ताहिक सदर...

शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजालादेखील अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि अहंकार, कशा प्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावरची निष्ठा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पहिल्या महायुद्धाच्या या इतिहासातून सापडायला मदत होईल, अशी अशा वाटते.

.............................................................................................................................................

१८५३-५६ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात रशियाविरोधात इंग्लंड-फ्रान्स यांनी एकत्र येऊन तुर्कस्तानला मदत केली आणि रशियाचा युरोपातल्या वाढत्या प्रभावाला खीळ घातली. या वेळी रशियाने ऑस्ट्रियाकडे मदत मागितली होती, पण ऑस्ट्रियाने नकार दिला. ही त्यांची चूक झाली. युरोपात ऑस्ट्रिया एकटा पडला असताना त्यांना रशियाच्या मदतीची गरज होती आणि तसेही १८४९ मध्ये हंगेरीशी युद्ध करून त्याला आपल्या साम्राज्यात सामावून घेताना एकट्या रशियाने त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे इतर युरोपियन देश गप्प बसले होते.

या क्रिमियन युद्धाच्या निमित्ताने रशियाच्या अनेक मर्यादा आणि कमतरता उघड झाल्या. इंग्लंडला अफगाणिस्तानात युद्धात गुंतवून चांगलेच दमवलेल्या रशियाबद्दल युरोपात भीतीचे अन संशयाचे वातावरण होते. अनेकांची खात्री झाली होती की, रशिया आणि इंग्लंडचे युद्ध अटळ आहे. या क्रिमियन युद्धाने मात्र बऱ्याच शंका दूर झाल्या.

चान्सेलर असताना बिस्मार्कने मात्र रशियाशी सामंजस्य राखण्याचे धोरण ठरवले होते. जसे फ्रान्सचे जर्मनीशी वैर होते, तसेच नेपोलियानिक युद्धे व क्रिमियन युद्धामुळे फ्रान्स आणि रशियाचेही वैर होते. त्यामुळे फ्रान्स विरुद्ध हे दोघे देश एकत्र आले आणि १८७९मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला. दक्षिणेकडे जर्मन भाषक ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याशीदेखील बिस्मार्कने सामंजस्य पूर्ण व्यवहारच ठेवला होता. तसा मैत्रीचा करार १८७९ सालीच केला गेला. स्पेन-इटली-तुर्कस्तानशी भांडण उकरून काढायची गरजच नव्हती. १८८२ साली ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी आणि इटलीने एकत्र येऊन मैत्रीचा करार केला. (हा पहिले महायुद्ध सुरू होईपर्यंत टिकला, पण युद्ध सुरू झाल्यावर इटलीने त्यातून अंग काढून घेतले.)

युरोपातला आजारी मरणासन्न म्हातारा म्हणून हिणवले जाणारे ओट्टोमान साम्राज्य खिळखिळे झाले होते. त्याच्यापासून फुटून स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या राज्यांवर रशिया आणि ऑस्ट्रिया दोघांचाही डोळा होता. त्यामुळे अर्थात ऑस्ट्रिया आणि रशियात तणाव वाढू लागला. तेव्हा या रस्सीखेचीत फ्रान्सने रशियाच्या बाजूने उडी घेऊन सत्तेचा समतोल आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला, पण बिस्मार्कने शिताफीने रशियाशी १८८७मध्ये गुप्त करार करून, ऑस्ट्रियाला समजावून गप्प केले आणि फ्रान्सला दूर ठेवले. यामुळे तुर्की समुद्रात तसेच बाल्कन प्रदेशात नव्याने स्वतंत्र होऊ घातलेल्या राष्ट्रांवर रशियाचा प्रभाव वाढला.

ही गोष्ट जशी ऑस्ट्रियाला फारशी आवडली नाही, तशीच जर्मनीतही अनेकांना आवडली नाही. (खरे तर असा मैत्री करार करून रशियाला तंत्रज्ञान, लष्करी, औद्योगिक, शैक्षणिक सुधारणात होऊ शकणारी युरोपातील इतर देशांची मदत बिस्मार्कने अडवली. या क्षेत्रात रशिया मागासलेला होता. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध, प्रचंड भूविस्तार आणि अमर्याद मनुष्यबळ असलेला रशिया जर तंत्रज्ञान, पायाभूत सोयी, अवजड उद्योग आणि लष्करीदृष्ट्या बलवान झाला असता तर ते भयावह ठरणार होते. त्यामुळे ही त्याची उपलब्धी मोठी होती, पण ती कुणाला समजली नाही.)

इंग्लंडला, त्यांच्या साम्राज्याला आणि त्यांच्या सागरी प्रभुत्वाला आव्हान दिले जाईल अशी कुठलीही योजना त्याने आखली नाही, तसे कुठलेही कृत्य केले नाही. बिस्मार्कने अशा प्रकारे १८७१पर्यंत असलेले आक्रमक धोरण बदलून पूर्णपणे सलोख्याचे धोरण आखले. एका अर्थी आर्थर बाल्फोर याने म्हटल्याप्रमाणे बिस्मार्क खरोखर जर्मनीचा नव्हे तर अख्ख्या युरोपचा पंतप्रधान होता, पण १८८८ साली गादीवर आलेल्या कैसरने या सगळ्या व्यवस्थेला सुरुंग लावायला सुरुवात केली. 

एकंदरीत बिस्मार्क हे मोठे गुंतागुंतीचे रसायन होते. त्याने आरोग्य विमा. अपघात विमा आणि कामगाराना पेंशन यासारख्या कल्याणकारी योजना आणल्या, पण मुख्यत्वेकरून त्या समाजवादी गटांना मिळणारा पाठिंबा कमी करायला वापरल्या. कामगार संघटनांवर बंदी घातली, पण कामगारांचा मतदानाचा अधिकार शाबूत ठेवला. अशा प्रकारे राजेशाही आणि पुरातन समाजव्यवस्था आपण समाजवादी, लोकशाहीवादी गटांना थोड्याफार सवलती देऊन किंवा त्यांच्या मागण्या अंशत: मान्य करून टिकवू शकतो असे त्याला वाटले. एक प्रकारे उदारमतवादी राजेशाही किंवा सामंतशाही म्हणा ना! अर्थात ती चूक होती. आंतरारष्ट्रीय राजकारणात जर्मनीचे हितसंबंध जपताना त्याने ज्या राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले, त्या रशिया-इटली-ऑस्ट्रिया यांच्यासारख्यांना कमजोर किंवा मागास कसे ठेवता येईल हे पाहिले.

याचा दोष त्याला द्यायचा की, श्रेय हे आज ठरवणे मोठे कठीण काम आहे, पण एका गोष्टीचा दोष त्याला नक्की देता येईल. त्याच्याकडे व्यापक दूरदृष्टी होती आणि तरीही आपण गेल्यानंतर आपले धोरण शिताफीने चालवू शकेल असा कुणी उत्तराधिकारी तो तयार करू शकला नाही. बिस्मार्क नसलेल्या जर्मनीचे युरोपात काय होणार होते, याचा त्याला अंदाज आला होता, पण त्याने काही केले नाही किंवा तो करू शकला नाही.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी इतका प्रभावी बनला होता की, जर्मन्मय युरोप ही संकल्पना इतर युरोपीय राष्ट्रात पसरू लागली होती. आणि जर्मन्मय म्हणजे पुढे बळाच्या जोरावर हिटलरने जवळपास संपूर्णपणे पादाक्रांत करून मांडलिक बनवलेला युरोप नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या जर्मन प्रभावाखाली असलेला युरोप. फ्रेडरिक न्यूमन याचे ‘मिटलयुरोपा’ हे पुस्तक वाचले तर समजून येते की, आज आपण जी युरोपियन युनियन पाहत आहोत, त्याची रूपरेषा त्याने त्यात तपशीलवार मांडली आहे आणि आश्चर्य म्हणजे त्यात इंग्लंडला स्थान नव्हते. नुकताच इंग्लंड युरोपियन युनियनमधून (brexit) बाहेर पडलाय. पण तेव्हा ही संकल्पना काही फलद्रूप झाली नाही, कदाचित काळाच्या खूप पुढे असल्याने असेल.

बिस्मार्कने मोठ्या हिकमतीने १८७१ साली सर्व जर्मन भाषकांचे एकसंघ जर्मन राष्ट्र निर्माण केल्यावर (अर्थात ऑस्ट्रिया-हंगेरीला बाहेर ठेवून) अल्पावधीतच जर्मनी समृद्ध, संपन्न, प्रचंड प्रबळ आणि महत्त्वाकांक्षी बनला. राष्ट्रवादाचे वारे शिडात भरलेले त्याचे जहाज अगदी सुसाट निघाले, पण त्याला पायउतार व्हायला हक्काची बाजारपेठ कुठे होती!

या नव्याने स्थापित झालेल्या जर्मन राष्ट्राला सुरुवातीला तरी इंग्लंडचा पाठिंबा होता. युरोपात सत्तेचा समतोल राहायचा असेल तर रशिया आणि फ्रान्स या तुल्यबळ सत्तांमध्ये एक, दोघांनाही टक्कर देऊ शकेल असे (आणि एव्हढेच- ते महत्त्वाचे) सामर्थ्यवान जर्मन संघराज्य असेल तर ते इंग्लंडला हवे होतेच. १८३०पर्यंत जर्मन संघराज्य औद्योगिक क्षेत्रात मागेच होते, पण हळूहळू फरक पडू लागला होता. १८७१नंतर प्रशिया, साक्सनी, ओस्टररिश अशा जर्मन घटक राज्यांनी भूसुधार कायदे केले, जमीन शेतकऱ्यांसाठी मोकळी केली. फ्रान्स आणि अमेरिकेतल्या तज्ञांच्या मदतीने पिक पद्धतीत सुधारणा करून कृषी क्रांती घडवली. आता शेतावर कमी माणसात भरपूर उत्पन्न होऊ लागल्याने, उद्योग क्षेत्रात काम करायला मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले. १८व्या शतकाची अखेर येईपर्यंत उद्योग, कला, शिक्षण, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात जर्मन लोक आघाडीवर येऊ लागले होते. अल्पावधीतच जर्मन राष्ट्र भरभराटीला आले. व्यापार, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला सर्व क्षेत्रांत त्याने घेतलेली झेप नेत्रदीपक होती. इतकी की थोड्याच काळात जर्मनी, त्याची राजधानी बर्लिन ही युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली. कुणालाही काहीही गंभीर, मूलगामी संशोधन करायचे असेल, अध्ययन करायचे असेल तर त्याची पावले बर्लिनच्या विद्यापीठाकडे वळू लागली. उद्योगधंद्यात – औद्योगिक उत्पादनात तर जर्मनी लवकरच इंग्लंडला टक्कर देऊ लागला.

मात्र या जर्मनीचा एक मोठा प्रॉब्लेम होता. अख्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. पश्चिमेला असलेला फ्रान्स तर त्याचा आधीपासूनचा वैरी. त्यातून १८१५ व १८७० साली फ्रान्सचा पराभव करून, तसेच यांचे आल्सेल आणि लोरेन हे प्रांत जिंकूनच जर्मनीचा जन्म झालेला होता. पण फ्रान्स काही अगदी पुचाट राष्ट्र नव्हते. उलट इंग्लंडनंतर युरोपात तेच सगळ्यात जास्त वसाहती असलेले साम्राज्यवादी राष्ट्र होते. इंग्लंड म्हटले तर युरोपियन, म्हटले तर युरोपबाहेरचे राष्ट्र, पण त्यांना युरोपातल्या सत्तासंघर्षात फारसा रस नव्हता, फक्त युरोपातील कोणतीही शक्ती त्यांच्या साम्राज्याला, आरमाराला आणि समुद्री व्यापारावरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतकी प्रबळ होत नाही ना हे फक्त ते पाहत.

इंग्लंड हे जरी युरोपीय राष्ट्र असले तरी ते भौगोलिकदृष्ट्या मुख्य युरोपीय भूमीपासून जसे तुटून आहे, तसेच मानसिकरीत्याही. ते युरोपच्या मुख्य भूमीतल्या सत्तास्पर्धेपासून गेली अनेक शतके दूरच होते (व आहे). पण आंतराष्ट्रीय राजकारणातली त्यांची भूमिका, त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जगभर पसरलेले साम्राज्य बिनबोभाट सांभाळणे आणि त्याकरता व्यापार व समुद्री संचारावर निर्विवाद प्रभुत्व कायम ठेवणे. गेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते की, इंग्लंडने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एकत्र येऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे. त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यांनी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला.

यात त्यांना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले. बाकी न्याय, लोकशाही, दमनाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढा, मानवतेचा कैवार या फक्त बाता. आताही युरोपियन युनियनमध्ये राहायचे की, बाहेर जायचे याचा निर्णय इंग्लंडने याच सूत्राने घेतला. खेळ्या बदलल्या तरी तत्त्व अपरिवर्तनीयच आहे!

कैसर विल्हेल्म दुसरा

हे पहिल्या महायुद्धातले कदाचित सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल. विल्हेल्म दुसरा ही व्यक्तिरेखा आपल्याला कैसर विल्हेल्म दुसरा म्हणून माहीत आहे. हा जर्मनीचा शेवटचा कैसर. याचा जन्म झाला २७ जानेवारी १८५९ रोजी. वडील होते फ्रेडरिक तिसरा, तर आई व्हिक्टोरिया. (तिला विकी म्हणत) ती इंग्लंडची सुप्रसिद्ध राणी व्हिक्टोरिया हिची थोरली मुलगी. तिचे वडील म्हणजे राणी व्हिक्टोरियाचे पती. जर्मन भाषक छोटे राज्य साक्स-कोबर्ग-साल्फिल्ड या जर्मन राज्याचा प्रिन्स अल्बर्ट. आहे कि नाही गंमत! तर हा कैसर विल्हेल्म दुसरा पायाळू म्हणून जन्मला आणि जन्म होताना डॉक्टरच्या चुकीमुळे या विल्हेल्मचा डावा हात कायमचा जायबंदी झाला.

आई व्हिक्टोरियाकरता हा मोठा धक्का होता. जर्मन राष्ट्राचा भावी सम्राट आणि डाव्या हाताने अधू! ही कल्पना त्या कर्मठ स्त्रीला सहन झाली नाही. त्यामुळे लहानपणापासून विल्हेल्मवर अनेक प्रकारचे औषधउपचार केले गेले. त्यातले अनेक क्रूर, वेदनादायी आणि तरी परिणामशून्य होते. नंतर त्याच्यावर व्यंगावर मात करण्याकरता कडक शिस्तीतल्या प्रशिक्षणाचा मारा केला गेला. इंग्लंडच्या राणीचा पहिलाच नातू अपंग असल्यामुळे आजीने त्याचे अति लाड केले. लहान वयाच्या विल्हेल्म करता हे सगळे फार जास्त झाले आणि त्याचा स्वभाव हेकट, शीघ्रकोपी, दुसऱ्यांचे न ऐकणारा असा झाला. विल्हेल्म तरुणपणी इंग्लिश द्वेष्टा बनला. असे सांगतात की, एकदा शिकार करताना त्याला जखम होऊन रक्त वाहू लागले, जे लवकर थांबेचना. तेव्हा तो म्हणाला- ‘जाऊ दे वाहून जितके जायचे तितके, हे घाणेरडे इंग्लिश रक्त.’

विल्हेल्म गादीवर आला, तेव्हा बिस्मार्क चान्सेलर होता आणि राष्ट्रपिता असल्याने त्याचा जर्मनीच्या राजकारणात तसेच युरोपातही दबदबा होता. पण हेकट आणि आपलेच म्हणणे खरे करून दाखवणाऱ्या अननुभवी तरुण कैसरला हे पचणे शक्य नव्हते. बदलत्या काळाचे वारे बिस्मार्कलाही जाणवू लागले होते. जर्मनी संपन्न आणि बलाढ्य होत होता, पण फार जास्त वेगाने आणि त्याला युरोपातल्या प्रभावशाली राष्ट्रात मानाचे स्थान हवे होते. त्याकरता अत्यंत संयम आणि धोरणी वागणुकीची गरज होती. पण जर्मनीत आपले स्थान बिस्मार्कपेक्षा दुय्यम आहे आणि आधुनिक लोकसत्ताक पण नावाला राजेशाही मिरवणाऱ्या देशात ते तसेच राहणार आहे, हे कैसरच्या पचनी पडणे शक्य नव्हते.

त्याच सुमारास जर्मन खाण कामगारांनी सार्वत्रिक संप पुकारला. त्यावरून कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावात कैसराने हस्तक्षेप करून आणि ऐनवेळेस बिस्मार्कला एकटे पाडून आपण आजोबाप्रमाणे गादीवर फक्त शांत बसणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. ७५ वर्षांच्या वृद्ध बिस्मार्कने मान तुकवली, राजीनामा दिला आणि तो राजकीय विजनवासात गेला. इथून पुढे जर्मनीच्या प्रगतीची दिशा युद्धाकरता तयारी आणि अटळ विनाशाकडेच जाणारी असणार होती हे अधोरखित झाले. बिस्मार्क निवृत्त झाला तरी त्या काळी जर्मनीला भेडसावणारे प्रश्न तसेच होते. पश्चिमेला फ्रान्स, पूर्वेकडे रशिया, दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि उत्तरेला इंग्लंड अशा चार साम्राज्याने तो वेढलेला होता. फ्रान्स तर त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा शत्रू, पण रशियाचे तसे नव्हते, इंग्लंड हे सदा सावध होते आणि ऑस्ट्रिया नावाला मोठा असला तरी आतून बंडाळ्या, फुटिरतावाद यांनी पोखरला गेलेला होता.

१८९० साली जर्मनी-रशिया मैत्रीकराराची मुदत संपत होती आणि त्याचे सहा वर्षांसाठी नुतनीकरण करावे असे रशियाला वाटत होते, पण कैसरनेच्या सांगण्यावरून चान्सेलर थिओ फोन काप्रीफी याने तो प्रस्ताव फेटाळला. फ्रान्सने ही संधी साधली आणि रशियाशी मैत्री करार केला. खरे तर झार आणि त्याच्या पराकोटीच्या राजेशाही शासन व्यवस्थेला प्रजासत्ताक असलेल्या फ्रान्सचे वावडे होते. फ्रान्सशी ते १९व्या शतकात दोन युद्धे खेळले होते. त्यात त्यांची चांगलीच हानीही झाली होती. फ्रान्सच्या मनातही रशियाबद्दल फार काही जिव्हाळा वगैरे नव्हता. जर्मन लेखक लुडविग रायानार्सने म्हटल्याप्रमाणे रशियात मार्सेली या फ्रेंच राष्ट्रगीताची धून एखाद्याने अगदी शिट्टी वाजवून आळवली तरी त्याला तुरुंगात टाकत, पण पक्क्या हाडवैरी असलेल्या दोघांचा संभावित शत्रू आता बलाढ्य होऊ घातला होता. १८९० पर्यंत जर्मनी एक संपन्न आणि बलाढ्य देश झाला होता. त्यामुळे रशियाला त्याच्या बदललेल्या नेतृत्वाबद्दल अन बदलत्या धोरणाबद्दल रास्त शंका वाटत होती. फ्रान्सच्या मदतीने रशियाने औद्योगीकीकरण करणे, लष्करी कुवत वाढवणे, सर्व देशभर लोहमार्गाचे जाळे वाढवून दळणवळण आणि संदेशवहन प्रणालीत सुधारणा करणे सुरू केले. १८९४ साली तसा करारही केला गेला. रशियाचा आकार आणि मागासलेपण पाहता त्याला वेळ लागणार होता, पण कधी ना कधी ते एक प्रबळ प्रतिस्पर्धी होणारच होते.

बिस्मार्कचा कटाक्ष होता की, काय वाट्टेल ते झाले तरी इंग्लंडला डिवचायचे नाही. पण कैसरने नादानपणाचे एकावर एक विक्रम करायला सुरुवात केली. जर्मनीला लाभलेला सागर किनारा कमी लांबीचा आणि व्यापाराकरता तुर्कस्तानमधून जाणारा जुना पारंपरिक मार्ग सोयीचा. त्यांचे तुर्कस्तानशी असलेले संबंध तसे बरे होते. त्यामुळे त्याने हे संबंध दृढ करावे आणि व्यापाराला चालना मिळावी, दार्दानेल्सची सामुद्रधुनी, काळा समुद्र, क्यास्पियन समुद्र इथून व्यापार सुरळीत करता यावा म्हणून १८९८ साली तुर्कस्तानाला भेट दिली. यात गैर काहीच नव्हते, पण तिथे जाऊन केलेल्या जाहीर भाषणात त्याने स्वत:ला जगातल्या सर्व मुसलमानांचा मित्र आणि हितरक्षक असल्याचे सांगितले. इंग्लंडच्या साम्राज्यात जगातला जवळपास सगळ्यात मोठा मुस्लीम समाज राहत होता. या कैसरच्या विधानाने इंग्लंडला त्याच्याबद्दल शंका यायला सुरुवात झाली. एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय कैसरने दुसरी फार मोठी चूक केली. ती म्हणजे जर्मन नाविक दलाची निर्मिती. शिवाय ते इंग्लंडच्या आरमारापेक्षा वरचढ करण्याच्या दृष्टीने जोमात प्रयत्न सुरू केले.

इंग्लंडची जीवनवाहिनी म्हणजे त्यांचे अद्वितीय आरमार. इतिहासात त्यांच्या वर आलेली (फ्रान्स स्पेन, डेन्मार्ककडून) परचक्रे या बलाढ्य आरमारामुळेच ते परतवू शकले होते. युरोपातील कोणत्याही दोन राष्ट्रांचे एकत्रित आरमार हे इंग्लंडपेक्षा जास्त प्रबळ असता कामा नये, असे त्यांचे त्या काळी धोरण होते. आता त्याला कैसर आव्हान देऊ लागला. खरे तर अजूनही जर्मनी आरमारी शक्तीबाबत इंग्लंडच्या खूप मागे होता. इंग्लंडनेही आपले सागरी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली. ड्रेडनॉट प्रकारच्या महाकाय शक्तीशाली नौकांचा ताफा त्याने आपल्या आरमारात समाविष्ट केला, कोळशावर चालणारी जहाजे बदलून तेलावर चालणारी जहाजे आणायला सुरुवात केली. ही जहाजे अधिक वेगवान असत. इंधन म्हणून कोळशाच्या मानाने जहाजावर तेलाचा साठ कमी करावा लागतो. कमी धूर ओकत असल्याने शत्रूला दुरून त्यांचा ठावठिकाणा लागणे अवघड होते. यावर जर्मनीनेदेखील अशाच प्रकारच्या सुधारणा केल्या, शिवाय पाणबुड्यांच्या निर्मितीवर भर दिला. इंग्लंडच्या नाविकदलाचे तत्कालीन मंत्री विन्स्टन चर्चिल यांनी म्हटल्याप्रमाणे जर्मनीची नौसेना इंग्लंडला युद्धात हरवायच्या दृष्टीने खूपच लहान होती, पण जर्मनीच्या हेतू/इराद्याबद्दल इंग्लंडच्या मनात संशय निर्माण करण्याइतपत मोठी नक्कीच होती. तशीही आधुनिक प्रबळ नौसेना जर्मनीकरता चैनीची बाब होती, पण इंग्लंडकरता मात्र तो जीवनमरणाचा प्रश्न होता.

साहजिक आता इंग्लंड फ्रान्स आणि रशियाच्या बाजूने झुकू लागले. आता रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड ही तीन बलाढ्य राष्ट्रे आपल्या विरोधात एकत्र येताहेत, आपली कोंडी होऊ शकते, तर आपण काही शिष्टाई करून, सामोपचाराने मार्ग काढावा, मुत्सद्देगिरीने ही कोंडी फोडावी की, अधिक जोमाने आरमार/शस्त्रास्त्र निर्मिती करून त्यांना अधिक जवळ यायला कारण पुरवावे? पण कैसरकडे मुत्सद्देगिरी नव्हती. शिवाय त्याच्या आसपासही कोणी त्या तोलाचा माणूस नव्हता. औटघटकेचा राजा बनलेला त्याचा बाप फ्रेडरिक याने मरणासन्न असताना चिंतेने बिस्मार्कला सांगितले होते की, ‘संयम आणि शहाणपणाचा अभाव असलेल्या या उर्मट युवराजापासून परराष्ट्र खाते लांबच ठेव, नाहीतर जर्मनीला त्याचे अनिष्ट परिणाम भोगायला लागतील. पण नेमके तेच झाले!’

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......