अजूनकाही
या सिनेमाचं नाव ‘चोरीचा मामला’ असं असलं तरी ही चोरी नातेसंबंधांतील फसवेगिरीशी जोडली गेलेली आहे. मध्यमवर्ग कुठल्याही परिस्थितीबद्दल विचार करतो, तेव्हा त्याचा प्राधान्यक्रम कुटुंबाला असतो. त्याचं विश्व मर्यादित चौकटीत आखलेलं असतं. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपड करणं हेच त्याचं आयुष्य असतं. अशाच मध्यमवर्गीय जाणिवा घेऊन शहरातल्या एका वस्तीत वास्तव्य करणारा नंदन (जितेंद्र जोशी) गरजा भागवण्यासाठी चोरी करायला लागतो. त्याला त्याची पत्नी, आशाचा (कीर्ती पेंढारकर) पाठिंबा असतो.
सिनेमा सुरू होतो तो चोरीसाठी निघालेल्या नंदन आणि आशाच्या संवादाने. नंदन चोर असला तरी त्याचं मध्यमवर्गीय असणं दिग्दर्शकानं गंमतीशीर पद्धतीनं रंगवलं आहे. नंदन चोरी करायला अमरजीत पाटील (हेमंत ढोमे) याच्या फार्म हाऊसवर जातो. अमरजीत हा लफडेबाज पुरुष असल्यानं श्रद्धाला (अमृता खानविलकर) त्या दिवशी तो फार्म हाऊसला घेऊन आलेला असतो. तोपर्यंत त्याची म्हणजे अमरजीतची पत्नी अंजली (क्षिती जोग) नवऱ्याचा पाठलाग करायला इन्स्पेक्टर अभिनंदनला (अनिकेत विश्वासराव) पाठवते. तिथून पुढे जो मेळ दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनं घातला आहे, तो विनोदी सिनेमाला साजेसा ठरतो.
प्रत्येक दृश्यात विनोदाला मोकळी जागा आहे. द्विअर्थी संवादाचा भरणा पूर्वार्धात फार आहे. मात्र हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत जातं. उत्तरार्धात कथानक अनेक ठिकाणी वळण घेत राहतं. मात्र चकित होण्याची वेळ प्रेक्षकांवर येत नाही.
मुळात मध्यमवर्गीय दाम्पत्याची चोरी करणं ही अपरिहार्यता आहे असं कुठलंही दृश्य सिनेमात येत नाही. मात्र चोरीला अधोरेखित करण्यापेक्षाही सिनेमाच्या कथानकाला पुढे घेऊन जाण्यासाठी पटकथा त्या पद्धतीने रचली आहे. त्यामुळे सिनेमातल्या दृश्यात चालणारा विनोदी गोंधळ प्रेक्षकांची उत्सुकता मात्र टिकवून ठेवतो.
मध्यमवर्गीय जाणिवा दाखवताना दृश्याच्या बरोबरीने येणारे संवाद तितकेच उत्तम पद्धतीने उभे केले आहेत. चोरी करायला जाणारा नंदन शुभकार्य असल्यागत नारळ फोडून फार्महाऊसचं कुलूप तोडतो. त्याचबरोबर तो एका ठिकाणी पकडला जातो, तेव्हा एक डाव रचला जातो. तेव्हा त्याच्या तोंडून येणारे ‘मराठी माणसाला गोविंदा माहित्ये, पण ‘विंदा’ माहीत नाही” किंवा ‘काय सांगून गेले ‘पुलं’ आणि काय समजतंय हे खुळं’ अशी साहित्यातील मध्यमवर्गाला बऱ्यापैकी माहीत असलेल्या साहित्यिकांचा उल्लेख पारंपरिक पद्धतीने सिनेमात येतो. अगदी मध्यमवर्गातल्या मराठी माणसाला साजेसा!
जितेंद्र जोशीचा अभिनय ही या सिनेमाची तगडी बाजू आहे. त्याला संवादाची आणि तितक्याच ताकदीच्या हावभावांची जोड मिळाली आहे. त्याने प्रत्येक दृश्यात उभा केलेली भूमिका ही दृश्यातल्या परिस्थितीला अचूकपणे धरून ठेवते. सिनेमात त्याला एक पंजाबी माणसाचं सोंग करावं लागतं आणि अचानक त्याला त्याच्या पत्नीचा कॉल येतो, तेव्हा तो पंजाबीतून बोलतो आणि शेवटी कॉल ठेवताना सहज ‘जय महाराष्ट्र’ म्हणून जातो. मात्र क्षणात चूक लक्षात येते, पण आता पंजाबी भाषेत काय म्हणायचं म्हणून तो ‘उडता पंजाब’ असं बोलतो. या संपूर्ण दृश्यात त्याने अखंड विनोदी संवादाची शैली जराही सोडलेली नाही. अशा अनेक दृश्यांत तो प्रभावी ठरतो.
हेमंत ढोमेची देहबोली पात्राला साजेशी आहे. मात्र त्याच्या अभिनयात तोचतोचपणा जाणवत राहतो. अमृता खानविलकर मात्र विनोदी संवादाला न्याय देत नाही. अनिकेत विश्वासरावचा अभिनय पठडीबद्ध आहे. क्षिती जोगने चांगला प्रयत्न केला आहे. कीर्ती पेंढारकरने साकारलेल्या भूमिकेने अभिनयाच्या जोरावर एका साधारण गृहिणीच्या मनातले भावविश्व उलगडून दाखवले आहेत.
सिनेमाची पटकथा खिळवून ठेवते. एडिटिंग सफाईदार केले आहे. सुरुवातीच्या गाण्याच्या बाबतीत सिनेमात नायिका आहे म्हणून अंगप्रदर्शन करणारं गाणं शूट केलं असावं असं वाटायला लागतं. मात्र असे काही अपवाद वगळता ‘चोरीचा मामला’ जितेंद्रच्या अभिनय शैलीने आणि त्याच्याच संवादाने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हौस पूर्ण करतो. त्यामुळे या एका पात्र निवडीसाठी दिग्दर्शकाचं कौतुक करावं लागेल. दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शन जाधवने सिनेमाला न्याय दिला आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment