अजूनकाही
‘१०० टक्के सुहृद’ असा शब्दप्रयोग हल्ली वापरला जात नाही. त्याचं एक कारण हा शब्दप्रयोग वापरावा अशा व्यक्तीही आपल्याला अवतीभवती दिसत नाहीत. पण हा शब्दप्रयोग वापरायचाच झाला तर तो यास्मिन शेखबाईंबद्दल नि:संशयपणे वापरता येईल. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ यंदा मराठी व्याकरणाच्या अभ्यासक यास्मिन शेख यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी...
.............................................................................................................................................
मूळ नाव जेरूशा जॉन रुबेन. जन्मानं बेनेइस्रायली ज्यू. लग्न भारतीय मुस्लिमाशी आणि पेशा मराठी व्याकरण व भाषाशास्त्राचं अध्यापन. जेरूशा रूबेन यांचा हा प्रवास विस्मयकारक आणि कौतुकास्पद असाच आहे.
पॅलेस्टाइन या देशातल्या अनन्वित छळाला कंटाळून अनेक वर्षांपूर्वी कितीतरी ज्यू कुटुंबांनी जगभरातल्या अनेक देशांत स्थलांतर केलं. त्यातील काही कुटुंबं भारतात आली. जवळजवळ अंगावरच्या कपड्यानिशी आलेल्या या ज्यू कुटुंबांनी भारतात आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. केवळ इथली भाषाच नाही, तर प्रथा-परंपरा, रीतीरिवाज, सण-उत्सव सर्व काही स्वीकारलं. ती ‘भारतीय’ झाली. रुबेन यांचं कुटुंबही त्यापैकीच एक. वडील जॉन रुबेन सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यामुळे त्यांची ठराविक काळानं बदली व्हायची. (बदलीच्या प्रत्येक गावी काही ज्यू कुटुंबं नव्हती, मराठी कुटुंबंच होती.) त्यामुळे रुबेन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. शालेय शिक्षण पंढरपूरला झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प.महाविद्यालयात. त्यांनी मराठी भाषा व साहित्य हा विषय घेतला. तिथं त्यांना श्री.म.माटे हे शिक्षक लाभले. माटेमास्तरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे रुबेन मराठीच्या, मराठी व्याकरणाच्या प्रेमात पडल्या.
बी.ए.बी.टी.ला त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला. नंतर एम.एम. केलं. त्यानंतर काही काळ औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये अध्यापन केलं. त्यानंतर तब्बल २८ वर्षं त्यांनी सायन (मुंबई)च्या ए.आय.इ.एस महाविद्यालयात अध्यापन केलं. तिथं श्री.पु.भागवत हे त्यांचे सहकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी दहाएक वर्षं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना भाषाशास्त्र व मराठी व्याकरण शिकवलं. त्यांनी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही मराठी व्याकरणाविषयीची दोन नितांत सुंदर पुस्तकं लिहिली आहेत.
पण या पुस्तकांवर त्यांचं नाव यास्मिन शेख असं आहे. त्याचीही एक गोष्ट आहे. जात, धर्म, वंश या पलीकडे जाणून निखळ मानवतावादी झालेल्या रुबेन यांनी अझीझ अहमद शेख यांच्याशी लग्न केलं.
नितळ गोरा म्हणावा असा रंग, त्या रंगाला अजूनच गहिरेपण देणारा मृदू, मुलायम स्वभाव, स्वच्छ व सुंदर मराठी शब्दोच्चार आणि नखशिखान्त महाराष्ट्रीय संस्कृतीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व, असं यास्मिन शेख यांचं वर्णन करता येईल. त्यांचा जन्म नाशिकचा. २१ जून १९२५चा. त्याच दिवशी त्या मिशनरी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरबाईंचा वाढदिवस होता. म्हणून त्यांनी जेरूशा यांचा पाळणा फुलांनी सजवला. त्यांचे वडील आले तेव्हा डॉक्टरबाई त्यांना म्हणाल्या, ‘तुम्हाला गुलाबाचं फुल झालं आहे.’ ही उपमा त्यांना आजही तितकीच सार्थ वाटते. सतेज, ऋजु आणि हसरं व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख आहे.
बाई सायनच्या महाविद्यालयात शिकवत असतानाची गोष्ट. त्या तेथील बी.ए.च्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र व व्याकरण हे विषय शिकवत. तेव्हा विभागप्रमुख असलेल्या श्री.पु. भागवतांना असं वाटलं की, हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल आणि त्याचं उत्तम प्रकारे अध्यापन करायचं असेल तर आधुनिक भाषाशास्त्र शिकायला हवं. तसं त्यांनी बाईंना सुचवताच त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यामुळे त्यांची भाषाशास्त्र व व्याकरणाची गोडी आवडीतून जिवनध्यासात बदलली. पुढे त्यांनी अतिशय कळकळीनं, तळमळीनं हे विषय आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले. असे शिक्षक विद्यार्थीप्रिय असतातच. बाईही होत्या.
यास्मिन शेख नावाच्या बाई भाषाशास्त्र व मराठी व्याकरण शिकवतात, याचं अनेक मुलांना आधी कुतूहल व आश्चर्य वाटे. पण जेव्हा त्यांचं शिकवणं ते अनुभवत, तेव्हा ते बाईंच्या प्रेमात पडत. परिचयानंतर त्या मूळच्या ज्यू आहेत, हे समजे तेव्हा तर त्यांना अजूनच आश्चर्य वाटे. पण बाईंनी आपण कुठून कुठे पोचलो, निधर्मी कसे झालो, मानवतावाद हाच कसा एकमेव श्रेष्ठ धर्म आहे, याचाही कधी बाऊ केला नाही. त्या तशा आहेतच, यात काहीच शंका नाही, पण या गोष्टीची टिमकी वाजवणं त्यांच्या स्वभावात नाही. गुलाबाच्या फुलासारख्या त्या, त्यांचा दृष्टीकोन निर्मळ, निर्मम आहे. तो त्यांनी आजवर तसाच राहू दिला. त्याची त्यांनी विशेषत्वानं जपणूक केली आहे. त्यामुळे बाई आपल्या शिक्षक होत्या, याचा सार्थ अभिमान त्यांचे अनेक विद्यार्थी बाळगून आहेत.
त्यांचं कुटुंब भारतीत्वाचं नितांतसुंदर उदाहरण आहे. बाईंचा विवाह प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या पुढाकारानं झाला. त्यांचे वडील नाशिकला स्थायिक झाल्यानंतर त्यांचा कानेटकरांशी संपर्क आला. त्यातून अझीझ अहमद शेख यांच्याशी त्यांचा परिचय व पुढे लग्न झालं. त्यांचं सहजीवन आदर्शवत म्हणावं असं राहिलं. पुढे त्यांच्या शमा व रुकसाना या दोन्ही मुलींनी वेगळ्या जातीतील मुलांशी लग्न केली. त्यांच्या नातवांनी अजून वेगळ्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात ज्यू, मुस्लीम, सिंधी, ब्राह्मण असा सुंदर योग घडून आला आहे.
असो. बाईंच्या वैयक्तिक माहितीपेक्षा त्यांच्या मराठी व्याकरणाविषयीच्या कामाविषयी जाणून घेणं अधिक श्रेयस्कर ठरेल. बाई व्याकरणशुद्ध मराठी भाषेच्या आग्रही आहेत. प्रमाणभाषा व बोलीभाषा यांत फरक केला पाहिजे आणि त्यानुसार त्या त्या जागी त्याप्रमाणे भाषा वापरली पाहिजे, असं त्या सांगतात. त्या स्वत: तसं आचरतात. प्रसारमाध्यमं, साहित्यिक, शिक्षणसंस्था या ठिकाणी एकच प्रमाणभाषा वापरली गेली पाहिजे, असं त्यांना वाटतं. नपेक्षा भाषिक अनागोंदी माजू शकते, असं त्यांचं म्हणणं असतं. तशी भाषिक अनागोंदी अलीकडच्या काळात माजलेली आहेच. त्यापुढे एकट्यादुकट्या माणसाचं बळ अपुरंच पडतं, पडणार हेही त्या जाणून आहेत.
बाई मराठी व्याकरणाविषयी आग्रही असल्या तरी त्या दुराग्रही अजिबात नाहीत. हटवादीपणा तर त्यांच्याकडे औषधापुरताही नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाने बनवलेले व राज्य सरकारने मान्य केलेले सध्याचे मराठी व्याकरणाचे नियम बदलायलाही त्यांची हरकत नाही. त्या नियमांत अधिकृतपणे बदल केला जावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. कारण पहिले १४ नियम १९६२ साली तयार केले गेले. नंतर १९७४ साली अजून आठ नियमांची त्यात भर घातली गेली. बदलत्या काळानुसार त्यात विशेषत: ऱ्हस्व-दीर्घाबाबतच्या नियमांमध्ये बदल करायला हवेत, असं त्यांनाही वाटतं. उच्चारानुसार लेखन करण्याला मर्यादा आहेत, त्याचे काटेकोर नियम करता येत नाहीत. चांगले मराठी शब्द असताना विनाकारण इंग्रजी शब्द वापरू नयेत, असा त्यांचा आग्रह असतो. हिंदी-इंग्रजीच्या प्रभावामुळे हल्ली मराठी भाषा प्रदूषित होत चालली आहे, याविषयी त्या खंत व्यक्त करतात. या भाषांमधून शब्द स्वीकारू नयेत, असं त्यांचं म्हणणं नसतं. पण या भाषांसारखी मराठी वाक्यरचना पाहून त्या खंतावतात. त्यामुळे त्या मातृभाषेतून शिक्षण याचा पुरस्कार करतात.
बाई निष्ठावान शिक्षक होत्या. त्यांच्या ऋजु व्यक्तिमत्त्वामध्ये त्या अर्थाने बंडखोरी नाही. त्यामुळे त्यांनी मराठी व्याकरणाचा आपल्यापरीनं प्रसार-प्रचार करण्यासाठी १९९७ साली ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे पुस्तक लिहिलं. राज्य मराठी विकास संस्थेनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक मराठी व्याकरणाविषयीचं एक अधिकृत पुस्तक मानलं जातं. या पुस्तकाच्या प्रती बाईंनी स्वत: विकत घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना भेट दिल्या आहेत. या पुस्तकाची १९९९मध्ये दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. पण एवढ्यावर बाईंचे समाधान झालं नाही. त्यांनी २००७मध्ये ‘मराठी शब्दलेखनकोश’ तयार केला. मराठी शब्दांचं योग्य रूप कोणतं, याची माहिती देणारा हा कोश मराठी भाषेचे अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमी अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या झाल्या असून तिसरी सुधारित आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. (त्याविषयीचा प्रा. रा. ग. जाधव यांचा लेख ‘अक्षरनामा’वर आजच प्रकाशित केला आहे.) व्याकरणशुद्ध मराठी लेखन कसं करावं, याचं अतिशय उत्तम मागदर्शन करणारा हा कोश आहे.
‘१०० टक्के सुहृद’ असा शब्दप्रयोग हल्ली वापरला जात नाही. त्याचं एक कारण हा शब्दप्रयोग वापरावा अशा व्यक्तीही आपल्याला अवतीभवती दिसत नाहीत. पण हा शब्दप्रयोग वापरायचाच झाला तर तो बाईंबद्दल नि:संशयपणे वापरता येईल. मराठी व्याकरणाविषयीची, शब्दाचा शुद्ध रूपाविषयीची अडचण तुम्ही त्यांना कधीही फोन करून विचारू शकता. बाई हातातलं काम बाजूला ठेवून तुमचं शंकानिरसन करतात. कितीही कामात असल्या तरी त्या कधीही कुणालाही निराश करत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार आणि परदेशातले मराठी भाषेचे अभ्यासक त्यांच्याकडून वेळोवेळी आपलं शंकानिरसन करून घेत असतात.
बाईंचं अजून एक वैशिष्ट्य आहे. त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही. श्री.पु.भागवतांशी त्यांचा अनेक वर्षं अतिशय घरोबा होता. पण त्यांनी कधीही त्याचा डिंडिम मिरवला नाही की, त्याची फारशी कुठे वाच्यता केली नाही.
.............................................................................................................................................
हेही पहा\वाचा : ‘मराठी शब्दलेखनकोश’ : सर्वांना उपयुक्त कोशग्रंथ
.............................................................................................................................................
लग्नानंतर त्या यास्मिन शेख झाल्या. निवृत्तीनंतर पुण्यात आल्या. ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अंतर्नाद’ या वाङमयीन मासिकाच्या त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ‘व्याकरण सल्लागार’ आहेत. ‘अंतर्नाद’ची मुद्रितं त्या अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही तपासतात. त्या ‘अंतर्नाद’च्या केवळ मुद्रित तपासनीस नाहीत, तर ‘व्याकरण-सल्लागार’ आहेत. आजवर मराठीमध्ये इतकी वाङमयीन नियतकालिकं प्रकाशित झाली, होत आहेत, पण कुठल्याही नियतकालिकानं असं स्वतंत्र पद निर्माण केलं नव्हतं. ते बाईंसाठी ‘अंतर्नाद’ने निर्माण केलं. या मासिकाचे अंक वाचताना ते हे पद किती समर्थपणे निभावत आहेत, याचा प्रत्यय येत राहतो.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Chandrahas Mirasdar
Sat , 19 June 2021
प्रा . शेख यांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का ? पंढरपूरच्या ज्या शाळेत त्या शिकल्या तेथील मंडळींना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे
Ram Jagtap
Wed , 11 January 2017
पहिला उल्लेख हा फक्त त्या जन्माने ज्यू असल्याचा आहे, त्यांचा जन्म पॅलेस्टाईनमध्ये झालेला नाही. तो नाशिकमध्येच झाला आहे.
Sachin Gaikwad
Wed , 11 January 2017
आपल्या लेखात बाईंचा जन्म दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं लिहिल्या गेलंय. लेखाच्या दुसऱ्या उताऱ्यात बाईंचा जन्म पॅलेस्टाइनमधला असल्याचं लिहीण्यात आलंयं तर पाचव्या उताऱ्यात त्यांचा जन्म नाशिकचा असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. कृपया तपासून योग्य ते एकच जन्मस्थळ द्यावे.