उरी आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर...
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
प्रकाश बुरटे
  • उरीमधील हल्ल्याचे एक छायाचित्र
  • Sun , 23 October 2016
  • प्रकाश बुरटे उरी सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तान Prakash Burate Surgical Strike Pakistan

गेल्या दोन महिन्यात काश्मीरप्रश्नाने उचल खाल्ली होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान संपूर्ण काश्मीरवर हक्क सांगत आहेत. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची संधी तयार करण्यासाठीही उरी हल्ला कदाचित झाला असावा. भारत-पाक तणाव वाढत आहेत. परस्पर चर्चां अशक्य झाल्या आहेत. तणावाचं युद्धात रूपांतर होणं आणि दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं असल्यानं युद्धाची अणुयुद्धात परिणती होणं अशक्य नाही. दोन्हीकडील प्रसारमाध्यमं भडक भाषा वापरून तसं जनमत बनवू लागली आहेत.

१८ सप्टेंबर रोजी पहाटेपहाटे काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी गावाजवळील तळावर पाकिस्तानातील दहशतवादी गटानं हल्ला केला. त्यात अठरा सैनिक ठार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध करताना ‘हल्लेखोर मोकाट सुटणार नाहीत’ याची ग्वाही ट्विटरवरून लगेचच दिली. त्यानंतर मोदींनी २५ सप्टेंबर रोजी ‘मन कि बात’मध्ये केलेलं भाषण मात्र देशाच्या प्रगल्भ नेत्याला शोभणारं होतं. त्यात त्यांनी उरी हल्ल्यात मारले गेलेल्या सैनिकांप्रती दु;ख व्यक्त केलं आणि युद्धच करायचं तर ते दोन्ही देशांनी मिळून करायचा सल्ला दिला. तसंच, हे युद्ध दारिद्र्य आणि अशिक्षिततेविरुद्ध पुकारावं, असं आवाहन केलं. हे युद्ध दोन्ही देश एकाच वेळी जिंकू शकतात, असंही ते म्हणाले. मोदींचे हे वक्तव्य शत्रूच्या विनाशाऐवजी ‘शत्रूबुद्धी विनाशाय’ या सायंप्रार्थनेशी सुसंगत होतं. ‘पाकिस्तानी शासन तसं न करता भारताविरुद्ध युद्ध करून स्वतःच्या जनतेचं नुकसान करून घेत आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाची भाषा आणि युद्धंदेखील कधी कधी शासकांच्या तात्कालिक हिताची असू शकतात आणि युद्धचे ढग जमा होणं, ही तर नेहमीच देशी-विदेशी शस्त्रनिर्मात्यांसाठी पर्वणी असते. परंतु युद्धं ही नेहमीच जनतेच्या अहिताची असतात. तणावग्रस्त वातावरणात शासन आणि जनता यांच्या हित-अहितातील भेद ओळखून त्याला आवाहन करणं, ही खूण नेहमीच राजकीय परिपक्वतेची ठरते. तीच परिपक्वता या भाषणात दिसते, पण भारताचा व्यवहार मात्र नेमका उलट्या दिशेनं झाला आहे.

२९ सप्टेंबर रोजी ‘मन कि बात’ मनातच राहिली आणि ‘हल्लेखोर मोकाट सुटणार नाहीत’ या पंतप्रधानांच्या आधीच्या ‘ग्वाही’प्रमाणे भारतीय सेनेनं पाक हद्दीत घुसून शल्यक्रियात्मक किंवा लक्ष्यनिर्धारित हल्ला (‘surgical strike’) केला. surgery या इंग्रजी शब्दाचा अर्थ रोग पसरू नये म्हणून शरीरातील केवळ बाधित भाग सुरक्षितपणे काढून टाकणे असा आहे. ‘लक्ष्यनिर्धारित’ किंवा ‘शल्यक्रियात्मक’ हल्ला समजण्यासाठी पाकिस्तानातील अबोटाबादेत उतरून ओसामा बिन लादेन यांना ठार करण्याची कृती आठवून पहावी. लादेनला अमेरिकेनंच शस्त्रास्त्रं आणि पैसे देऊन मोठं केलं असलं, तरी तो जुना इतिहास विस्मरणात गेला होता. लादेनची नवी जागतिक ओळख ही दहशतवादी गटाचा म्होरक्या अशीच होती. गुप्ततेपायी हल्ल्याचं लक्ष्य आधी जाहीर केलं नसलं, तरी अमेरिकेनं केलेली कृती ‘लक्ष्यनिर्धारित’ होती, असं म्हणता येतं. यावर पाकिस्तानलादेखील ब्र काढता आला नाही.

वरील तुलनेच्या संदर्भात उरीला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्याचा विचार आपण केला पाहिजे. त्या हल्ल्यात ३५-४० दहशतवादी व्यक्ती ठार केल्याचा भारतीय दावा आहे. यावर जगाचा विश्वास बसणं अवघड आहे. याचं कारण ठार केलेल्या माणसांच्याऐवजी भारताचं लक्ष्य जर मुंबई बॉम्बहल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम किंवा १९९९ च्या डिसेंबर महिन्यात काठमांडू-नवी दिल्ली विमान हायजॅक करणारे आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी नाईलाजानं व नामुष्कीनंही परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग यांनी स्वतः ज्या तीन दहशतवादी हल्लेखोरांना कंदाहारला पोहोचवलं, त्यापैकी आज जिवंत असणारे कोणी अथवा हाफिज सईद लक्ष्य असता, तर ते जगाला पटलं असतं. परंतु भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचं यापैकी कोणीही लक्ष्य नसावं किंवा असलं तर ते मुळीच साध्य झालं नाही. भारतीय हल्ल्यात जी ३५-४० पाकिस्तानी माणसं ठार झाली, त्यांची नावं दहशतवादी म्हणून जगाला माहीत असती, तर ती आपण खचितच प्रसिद्ध केली असती. तसंही आपण केलं नाही. केवळ स्वतःचंच कौतुक करत बसलो. तेही देशातल्या देशात. मराठी वर्तमानपत्रांतील या हल्ल्याच्या बातम्या (आणि बहुधा इतर प्रादेशिक भाषांतीलदेखील) इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा जास्त भडक होत्या. उदाहरणार्थ, ३० सप्टेंबरच्या मराठी वृत्तपत्रांतील काही बातम्यांच्या शीर्षकांचे हे काही नमुने पाहावेत: ‘सीमोल्लंघन! पाकमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त’, ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून...’, ‘देशाची इच्छा लष्कराने पूर्ण केली’, ‘असुर मर्दन’, ‘प्रत्येक भारतीयाने लष्कराला दिली सलामी’, इत्यादी. त्यानंतरचा पहिला रविवार गांधीजयंती (२ ऑक्टोबर) दिवशी आला. दरम्यान काही दिवस गेले असल्याने राग किंवा उन्माद शांत होण्यासाठी दहा अंक मनात दहादा मोजता आले असते. तसं फारसं कोणी न केल्याने शांत मनानं विचार करणारे लेख कमीच होते. उदाहरणांसाठी गांधीजयंती दिवशी प्रसिद्ध झालेले मराठी वृत्तपत्रांतील काही बेहोशी आणणाऱ्या लेखांचे मथळे पाहू या. ‘जशास तसे!’, ‘लष्कराची कौतुकास्पद कामगिरी’, ‘पाकिस्तानची चौफेर कोंडी!’ खरंच कोंडी झाली तर तो देश सूडबुद्धीनं वागू शकेल, हा विचार कुणा लेखकाच्या मनाला शिवलादेखील नाही. त्याच दरम्यान ‘तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडल्याचा मोठा फटका गुरुवारी ठाणे, मुंब्रा’ या भागाला बसला. ही बातमी ‘चौफेर कोंडी’ अशाच शीर्षकाखाली होती. अशा कोंडीची आम्हाला फारशी पर्वा नाही; पाकची कोंडी केल्याचा आनंद जास्त मोठा!!

‘पाकिस्तानची अवस्था भूल दिलेल्या रुग्णासारखी’ हे आपल्या संरक्षण मंत्र्यांचे उद्गार माध्यमांनी संपादकीय संस्कार न करताच छापले. त्याच वेळी पाकिस्तानी प्रसारमाध्यमं मात्र ‘भारताने नियंत्रण रेषा ओलांडून केलेले लक्ष्याधारित हल्ले म्हणजे निव्वळ नाटक आहे’, अशा बातम्या देत होती. प्रत्येक देशातील ‘स्वतंत्र’ माध्यमं त्या त्या देशाला चिथावणी देणाऱ्या आणि नेत्याला आवडणाऱ्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध करत असतात, हेच यावरून दिसतं. अशा वेळी सत्य कळणं दुरापास्त होतं. २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या तर साध्या चर्चादेखील युद्धाच्या पावित्र्यात घडवतात. त्याला स्मरून जणू जनतेनं बेहोष होऊन ताळतंत्र सोडावं अशा हेतूनेच वृत्तवाहिन्या बातम्या देत होती. सुष्ट-दुष्ट माणसं एकदिलानं बेहोषी किंवा दुसऱ्या शब्दांत ‘देशप्रेमाची निशाणी’ नाचवत, मिरवत होती. या बेहोशीच्या काळात पाकिस्तानी सिनेकलावंतांना हुसकून लावण्याची आणि भारतातील जन्मानं मुस्लीम सिनेकलावंतांना अपमानित करण्याची भाषा मोदींनी केरळात केलेल्या भाषणाच्या विरोधी सूर नव्यानं गिरविणारी होती.

जमिनीवरचा पट मात्र एकदम वेगळा होता. पाकिस्तानचा प्रतीहल्ला झाल्यास जीवित हानी कमी व्हावी म्हणून सीमा भागांतील शेकडो गावं रिकामी केली गेली. या बेहोशीत याची फारशी तमा कोणाला जाणवली नसावी. गुप्ततेच्या गरजेपायी गावं रिकामी करण्याची कारणं गावकऱ्यांना दिली असणं अशक्य आहे. परंतु सीमेपलीकडून गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांना मात्र गावं रिकामी होत असल्याचा अंदाज आला नसेल, असं मानणं भाबडेपणाचं ठरतं. अशा प्रकारे परागंदा होणं या गावकऱ्यांना किती कष्टाचं गेलं असेल, याची कल्पना स्वतःवर अशी पाळी आली तरच करता येऊ शकते. सक्तीने ‘देशसेवा’ लादलेल्या या सीमेलगतच्या गावकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांना आलेल्या अडचणींची सविस्तर दखल कोण्या वाहिनीनं अथवा वर्तमानपत्रानं घेतली नाही. भारताला सरहद्द ओलांडून लष्करी कारवाई नाईलाजानं करावी लागत आहे, या भावनेचा तर त्या बेहोशीत लवलेश नव्हता.

भारताने १९९८ सालच्या मे महिन्यात अण्वस्त्र चाचण्या केल्या, तेव्हाही असाच उन्माद जनतेनं व्यक्त केला होता. किरणोत्सारी राखेचं भस्म कपाळावर लेपून मिरवणुका काढण्याची काहींची मनीषा होती. थोड्याच दिवसात पाकिस्ताननंदेखील अणवस्त्र चाचण्या केल्यावर उन्माद हवेत विरून गेला होता. दोन्ही राष्ट्रं आता अण्वस्त्रधारी बनली आहेत. समजा आता भारतानं सिंधू नदी पाणीवाटप करार मोडून पाकिस्तानचं पाणी तोडलं, सार्क परिषदेतून अनेक देशांनी बाहेर पडून पाकला एकटं पाडलं, अमेरिका, चीन, रशिया या सर्व देशांनी पाठ फिरवून पाकिस्तानला युनोमध्ये समजा एकटं पाडलं, तर पाकिस्तान काय करेल असा आपला अंदाज आहे? शत्रू हा आपला मित्र नसल्याने त्याची पुढची चाल आपल्या अपेक्षेत बसणारी असू शकत नाही; तसंच शत्रू देश आपल्या कृतीचा अर्थ मित्राप्रमाणे मुळीच लावणार नाही, हे लक्षात घेऊनच आपण अंदाज केला पाहिजे. पाकिस्तानी सरकारला जाणवेल अशी खऱ्या अर्थानं चाहुबाजूने कोंडी झाली, तर पाकिस्तानकडे काही शेवटचा उपाय आहे का? शेवटचा उपाय नसेल, तर तो देश स्वतःचा नाश शांतपणे पाहत बसेल; परंतु जर अखेरचा काही उपाय असेल तर...?

आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे प्रत्येकी शंभर ते सव्वाशे अण्वस्त्रं आहेत. मुंबई, कराची, इस्लामाबाद-लाहोर, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद... या आजच्या महानगरांची वस्ती १९४६ सालातील हिरोशिमापेक्षा बरीच जास्त आणि तुलनेनं खूप दाट आहे. परिणामी दोन्ही देशांकडील अणुबॉम्ब समजा केवळ हिरोशिमा अणुबॉम्बच्याच ताकदीचे असले, तरीही दोन ते तीन बॉम्बच्या मदतीनं यातील प्रत्येक शहर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. भारत-पाक युद्धात जर दोन्ही बाजूंनी शंभर-सव्वाशे अणुबॉम्ब वापरले, तर काही कोटी माणसं मृत्युमुखी पडतील, कसलीही वाहतूक अशक्य होईल, संपर्कमाध्यमं थंड पडतील. उर्वरित भाजलेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स आणि इस्पितळे नसतील. अशी आततायी कृती थांबवण्याची धमक आणि उसंत अमेरिका, रशिया यांना सध्या असेल असं वाटत नाही.

पाकिस्तानी आणि भारतीय प्रसारमाध्यमं सध्यादेखील बेहोषी वाढवतच आहेत. भविष्यात वेगळं काही घडण्याची शक्यता नाही. जनक्षोभाच्या दबावाखाली कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, अशी हमी देणं कठीण आहे. जोडीला दोन्ही देशांत दहशतवादी गट आहेतच. परिस्थिती अशी आहे की, ‘अण्वस्त्रांचा धोका वास्तवात येणार नाही’, असं आता फक्त निरागस बालकच म्हणू शकेल. या दोन्ही देशांतील जनतेनं दंगली आणि दहशतवादी कारवाया अनुभवल्या आहेत, सीमेवरील चकमकी बहुतांश जनतेनं वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांवरून अनुभवल्या आहेत, काही गावांतील लोकांनी भूकंप अनुभवले आहेत. या संकटांनुभवी मंडळींना त्या आणि त्यापेक्षा गंभीर अनुभवांची पुनरावृत्ती नको आहे. असं असूनही पायावरून वळवळत झुरळ गेल्यावरदेखील किंचाळणारी माणसं ‘अणुबॉम्बला घाबरून किती दिवस गप्प राहायचं?’ असं विचारतात, तेव्हा त्यांच्या देशाची किव येते.  तो देश पाकिस्तान असेल किंवा भारत, तेथील जनतेला संकटात लोटणाऱ्या उन्मादी प्रवृत्तींची सामान्यांना धास्ती वाटते.

अशा वेळी पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच्या नेत्यांकडून प्रगल्भ राजकीय कृतींची अपेक्षा करणं आणि तसा त्यांच्यावर दबाव टाकणं हाच एक मार्ग आहे. तोच मार्ग भारतीय जनतेनंदेखील आपलासा केला पाहिजे. त्यात स्वतःच्या देशाचं आणि जगाचंही हित आहे. पाकिस्तान तसा मार्ग वापरणार नाही, अशी आपली भावना असली, तरीही आपण यश येईपर्यंत तो मार्ग पाकिस्ताननं वापरावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याचं एक साधंसं कारण आहे. ते म्हणजे आपण भारतीय आहोत, आपल्याला समाजबांधवांची काळजी आहे आणि मुख्य म्हणजे युद्धांनी प्रश्न सुटत नसतात, उलट युद्ध हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे, याबाबत आपली खात्री आहे. तसेच, शत्रुबुद्धीचा विनाश होवो, अशी आपली सायंप्रार्थना आणि इच्छा आहे. थोडक्यात, तगडा आशावाद मनात बाळगून काश्मीरसह सर्व प्रश्नांसाठी चर्चेचा सुसंस्कृत मार्ग शोधणं आणि वापरणंच योग्य व आवश्यक आहे, हे आपण आपल्या नेत्यांना ठामपणे सतत सांगत राहिलं पाहिजे.

 

लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

 prakashburte123@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......