२०१४च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांतून आणि भाजपकडून सरदार वल्लभभाई पटेल यांचा वापर गांधी-नेहरू यांना लक्ष्य करण्यासाठी केला जायचा. सत्तेत आल्यानंतर भाजपकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वापर गांधी-नेहरूंच्या प्रतिमा हनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला गेला. महात्मा गांधी यांना लक्ष्य करणारा बराच मजकूर मागच्या सहा वर्षांपासून उजव्या विचारसरणीकडून सोशल मीडियावर प्रसृत करण्यात येत आहे.
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या गांधी चरित्रात दिली आहे. डाव्या व पुरोगामी विचारांचे सुभाषचंद्र बोस यांचे पटेलांशी फार चांगले संबंध नव्हते. पुढे अनेक कारणांनी तणाव तयार होऊन ते अत्यंत खराब अवस्थेत गेले. १९३३मध्ये पटेलांचे थोरले बंधू विठ्ठलभाई हे गंभीर आजारी व मरणासन्न अवस्थेत असताना त्यांची सुभाषबाबूंनी खूप सेवासुश्रुषा केली. त्यामुळे प्रभावित होऊन विठ्ठलभाई यांनी मृत्यूपत्रात आपल्या संपत्तीचा तीन चतुर्थांश (७५ टक्के) भाग बोस यांच्या नावे करून टाकला. त्यात ‘या संपत्तीचा वापर भारताच्या हितासाठी इतर देशांमध्ये प्रचार-प्रसार करण्यात खर्च करण्यात यावा’ अशी अटदेखील टाकली गेली. पटेलांनी या मृत्यूपत्राच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित केली. डॉक्टरांनी साक्षंकित का केले नाही?, मूळ कागदपत्रे संरक्षित आहेत का?, सर्व साक्षीदार बंगालीच का? जिनिव्हा इथं विठ्ठलभाईंचं निधन झालं, तिथं उपस्थित स्वातंत्र्यसैनिक किंवा काँग्रेस नेत्यांची सही का नाही? सही खरी कशावरून? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. वर्षभर चाललेल्या कायदेशीर लढ्यानंतर शेवटी न्यायालयाने ही संपत्ती नातेवाईकांच्या हवाली केली. त्यासाठी विठ्ठलभाई स्मृती ट्रस्ट बनवण्यात आला.
भारताला राजकीय, व्यक्तिगत किंवा वैचारिक दृष्टीने मुक्त करण्याची इच्छा हा समान दुवा सोडला तर बोस आणि पटेल यांच्या विचारांत जुळण्यासारखे काहीच नव्हते. १९२८ साली कलकत्त्यात काँग्रेसचं अधिवेशन भरवण्यात आलं. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारताला अधिराज्य दर्जा (डोमिनियन स्टेट्स) देण्याचा ठराव मांडला. तिथे मिलिटरी स्टाइलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी २००० स्वयंसेवकांच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’ची व्यवस्था केली होती. त्यातले हजार स्वयंसेवक सैनिकी गणवेश घालून होते. कलकत्त्यात ब्रिटिश सैनिकांचे कपडे शिवणार्या ‘हरमन्स’ फर्मकडून स्वतः बोस यांनी वरिष्ठ सैन्य अधिकार्यासारखा गणवेश शिवून घेतला होता. स्वतःसाठी फील्ड मार्शलची छडी (बॅटन) बनवून घेतली होती. साधेपणाने जगणार्या गांधींना मात्र हे सर्व विचित्र वाटल्याने त्यांनी याला ‘बेट्रम मिल्सची सर्कस’ (ब्रिटेनची त्या वेळची सुप्रसिद्ध सर्कस कंपनी) असं नाव दिलं.
राजमोहन गांधी यांनी पटेल यांच्या चरित्रात लिहिलं आहे, “त्यांना (वल्लभ भाई) सुभाषच्या कार्यक्षमतेवरच शंका होती. शिवाय ते सुभाषसोबत पूर्णपणे असमत होते. १९३७ साली काँग्रेसची निवडून आलेली सरकारे राहावी असे पटेल यांचे मत होते, पण बोस यांनी सरकारशी युद्ध पुकारण्याची भूमिका घेतली होती. हे पटेल यांना अमान्य होते. दुसरा एक महत्त्वाचा फरक गांधीजींना घेऊन होता. सुभाषचंद्र यांच्या नजरेत त्या वेळी गांधींच्या मतांना एका मर्यादेपलीकडे महत्त्व नव्हतं, पण पटेल यांच्यासाठी गांधी पूर्णपणे आवश्यक होते.”
पाच वर्षांनी हरिपुरा येथे १९३८ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी महात्मा गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अध्यक्ष म्हणून प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्यावर पटेलांनी तीव्र नापसंती व विरोध दर्शवला, परंतु गांधीजी बोस यांच्या नावावर ठाम राहिले. त्यामुळे बोस हे अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकले. मात्र अध्यक्ष म्हणून निवडले गेल्यानंतर बोस यांनी ५१ बैलगाड्यांवर स्वागत करत असलेल्या केशरी साडी घातलेल्या ५१ महिला स्वयंसेविका ५१ प्रवेशद्वारांतून ५१ ब्रास बॅंडच्या ताफ्यात निघतील, अशी राजाच्या स्वागतासाठी केली जाते, तशी जंगी व्यवस्था केली होती.
पुढच्या वर्षी पुन्हा १९३९ साली बोस यांच्या निवडणूक लढवण्याला पटेल यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी सार्वजनिकपणे चेतावणी दिली की, ‘बोस जर निवडून आले तर आम्ही त्यांची धोरणं व्हेटोने (नकाराधिकार) हाणून पाडू. गरज पडली तर कार्यकारी समितीद्वारे (पटेल समर्थकांकडून) व्हेटोचा वापर करू.’ बोस पुन्हा निवडणूक जिंकून काँग्रेसचे नेतृत्व करतील अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा पटेल यांना वाईट वाटून त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिले की, ‘मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, ते (सुभाष) पुन्हा निवडणुकीसाठी अशा प्रकारच्या गलिच्छ तंत्रांवर उतरतील.’ सुगाता बोस त्यांच्या ‘हिज मेजेस्टी ऑप्शनंट’ या पुस्तकात लिहितात- पटेल यांचे म्हणणे होते की, सुभाषांचे पुनरुत्थान ‘देशहितासाठी हानिकारक’ असेल. यावर प्रत्युत्तर देताना बोस यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी पेटल ‘नैतिक बंधन’ वापरत असल्याचा आरोप केला.
गांधीजींनी उच्चवर्णीय असल्याने बोस यांना राष्ट्रीय अध्यक्ष होऊ दिले नाही, ही माहिती पूर्ण खोटी आहे. २९ जानेवारी १९३९च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरू यांनी भाग घेतला नाही, मौलाना आझाद यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि आंध्र प्रदेशचे गांधीवादी नेते डॉ. पट्टाभि सितरामय्या यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीच्या वेळी बोस यांच्या विरोधात गांधींपेक्षा काँग्रेसमधले सनातनी व हिंदुत्ववादी विचारसरणीकडे कल असलेले नेते जास्त होते. पटेल टीका करण्यात त्यांच्या बाजूने तितकेच निर्मम होते. बोसनी त्यांना ‘गैरलोकशाहीवादी’ म्हणून संबोधले, तेव्हा ते रागाने म्हणाले, ‘जंगलात सिंह जन्माद्वारे राजा बनतो, निवडणुकीत नाही.’
१९३९मध्ये काँग्रेसच्या अंतर्गत संघर्ष वेगळ्या पातळीवर गेला होता. इथे महात्मा गांधींचा विरोध सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांच्या हिंसक मार्गांचा वापर करून ब्रिटिशांशी लढा देण्याच्या विचारांशी होता. हा विरोध पूर्णतः तात्त्विक होता, गांधींकडून तसा विरोध असणं, हा त्यांचा अधिकार म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.
पटेल आणि गांधी यांच्याविरोधी असूनही बोसनी १९३९च्या काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा जिंकली व पट्टाभी सितारामय्यांना पराभूत केलं. पटेलांनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिलं, ‘सुभाषबरोबर काम करणं आपल्यासाठी अशक्य आहे.’ गांधी-पटेल गटाने बोस यांच्या अध्यक्षीय अधिकारांना कमजोर करण्याचे काम केलं, त्यामुळे हताश होऊन बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पटेल यांचे विश्वासू राजेंद्र प्रसाद यांची हंगामी अध्यक्ष म्हणून वर्णी लावण्यात आली. बोस यांचा कट्टर विरोध पटेल यांना होता. परंतु गांधींबाबत ते तितके कठोर नव्हते. बोस यांचे भाऊ शरत् यांनी पटेलांवर आरोप केला की, त्यांनी सुभाषचंद्रच्या विरोधात ‘स्वार्थी, द्वेषपूर्ण आणि प्रतिशोधी’ प्रचार युद्ध चालवलं.
बोस यांच्या पराभवासाठी गोविंद वल्लभ पंत यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊन पटेल व पंत यांनी शर्थीचे प्रयत्न करून पाहिले. त्या निवडणुकीत बोस यांना १५८० मतं आणि सितारामय्या यांना १३७७ मतं मिळाली. फक्त २०३ मतांच्या फरकाने बोस जिंकले. नेहरू यांचंदेखील बोस यांना सुप्त समर्थन होतं. गांधींना हा पराजय जिव्हारी लागल्याने त्यांनी ‘सितारामय्या यांचा पराजय म्हणजे माझा पराजय’ असल्याचं मत व्यक्त केलं. पुढे अंतर्गत राजकारणातून व मतभेदांतून खिन्न होऊन बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महात्मा गांधी यांच्या मतभेदापेक्षा बोस यांचे प्रखर विरोधक काँग्रेसचे सरदार पटेल, जी. डी. बिर्ला, गोविंद वल्लभ पंत, राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद हे होते. गांधी यांना लक्ष्य करत असताना यांचं आज कोणी नावंदेखील घेत नाही. बोस देशात तुफान लोकप्रिय होते, नेहरूही होते; परंतु गांधींविरोधात बंड पुकारून निर्णय घेण्याची धमक फक्त बोस यांच्यामध्ये होती.
गांधींचा विरोध जर डाव्या विचारांना असता तर त्यांनी नेहरूंचा विरोधदेखील केला असता, कारण नेहरू उघड समाजवादी विचारांचे होते आणि देशाच्या क्रांतिकारक आंदोलनांचे जाहीर समर्थक होते. पण बोस यांचा मार्ग हिंसेचा असल्याने त्यांच्याशी नेहरू-गांधी यांचे स्वाभाविक मतभेद होते. शहिद भगतसिंग यांनी १९२८ साली लिहिलेल्या ‘नये नेताओं के अलग अलग विचार’ या लेखात काँग्रेसच्या या तरुण तुर्क नेत्यांचे विविध मतभेद व वैचारिक कल यांचा आढावा घेतला आहे. पटेल आणि बोस या दोघांच्या राजकीय मतभेदांच्या पलीकडे त्यांच्यात वैचारिक मतभेदही भरपूर होते. बोस समाजवादी नियोजनाचे समर्थक होते, तर पटेल खाजगी उपक्रमांबद्दल अधिक सहानुभूतीशील होते. हिंदू-मुस्लीम सद्भावनेसाठी बोस पटेलांपेक्षा खूप अधिक आग्रही व कटिबद्ध होते. नियोजन आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या मुद्द्यांवर बोस आणि नेहरू एकाच विचारांचे होते. गांधींशी निष्ठा आणि जर्मनी, इटली व जपान या मित्र राष्ट्रांच्या आघाडीपेक्षा ब्रिटन, संयुक्त राज्य अमेरिका, सोव्हियत संघ व चीन अधिक धोकादायक असल्याच्या मुद्द्यावर नेहरू व पटेल यांच्यात एकमत होते.
१९४०च्या सुमारास बोस यांनी काँग्रेस पक्षातच ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाने नवीन डाव्या विचारांची आघाडी बनवायची सुरुवात केली. याला नेहरूंचा विरोध नव्हता. पण हा गट मजबूत झाल्यास काँग्रेस या बलाढ्य पक्षाला हिंसात्मक, साम्राज्यवाद विरोधी व डाव्या विचारांची लागण झाली तर आपल्याला खूप जड जाईल, याची ब्रिटिशांना भीती वाटल्याने त्यांनी बोस यांना नजरकैदेत ठेवून त्यांची प्रत्येक हालचाल टिपायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने बोस यांनी भारत सोडून नंतर आझाद हिंद फौज बनवली, तो इतिहास ज्ञातच आहे.
बोस आपल्या प्रेयसीला (नंतर पत्नी) लिहिलेल्या पत्रात शल्य व्यक्त करतात की, त्यांना नेहरूंकडून पाठिंब्यापेक्षा वरचा गोष्टी अपेक्षित होत्या, ज्या त्यांच्याकडून झाल्या नाहीत. आणि लोकांचा विश्वास जिंकूनही भारताची महानतम व्यक्ती (गांधी) यांचा विश्वास जिंकू शकलो नाही. यात ते कुठेही गांधींवर आरोप करत नाही, उलट आदरयुक्त मतभेदच व्यक्त करतात. सुभाषचंद्र बोस यांचे काँग्रेस, गांधी व भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दलचे आदर व प्रेम कधीच कमी झाले नाही. वैचारिक मतभेद असूनही त्यांनी नेहमी गांधींच्या आंदोलनांना पाठिंबा दिला. याची मुळे सहिष्णू, धर्मनिरपेक्ष व उदारमतवादी कार्यपद्धतीचा मूल्यांमध्ये आहेत.
६ जुलै १९४४ रोजी सिंगापूरच्या आझाद हिंद रेडिओवरून त्यांनी देशाला संबोधित करत असताना महात्मा गांधींचे आशीर्वाद मागितले. सुभाषचंद्र बोस हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली. गांधी आणि नेहरू हे दोघे बोस यांचे मोठे प्रशंसक होते. गांधी त्यांना ‘राष्ट्रभक्तांमधला राजकुमार’ म्हणायचे. त्यांनी ‘बोस यांची देशभक्ती कोणापेक्षाही कमी नाही’ असेही अनेक वेळा म्हटले. हवाई जहाज अपघातात बोस यांच्या मृत्यूची बातमी माहीत पडल्यावर गांधींना अतीव दुःख झाले. त्यांच्या शोकसंदेशात त्यांनी ‘बोस आपल्यामध्ये त्यांनी जगासमोर उभारलेल्या आदर्श व विचारांच्या स्वरूपात नेहमी जिवंत आहेत’ असे म्हटले होते.
१९४४ साली टोकियो विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले- ‘भारताला नाझीवाद आणि साम्यवाद यांच्यामधल्या विचारधारेची गरज आहे.’ या विधानाने नेहरू आणि बोस यांच्यातले संबंध अजून दुरावले. बोस हिटलरच्या नाझीवाद आणि मुसोलिनीचा फासीवाद यातून प्रभावित होते, पण पंडित नेहरू या दोन्ही विध्वंसक विचारांचा परिणाम ओळखून होते. त्यांना हिटलर-मुसोलिनीची तीव्र चीड होती. त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, फासीवाद आणि साम्यवाद यांच्यात कुठलाच मध्यममार्ग शक्य नाही आणि नाझीवाद-फासीवाद ही भांडवलशाहीची अपरिष्कृत व क्रूरतम रूपं आहेत.
पंडित नेहरू आपल्या या महान सहकार्याला अभिवादन करताना लिहितात, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जीवन अर्पण केले. त्यासाठी त्यांनी एका बहाद्दर सैनिकाप्रमाणे सर्व अडचणींचा वीरतेने सामना केला. त्यांचं देश व स्वातंत्र्य यावर निस्सीम प्रेम होतं. मी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या काही धोरणांशी सहमत नसलो तरी त्यांनी जे काही बरोबर-चुकीचं केलं, ते सर्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं. ते आपल्यातून निघून गेले, त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक बनवलं, त्यांच्या प्रमाणिकतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांनी आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पद्धतीने लढा दिला.” आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर जेव्हा लाल किल्ल्यात खटला चालवला गेला, तेव्हा त्यांच्या बचावासाठी उभ्या असलेल्या चार वकिलांपैकी एक जवाहरलाल नेहरूदेखील होते.
एक काळ असाही आला, जेव्हा गांधी बोस यांच्या विद्रोहामुळे प्रभावित झाले होते. १९४२ साली पूर्वोत्तर भागात बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने हल्ला चढवला, त्याच वेळी गांधींनीही ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली. बोस यांनी आयएनएच्या दोन ब्रिगेड्सची नावे ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ अशी होती. पटेल यांनी मुंबई पोर्टवर सुभाषचंद्र बोस व आयएनएबाबत तस्करीच्या मार्गाने एक चित्रफीत मिळवली. त्याचे गुप्त प्रदर्शन दिल्लीच्या रिगल थिएटरमध्ये करण्यात आले. नंतर त्यात इतर काँग्रेस नेत्यांचे संदेश जोडून ती देशभरात दाखवण्यात आली. भगतसिंगच्या फाशीच्या वेळी (१९३१ सालापर्यंत) आपल्या अहिंसच्या सिद्धांतांना कवटाळून बसलेल्या गांधींचा १९४२ पर्यंत सशस्त्र संघर्षाला असलेला विरोध मावळत गेला आणि ते बोस यांच्या अहिंसक गुरिल्ला युद्धाला तात्त्विक पाठिंबा देऊ लागले. काही वर्षांनंतर १९४६मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय लष्कराचे (आयएनए) सैनिक भारतात मायदेशी परतले, तेव्हा पटेल यांनी त्यांना सहाय्य करून त्यांच्या निर्दयी वक्तव्यासाठी आंशिक सुधारणा केली. त्यांच्या वागण्यात व्यवहार्यता होती. बोस यांची प्रतिष्ठा उंचीवर होती व त्यांच्या हृदयातही होती. पटेलांनी सुभाष यांनी निर्वासित राहून जे केले त्याचे कौतुक केले.
बोस (१९२१ ते १९४० दरम्यान ११ वेळा भारताच्या वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये), जवाहरलाल नेहरू (नऊ वेळा जवळपास १० वर्ष), गांधी (आफ्रिकेत सहा वेळा आणि भारतात सात वेळा, एकूण पाच वर्ष) आणि पटेल (५ वेळा सव्वा सहा वर्षे) यांच्यापैकी प्रत्येकाने तुरुंगामध्ये अनेक वर्षे व्यतीत केली. पण १९३० ते १९४०च्या दरम्यान हिंदुत्ववाद्यांनी ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारे आव्हान दिले नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातले मतभेद आणि एकमेकांच्या त्यागाबद्दल असलेला सन्मान यावर खरं तर चर्चा झाली पाहिजे. परंतु बोस व पटेल यांचा वापर करून भाजपपुरस्कृत प्रचारसामग्रीत अत्यंत हीन पातळीवरची टीका महात्मा गांधी व नेहरू यांच्यावर केली जाते.
.............................................................................................................................................
लेखक संजय पांडे ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्रचे सदस्य आहेत.
adv.sanjaypande@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment