अजूनकाही
२७-२८ जानेवारी २०२० दरम्यान वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतिवर्षानिमित्त एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या निमित्ताने तर्कतीर्थांचा हा एक लेख पुनर्मुद्रित करत आहोत. हा लेख सर्वप्रथम ‘साधना’ साप्ताहिकाच्या १४ सप्टेंबर १९५७च्या अंकात प्रकाशित झाला होता.
.............................................................................................................................................
साधकबाधक चर्चा म्हणजे वाद होय. कोणत्याही विषयाची अनुकूल व प्रतिकूल प्रश्न उपस्थित करून चर्चा केल्याशिवाय त्यातील सत्याचा शोध करणे शक्य होत नसते. एखाद्या सिद्ध व मान्य सिद्धान्ताचा बोध होण्यासही चर्चेची गरज असते. कोणताही विचार स्पष्ट होण्याकरता त्याबद्दल उलटसुलट शंका उत्पन्न करणे आवश्यक असते. सिद्धान्त, सत्य किंवा महत्त्वाचा विचार चांगला समजण्याकरता त्या सिद्धान्ताची, सत्याची किंवा विचाराची उलट बाजूही समजावी लागते. त्रिकालाबाधित म्हणून जी सत्ये प्रसिद्ध असतात त्याबद्दलही वाद उपस्थित केल्याशिवाय त्यात मिसळलेली भ्रामक विधाने बाजूस करून ती सत्ये निवडता येत नाहीत. सत्य व अनृत हे बेमालूमपणे मिसळलेले असते, म्हणून मतभेद माजतात. समंजस व विचारी सज्जनांमध्येसुद्धा मतभेद, तीव्र मतभेद होतात, याचे कारण सत्य व अनृत हे मिसळून राहते, हे होय.
द्रष्ट, साधू, पंडित व विज्ञानसंशोधक यांच्यात मतभेद आढळतात. जगात मोठमोठ्या धर्मात विश्वाच्या अंतिम सत्याबद्दल म्हणजे ईश्वराच्या रूपाबद्दल मतभेद आहेत, म्हणून तर धर्म भिन्न किंवा परस्परविरोधी आहेत. हीच गोष्ट समाज, जीवन व इतिहास यांतील मूलभूत व जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील मतभेदास लागू पडते. न्यायालये, पंडितसभा, विधानसभा, संसद वा वैचारिक परिषदा यांचे अस्तित्व या गोष्टीचीच पुष्टी करते. मानवी विचाराची प्रगतीच मतभेदामुळे होत असते, म्हणून प्राचीन भारतीय म्हणत की, “वादे वादे जायते तत्त्वबोध:” म्हणजे नित्य वाद केल्याने तत्त्वाचा उलगडा होता जातो. प्राचीन भारतीयांच्या वादविद्येतही वादाचा तत्त्वबोध हाच मुख्य उद्देश सांगितला आहे.
भारतीय प्राचीन वादविद्या वाढीस लागण्यास प्राचीन भारतीयांच्या अनेक बुद्धिप्रधान विचारांची, दर्शनांची व भौतिक शास्त्रांची परिणती कारण झाली. धर्मतत्त्वांची मीमांसा, विश्वाच्या तत्त्वाची चर्चा, सृष्टीरचनेची तपासणी, रोग व आरोग्य यांचे संशोधन, न्यायालयांत न्यायनिर्णयाची पद्धती ठरवण्याचा प्रयत्न, भाषेचे शास्त्र म्हणजे व्याकरण अत्यंत खोलपणे मांडण्यात मिळवलेले कौशल्य इत्यादी अनेक बौद्धिक संस्कृतीच्या अंगांची वाढ होत असतां, भारतीय वादविद्येचे सिद्धान्त निष्प्रभ होऊ लागले. वादविद्या ही बौद्धिक संस्कृतीच्या विकासाचे लक्षण होय. प्राचीन भारतीयांच्या बौद्धिक संस्कृतीचा प्रारंभ उपनिषत्काली झाला. प्रश्नाचे महत्त्व त्या वेळी कळू लागले. थोरांनी सांगावे, लहानांनी मानावे, ही आज्ञाधारक प्रथा शास्त्रवाढीस उपयोगी पडत नाही, हे कळून चुकले.
लहानांनी मोठ्यांना म्हणजे जाणत्यांना प्रश्न किंवा परिप्रश्न विचारावे, अशा विचाराचा महिमा स्थापित झाला. अगदी मूलग्राही प्रश्नांचा मारा लहान माणसे मोठ्या माणसांवर म्हणजेच गुरूवर करताना उपनिषदात दिसतात. ऋषीचे शिष्य म्हणून ज्यांचा दर्जा समाजात मानला जात होता, त्या क्षत्रिय राजाकडे उलट ऋषीच सत्य समजावून घेण्याकरता जात आहेत, असा देखावा उपनिषदात दिसतो. अजातशत्रू राजापासून किंवा अश्वपति कैकेय राजापासून ऋषि तत्त्वज्ञानाचा धडा घेत आहेत, असे उपनिषदांत दृश्य दिसते. तत्त्वांची चर्चा करण्याकरता पंडितांच्या सभा भरून अहमहमिकेने वाद उपनिषत्काली होऊ लागले होते. उदा. जनक राजाने मोठमोठ्या तत्त्वदर्शी ऋषींची एक तत्त्वज्ञान परिषद भरवली, मोठा वादविवाद घडवून आणला व त्यांत याज्ञवल्क्य मुनि हे सर्वांत श्रेष्ठ वादपटू ठरले, असे बृहदारण्यक उपनिषदांत सांगितले आहे. राजे व ऋषि मोठे दीर्घकालीन यज्ञसमारंभ करत. त्यांत तत्त्वविषयक वादाकरता स्वतंत्र सभा भरवत असत, असे महाभारतावरून दिसून येते. ही वादाची परंपरा बुद्धाच्या काली उत्कर्षास पोचली. बुद्धाच्या काली धर्म, ईश्वर, नीती इत्यादींविषयी परस्परविरुद्ध मतांचे साठ संप्रदाय अस्तित्वात होते.
धर्मशास्त्र म्हणजे काय?
सत्याचा व तत्त्वाचा शोध करावयाचा व तत्त्वांबद्दल किंवा सत्याबद्दल शोध करणाऱ्यांनी एकत्र जमून वाद करून खऱ्याखोट्याचा निर्णय काढण्याचा प्रयत्न करावयाचा, अशा रीति प्राचीन भारतात रूढ झाल्यामुळे अनेक शास्त्रांची वाढ झाली. शास्त्रासंबंधी वादसभा होत. या वादसभांचे वादविषयक नियम चरकसंहितेत सांगितले आहेत. वादसभेस तद्विद्यसंभाष (परिषद) असे चरकसंहितेत म्हटले आहे. तद्विद्य म्हणजे तज्ज्ञ, त्यांची संभाषा म्हणजे वाद. मनु, याज्ञवल्क्य, नारद इत्यादिकांच्या धर्मशास्त्रातही वादांचे शास्त्र सांगितले आहे. कारण धर्म म्हणजे कायदा, कर्ज, जमीन, व्यापार, वारसा, करारमदार, राज्याचा कारभार इत्यादीसंबंधी धर्मशास्त्र किंवा रूढी यांच्याद्वारा जे नियम समाजात अमलात येत त्यासंबंधी वाद उत्पन्न होई. त्याचा निवाडा न्यायालयात होई. ही न्यायालये एक तर राजाने नेमलेली असत, किंवा गावे, नगरे व जमाती यांनी नेमलेली असत. त्यांच्यात वाद होऊन निर्णय लागे. त्याकरता लागणारे वादाचे व प्रमाणाचे नियम धर्मशास्त्रात सांगितले आहेत.
तर्कशास्त्र : वादविद्येचा गाभा
तात्पर्य, प्राचीन भारतात तत्त्वदर्शने, धर्मशास्त्रे, व्याकरण, वैद्यक इत्यादी विद्या परिणती पावू लागल्या, त्याबरोबर वादविद्याही निर्माण झाली. ही वादविद्या प्रथम अक्षपाद गौतम मुनींनी समग्र व विस्तृत स्वरूपात मांडली. वादविद्या हे एक स्वतंत्र दर्शन म्हणून मान्यता पावले. पुराणात एक श्र्लोक आहे, “गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतंजले: | व्यासस्य जैमिनेश्चापि दर्शनानि षडेव हि||” गौतम, कणाद, कपिल, पतंजलि, व्यास व जैमिनि यांची सहा दर्शने आहेत, असा या श्लोकाचा अर्थ. यांत प्रथम गौतमाच्या दर्शनाचा निर्देश केला आहे. गौतमाच्या दर्शनास न्यायदर्शन म्हणत. न्याय म्हणजे यथार्थ निर्णय किंवा यथार्थ निर्णय करण्यास उपयुक्त असे नियम. म्हणजेच वादाचे किंवा चर्चेचे नियम. यथार्थ निर्णय म्हणजे सत्याचा निर्णय किंवा ज्ञान होय. यथार्थ ज्ञानास गौतम मुनींनी प्रभा अशी संज्ञा दिली आहे व यथार्थ ज्ञानाच्या असाधारण साधनांस प्रमाण अशी संज्ञा दिली आहे. म्हणून गौतम मुनींच्या न्यायदर्शनास प्रामाण्यविद्या असे म्हणतात. योग्य पद्धतीचा वाद प्रमाणांचे समग्र व व्यवस्थित ज्ञान असल्याशिवाय करता येत नसतो. प्रमाणांची सविस्तर मांडणी गौतमाच्या न्यायदर्शनात केली आहे. प्रमाणांची म्हणजे विचार तपासण्याच्या साधनांची विद्या गौतमाची न्यायविद्या आहे. प्रमाणांच्या विद्येस तर्कशास्त्र असेही म्हणतात. वादविद्येतूनच तर्कशास्त्र उत्पन्न झाले, तर्कशास्त्र हा वादविद्येचा गाभा होय.
गौतमाचे न्यायदर्शन म्हणजेच न्यायसूत्र होय. या न्यायसूत्रांवर वात्स्यायनाचे भाष्य आहे व या भाष्यावर उद्योतकर आचार्यांची वार्त्तिक नामक टीका आहे. या दर्शनाची वाढ गेल्या शतकापर्यंत होत आली आहे. गेल्या ६०० वर्षांतील न्यायदर्शनाच्या शाखेस नवा न्याय म्हणतात. वात्स्यायनाच्या न्यायभाष्याची भाषा अत्यंत प्रसन्न आहे. वात्स्यायनाने न्यायदर्शनाच्या स्तुतीचा कौटिलीय अर्थशास्त्रांतील एक श्र्लोक उदधृत केला आहे, त्यावरून प्राचीन भारतीयांमध्ये वादविद्येची किती श्रेष्ठ प्रतिष्ठा होती, हे समजून येते. तो श्लोक असा – ‘प्रदीप: सर्वविद्यानां उपाय: सर्वकर्मणाम् | आश्रय:सर्वधर्माणां शश्वदान्वीक्षिकी मता ||’ ‘आन्वीक्षिकी’ म्हणजे वादविद्या ही सर्व विद्यांचा प्रदीप, सर्व कामांचा उपाय व सर्व धर्मांचा आधार आहे, असे मान्य झाले आहे. कौटिल्याने वादविद्येबद्दल आणखी असे म्हटले आहे की, धर्माधर्म सांगणारी वेदविद्या, संपत्ति व दारिद्रय यांच्याशी संबंध, व्यापार व उद्योग यांची विद्या किंवा बलाबलाचा वा मुत्सद्दीपणाचा विचार सांगणारी राजनीती या सर्व विद्यांची प्रमाणांनी तपासणी करून त्यांची वाढ आन्वीक्षिकी म्हणजे वादविद्या करते. ही विद्या संकटात व उत्कर्षात बुद्धीला स्थिर ठेवते. आणि ‘प्रज्ञावाक्यवैशारद्यं च करोति’ प्रज्ञा व भाषण यांत प्रावीण्य आणते.
पाखंडी विचारप्रणाली
भारतीय वादविद्येच्या नियमांचे स्वरूप केवळ सत्याच्या संशोधनास उपकारक असेच असल्यामुळे प्राचीन काळी भारतीय संस्कृतीत फार मोठे विचारस्वातंत्र्य वा मतस्वातंत्र्य नांदले. भारतात त्यामुळे चार्वाकाचे पाखंडी भौतिकवादी वा नास्तिकदर्शन, वेदांचे प्रामाण्य अमान्य करणारी किंवा ईश्वराचे अस्तित्व खंडित करणारी बौद्ध व जैन दर्शने अस्तित्वात आली, प्रसृत झाली. भारतीयांचे संस्कृतमधील दर्शनग्रंथ हे वादपद्धतीने म्हणजे पूर्वपक्षमालिका व उत्तरपक्षमालिका यांची गुंफण करून लिहिले आहेत. ईश्वर नाही, वेद प्रमाण नाहीत, आत्मा नाही, परलोक नाही, अशा प्रकारचे तर्कशुद्ध पूर्वपक्ष विस्ताराने, वेद, ईश्वर, आत्मा व अमरत्व मानणाऱ्या शबरस्वामी, कुमारिलभट्ट, शंकराचार्य, उदयनाचार्य इत्यादी भारतीय आस्तिक व सश्रद्ध आचार्यांच्या ग्रंथात मांडलेले वाचण्यास मिळतात. प्रखर व सत्यसंशोधनपर असे वादशास्त्रच मूर्तीमंत अवतरलेले सर्व भारतीय आचार्यांच्या भाष्य, वार्तिक, किंवा टीकाग्रंथांत दृष्टीस पडते. म्हणून ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ असा उदार दण्डक भारतीयांच्या गुरुशिष्यपरंपरेत प्रमाण मानलेला दिसतो. बृहस्पतीचे शिष्य चार्वाक किंवा लोकायत यांचे ग्रंथ सध्या मिळत नाहीत. नास्तिक भौतिकवाद प्राचीन जगातील सर्वसामान्य लोकांना न पचल्यामुळे त्याची अध्ययनपरंपरा बुडाली.
बौद्धांचे व जैनांचे पाखंडी ग्रंथ अजून आहेत. प्रखर बुद्धिवादाचे नमुने त्यांत सापडतात. उदा. इ. सनाच्या सातव्या शतकात धर्मकीर्ति नामक बौद्ध आचार्य होऊन गेले. त्यांचे उदगार येथे निर्दिष्ट करतो. त्यांचे व पूर्वमीमांसक महापंडित कुमारिलभट्ट यांचे मामा-भाचे असे नाते होते असे म्हणतात. धर्मकीर्तीचा ‘प्रमाण-वार्तिक’ हा ग्रंथ पंडित राहुल सांकृत्यायन यांनी प्रकाशात आणला आहे. त्यातील एक श्लोक असा आहे – “वेदप्रामाण्यं कस्यचित् कर्तृवाद: स्नाने धर्मेच्छा जातिवादावलेप: | संतापारंभ: पापहानाय चेति ध्वस्तप्रज्ञानां पंचलिंगानि जाड्ये||” वेद संपूर्ण प्रमाण मानणे किंवा विश्वाचा कोणीतरी श्रेष्ठ कर्ता आहे असे मानणे, तीर्थस्नानाने पुण्यप्राप्तीची इच्छा करणे, जातीचा अहंकार बाळगणे, पापनाशाकरिता जीवाला ताप करून घेणे, ही पाच बुद्धि नष्ट झाल्याची किंवा जडबुद्धीची लक्षणे होत.”
विचारस्वातंत्र्य कायम राहिले
असे विचारस्वातंत्र्य वादविद्येच्या प्रभावामुळे त्या काळी प्रचारात राहिले. राजेलोकही या वेळी भिन्नभिन्न विचारांच्या पंडितांच्या वादसभा भरवत. अशी गोष्ट सांगतात की, सुप्रसिद्ध मीमांसक कुमारिलभट्टांनी एका बौद्ध आचार्यापाशी वादविद्येचे व बौद्धदर्शनाचे अध्ययन गुप्तपणे, गुरूंना स्वत: वेदानुयायी आहो हे न सांगता बारा वर्षे केले. अखेर एका राजसभेत वैदिकधर्माचे समर्थक म्हणून ते प्रकट झाले व ज्या बौद्ध गुरूंपाशी अध्ययन केले, त्यांचाच पराभव केला. त्यामुळे गुरुद्रोहाचे पातक लागले. ते पातक चित्ताचा दाह करू लागले. मनाला पश्चाताप झाला. त्यांनी प्रायश्चित घेण्याचा निश्चय केला. देहान्त प्रायश्चित्ताशिवाय उपाय नव्हता. भाताचा जळता भुसा ठेवून त्यात त्यांनी देह ठेवला. अशा स्थितीत आद्य श्रीशंकराचार्यांची गाठ पडली. कुमारिलांनी बौद्धधर्माचा पराभव करण्याचा व वेदोद्धाराचा संदेश शंकराचार्यास दिला. शंकराचार्यांनी सर्व भारतात पर्यटन करून सर्व राजसभा व पंडितसभा जिंकल्या. वैदिक धर्माचा व वैदिक अध्यात्माचा विजय स्थापित केला. हा शंकराचार्यांचा दिग्विजय इतिहासात प्रख्यात झाला. वैचारिक साम्राज्य माणसांना बंधनात टाकीत नाही, अज्ञानाच्या बंधनातून सोडविते.
शंकराचार्यांच्या वादकौशल्यासंबंधी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यातील एक सुसंगत विचाराचे उदाहरण म्हणून पक्की ध्यानात ठेवण्यासारखी आहे. एकदा काशीत पंडितांशी शंकराचार्यांचा वाद झाला. शंकराचार्यांनी हे इंद्रियांनी दिसणारे विश्व कसे आभासमय किंवा भ्रमात्मक किंवा मिथ्या आहे हे सिद्ध करून सत्य आहे असे मानणाऱ्या विरुद्ध पक्षाचा पराजय केला. सभेत उपस्थित असलेल्या राजपुत्राने यावर एक युक्ती योजली. आपला एक गज शंकराचार्य काशीच्या ज्या संकुचित मार्गाने जात होते, त्या मार्गात त्याने सोडला. गज सामोरा धावत येत आहे हे पाहून शंकराचार्य पळू लागले. त्यास राजपुत्राने अडवले व विचारले की, गजो मिथ्या. गज मिथ्या हे खरे ना? मग का पलायन करता? आचार्यांनी लगेच उत्तर दिले की, ‘गजो मिथ्या तथा पलायनपि मिथ्या’ – गज जसा खोटा तसेच पलायनही खोटे. राजपुत्राने आचार्यांचे वादिगजसिंहत्व मान्य केले.
गौतमाने न्यायदर्शनात तत्त्वचर्चेचे तीन प्रकार सांगितले आहेत. वाद, जल्प व वितण्डा या तीन प्रकारच्या चर्चेच्या तीन व्याख्या सांगितल्या आहेत. ‘तत्त्वबुभुत्सो’, वाद, कथा : पक्ष व प्रतिपक्ष यांच्यात तत्त्वबोधाच्या इच्छेने म्हणजे सत्यसंशोधनाच्या इच्छेने चर्चा होते, त्या चर्चेस वाद म्हणतात. ‘विजिगीषु-कथा जल्प:’ पक्ष व प्रतिपक्ष बौद्धिक विजय प्राप्त होण्याच्या इच्छेने ज्या चर्चेस प्रवृत्त होतात त्या चर्चेस जल्प म्हणतात. ‘स्वपक्षस्थापनाहीनोवितण्डा’, स्वत:चे विशिष्ट मत न स्वीकारता जेथे विरुद्ध पक्ष एकमेकाचे म्हणणे खोडण्यास प्रवृत्त होतात, त्यास वितण्डा म्हणतात.
‘गुरु-शिष्य सब्रह्मचारिभि: वाद: प्रयोक्तव्य:’ गुरु-शिष्य व सहाध्यायी यांनी सत्याच्या बोधाकरिता वाद करावा असे गौतममुनि म्हणतात. युक्तीने किंवा प्रमाणाने काहीच सिद्ध होत नसते, असे मानणारे संशयवादी लोक वितंडा माजवतात. प्रत्यक्षवादी, शून्यवादी किंवा मायावादी हे वितंडावादी असतात, असे शांकर अद्वैतवादाचे समर्थन करणारे पंडित श्रीहर्ष यांनी ‘खण्डनखण्डखाद्य’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. वाद, जल्प किंवा वितंडा या तीन पद्धतीचे नियम व गुणदोष यांची सविस्तर मांडणी गौतमाच्या न्यायदर्शनात केली आहे. या न्यायदर्शनातून म्हणजे वादविद्येतून बौद्ध, जैनपूर्वमीमांसक व अद्वैत-द्वैत-विशिष्टाद्वैत इत्यादि वेदान्ती संप्रदाय यांची समृद्ध अशी तर्कशास्त्रे निर्माण झाली असे भारतीय वादविद्येचा इतिहास सांगतो. भगवदगीतेत भगवानांनी ज्या स्वत:च्या दिव्य विभूति सांगितल्या आहेत त्यात ‘वाद: प्रवदतामहम्’ म्हणजे चर्चा करणाऱ्या पद्धतीत वाद अर्थात् तत्त्वजिज्ञासेची चर्चा म्हणजे मी होय असे म्हटले आहे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment