नुकतीच पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हे नवेकोरे साप्ताहिक सदर...
शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजालादेखील अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि अहंकार, कशा प्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावरची निष्ठा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पहिल्या महायुद्धाच्या या इतिहासातून सापडायला मदत होईल, अशी अशा वाटते.
.............................................................................................................................................
प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क हा अतिशय कणखर वृत्तीचा धोरणी, मुत्सद्दी पण विधिनिषेधशून्य असा संसदपटू/राजकारणी होता. सर्व लहान-मोठ्या जर्मन भाषक राज्यांचे अस्तित्व मोडून काढून एक विशाल जर्मन राष्ट्र उभे करायचे, हा त्याचा निश्चय होता. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करायची इच्छा विल्हेल्मलासुद्धा होती. त्यामुळे राजा आणि प्रधानाची एक उत्तम युती तयार झाली (आणि ती सुदैवाने दीर्घकाळ टिकलीदेखील.) बिस्मार्कने प्रथम प्रशियात अंतर्गत शांतता प्रस्थापित केली. १८४८पासून चाललेली बंडाळी पुरती शमली नव्हती आणि समाजवादी, स्वातंत्र्यवादी, राजेशाहीविरोधी असंतोषाचे निखारे अजूनही धुमसतच होते, पण बिस्मार्कने त्यांचे सरसकट दमन न करता त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून, त्यांना चुचकारून त्या बदल्यात राजेशाही, सामंतशाहीला पराकोटीचा असलेला त्यांचा विरोध सोडायला लावला. अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित केली. एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली.
बिस्मार्कला आपले ध्येय साध्य करण्यासाठी युद्ध छेडणे, भांडण उकरून काढणे, हिंसा असे काहीच वर्ज्य नव्हते. त्याची उद्दिष्टं आणि धोरण स्पष्ट असत. (यालाच त्याने ‘Blood & iron policy’ - लोह-रुधीर धोरण असे गोंडस नाव दिले.) आयुष्यात तो कधीही याबाबत चुकला नाही. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण तीन युद्धे छेडली. पहिले युद्ध डेन्मार्कशी झाले. प्रशियाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील श्लेसविग आणि होलस्टीन हे जर्मनबहुल प्रांत डेन्मार्कच्या अधीन होते आणि त्यांचा ताबा मिळवण्यासठी त्याने डेन्मार्कशी युद्ध केले. याला अर्थातच प्रशियन राज्यसंघाताल्या जर्मन राष्ट्रवादी लोकांचा मोठा पाठिंबा लाभला. ही मोहीम फत्ते झाल्यावर उत्तर जर्मन राज्यातल्या राष्ट्रीय चळवळी आणि नेत्यांना पाठींबा देऊन उत्तरेकडील सगळी जर्मन भाषक राज्य प्रशियात सामील करून घेतली.
जर्मन एकीकरणापूर्वीचा प्रशिया आणि जर्मन राष्ट्रसंघ
या एकाच युद्धाने प्रशियाचे पारडे जड झाले, हे ओळखून ऑस्ट्रिया अस्वस्थ झाला आणि त्याने दक्षिणेकडील जर्मन राज्ये स्वत:च्या पंखाखाली घ्यायला सुरुवात केली. ऑस्ट्रियाला नुकत्याच जिंकलेल्या श्लेसविग आणि होलस्टीन या प्रांतापैकी होलस्टीन प्रांताचा ताबा हवा होता. ही मागणी म्हणजे ‘प्रशिया आणि उत्तरेकडील जर्मन भाषक प्रशियावादी राज्य यात ऑस्ट्रियाची पाचर बसावी म्हणून खेळलेली एक चाल आहे’ अशी भूमिका उठवून आणि ऑस्ट्रियाला फशी पडून बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध केले. हे करताना फ्रान्स तटस्थ राहील याची काळजी घेतलीच, पण ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला असलेला इटलीचा पाठिंबा मिळवून वेळ पडल्यास तो आपल्याला मदतही करेल, अशी व्यवस्था केली. त्यामुळे ऑस्ट्रियाला इटलीच्या सीमेवर संरक्षणाची तरतूद करावी लागली आणि प्रशियाच्या विरोधात सर्व ताकद पणाला न लावता आल्याने त्यांचा निर्णायक पराभव झाला.
त्यानंतर बिस्मार्कने जर्मन राज्य संघातून ऑस्ट्रियाची बोळवण केली आणि मग अर्थातच राज्यसंघात फक्त प्रशिया हाच एक प्रबळ देश उरला. अर्थात ऑस्ट्रियाचा पराभव झाल्यावरही त्यांच्या अधिपत्याखालाच्या भूमीचे लचके न तोडता दूर अंतरावरच्या मैत्रीचे संबंध ठेवल्याने ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियन जनता जी बहुसंख्येने जर्मन भाषक होती, ती जर्मनीची पक्की वैरी बनली नाही. अजून प्रशियाच्या कच्छपी न लागलेली जी दक्षिण जर्मन राज्ये होती, त्यांना प्रशियाची भीती वाटत होती, पण यापेक्षा जास्त भीती त्याना फ्रान्सची वाटत होती. ५०-६० वर्षापूर्वी फ्रान्सने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून त्यांना मांडलिक बनवले होते. १८१५मध्ये जरी नेपोलियनचा पराभव झालेला असला तरी लगेच काही फ्रान्स हे राष्ट्र कमकुवत झालेले नव्हते. उलट नेपोलियनने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे ते सामर्थ्यवान आणि त्याहूनही अधिक आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांच्या जगभर वसाहती होत्या आणि इंग्लंडनंतर क्रमांक दोनची वसाहतवादी सत्ता फ्रान्सच होता. जर्मनबहुल प्रांत आल्सेस आणि लोरेन हे नेपोलियनने जिंकून फ्रान्सला जोडले. त्यावरचा ताबा अजूनही त्यांनी सोडला नव्हता, ही गोष्ट जर्मन लोक विसरले नव्हते.
त्यातून १८५२ साली नेपोलियन तिसरा हा पुन्हा फ्रान्सच्या गादीवर आला आणि त्याने सत्ता काबीज करून दुसरे फ्रेंच साम्राज्य स्थापन केले. म्हणजे फ्रान्स आता पुन्हा एकदा प्रजासत्ताक न राहता एका राजाची राजवट बनला होता. याचे प्रत्यंतर युरोपला एक वर्षातच आले, जेव्हा फ्रान्सने रशियाविरुद्ध क्रिमियन युद्धात सक्रीय सहभाग घेतला.
तर आता साम्राज्यवादी फ्रान्स हा पुन्हा एकदा नेपोलियनप्रमाणे शत्रू म्हणून आपल्या उरावर बसला आहे आणि त्याच्यापासूनच आपल्या अस्तित्वाला खरा धोका आहे, हे दक्षिणेकडच्या जर्मन राज्यांवर ठसवण्याकरता फ्रान्सकडून काही आगळीक होणे जरुरीचे होते. नाहीतर फ्रान्सपेक्षा बिस्मार्कच्या म्हणजेच प्रशियाच्याच खऱ्या हेतूचे पितळ उघडे पडले असते. त्यामुळे बिस्मार्क योग्य अशी संधी शोधत होता, जी त्याला लवकरच मिळाली.
फ्रांको प्रशियन युद्ध १८७०-७१
१८७० साली स्पेनची राणी इझाबेला हिला अंतर्गत बंडाळीमुळे गादीवरून पायउतार व्हावे लागले आणि स्पेनची गादी रिकामी झाली. प्रशियाचा राजा विल्हेल्मचा पुतण्या प्रिन्स लिओपोल्डला स्पेनचा राजा होण्याची शिफारस केली गेली. बिस्मार्कचा याला पाठिंबा होता, नव्हे त्यानेच त्याचे लागेबांधे वापरून लिओपोल्डचे नाव पुढे करवले होते. स्वत: लिओपोल्ड आणि त्याचा काका सम्राट विल्हेल्म यांची लिओपोल्द्ने स्पेनचा राजा व्हायला फारशी इच्छा नव्हती. फ्रान्स नाराज झाले असते, पण गेली शंभरेक वर्षे स्पेनमध्ये सतत कुरबुरी, बंडाळ्या, उठाव चालू होते. ही असली सुळावरची पोळी खाण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते, पण बिस्मार्कने मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांचे मन वळवले. कारण लिओपोल्ड स्पेनचा राजा झाल्यावर फ्रान्सच्या पश्चिमेकडून प्रशियाला अनुकूल असणारे एक राज्य तयार होणार होते. अखेर १९ जून १८७० रोजी लिओपोल्ड तयार झाला आणि तशी तार (सांकेतिक भाषेतली) त्याने स्पेनला केली.
इथे एका छोट्याश्या घटनेने बिस्मार्कच्या सगळ्या योजनेवर पाणी पडले. झाले असे की, सांकेतिक भाषेतली तार भाषांतरित करणारा जो कुणी होता, त्याने २९ जूनऐवजी चुकून ९ जुलै केले. त्यामुळे स्पेनमधील मंत्रिमंडल/ कायदेमंडळाची सभा त्याने तोपर्यंत तहकूब केली. त्यामुळे लिओपोल्ड २९ जूनला पोहोचला, तेव्हा सगळा गोंधळ उडाला आणि ती बातमी साहजिकच बाहेर फुटली. तो राजा होईपर्यंत ही बातमी गुप्त विशेषत: फ्रान्सपासून लपून राहणे गरजेचे होते, पण आता सगळेच बिंग फुटले. फ्रान्समध्ये खळबळ उडाली. त्यांनी यावर तीव्र नापसंती दाखवली आणि भांडण नको म्हणून राजा विल्हेल्मने त्यांचे म्हणणे मान्य करत लिओपोल्डला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला. लिओपोल्डनेदेखील लगोलग आपली उमेदवारी मागे घेतली आणि तसे स्पेन व फ्रान्सला कळवले. हा खरे तर फ्रान्सचा राजनयिक विजयच होता (आणि बिस्मार्कच्या मनसुब्याचा पराभव), पण तेवढ्यावर समाधान मानायला ते तयार नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी फ्रान्सने पाठवलेला राजदूत काउंट बेनेडेटी याने चक्क राजा विल्हेल्मकडे त्याने प्रिन्स लिओपोल्डला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे आणि पुढे भविष्यातदेखील स्पेनच्या मामल्यात दखल देणार नाही, असे लिखित आश्वासन मागितले.
खरे तर यातली पहिली गोष्ट आधीच झालेली होती आणि असा काही विषय परत येणे शक्य नव्हते. (लोकांना राजा व्हायची ऑफर काही रोज रोज मिळत नाही.) पण अशा प्रकारे लिखित आश्वासन मागणे, तेसुद्धा एका राजदूताने हे अपमानजनक होते. राजा विल्हेल्मने त्याची दुसरी मागणी साफ धुडकावली. जे काही घडले ते सांगणारी तार सम्राट विल्हेल्मने शिष्टाचार म्हणून बिस्मार्ककडे पाठवली. तो अशाच संधीची वाटच पाहत होता. त्याने त्या तारेतले फक्त काही शब्द असे काही फिरवले की, त्यातून फ्रेंचांचा उद्दामपणा तर अधोरेखित झालाच, पण प्रशिया अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नसून आता उलट स्पेनच्या मामल्यात नक्कीच हस्तक्षेप करणार, असा देखावा तयार झाला. इतिहासात ही तार किंवा टेलिग्राम ‘एम्स टेलिग्राम’ म्हणून प्रसिद्ध आहे. (ही भेट झाली तेव्हा राजा विल्हेल्म एम्स राजवाडा, ऱ्हाईनलंड इथे होता म्हणून हा एम्स टेलिग्राम, तारीख होती २३ जुलै १८७०)
झाले, आता फ्रान्सचे पित्त खवळले आणि त्याने ही प्रशियाची आपल्याला दोन बाजूने घेरण्याची चाल आहे असे ओळखून प्रशियावर युद्ध पुकारले. बिस्मार्कची हीच इच्छा होती. त्यामुळे आगळीक फ्रान्सनेच काढली हे सिद्ध झाले. फ्रान्स आपल्याला शांतपणे जगू देणार नाही याची दक्षिण जर्मन राज्यांना खात्री पटली. नुकतेच हरल्यामुळे नाराज असलेल्या पण जर्मनच असलेल्या ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या उद्दामपणामुळे गप्प बसावे लागले आणि आपली तार पाहून फ्रान्स असा आततायीपणा करणार याची पूर्ण कल्पना असल्याने युद्धाच्या पूर्ण तयारीत असलेला प्रशिया आता अगदी शड्डू ठोकून युद्धात उतरला.
तार प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे फ्रेंच सैन्याची युद्धाला जायची तयारी नव्हती. त्यामुळे युद्ध पुकारल्यावर पूर्ण तयारीत असलेल्या प्रशियाने फ्रान्सची अगदी धुळदाणकेली. वैझेन्बार्ग, ग्रेवेलोट, मार्त्झ नदीजवळ, अशा ठिकाणी लढाया झाल्या. मुख्य लढाई सेदान इथे झाली आणि त्यात फ्रान्सचा पूर्ण पराभव झाला. चक्क राजा नेपोलियन कैद झाला आणि त्याला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. तीन वर्षांनी तो निर्वासित अवस्थेत इंग्लंडमध्ये मरण पावला. प्रशियन सैन्य तिथे थांबले नाही. झाले असे की, स्वत: राजा नेपोलियन कैद झाल्याने फ्रान्समध्ये गोंधळ झाला आणि तिथे तात्पुरते हंगामी सरकार स्थापन केले गेले. त्यांनी लगोलग प्रशियाशी बोलणी करायला हवी होती, पण नक्की किती नुकसान झालेले आहे, सध्या आपल्या राखीव सैन्याची अवस्था काय आहे, याबाबत गोंधळ असल्याने त्यांच्यातच एकमत होत नव्हते. इकडे मोल्टके काही शांत बसला नव्हता. त्याच्या अधिपत्याखालील प्रशियन सैन्याची आगेकूच चालूच होती. त्यांनी चक्क फ्रेंच राजधानीलाच वेढा घातला आणि तो चांगला १३० दिवस चालला.
पाच दशकांपूर्वी अख्ख्या युरोपला धूळ चरणाऱ्या फ्रान्सची केवढी मानहानी! आणि ती पण अजून पुरते राष्ट्रदेखील न झालेल्या जर्मन-प्रशियाकडून. सगळा युरोप बोटे तोंडात घालून पाहतच राहिला.
आता प्रशियाच्या सामर्थ्यापुढे बोलायची कुणाची टाप नव्हती. अखेर २४ जाने १८७१ रोजी फ्रन्कफुर्ट इथे तह झाला आणि सर्व जर्मन राज्यांचा प्रशियात विलय होऊन जर्मनी हे नवे राष्ट्र उदयाला आले. त्याचा राजा होता विल्हेल्म पहिला, त्याने कैसर (सम्राट) ही पदवी धारण केली. पराजित फ्रान्सने मागे बळकावलेले अल्सेस आणि लॉरेन हे प्रांत परत केले. शिवाय युद्धखोरीची भरपाई म्हणून ५ अब्ज रुपये भरपाई दिले.
अशा प्रकारे मोठ्या मुत्सद्देगिरीने आणि चलाखीने बिस्मार्कने आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. पण याबरोबरच स्वत:च्या सामर्थ्याबद्दल भरमसाट गर्व आणि युद्ध करून आपल्याला हवे ते पदरात पडून घेता येईल, हा आंधळा विश्वास जर्मन जनतेच्या मनात भरला गेला.
बिस्मार्क जितका धोरणी आणि काळाची पावले ओळखणारा होता, तितके मुत्सद्दीपण पुढील पिढीतल्या कुणात असणार नव्हते. अगदी ५०-५५ वर्षांपूर्वी ज्यांना आपण मंडलिक केले होते, त्यांनी आपला लाजिरवाणा पराभव केलाच, पण अल्सेस आणि लॉरेन प्रांत हाताचे गेल्याने आणि चक्क राजधानी पॅरिसला पाच महिने वेढा पडल्याने झालेला अपमान फ्रेंचांच्या जिव्हारी लागला. (खरे तर सेदान आणि वेर्डून इथे पराभव झाल्यावर बिस्मार्कने थांबायला हवे होते, पण पुढे त्याने जे केले, त्यामुळे फ्रान्स-जर्मनी कायमचे वैरी बनले. हे वैर पुढची जवळपास ७५ वर्षे - आणि दोन महायुद्धे - दोघांना पुरले.).
या एका युद्धाने युरोपचा भूगोलच नाही, तर सत्ता-समतोल पार बदलून/बिघडून गेला. पहिल्या महायुद्धाचे बीज इथे पडले आणि आता सर्वनाश, संहाराकडे वाटचाल सुरू झाली. या युद्धात जर्मनीचा सेनापती होता हेल्मुट फॉन मोल्टके. पहिल्या महायुद्धात भाग घेतलेल्या जर्मन सेनापती हेल्मुट फॉन मोल्टकेचा काका.
अशा प्रकारे एकीकृत जर्मनीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर मात्र बिस्मार्कने कोणतेही विस्तारवादी धोरण आखले नाही. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या जर्मनीची भरभराट, प्रगती साधण्यासाठी त्याला स्थैर्य आणि शांतता हवी होती. देशातल्या स्वातंत्र्यप्रेमी, समाजवादी, राष्ट्रवादी अशा निरनिराळ्या गटांना शांत करण्यासाठी त्याने काही प्रमाणात लोकशाही आणली. १८७१ सालीच जर्मन संसद म्हणजे राईश्टाग स्थापन करून २५ वर्षे वयावरील प्रत्येक जर्मन नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. हे तेव्हा इंग्लंडमध्येही नव्हते. आरोग्य विमा आणि कामगारांना पेन्शन यासारख्या योजना त्याने आणून जर्मन देश हे एक कल्याणकारी राज्य आहे असे ठसवले. राजेशाही पूर्ण बरखास्त केली नाही आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या भाषेत चान्सेलर जरी लोकनियुक्त नसला तरी लोकांचा राज्यकारभारातला सहभाग लक्षणीयरीत्या वाढला. कायदे करणे, करप्रणाली आणि एकूण शैक्षणिक आणि आर्थिक धोरण ठरवणे अशा बाबीत लोकांना सहभाग दिला गेला. औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन आणि कल्याणकारी कामगार धोरण यामुळे लवकरच जर्मनी एक बलाढ्य औद्योगिक राष्ट्र बनले. शेतीवर अवलंबून लोकांची संख्या उद्योगधंद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांपेक्षा कमी झाली. २० लाख लोकसंख्या असलेले बर्लिन १९१२ पर्यंत ४० लाख लोख संख्या असलेले मोठे शहर बनले. ते जगात चार नंबरचे मोठे शहर होते. एकीकरणानंतर जर्मनीच्या औद्योगिकीकरणाला नवे बळ मिळाले आणि जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १० वर्षांत तिपटीने वाढले. औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्ग शहरात, औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात संघटीत झाला. त्यातून कामगारहक्क चळवळी मूळ धरू लागल्या. त्या मात्र त्याने निष्ठूरपणे मोडून काढल्या.
राजेशाही आणि सामंतशाही हे कालबाह्य झालेले असून शेतकरी-कामगारांचे लोकसत्ताक राज्य हे आजची गरज आहे, असले विचार त्याला खपत नसत. असले विचार व्यक्त करणाऱ्या पक्षांवर त्याने बंदी आणली, नेत्याना तुरुंगात टाकले, हद्दपार केले, पण त्या पक्षाच्या अनुयायांना मतदानाचे अधिकार तर होतेच ना! त्याचे तुष्टीकरण करण्यासाठी त्याने कामगार पेन्शन, अपघात विमा, सुट्ट्या कामाचे साप्ताहिक तास अशा मूलभूत सुधारणा केल्या. खरे तर कल्याणकारी राज्य होण्याच्या दिशेने पडलेले एक पुरोगामी पाऊल होते, पण समाजवादी चळवळींना शह देऊन जनतेत उदारमतवादी राजेशाहीची लोकप्रियता वाढवण्याचा छुपा उद्देश त्याच्या अंगलट आला.
बिस्मार्कने धर्मालादेखील राज्ययंत्रणेपासून दूर ठेवले होते. इतिहासाचा दाखला घेतला तर मोठमोठ्या कटकटीना, संहाराला राज्य यंत्र आणि धर्म यांची अभद्र युती कारणीभूत असते, या मताचा तो होता. (त्यात तथ्य होतेच आणि आहेही.) त्यामुळे बिस्मार्कवर नाराज असलेले चर्चचे लोक आणि त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आणि समाजवादी लोक यांची बिस्मार्क विरोधात अघोषित युती झाली. १८७०-८०मध्ये राईश्तागमधले त्यांचे एकूण मताधिक्य ६ टक्क्यांपेक्षा खाली होते, ते वाढून १८९० येईतो २५ टक्क्यांपर्यंत गेले. त्यामुळे राजनियुक्त चान्सेलरच्या सार्वत्रिक अधिकाराला खीळ बसली. आता गेली १७ वर्षे तो जर्मनीचा चान्सेलर\पंतप्रधान होता (आणि प्रशियाच्या पंतप्रधानकीचा काळ जमेला धरला तर २६ वर्षे), पण त्याचा खंदा आधारस्तंभ कैसर विल्हेल्मही थकला होता. ९ मार्च १८८८ रोजी तो वारला. त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा गादीवर आला खरा, पण तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला, तेव्हा त्याचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही, पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला वारला. मग त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. नवीन राईश्ताग जे कैसर विल्हेल्म दुसरा याच्या अध्यक्षते खाली सुरू झाले, त्याचे त्या वेळी काढलेले हे चित्र मोठे सूचक आहे.
चित्रात दाखवल्याप्रमाणे कैसरच्या पायाशी एकटाच उभा असलेला चान्सेलर बिस्मार्क खरोखर एकटा पडला होता. त्याला राईश्तागमध्ये बहुमत नव्हते आणि नव्या राजाचा पाठिंबा नव्हता. कैसर विल्हेल्मला जुना आणि त्याच्यावर प्रभाव गाजवणारा चान्सेलर नको होता. मार्च १८९०मध्ये म्हणजे गाडीवर आल्यावर दोनच वर्षात त्याने बिस्मार्कची बोळवण केली. अगदी एक दिवसाच्या नोटिशीवर त्याला हाकलले गेले. बिस्मार्क त्यानंतर निवृत्त होऊन हाम्बुर्गजवळ आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीवर जाऊन राहिला. पुढे तो आणखी ८ वर्षे जगला. त्याचे जर्मनीच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणे, हे एका युगाचा अंत आणि आणि इतिहासाच्या प्रवाहाला एक निश्चित वळण देणारे ठरले. तसे युरोपात मानलेही गेले, इंग्लंडमधील ‘पंच’ नावाच्या मासिकात २९ मार्च १८९० रोजी ‘Dropping The Pilot’ या नावाने एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. ते मोठे भविष्य दर्शक आहे. शिडात वारे भरलेले हे जर्मनीचे जहाज आता चाणाक्ष, अनुभवी पायलट(!) नसल्याने कसे आणि कुठे जाणार याविषयी अनेकांना त्या वेळी सार्थ शंका वाटली असणार.
सात वर्षांनी म्हणजे १८९७ मध्ये वृद्ध, आजारी आणि मृत्युपंथाला लागलेल्या बिस्मार्कची सदिच्छा भेट घ्यायला विल्हेल्म त्याच्या घरी गेला. तिथून निघताना वृद्ध आणि गलितगात्र झालेला बिस्मार्क त्याला म्हणाला, “महाराज जोपर्यंत जर्मन सैन्य आणि सैन्याधिकारी तुमच्याशी एकनिष्ठ आहेत, तोपर्यंत तुम्ही हवे ते करू शकाल. तुम्हाला भ्यायची गरज नाही. (तुमची दंडेली, मनमानी खपून जाईल.) पण ज्या दिवशी त्या सैन्याची निष्ठा ढळेल, तेव्हा मात्र तुमची धडगत नाही. मी आता काही दिवसांचाच सोबती आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही वागता आहात आणि घटना घडत आहेत, ते पाहता माझ्या मृत्युच्या २० वर्षांतच हा सगळा डोलारा कोसळेल आणि तुमची (आणि पर्यायाने एकीकृत जर्मनीची) वाताहत होईल.”
जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि त्यानंतर २० वर्षे चार महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले. जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला. सैन्याने कैसरची साथ सोडली आणि कैसरला सत्ताभ्रष्ट/परागंदा होऊन नेदरलंडमध्ये उर्वरीत आयुष्य कंठावे लागले!
.............................................................................................................................................
या सदरातील आधीच्या लेखासाठी पहा -
१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3952
२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3977
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment