‘तुकडे तुकडे गॅंग’ सहा वर्षे झाली तरी अखंड कशी?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 28 January 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah तुकडे तुकडे गॅंग Tukde Tukde Gang रवीशंकर प्रसाद Ravi Shankar Prasad

भारतात टोळ्या म्हणजेच गॅंग्ज तयार व्हायला लागल्या, त्यालाही बराच काळ लोटलाय. तसं पाहिलं तर आपण सगळे मानवच टोळ्यांमधून उत्क्रांत होत इथवर आलोय. आजच्या साहित्य समीक्षकी भाषेत म्हणायचं तर आपला प्रवास ‘समष्टीकडून व्यक्तीकडे’ होत आलाय मानववंश इतिहासानुसार. यात जनावर ते माणूस असाही प्रवास झाला. तरीही माणसातलं जनावर पूर्ण नामशेष न झाल्यानं आपल्याला व्यक्ती ते समष्टी अशा प्रवासाचा धोशा लावावा लागतोय. थोडक्यात आपण मनसेच्या इंजिनाप्रमाणे कधी डावीकडून उजवीकडे तर कधी उजवीकडून डावीकडे, असे हिंदकळत चाललोय.

तर टोळ्यांना इंग्रजी शब्द ‘गॅंग्ज’. गावांची नगरं, नगरांची महानगरं व महानगरांची बृहननगरे होत गेली आणि या उत्तरोत्तर आधुनिक, यांत्रिक, तांत्रिक, वेगवान होत जाणाऱ्या महानगरांतून वेगवेगळ्या टोळ्यांचा उगम होत गेला. या टोळ्या म्हणजे पूर्वीच्या चोर, डाकू, वाटमारे यांचेच नवे अवतार. थोडक्यात नव्या कालखंडात टोळ्या या मुख्यत्वे अधोविश्वात तयार होऊ लागल्या. प्रसिद्ध महाकवी नामदेव ढसाळ म्हणायचे- ‘अधोविश्व ही महानगराची गरज असते आणि त्याचेच ते बायप्रॉडक्ट असते.’ अवैध धंदे, काळाबाजार, जुगार, सट्टा, दारू, वेश्या, दलाल, भडवे, गल्ली दादा, मारामाऱ्या, खून, दरोडे आणि पोलीस व न्याययंत्रणा हे सगळे या विश्वाचे अपरिहार्य घटक. यातच टोळीयुद्धं भडकतात. त्यातूनच ‘गॅंगवॉर’ हा शब्द उपजला. या गॅंग्ज व त्यांची ख्याती न्यूयॉर्क ते वासेपूर अशी विशाल भौगोलिक वा ग्लोबल आहे.

हा एवढा उहापोह करायचं कारण म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात जेएनयूमध्ये काही तरुणांच्या गटानं काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देत, त्यात ‘भारत तेरे तुकडे होंगे’ वगैरेही घोषणा दिल्या गेल्या, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या गटात तत्कालीन जेएनयू स्टुडंट युनियनचा लढाऊ नेता कन्हैयाकुमारही होता, हे दाखवले गेले.

कन्हैयाकुमारने आरोप फेटाळत हे व्हिडिओ बनावट व छेडछाड केलेले आहेत असं सांगितलं. पण सरकारनं कन्हैयाकुमारला अटक केली, पतियाळा न्यायालयात देशभक्त वकिलांच्या टोळीनं त्याच्यावर हल्ला केला. त्याची सुटका झाली आणि तो जेएनयूतून देशभर व्हायरल झाला. नवं नेतृत्व म्हणून आजही तरुणांत तो लोकप्रिय आहे.

तर हा जो काय कथित प्रकार घडला, त्यात जे सामील होते कन्हैयासह, त्यांना मोदी सरकार, भाजप, भक्त, आश्रित माध्यमं यांनी नाव ठेवलं ‘टुकडे टुकडे गॅंग’!

या प्रकारानंतर एक निवृत्त सेनाधिकारी व मोदी सरकारतले मंत्री यांनी तर जेएनयूच्या आवारात रणगाडा ठेवायची अनाकलनीय सूचना केली. अनाकलनीय विधानं, सूचना यांची कायमच स्पर्धा सत्ताधारी गटात चालू असते. ‘तुकडे तुकडे गॅंग’ या अशा उल्लूमशाल लोकांसाठी नवीन खाद्यच झालं.

आज या घटनेला पाच वर्षांहून अधिक काळ होऊन गेलाय, पण आजतगायत या कथित गॅंगवर ना काही कारवाई झाली, ना कुणाला अटक, ना आरोप निश्चिती झालीय, ना खटला दाखल झालाय. त्या प्रकाराबद्दल सरकारनं आजवर नेमकी काय कारवाई केली, हे अजूनही सांगितलेलं नाही.

मध्यंतरी एका टीव्ही चर्चेत भाजप प्रवक्ते संबित बात्रा व कन्हैयाकुमार दोघं होते. तिथंही हा विषय निघाला, तेव्हा कन्हैयाकुमार त्यांना एकच प्रश्न विचारत होता की, तुम्ही या कथित देशद्रोहींना अटक करून, त्यांच्यावर खटला चालवून, त्यांना शिक्षा का नाही करत? हा कार्यक्रम झाला, तेव्हा त्या घटनेला चार वर्षं उलटून गेली होती!

आज सहा वर्षानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद याच ‘तुकडे तुकडे गॅंग’ला धडा शिकवावा मतदारांनी असं आवाहन करतात! तेव्हा प्रश्न असा पडतो की, जर ‘तुकडे तुकडे गॅंग’ थेट देशद्रोही आहे, तर त्यांच्यावर पोलिसी कारवाई न करता कायदामंत्री त्यांचा राजकीय पराभव करा, असं का सांगतात? त्यासाठी ते बादरायण संबंध जोडत केजरीवाल व राहुल गांधी पर्यायाने आप व काँग्रेस यांना या गॅंगचे समर्थक ठरवतात!

देशाचे गृहमंत्री असोत की कायदामंत्री की पंतप्रधान, यांना गेल्या सहा वर्षांत या ‘तुकडे तुकडे गॅंग’ला जेरबंद करता आलं नाही? त्या गॅंगचेच तुकडे (त्यांच्या भाषेत खांडोळी) करता आले नाहीत? या गँगला मोकाट ठेवून ती शाहिन बागेसह देशभर कशी विस्तारू दिली?

‘तुकडे तुकडे गॅंग’ ही मोदी सरकार, भाजपची मानसिक गरज झालीय. त्यांना कायम जो एक काल्पनिक शत्रू तयार करायचा असतो, त्यासाठी ही गॅंग हातचा एक असल्यासारखी कामी येते.

मागे वाजपेयी म्हणाले होते, ‘भारतात मुसलमान नसते तर भाजपने ते तयार केले असते’ (हे विधान त्यांनी गंमतीने वेगळ्याच संदर्भात केले होते). आजच्या भाजप व मोदी सरकारसाठी ‘तुकडे तुकडे गॅंग’ म्हणजे पंचिंग बॅगसह वेळोवेळी किंवा वेळ मारून न्यायला मारायचा पंच झालाय.

एक दिवस आपल्या याच पंचवर भाजप नॉकआऊट व्हायची शक्यता वाढीस लागतेय.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vividh Vachak

Thu , 30 January 2020

मुळात कन्हैया कुमारला बेगुसराई निवडणुकीत दारूण पराभवाचे धनी व्हावे लागले आणि त्याला २.२८ लाख मते मिळाली याला जर "लोकप्रियता" म्हणायचे असेल तर असो. पण तसे पाहता एक मत मिळवणारासुद्धा कुणालातरी आवडत असतोच, म्हणून हा संख्यांचा खेळ जरा बाजूला ठेवूयात. कन्हैयाकुमारने केलेल्या कुठल्याही विधानाबद्दल अथवा कृतीबद्दल त्याला जर तुरुंगात घालायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. ज्या अर्थी तुरुंगात घातले नाही त्या अर्थी त्याने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणता येत नाही. पण केवळ कायद्याच्या कचाट्यात न सापडणारी भूमिका म्हणजे अविवाद्य भूमिका नव्हे. आणि विशेषतः स्वतः कन्हैया आता निवडणूक लढवून राजकारणात उतरला आहे तेव्हा कुठल्याही (त्याच्या विरोधी) राजकीय पक्षाच्या सदस्याने जर ह्या व्यक्तीचा मतदारांनी म्हणजे निवडणुकीत पराभव करावा असे विधान केले तर त्यात काहीही गैर नाही. खरेतर हीच लोकशाहीच्या तत्त्वाला धरून घेतलेली भूमिका आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......