अजूनकाही
जानेवारी २००६मध्ये राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली आणि मार्च २००६मध्ये पक्षाचे पहिले स्वतंत्र अधिवेशन झाले. त्यानंतर २१ मार्च २००६मध्ये दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘मुद्रा भद्राय राजते।’ हा अग्रलेख प्रकाशित झाला. या अग्रलेखात तत्कालीन संपादकांनी राज ठाकरे यांच्या भावी राजकारणाविषयी, पक्षाविषयी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. खरोखरच तेव्हा राज ठाकरे यांनी बऱ्याच अपेक्षा निर्माण केल्या होत्या...
.............................................................................................................................................
गेल्या वर्षी ११ मे रोजी, ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या प्रशस्त प्रांगणात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या उास्थितीत राज ठाकरे यांनी थाटामाटात आणि झगमगाटात बाळासाहेबांचे छाया-चरित्र प्रसिद्ध केले. तो सोहळा नेत्रदीपक व्हावा म्हणून राजने व्यासपीठावरील नेपथ्यरचनेपासून ते लेसर किरणांच्या थरारक प्रकाशलहरींचे अंधारनृत्य यातील प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष पुरवले होते. त्या समारंभाचे पार्श्वसंगीतही राजनेच स्वरबद्ध केले होते. श्रोत्यांमध्ये कोण असेल आणि तो वा ती कुठे बसेल याचाही लॅन राजनेच तयार केला होता. ज्या छाया-चरित्राचे ऊर्फ ‘फोटोबायॉग्राफी’चे प्रकाशन त्या दिवशी झाले, त्या वजनदार ग्रंथातील प्रत्येक चित्र, व्यंगचित्र, छायाचित्र राजने निवडलेले होते. फारच कमी जणांना तेव्हा असे वाटले असेल की, ही सर्व ‘ग्रँड रिहर्सल’ ऊर्फ सुसज्ज रंगीत तालीम होती- एका नव्या राजकीय पक्षाच्या संस्थापनेची; राज्यात एकच हंगामा घडवून, प्रस्थापितांच्या सुस्त निद्रेतून त्यांना खडबडून जागे करण्याची आणि लक्षावधी तरुणांच्या अंगभूत शक्तीला आवाहन करण्याची.
रविवारी संध्याकाळी शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी त्यांचा ‘ग्रँड पोलिटिकल फरफॉर्मन्स’ आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या आवाजात सादर केला. ज्यांनी सभेला आलेली तारुण्याची सळसळ पाहिली असेल, त्यांना आपल्या समाजात असलेल्या सुप्त ऊर्जेचे दर्शन झाले असेल. या ऊर्जेला विकृत वळण लावून समाजाचे विध्वंसक विघटन करण्याचे राजकारण आपल्या देशात गेली दोन दशके चालू आहे. धर्माला वा जातीला, भाषेला वा प्रांतवादाला विद्वेषाचे विद्रूप मुखवटे देण्याचा राजकीय धंदा भलताच तेजीत होता. अजूनही ती स्फोटके आपल्या समाजात ठिकठिकाणी पेरलेली आहेत. ती विस्फोटक शक्ती जागी करून त्याच्यावर स्वार होणे आणि जमले तर सत्ता हस्तगत करणे राजला शक्य होते. परंतु राजने तो पारंपरिक मोह टाळला आहे. विस्फोटात नाट्यमयता व प्रसिद्धी जास्त असते. विधायकतेत तसे नाट्य नसते. परंतु स्फोटकांचे तसे सुरुंग उडवायला सृजनशीलता आणि साहस लागत नाही. कुणीही बेबंद वा बेमुर्वत व्यक्ती ते करू शकते.
नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडियांसारख्या व्यक्ती आणि ‘लष्कर-ए-तय्यबा’ वा ‘अल-कायदा’सारख्या संस्था आपल्या अतिरेकी भाषा व कारवायांवरच पोसल्या जातात. नथुराम गोडसे होणे सोपे असते, गांधी होण्याचा प्रयत्न करणेही कठीण असते. आज तर नथुरामवादीच जिनांना आणि त्याद्वारे पाकिस्तानला प्रतिष्ठा देऊ पाहत आहेत आणि त्याच वेळेस एकात्मता यात्रेचे आयोजन करत आहेत. दुटप्पीपणाचे असे राजकारण करायलाही फारशी राजकीय कलाकारी लागत नाही. राजला तो पर्यायही उपलब्ध होता. काट-कारस्थानाचे राजकारण करताना आविर्भाव मात्र विकासाचा ठेवायचा, अशी शहाजोग शैलीही शरद पवारांकडून राज शिकू शकला असता. तोही राजने पत्करला नाही.
कुठच्या तरी पक्षाची कवचकुंडले धारण करण्याचा पर्यायही राजला खुला होता. तोही न स्वीकारता राजने नवीन पक्षाची घोषणा करून अंधारात उडी घेतली आहे. तसे करायला सृजनशीलतेबरोबरच साहसही लागते. उद्धव आणि बाळासाहेबांच्या तालावर नाचायचे राजने ठरवले असते, तर ते त्याला अगदी सहजच शक्य होते. काँग्रेसच्या निगरगट्टपणाला व नतद्रष्टतेला कंटाळून लोक शिवसेना-भाजप युतीकडे परत आले असते, अशी आशा बाळगणारे कमी नव्हते. आजही आहेत.
राजची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ म्हणजे चार-दोन प्रयोग करणारी सर्कस आहे, असे मानणाऱ्यांमध्ये भले भले पत्रकार आणि काही वृत्तपत्रेही होती. त्या सर्वांनी राजच्या बंडाची संभावना ‘उथळपणा, उतावीळपणा, अहंगंड’ अशा शब्दांत केली होती. उद्धव हाच शिवसेनेचा तारणकर्ता आणि भाग्यविधाता आहे आणि राज आहे तोतया, (शिवसेना या बँडची नकली आवृत्ती!) अशा अर्थाचे लेख-अग्रलेख-वृत्तान्त प्रसिद्ध होत होते. रविवारच्या सभेनंतर मात्र आता त्याच्यामध्ये असलेल्या अंगभूत गुणांचा साक्षात्कार बऱ्याच जणांना होऊ लागला आहे. जर याच मंडळींनी उभ्या केलेल्या बुजगावण्यांना दचकून राजने पाऊल मागे घेतले असते, तर महाराष्ट्र एका सृजनशील राजकीय नवनिर्माण प्रक्रियेला मुकला असता.
श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला धडा राजने गिरवला आहे आणि ज्येष्ठ कुटुंबीय, आत, मित्र आणि स्वयंघोषित गुरू यांचा उपदेश दूर सारून स्वत:च्या स्वतंत्र पक्षाची तुतारी फुंकली आहे. त्यांच्या विधायक वृत्तीबद्दल आणि साहसी शैलीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करावयास हवे.
राजची सभा विराट होतीच, पण शिस्तबद्धही होती. सभेला शिवसेनेचे समर्थक होते, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मुस्लीमही होते. सर्वसाधारणाणे शिवसेना वा भाजपच्या सभा असल्या की, पोलीस यंत्रणा ‘रेड अॅलर्ट‘वर असते. मुस्लीम वस्त्यांमध्ये काहीसे दबलेले, काहीसे जागरूक असे वातावरण असते. राजच्या सभेत जितक्या उघडाणे मुस्लीम-मराठी तरुण सामील झाले, तसे शिवसेनेच्या सभांमध्ये कधीही आले नव्हते.
तीच गोष्ट दलित तरुणांची. वय वर्षे १८ ते ३० या गटातील दलित तरुणांना प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले वा अन्य नेते हे ‘बनचुके’ वाटतात. दलित व्होटबँक जणू आपली ‘खासगी मालमत्ता’ आहे असे त्यांना वाटते, असे आता दलित तरुण उघडपणे बोलू लागला आहे. एकेकाळी बंडखोर वृत्ती धारण केलेली दलित पँथर पुढे प्रस्थापित झाली, संधीसाधू झाली आणि सत्तेसाठी कुणालाही वश होऊ लागली, असे मत आज दलित समाजात आहे. शिवाय विशी-पंचविशीत असलेल्या दलित तरुणांना आकर्षित करण्यात वा त्यांना नेतृत्व देण्यात प्रस्थापित आंबेडकरवाद्यांना यश आलेले नाही. ते दलित तरुण बहुसंख्येने राजच्या सभेला होते.
ओबीसी समाज नेहमीच शिवसेनेबरोबर असे. आता छगन भुजबळ यांनी पर्यायी ओबीसी निशाण उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी काही विभाग (विशेषत: माळी समाज) द्विधा मन:स्थितीत असू शकतात. मुंबई-पुणे परिसरात सेनेचा विस्तार मध्यमवर्गाच्या मदतीने झाला होता. परंतु सेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर हा मध्यमवर्ग भगव्या आघाडीपासून दूर जाऊ लागला. शिवसेनेने मराठी माणसाच्या अस्मितेचा केवळ घोषणेसाठी उपयोग केला, प्रत्यक्षात मुंबई महापालिकेत इतकी वर्षे बहुमतात असूनही या महानगराची आणि मराठी माणसाची उपेक्षाच झाली, असे वाटणारा शहरी मध्यमवर्ग सेनेपासून दूर होत गेला. सेनानेत्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या, पण ज्या मराठी तळमळीतून शिवसेना जन्माला आली होती, ती मराठी जनता मात्र तळमळतच राहिली, अशी भावना पसरत गेली.
सामान्य मुंबईकर रोजच्या जगण्याच्या संघर्षातच इतका व्यग्र आणि कावलेला असतो की, त्याला आणखी तणाव नको असतात. लोकल गाड्या वेळेवर चालणे, त्यात किमान चेंगरून उभे राहण्याइतकी जागा मिळणे, कामावर वेळच्या वेळी पोचणे, नोकरी-व्यवसायात खंड पडू न देणे इतपत माफक अपेक्षा जीवनाकडून असलेला मुंबईकर हा सहनशील, सहिष्णू आणि सेक्युलर असतो. म्हणूनच राजने जेव्हा घोषणा केली की, सामान्य मुस्लीम माणूस हा शत्रू नाही, इरफान पठाण ते अब्दुल कलाम ही तर राष्ट्रीय प्रतीके आहेत, तेव्हा त्याला शिवाजी पार्कच्या सभेत प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘हिंदुत्वापेक्षा राष्ट्रीयत्व विशाल आहे’ ही राजची घोषणा या संदर्भातूनच आली होती.
काही महिन्यापूंर्वी राहुल गांधींनी ‘राष्ट्रीयत्व हाच माझा धर्म’ आणि ‘तिरंगा झेंड” हेच माझे श्रद्धास्थान असे विधान काँग्रेसच्या अधिवेशनात केले होते. राहुल आणि राज एकाच वयोगटात आहेत. नव्या पिढीचे नेतृत्व जर अशा उमदेपणातून देशाचा आणि धार्मिकतेचा विचार करत असेल तर भारताच्या आर्थिक समृद्धीबरोबर सांस्कृतिक संपन्नताही साध्य करता येईल.
आज भारताच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीला खीळ घालून देशाचे एकत्व उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न अनेक धर्मवादी/जातीयवादी व्यक्ती, पक्ष व संघटना करत आहेत. राज ठाकरे या पारंपरिक आणि संकुचित तसेच प्रक्षोभक आणि विद्वेषी राजकारणाची परिभाषाच बदलू पाहत आहेत. भावनांपेक्षा विकासाच्या विचाराला व योजनांना ते अधिक महत्त्व देत आहेत. लोक कोणत्याही जातीचे, धर्माचे वा प्रांताचे असले तरी त्या सर्वांची इच्छा-अपेक्षा एकच आहे- कटकटी नसलेले, आनंदी जीवन जगता आले पाहिजे आणि तसे जगण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. परंतु इतकी साधी अपेक्षाही राज्यकर्त्यांना पुरी करता आलेली नाही.
दैनंदिन हलाखीचे अनेक दाखले राजने दिले. लोकलगाड्यांमधील असह्य प्रवासापासून ते लहान मुलांना व एकूणच कुटुंबाला साधे बाग-बगीचे वा मैदानेही उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या कुचंबणेपर्यंत सर्व प्रश्न राजने सभेत मांडले. त्याने हेसुद्धा सांगितले की, आतापर्यंत एकाही पक्षाने, युतीने वा आघाडीने आपण जनतेचे जीवन कसे सुखी करू शकतो, राज्याचा विकास कसा करू शकतो, बेकारी दूर कशी करू शकतो, याचा स्पष्ट योजनाबद्ध आराखडा लोकांसमोर ठेवला नव्हता. ‘सत्ता हातात घेण्यापूर्वी मी मात्र तसा ब्ल्यू प्रिंट बनवणार आहे.’
राजने मुंबई-महाराष्ट्रातील राजकीय पोकळी व्यापायचे ठरवलेले दिसते. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला अपूर्व संधी लाभली आहे. राज्यकर्त्या काँग्रेस आघाडीने आणि सेना-भाजप युतीने दिवाळखोर कारभार करून राजकीय पोकळी विस्तारत नेली आहे. पुढील वर्षभरात मुंबईत आणि पुढील साडेतीन वर्षांत महाराष्ट्रात जसजशी नाराजी वाढत जाईल, काँग्रेस आघाडी धुसफूस करून तुटत जाईल आणि शिवसेना-भाजप यांच्यातील तणाव वाढत जातील, तसतसा राज ठाकरेंच्या पक्षाचा विस्तार होत जाईल. याचा अर्थ ते लगेच २००९ साली राज्य पादाक्रांत करतील असा नव्हे; पण बऱ्याच प्रस्थापित राजकारण्यांना ते (कायमचे) निवृत्त मात्र करतील. महाराष्ट्रात आता राजकीय समीकरणे बदलू लागतील. मित्र कोण-शत्रू कोण हे पुन्हा नव्याने अजमावले जाईल आणि त्यातून होणाऱ्या ‘नंबर-गेम्स‘च्या म्हणजे बेरीज-वजाबाकीच्या आट्यापाट्यांमधून राजच्या पक्षाचा प्रवास सत्तेच्या दिशेने जात राहील. राजने उभ्या केलेल्या आव्हानाचा विचार राज्यातील सर्वच पक्षांना करावा लागणार आहे!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment