अजूनकाही
दुर्मीळ पुस्तकांचे संग्राहक, विचक्षण वाचक आणि समीक्षक प्रा. नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकांविषयीच्या पुस्तकाला सोलापूरच्या ‘लोकमंगल पुरस्कारा’नंतर नुकताच ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा २०१९चा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाविषयी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखांची ही झलक...
.............................................................................................................................................
महाराष्ट्रीयांच्या पुस्तकसंस्कृतीवर दृष्टिक्षेप - नीतीन रिंढे
https://www.aksharnama.com/client/article_detail/744
प्रा. नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे इंग्रजीतील Book on Booksचा परिचय करून देणारं पुस्तक. या पुस्तकाला रिंढे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असून त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या वाचनसंस्कृतीचा थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यांच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
महाराष्ट्रीय पुस्तकसंस्कृती छापील पुस्तकांच्या प्रकाशनाला दोनशे वर्षं उलटल्यानंतरही अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहे, असा निष्कर्ष काढावा लागतो. पूर्वी समाजातलं अज्ञान, निरक्षरता अशी त्याची कारणं तरी देता यायची. इंग्रजपूर्व काळात धार्मिक हस्तलिखितांचं वाचन ऐकण्याची श्रवणपरंपरा होती. श्रद्धा हा या परंपरेचा मुख्य आधार होता. आधुनिक काळात पुस्तकाला असलेलं धर्माचं, श्रद्धेचं हे अधिष्ठान नाहीसं झालं. साहित्याचा आशय ‘सेक्युलर’ झाला. श्रवणाकडून आपला समाज वाचनाकडे आला. अशा वाचनासाठी व्यक्तीला आवश्यक असणारा मोकळा वेळ, खाजगी अवकाश आणि पुस्तकं मिळवण्यासाठीची आर्थिक क्षमता या तीनही गोष्टी आजच्या महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजाला लाभलेल्या आहेत आणि तरीही इथं पुस्तकाचं वाचन मोठ्या प्रमाणात रुजलेलं नाही, पुस्तकसंस्कृती पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नाही. असं का झालं असेल?
.............................................................................................................................................
लीळाच, पण पुस्तकांविषयीच्या पु्स्तकांच्या! - वसंत आबाजी डहाके
https://www.aksharnama.com/client/article_detail/993
नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तकांविषयीचं पुस्तक मला अतिशय आवडलेलं आहे, हे सुरुवातीलाच सांगून टाकतो. खरं तर रिंढे यांचं हे पुस्तक पुस्तकांविषयीच्या पुस्तकांविषयीचं आहे, हे म्हणणं अधिक सार्थ ठरेल. पुस्तकांविषयीचं पुस्तक म्हणजे काय? ज्या पुस्तकाचा विषय पुस्तक ही वस्तू असतो, ते पुस्तकांविषयीचं पुस्तक असं प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेलं आहे. अशा पुस्तकांचा विषय साहित्यकृती हा नसतो, साहित्यकृतीकडे एक अस्तित्व म्हणूनही इथं पाहिलं जात नाही, एक भाषिक, सांस्कृतिक कृती म्हणूनही पाहिलं जात नाही; तर पुस्तक ही जड, भौतिक वस्तू इथं अभिप्रेत असते, ही वस्तू जिथं केंद्रस्थानी असते ते पुस्तक म्हणजे पुस्तकांविषयीचं पुस्तक होय. अशा प्रकारच्या मराठीत लिहिल्या गेलेल्या काही पुस्तकांचा उल्लेख रिंढे यांनी केलेला असला तरी प्रस्तुत पुस्तकातील विषयाचा व्याप लक्षात घेता हे अपूर्व असं पुस्तक आहे, असं निश्चितपणे म्हणता येईल.
.............................................................................................................................................
पुस्तकांनी नादावलेल्यांच्या जगाची सफर - विकास पालवे
https://www.aksharnama.com/client/article_detail/992
नीतीन रिंढे यांनी आपल्या या पुस्तकात केवळ इतर देशांतल्या पुस्तकांच्या इतिहासाविषयीचा किंवा विविध पैलूंचा आढावा घेतलेला नाही तर प्रसंगोपात्त भारतातील पुस्तकनिर्मितीच्या इतिहासावरील संशोधन, त्याविषयी प्रसिद्ध झालेली पुस्तकं, या विषयांची माहितीदेखील दिलेली आहे. त्या त्या देशांत ज्ञानकोश, शब्दकोश यांच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कसं काम केलं जातं, तिथले समीक्षक-संशोधक कशा तऱ्हेनं आपलं लेखन अद्ययावत, परिपूर्ण व्हावं यासाठी अपरिमित कष्ट उपसत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, याबद्दलही ते भाष्य करतात.
.............................................................................................................................................
लीळा पुस्तकांच्या : नीतीन रिंढे - नीतीन वैद्य
https://www.aksharnama.com/client/article_detail/1624
नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक म्हणजे पुस्तकांवरील प्रेमाचं प्रसन्न आख्यान आहे. या प्रेमाच्या नाना परी वेगवेगळ्या या पुस्तकातील लेखांतून रिंढे उलगडतात, त्यात हरवून जायला होतं. रिंढेंच्या वाचनातल्या व्यासंगाचा प्रत्यय पानापानांत येत राहतो. रिंढे यांनी ज्या दोन मास्टरपीस कथा लिहिल्या (‘दोन कादंबऱ्या आणि तीन लेखक’, ‘पुस्तकांचे घर’), त्यातही वाचनातलं सृजन आणि पुस्तकांवरचं प्रेमच केंद्रस्थानी होतें.
‘लीळा पुस्तकांच्या’मधल्या पहिल्याच लेखात (‘पुस्तकवेड्यांचा तत्त्वज्ञ : वॉल्टर बेंजामिन’) एका लेखाचा उल्लेख आहे, ‘ब्रीफ नोट्स ऑन आर्ट अॅण्ड मॅनर ऑफ अॅरेंजिंग वन्स बुक्स’. यात एक किस्सा आहे. पुस्तकप्रेमाचा रोग बळावतो तसा अनावर गतीनं संग्रह वाढत जातो. हे जग वेड्यांचं असलं तरी त्याला जागा वास्तवातली लागते, जी मर्यादित असते. हा मित्र ठरवतो, यापुढे संग्रहात फक्त ३६१ पुस्तकं असतील. एक वाढेल तेव्हा आधीचं एक कमी करायचं. तशी वेळ येते तेव्हा मनाची उलाघाल होते. पुन्हा तोडगा. एक पुस्तक म्हणजे काय याचं सूत्र तयार करू. एकच पुस्तक अनेक भागांत असेल तर ते एकच धरायचं. काही दिवस निभतात. पुन्हा वेळ येते, सूत्र विस्तारतं, एका लेखकाची सगळी पुस्तकं म्हणजे एक पुस्तक. पुढे एका विषयावरची पुस्तकं म्हणजे… सूत्र विस्तारत राहतं, पुस्तकांचा वाढता संसार ओढगस्तीत पण सुखेनैव चालू राहतो. कारण वेडाला अंत असत नाही. पुस्तकं संग्रहातून कमी करायच्या यातना ‘जावे त्यांच्या वंशा’ तेव्हाच कळायच्या आणि पुस्तकाभोवतीचा कृतज्ञ प्रेमाचा, आठवणींचा गोतावळा… त्याचं काय करायचं?
अशा वेडाची अनेक रूपं या पुस्तकात रिंढेंनी तितक्याच प्रेमानं रेखाटली आहेत. अशी माणसं भणंग असतात ऐहिकबाबींत…त्यासाठी बांधून ठेवणाऱ्या नोकरी व्यवसायात कसलाच रस नसलेली. रिंढे ज्याला पुस्तकवेड्यांचा तत्त्वज्ञ म्हणतात, त्या वॉल्टर बेंजामिनची एक हकिकत पुस्तकात आहे. वडिलांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात गुजराण करणाऱ्या वॉल्टरनं असंख्य पुस्तकं आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला होता. केव्हातरी अडचणींना वैतागून काही पुस्तकं विकण्यासाठी घेऊन तो विक्रेत्यांकडे गेला, परतला तेव्हा त्या पुस्तकांबरोबरच उधारीवर आणलेली आणखी काही पुस्तकं त्याच्याबरोबर होती. पुण्यातल्या म्युझियमवाल्या दिनकर केळकरांची अशीच अधिक करुण हकिकत इथं आठवायला हरकत नाही. कोणतीही वस्तू व्यावहारिक उपयोगासाठी स्वतःजवळ बाळगत नाही, तोच खरा संग्राहक हे वॉल्टर बेंजामिनचं वाक्य रिंढे उदधृत करतात, तेव्हा पटतंच ते.
नानापरींनी केंद्रस्थानी असलेली पुस्तकं, कादंबऱ्या आणि माणसं याबद्दल रिंढे आतल्या उमाळ्यानं लिहितात. जगातली सगळी महत्त्वाची पुस्तकं कधीच वाचून होणार नाहीत, हा विदीर्ण करणारा साक्षात्कार केव्हातरी नादी वाचकाला होतोच, छंदाचं वेडात रूपांतर करणारा क्षण हाच असावा. यापुढच्या प्रवासाचीही अनेक रूपं या पुस्तकात भेटीला येतात.
कधीच वाचायला मिळणार नाहीत अशा काळाच्या उदरात गडप झालेल्या पुस्तकांबद्दलचं ‘बुक ऑफ लॉस्ट बुक्स’...युरोपातल्या मुद्रित माध्यमाच्या पाच-सहाशे वर्षांतल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या इतिहासाचे सर्ग…मानवजातीच्या वाचनसवयीचा इतिहास उलगडणारं ‘हिस्ट्री ऑफ रिडींग’...आयुष्यभर देशोधडीला लागल्यासारखा जगभर फिरत उभ्या केलेल्या ग्रंथसंग्रहाचा आणि त्यासंदर्भात एकंदर ग्रंथालयाचाच इतिहास मांडणारं मॅंग्वेलचं ‘लायब्ररी अॅट नाईट’...रात्रीच्या वेळी त्याच्या संग्रहातल्या पुस्तकांनी केलेली ही कुजबूज असं रिंढे म्हणतात, तेव्हा यातल्या व्यासंगाचा अंशही नसलेल्या माझ्या अंगावर शहारा येतो. स्वप्नांना शक्यतांचे पंख फुटावेत इतकी आणि अशी पुस्तकं...
महत्त्वाच्या पुस्तकांतल्या समासात वाचकांनी केलेल्या नोंदी, पुस्तकांच्या अर्पणपत्रिका, दुर्मिळ पुस्तकांच्या खरेदी विक्रीचं अदभुत जग, पुस्तकं आणि लेखक यांच्याविषयीच्या दंतकथा असा अनेकांगांनी विषय फुलत विस्तारत राहतो…वेगळ्या जगातलं हे नखशिखान्त भिजणं अतिव आनंददायक आहे....
.............................................................................................................................................
‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी - नितिन भरत वाघ
पूर्वार्ध - https://www.aksharnama.com/client/article_detail/1933
उत्तरार्ध - https://www.aksharnama.com/client/article_detail/1932
पुस्तकांच्या जगातल्या अशा अनेक विसंगती, गमतीजमती ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकांवर अफाट प्रेम करणारी, पुस्तकवेडी माणसं पानोपानी भेटत राहतात. सदर पुस्तकात आधुनिक काळातील अनेक पुस्तकवीरांच्या गोष्टी आलेल्या आहेत. तरी पुस्तकांविषयी प्रेम असणारे वेडे सर्वच काळात उपलब्ध असलेले दिसतात. इसपू दुसर्या शतकातील ‘लेटर्स ऑफ अरिस्टीस’ (Letter of Aristeas) या पत्रांच्या संकलनात दिमित्रीयस या पुस्तक वेड्याची इच्छा काय आहे ते सांगितले आहे. “दिमित्रीयसने आपल्या बजेटचा पैश्यांचा मोठा हिस्सा ग्रंथसंग्रहासाठी खर्च केला आहे, जर शक्य झाले तर त्याच्या क्षमतेनुसार जगातली सगळी पुस्तकं तो जमवेल.”
पुस्तकाविषयीची पुस्तकं म्हणजे काय, कोणत्या पुस्तकाला पुस्तकाविषयीचं पुस्तक म्हणता येऊ शकतं, अशा पुस्तकांची व्याप्ती किती आणि कशी असू शकते याबाबत परिपूर्ण विवेचन नीतीन रिंढे यांनी केलेलं आहे. पुस्तकांविषयीची पुस्तकं आणि एकूणातच जागतिक पुस्तक संस्कृतीच्या इतिहासाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात घेतलेला आहे. पुस्तक लेखनापासून ते पुस्तक निर्मितीपर्यंत विविध टप्प्यांची माहिती लेखांमध्ये मिळत राहते.
जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राहील.
.............................................................................................................................................
‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/3383/Leela-Pustakanchya
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment