‘रिंगाण’ : मराठी कादंबरीचं एक नवं वळणरूप
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रणधीर शिंदे
  • कृष्णात खोत आणि त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 24 January 2020
  • ग्रंथनामा शिफारस कृष्णात खोत Krushnat Khot रिंगाण Ringan

‘रिंगाण’च्या निमित्ताने मराठी कादंबरी लेबलांच्या आणि प्रवाहांच्या पलीकडे निघाली आहे. मार्क्सवादातील निसर्ग-मानव संबंधांचा विचार करत होतो, तर मागून कुठून तरी रिंगाण खुणावू लागली. विस्ताराने लिहावं अशी ही कादंबरी आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरीलेखनाने कृष्णात खोत यांनी ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी कृष्णात खोत यांच्या लेखनाला आरंभ झाला आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या. तर ‘नांगरल्याविन भुई’ (२०१७) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी काही कथाही लिहिल्या आहेत.

ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी असणाऱ्या आणि विपुल प्रमाणात लिहिल्या जात असलेल्या कादंबऱ्यांतून शतकभरात महाराष्ट्राचा विस्तीर्णलभू-प्रदेश मराठी साहित्यात प्रवेशित झाला. सत्तरच्या दशकात त्यास चळवळीच्या प्रेरणेतून नवे धुमारे फुटले. तसेच नव्वदीनंतरच्या नवभांडवली कालावस्थेच्या दुविधेचं चित्रण तीमधून आलं. गावगाडा, शेती संस्कृती व तिथल्या सजीव पशू-पक्षीप्राणिजीवनाचं चित्र कादंबरी वाङ्मयातून रेखाटलं. ‘बळीबा पाटील’ (१८८८) ते ‘रिंगाण’ (२०१८) या शतकभराहून अधिकच्या काळात या वाङ्मयस्वरूपात मोठे बदल, स्थित्यंतरं घडली. मध्यमवर्गीय दृष्टीतील गावपाहणीपासून रोमँटिक दृष्टी, विनोदात्म बाजाचं कथनरूप ते गतस्मरणरंजनाची रूपं त्यामधून प्रकटली. परंपरानिष्ठ श्रद्धाभाव आणि नवी समूहदर्शनं तीमधून आली. या पार्श्वभूमीवर मराठी कादंबरीपरंपरेत कृष्णात खोत यांच्या कादंबरीवाङ्मयाकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनानुभवाचा प्रदेश व भूगोल. प्रादेशिक म्हणवल्या गेलेल्या कादंबरीने एक नवा भूप्रदेश साहित्यसृष्टीत आणला. उदा. कोकण, विदर्भ, मराठवाड्याचा भूप्रदेश. (अर्थात ‘प्रादेशिक साहित्य’ ही कोटी आज फारशी प्रचलित नाही.) या प्रकारच्या कादंबऱ्या बऱ्याचदा कुटुंबकेंद्री वा व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाच्या होत्या.

जीवनानुभवाच्या दृष्टीने कृष्णात खोत यांचं कादंबरीविश्व विविधस्वरूपी आहे. गावगाड्यातील समकाळातील जीवघेण्या व्याकूळ प्रश्नांनी जसं त्यांचं कादंबरीजग आकाराला आलेलं आहे, तसंच मानवी जीवन आणि निसर्गसत्ता यांच्यातील सनातन संघर्षाचं खोलवरचं चित्रणही त्यांच्या कादंबऱ्यांत आहे. एक लेखक म्हणून मानवसृष्टी न्याहाळण्याचा त्यांचा दृष्टिबिंदू सहानुभावाचा आणि मानवी कळवळ्याचा आहे. त्यांच्या कादंबरीचं एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे या कादंबऱ्यांची भाषा. प्रदेशभाषा अनेक मराठी कादंबऱ्यांत पाहायला मिळते. मात्र प्रदेशाने नियंत्रित केलेल्या व्यक्तिभाषेचा मनोहारी नकाशा कृष्णात खोत यांच्या सबंध कादंबऱ्यांत आहे. ‘गावठाण’ कादंबरीत आनंदी या मुलीची शोकान्त कहाणी आहे. मात्र तिच्या या जीवनसंघर्षाला आणि पडझडीला अनेक कौटुंबिक, सामाजिक पदरही आहेत. ‘धूळमाती’मध्ये खेड्यातील नवे बदल आणि जमीनविक्री यांतल्या संघर्षाचं चित्रणरूप आहे. जीवापाड कसलेल्या जमिनीचा तुकडा विकताना होणाऱ्या कुटुंबाच्या वाताहतीचं चित्र आहे.

बाहेरच्या अपरिमित बदलाने खेडी आतून धुमसत आहेत. गावगाड्यातील परंपरेतील काहीशी सुरक्षेची चौकट आधुनिकीकरणाने विस्कळित झाल्याच्या खुणा त्यांच्या कादंबरीदर्शनात आहेत. आधुनिकतेचा ग्रामजीवनावर झालेल्या परिणाम-प्रभावाचा एक दृष्टिबिंदू खोतांच्या कादंबरीवाङ्मयात आहे. ‘रौंदाळा’ कादंबरीत समकालीन गावगाड्यातील राजकारणाचं आख्यानरूपक आहे. अल्प कालावकाशाचं व त्यातल्या असंख्य समाज मितीदर्शनातून कादंबरीऐवज साक्षात करणं हे कादंबरीकार म्हणून खोत यांचं वैशिष्ट्य आहे. ‘झड-झिंबड’मध्ये संततधार झडीच्या पावसाची थैमानरूपं आहेत. दिवसागणिक पालटणाऱ्या खलनायक पाऊसरूपाची आणि त्याला सामोरं जाणाऱ्या गावाची जीवितकथा ‘झड-झिंबड’मध्ये आहे. या कादंबरीकडे मराठी समीक्षेचं फारसं लक्ष गेलं नाही. ग्रामीण जीवनातील व्यक्तींचे हे एकल प्रश्न असले तरी ते समूहकेंद्री आहेत. या प्रश्नांच्या सावटाखाली व्यक्तीबरोबर कुटुंब आणि समाजही अपरिहार्य आहे. कृष्णात खोत यांनी पन्हाळ्यालगतच्या वैशिष्ट्यपूर्ण समूहदर्शनाबरोबर तिथला निसर्ग आणि भोवतालची चलसृष्टी वेधक स्थानिक भाषेत आणली. जीवनाच्या इतक्या गतिचक्रात आजही असे समूह त्यांच्या प्राथमिक जीवनशैलीसह, प्रश्नांसह आणि प्रदेशासह नांदत आहेत, याचं भान खोत यांच्या कादंबरीरूपात आहे.

व्यक्ती, कुटुंब, गाव यांतील सहसंबंधाच्या वेगळ्या परी शोधणारे कृष्णात खोत व्यक्ती आणि समूहकेंद्राकडून आता माणूस आणि निसर्ग, माणूस आणि प्राणी यांच्यातील सनातन संघर्षाची रूपं शोधत आहेत. ‘रिंगाण’ मध्ये देवाप्पाची गावापासून उखडल्याची वेदना आणि पाळीव प्राण्यांचं मूळ आदिम हिंस्त्रभावाकडे होणाऱ्या स्थानांतराचं चित्रण आहे. माणूस आणि प्राणी, विकास आणि आधुनिकपूर्व जगातले अंतर्विरोध यांच्यातल्या सूक्ष्म परी ते कादंबरीत आणत आहेत. याआधीही मराठी कादंबरीत विस्थापनाची समूहदर्शनं आलेली आहेत. ‘पाणी’ (बा. सी. मर्ढेकर) ते ‘झाडाझडती’ (विश्वास पाटील)पर्यंत धरणग्रस्तांच्या माहोलाचं चित्रण आहे. मात्र कृष्णात खोत हे समूह-दर्शनाबरोबर मानव आणि निसर्ग, मानव आणि प्राणी यांच्यातल्या संबंधांना विविध परिमाणं प्राप्त करून देत आहेत.

विकास, प्रगतीच्या चौखूर वाटचालीत अनेक प्रकारचे अंतर्विरोध निर्माण होत आहेत. धरण बांधल्यानंतर स्थानिक आपल्या गावा-मुळांपासून तुटतात. ही वेदना आयुष्यभर पीडित समूहांना वागवावी लागते. ‘नदार जाईल तिथवर दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर, टेकड्या, फड्या निवडुंगाच्या ताटव्याबरोबर’ सारी स्थानिक जैवविविधता त्यातल्या मानवी गुंतवणुकीसह नाहीशी होते आहे. ‘निचळ दुधात धरणाचं मीठ पडलं’ आणि अंगात सारा मुलूख संचारलेल्या देवाप्पाला बुडालेल्या गावाची अस्वस्थ वेदना आहे. झाडापेरात, झुडपांत, वाटंकुटंत लपलेल्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या देवाप्पाची शोकान्त कहाणी कादंबरीत आहे. विस्थापितांच्या जगाचा दीर्घ चित्रणपट आहे. माणसांचं परागंदापण आणि हजारो वर्षांपासूनच्या हाडीमासी रुजलेल्या प्रदेशापासून अलग होण्याची जीवघेणी घुसमट कादंबरीत आहे. ‘देवाप्पा, हे शेत तुझं नाही’, ‘काय आसंल त्यो भरला शेर इथंच लवंढू दे’ अशा भाषारूपातून मानवी जीवनाचं दर्शन घडवलं आहे.

एका बाजूला भूमीपासून उखडून फेकल्याची त्रासदायक जाणीव आणि त्याची परिणती अस्वस्थता सभोवतालच्या जगात आहे. ग्रामीण जीवनातील जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या म्हशी आणि रेडे हे क्रमश: हिंस्त्रतेकडे झुकतात. भूमीच्या आणि आपल्या म्हशीच्या शोधात देवाप्पा जेव्हा जंगलभूमीत जातो, त्या वेळी एका विलक्षण महानाट्याला सुरुवात होते. प्राण्यांचाही रहिवास बदलल्यामुळे त्यांच्यात हिंस्त्र स्वरूपाचा पालट होतो. देवाप्पा आणि म्हशींचं एकमेकांवर धावून येण्याच्या जीवघेण्या झटापटीचं खेळरूपक कादंबरीत आहे. रक्तांचे चिंदके आणि मांसाच्या विखुरलेपणात म्हसरांच्या रिंगणात देवाप्पाचा करुण अंत होतो. देवाप्पा आणि मुदीवाली म्हशीतील कडेलोटाच्या संघर्षात देवाप्पाचा ‘रक्तमांसाचा काला काला आणि रक्तमांसाचं रिंगण’ होतं. हद्द गाठणं आणि हद्द सोडणं आणि परत हद्दीच्या शोधाची ही यात्रा आहे. कादंबरी एका महाव्याकूळ आदिम प्रश्नाला साक्षात करते. आपल्या हद्दीचं रिंगण करून उभी असणारी म्हसरं आपली मुळं तुटू देत नाहीत. प्रक्षोभ आणि हिंस्त्र आक्रमणात परिणत झालेल्या म्हसरांच्या विराट प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर माणूस किरटा, हतबल वाटायला लागतो.

कादंबरीत एका प्रदेशाची, रानावनाची जैवविविधता तिथल्या प्रदेश, रंगगंधासह साकार झाली आहे. मानवाचा व पाळीव प्राण्यांचा भूमिशोध, त्यांचं हरवले-हिरावलेपण आणि प्राण्यांची क्रमश: हिंस्त्ररूपात रूपांतर होण्याची प्रक्रिया त्यात आहे. विस्थापन, आधुनिकतेचे पेच, प्राण्यांची मूळ आदिम हिंस्त्रता, माणूस आणि निसर्ग यांतील अनेक परिमाणांना साकार करणारी ही कादंबरी आहे. कादंबरीत डोंगरावरील अनंत प्रकारच्या माजलेल्या रानभाज्या ते भरगच्च जंगलमेव्याचा सजीव परिसर साकारला आहे. तृतीयपुरुषी कथन आणि देवाप्पाच्या आत्मपर कथनाच्या संगमिसळीतून एक अनोखं कथनरूप कादंबरीत आहे. चिटुकल्या, अल्पाक्षरी शब्दबंध आणि वाक्यबंधांच्या कथनशैलीने त्याला वेगळं परिमाण प्राप्त झालं आहे.

अधिकाधिक आत आत ओढणाऱ्या कोल्हापुरी व्यक्तिबोलींचं गोष्टीवेल्हाळ भाषारूप कादंबरीत आहे. मराठी कादंबरीत एका अनोख्या विचारसूत्राचं आणि प्रदेशसंचितांचं वैभव दाखवणारं हे कथनरूप आहे. मराठी कादंबरीपरंपरेत मानव आणि मानवेतर सृष्टीचं चित्रण फारसं आलेलं नाही. या प्रकारचं चित्रण काहीएक प्रमाणात व्यंकटेश माडगूळकर, अनंत मनोहर, सुरेश शिंदे यांच्या साहित्यात आहे. त्यामुळे आधुनिकतेचे पेचप्रश्न, विस्थापन, माणूस आणि निसर्ग-प्राणी यांच्यातील संघर्षाचं प्रभावी चित्रण करणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे. ‘रिंगाण’ ही कादंबरी मराठी कादंबरीचं एक नवं वळणरूप आहे.

(‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या २०२०च्या स्मरणिकेतून साभार)

.............................................................................................................................................

‘रिंगाण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4376/Ringaan

.............................................................................................................................................

रणधीर शिंदे

randhirshinde76@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......