अजूनकाही
ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांचं नुकतंच आपल्या देशात आगमन झालं आहे. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते आपले सन्माननीय पाहुणे असतील.
बोल्सोनारोंचा जन्म १९५५ मधला. तिथल्या लष्करी अकादमीतून १९७७मध्ये पदवी घेऊन ते बाहेर पडले. त्यानंतर १९८८पर्यंत ते लष्करी सेवेत होते. लष्करातून बाहेर पडल्यावर त्यांनी ‘हिओ दि जानेरो’ (Rio de Janeiro) शहराच्या निवडणुकीत भाग घेतला आणि तिथं निवडणूक जिंकली. त्यानंतर ते ब्राझीलच्या राजकारणात आले. हिओ दि जानेरो शहराचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी ओळीनं सात वेळा निवडणुका जिंकल्या. विचारानं ते ‘परंपराप्रिय राष्ट्रवादी’ म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी वेगवेगळ्या वेळी जी विधानं केली होती, त्यामुळे ‘अतिरेकी विचारांची व्यक्ती’ म्हणून ते अधिक गाजले. परिणामी त्यांच्या वाट्याला फार मोठी पदं आली नाहीत.
ब्राझीलमध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली, तिच्यात ते सोशल ख्रिश्चन पक्षातर्फे उमेदवार म्हणून उभे होते. ही निवडणूक ब्राझीलमधल्या या पूर्वीच्या शासनाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चांगलीच गाजली. ‘पेट्रोब्रास’ या तेलकंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचं एक प्रकरण ब्राझीलमध्ये गाजत होतं. अनेक उच्चपदस्थ राजकारण्यांची नावं या प्रकरणाशी जोडली जात होती. त्याच वेळी मंदीच्या तडाख्याने ब्राझीलची अर्थव्यवस्था गांजली होती. डाव्या विचारांच्या जिरुमा हुसेफू (Dilma Rousseff) या दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून सत्तेवर होत्या. पण त्यांच्यावर देशाच्या अंदाजपत्रकाविषयीच्या कायद्यांचा भंग करण्याचे आरोप झाले. (त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचार केला असे आरोप विरोधकांना करता आले नाहीत. पण पेट्रोब्रास कंपनीतल्या भ्रष्टाचारापासून त्या अंतर राखू शकल्या नाहीत असं विरोधकांनी म्हटलं.) अखेरीस जिरुमा हुसेफू यांच्यावर कारवाई होऊन त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. आपण देशातल्या भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू; तसंच ब्राझीलमधली गुन्हेगारी आणि खूनबाजी यांना आळा घालू, अशी आश्वासनं बोल्सोनारोंनी दिली. ही निवडणूक बोल्सोनारोंनी डाव्या आघाडीचा पराभव करून जिंकली. १ जानेवारी २०१९ रोजी बोल्सोनारोंचा कार्यकाल सुरू झाला.
कसे आहेत जाइर बोल्सोनारो?
बोल्सोनारोनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लष्करापासून केली होती. परिणामी लष्कराबद्दल त्यांना विलक्षण ममत्व आहे. चिले हा दक्षिण अमेरिकेतला एक देश. १९७१ साली साल्वादोर आयंदे यांचं सरकार तिथं निवडून आलं होतं. पण त्या देशाचे जनरल जनरल पिनोशे यांनी लष्करी कट करून ते सरकार १९७३ मध्ये उलथून टाकलं; आपली हुकूमशाही आणली आणि नंतर भीषण हत्याकांडं घडवून आणली. हे सगळं दुनियेला माहीत आहे. तरीपण जनरल पिनोशेचं बोल्सोनारो समर्थन करतात. पिनोशेंनी आणखी काही माणसं मारायला हवी होती, असं वक्तव्य बोल्सोनारोंनी केलं. (विरोधकांचा) छळ करायला आपला विरोध नाही, असंही वक्तव्य बोल्सोनारोंनी केलं आहे. आपल्या विरोधकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, असं बोल्सोनारो एका ठिकाणी म्हणतात.
१९६४ ते १९८५ या काळात ब्राझीलमध्ये लष्करशाही होती. त्या काळाचं स्मरणरंजन करणं त्यांना आवडतं. १९६४मध्ये झालेला लष्करी कट हा त्यांच्या मते क्रांती होती. हा कट घडवून आणणारा कर्नल कार्लोस ब्रिहन्ते उस्त्रा याची राजवट त्याने राजकीय विरोधकांच्या केलेल्या छळासाठी गाजली. त्याने ब्राझीलमध्ये २१ वर्षं सत्ता गाजवली. बोल्सोनारो हे उस्त्राला हीरो मानतात. या राजवटीनं माणसांचा छळ केला, पण माणसं मारली नाहीत, ही त्यांची चूक झाली, असं बोल्सोनारोंनी रेडिओवर दिलेल्या एका मुलाखतीत २०११ मध्ये म्हटलं होतं. ब्राझीलमधले त्या काळातले लष्करी अधिकारी आपल्या शासनात भरती केले पाहिजेत, असं मतप्रदर्शन बोल्सोनारोंनी केलं आहे.
एकदा हे पाहिल्यावर लोकशाही आणि लष्करी हुकूमशाही या दोहोंपैकी त्यांना काय पसंत असेल, या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं आहे. पण ते याच्याही पुढे जातात. ते म्हणतात - मतदान करून या देशात कदापीही बदल होणं शक्य नाही. इथं जेव्हा यादवी होईल आणि तीसएक हजार माणसं मारली जातील, तेव्हाच काहीतरी बदल होऊ शकतो. आणि अशा यादवीत काही निष्पाप माणसं मारली गेली, तरी त्यात काही वावगं नाही.
ते स्त्रियांना कसे दुय्यम लेखतात याविषयी काही घटना आणि वक्तव्यं उपलब्ध आहेत. ‘मी तुझ्यावर बलात्कार करणार नाही; कारण तुझी तेवढीही पात्रता नाही’ असं २००३ मध्ये एका महिलेला उद्देशून ते म्हणाले होते. २०१५ मध्ये जेव्हा बोल्सोनारो एक साधे सिनेटर होते, त्या वेळी एका महिलेबद्दल गलिच्छ उद्गार काढण्यावरून तिथल्या न्यायालयानं त्यांना दंड ठोठावला होता. ‘‘मला पाच मुलं आहेत. त्यातले चार मुलगे आहेत. पाचव्या वेळी मी थोडा दुबळा पडलो. त्यामुळे मला मुलगी झाली,’’ असं एक विनोदी वक्तव्य त्यांच्या नावावर जमा आहे.
समलिंगी संबंधांबद्दल त्यांना तिरस्कार आहे. ‘जर माझा एखादा मुलगा समलिंगी निघाला असता तर तो जिवंत राहण्यापेक्षा कुठल्यातरी अपघातात मेलेला बरा असं मला वाटलं असतं’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ट्रान्सजेंडर किंवा तत्सम व्यक्तींबद्दलाही त्यांना मुळीच आस्था नाही.
त्यांचा वंशवाद त्यांच्या विविध वक्तव्यांमध्ये डोकावत असतो. तुमचा मुलगा जर एखाद्या काळ्या रंगाच्या मुलीबरोबर डेटिंग करायला लागला तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न एका कृष्णवर्णीय महिला पत्रकारानं त्यांना विचारला होता. त्यावर बोल्सोनारोंचं उत्तर असं - तुम्ही जशा वातावरणात वाढलात तसल्या वातावरणात माझी मुलं वाढलेली नाहीत. ती उत्तम वातावरणात वाढली आहेत. त्यामुळे मला हा धोका संभवत नाही.
एकेकाळी गुलाम असलेल्या लोकांच्या (काळ्या रंगाच्या) वंशजांची एक वसाहत ब्राझीलमध्ये आहे. सुमारे ५०० माणसांच्या एका सभेत बोलताना त्यांनी तिथल्या रहिवाशांबद्दल म्हटलं होतं - हे लोक बांडगूळं आहेत. देशाची साधनसंपत्ती ते पळवून नेत आहेत. ते बिनकामाचे आहेत. मुलांना जन्माला घालायलासुद्धा त्यांचा काही उपयोग नाही.
फुनाई (FUNAI) नावाचं एक प्रतिष्ठान तिथल्या दबल्या गेलेल्या मूळ रहिवाशांना जमिनींचं फेरवाटप व्हावं यासाठी काम करतं. त्याबद्दल बोल्सोनारो म्हणतात - देशातली सर्वांत सुपीक जमीन तिथं वर्षानुवर्षं राहणाऱ्या गोऱ्या वर्णाच्या लोकांकडून काढून घेऊन काळ्या वर्णाच्या आणि मूळ रहिवाशांना मिळाव्या म्हणून ही संघटना काम करते आहे. अर्थातच बोल्सोनारोंना ते मान्य नाही. स्वयंसेवी संघटना आणि सामाजिक चळवळी या देशाच्या संसाधनांवर डल्ला मारत आहेत, असं एक मतही बोल्सोनारोंनी मांडलं आहे. आपण निवडून आलो तर जमिनीच्या फेरवाटपाची चळवळ करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटना यांना एक छदामसुद्धा मिळणार नाही. उलट या सर्वांशी लढता यावं म्हणून मी प्रत्येक घरात एक बंदूक देईन, असं त्यांनी आपल्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं.
धर्मनिरपेक्षतावादाबद्दलची त्यांची मतं आपल्या हिंदुत्ववाद्यांच्या मतांना समांतर जाणारी आहेत. ते म्हणतात - हा ख्रिश्चन देश आहे. ख्रिश्चनांखेरीज बाकीच्या सगळ्या धर्मांच्या लोकांनी राजकीय जीवनात राहू नये; कारण ते इथले खरे नागरिक नाहीत. इथल्या अल्पसंख्याकांनी आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे किंवा बहुसंख्याकांच्या मतांप्रमाणे स्वतःला मुरड घातली पाहिजे. इस्लाम आणि इतर आफ्रिकन धर्म हे आपल्या ‘राष्ट्रीय धर्मा’ला विरोधी आहेत; ते धर्म दहशतवादाला मुक्तद्वार देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. मात्र ज्यू हे ख्रिश्चन धर्मीय आहेत.
बोल्सोनारोच्या विचारांचा एकूण आवाका आणि कल पाहिला तर खाजगी संपत्तीच्या पुनर्वाटपाला त्यांचा विरोध असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
बोल्सोनारो आणि त्याचे दोन मुलगे - फ़्लाविओ आणि एदुआर्दो - हे सगळे नाझीवादाचे समर्थक आहेत. २०१५ साली घडलेली एक गोष्ट या दृष्टीने महत्त्वाची आहे. प्रा. मार्को अन्तोनिओ नावाचे एक गृहस्थ मानवाधिकार समितीच्या एका चौकशीसाठी हिटलरचा पेहराव करून गेले होते. आणि बोल्सोनारोंचा सदर गृहस्थांना पाठिंबा होता. आणखी एका वंशवादी संघटनेलासुद्धा बोल्सोनारोंनी पाठिंबा दिल्याचं नमूद आहे. ब्राझीलमध्ये कम्युनिस्ट पक्षावर बंदी का असू नये, असं या संघटनेचं म्हणणं होतं. अर्थातच वंशवादी संघटनांबद्दल मात्र तिचं काहीच म्हणणं नव्हतं.
बोल्सोनारो यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षातच चित्रपट निर्माते, कलाकार, विचारवंत, पत्रकार, ॲमेझॉन वर्षावनांच्या आत किंवा जवळपास राहणारे मूळनिवासी आणि पर्यावरणवादी या सर्वांबरोबर त्यांनी अघोषित युद्ध पुकारलं आहे. ते सत्तेवर आल्यापासून गरीब वस्त्यांत राहणाऱ्या काळ्या रंगाच्या व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. स्वतंत्र विचाराचे पत्रकार आणि माध्यम-कंपन्यांना वाढत्या विरोधाला तोंड द्यावं लागत आहे. बोल्सोनारोंबद्दल तुम्ही टीकेचा सूर काढलात की, लगेच त्यांच्या विरोधकांच्या रोषाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तुम्ही स्त्री पत्रकार असलात की, विचारायलाच नको. तुमची तुलना लगेच वेश्येशी केली जाते.
आणखी एका मुद्द्यासाठी बोल्सोनारो जगात प्रसिद्धी पावले आहेत. २०१९ मध्ये त्यांची अध्यक्षीय कारकीर्द सुरू झाल्यावर मे महिन्यांपासूनच ब्राझीलमधल्या वर्षावनांत मोठ्या प्रमाणावर वणवे लागायला सुरुवात झाली. वास्तविक पाहता पूर्वीसुद्धा तिथे वणवे लागतच होते. पण बोल्सोनारोंच्या कारकीर्दीत त्यांत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे जागतिक रोषाला त्यांना तोंड द्यावं लागलं. बोल्सोनारोंनी वणव्यांकडे दुर्लक्ष केलं, त्याचं कारण वेगळं होतं. त्यांना मनातून या वर्षावनांपेक्षा तिथली उपजाऊ जमीन दिसत होती. ती पाळीव जनावरांसाठी कुरणं, शेती आणि खाणकाम यांच्यासाठी मोकळी व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्याबद्दल त्यांच्यावर भरपूर टीका झाली.
हे सगळं खरं तर एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. बोल्सोनारोंचे गुण लक्षात घेतल्यावर त्यांची काय भूमिका असेल याचा अंदाज लावणं कठीण नाही. अशा अनेकविध गुणांमुळे त्यांचा ‘दक्षिणेकडचे ट्रम्प’ असा कधीकधी उल्लेख केला जातो.
तर असे हे आपले प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे. मोदींनी त्यांना पाहुणे म्हणून का बोलावलं असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क होऊ शकतात. राजकारणात अनेकदा आपल्याला न आवडत्या पाहुण्याबरोबर संवाद करावे लागतात. त्यातून अनेक करार-मदार होत असतात. ती गोष्ट वेगळी. पण सामान्य भारतीयाला पाहुण्यांचं वागणं आवडलं पाहिजेच असं नाही.
.............................................................................................................................................
लेखक अशोक राजवाडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
ashokrajwade@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment