नुकतीच पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हे नवेकोरे साप्ताहिक सदर...
शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजालादेखील अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि अहंकार, कशा प्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावरची निष्ठा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पहिल्या महायुद्धाच्या या इतिहासातून सापडायला मदत होईल, अशी अशा वाटते.
.............................................................................................................................................
“Lamps are going out all over europe : We shall not see them lit again in our life time.”
- सर एडवर्ड ग्रे, ब्रिटनचे तत्कालीन परदेश सचिव
(सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत की, आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पाहायला मिळणार आहेत...)
विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते. मानवी संस्कृतीच्या / सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ या आधी कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी, वैद्यकीय, इंजिनियरिंग, अवकाश संशोधन, अशा सर्वच क्षेत्रांतली झंझावाती प्रगती आणि त्याने निर्माण केलेले असंख्य अक्राळविक्राळ प्रश्न, हे या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकीकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या या गोष्टी विसाव्या शतकात महत्त्वाच्या ठरल्या नाहीत, तर एकूणच औद्योगिकीकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे अमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हेदेखील पाहायला मिळाले. (हुकूमशाही जरी राजेशाहीचेच एक ‘भेस बदला हुआ रूप’ असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकूमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले ही विशेष उल्लेखनीय बाब. तसेही हुकूमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले. त्याआधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.)
विसाव्या शतकात ही परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली. त्यामुळे इथे अब्राहम लिंकनच्या १९व्या शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही.
“The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise -- with the occasion. As our case is new, so we must think anew, and act anew. We must disenthrall ourselves, and then we shall save our country.”
- Abrahm Lincoln, Washington, D.C., December 1, 1862, Speech at Annual Congress meet
(गत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे पडत नाहीत. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते की, आपल्याला बऱ्याचदा नवा विचार/ नवे उत्तर, नवी समीकरण शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरू होतं.)
विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्धे पहिली. खरे पाहू जाता पहिल्या महायुद्धाचेच पर्यावसान दुसरे महायुद्ध होते. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पाहिला-अनुभवला, नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला. कोणत्याही प्रकारचे उच्च तत्त्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरू झाले नाही. (अर्थात जसा दावा या युद्धातल्या जेत्यांनी केला, तसा तो दुसऱ्या महायुद्धाबाबतदेखील केला.) तरीदेखील या युद्धात एकूण २४ लहान-मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला. एक अंटार्क्तीका हे खंड सोडले तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र या युद्धात सामील झाले. युद्ध संपेपर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्ये लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार-साडेचार महिन्यांतच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील, असे सगळ्यांना वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्षे हे युद्ध चालले आणि यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले, तर २ कोटी १२ लाखांवर लोक जखमी झाले.
१९१४चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २ टक्के लोक या युद्धात कामी आले. १९व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था हादरून गेली... हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशात लढले गेले. प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हेदेखील जणू एक युद्ध क्षेत्रच बनवले गेले. मशीनगनसारख्या शस्त्राचा वापर आधीही माहिती होता, पण चाल करून येणाऱ्या सैनिकांच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या साह्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे या आधी वापरले गेले नव्हते. साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौऱ्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवातीपासून भरडली जाऊ लागली.
पण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, उड्डाण, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रांत प्रचंड वेगाने प्रगती झाली. वैद्यकीय क्षेत्र या साडेचार वर्षांत आधी कधीच झाले नव्हते, इतक्या झपाट्याने विकसित झाले. सेवा-शुश्रुषा, सर्जरी प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, प्रत्यारोपण, मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रांतल्या असंख्य शाखांचा विकास झाला.
युद्धाआधीही लोकांना विमान, मोटारी माहिती होत्या, रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या, पण या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली. आफ्रिका आशियातल्या अनेक देशांना/ मानव समूहांना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदलही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकाराठीचे/स्वातंत्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरी हक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना) हेदेखील अंशत: या युद्धाचेच फलित.
वसाहतवाद आणि त्या वसाहतीतून मिळणाऱ्या उर्जेवर इंग्लंड-फ्रान्ससारखे युरोपीय देश आपले उच्चतर मानवी संस्कृतीचे मळे फुलवत होते. तर इटली-जर्मनीसारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला या आधीच जुन्या भिडूंनी बळकावलेल्या वसाहतीताला हिस्सा कसा लाटता येईल या विवंचनेत होते.
खरे तर त्यामुळेच या युद्धाचा वणवा पेटला होता. या युद्धाने प्रचलित साम्राज्यवादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला. अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत, पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले. तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातील राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो यात वरचढ ठरत असे, तोच सगळ्या जगाच्या सत्ता सामातोलावर प्रभाव टाकत असे.
या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नाही तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. त्यालाही मर्यादित प्रमाणात का होईना पण यश मिळाले.
परिस्थिती इतकी स्फोटक बनली कशी?
आपल्या सर्वांना हे माहिती आहे की, पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारण झाले ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स) आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांचा २८ जून १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला खून. बोस्निया हा त्यांच्या-ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून वाचून असतात त्यांना ही एवढी माहिती असतेच असते. आणि म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थितीपासून सुरुवात करूया.
१९व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी
ज्याप्रमाणे १८५७च्या बंडाची कारण शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही, तसेच पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते. १९व्या शतकातल्या युरोपचा विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीच्या इतिहास तर इतका गुंतागुंतीचा आहे की, ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटला होता की, जगात फक्त तीन लोकांना या प्रश्नाची खरोखर माहिती आहे. पहिला म्हणजे प्रिन्स अल्बर्ट (इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाचा नवरा), पण तो आता हयात नाही. दुसरा जर्मन प्रोफेसर आहे, पण तो वेडा झालाय आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.
मुळात १९व्या शतकाचा बराचसा काळ (साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषक फुटकळ राज्ये. इसवी सनाच्या १५व्या शतकापासूनच कधी पोलंड कधी फ्रान्स, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले की, प्रशियामध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणत की, काय असे आपल्याला वाटावे!
तर या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट (फ्रेडरिक दुसरा) याने पोलंड, फ्रान्स आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे, पण शक्तिशाली साम्राज्य (खरे तर राज्य!) स्थापले. साल होते १७७२.
इतक्या दीर्घ काल म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्धरत राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक थोडक्यात युद्धखोर बनला असल्यास नवल नव्हते. मात्र पुढे जेव्हा फ्रान्समध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली, तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विल्यम दुसरा. हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्व काही लाभली, पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले.
नेपोलिअन – रणकुशल सेनानी ते सर्वसत्ताधीश सम्राट
हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलियनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलियनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता. १७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषक असा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विल्यम तिसरा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले, पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलियनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलियनने संपूर्ण प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला. या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्ये सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलियनने यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकांत विलय करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी ही छोटी छोटी राज्ये नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रूमुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली.
पुढे १८१५ साली जरी नेपोलियनचा वाटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव झाला असला तरी या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड. या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला, प्रशिया स्वतंत्र झाला आणि फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे, हे ओळखून प्रशिया आणि ही ३९ जर्मन भाषक राज्ये एकत्र येऊन त्यांनी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला. सुरुवातीला यात ऑस्ट्रियादेखील सामील झाला होता, पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्त्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला.
१८४० साली प्रशियाच्या गादीवर आला फ्रेडरिक विल्यम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे की, आतापर्यंत आपण जी भांडणे लढाया गटतट शह-प्रतिशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. देश, राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्या स्वरूपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरे तर १८व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनातर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते, पण नेपोलियनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ घातली.
अर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले. जरी हे सगळे उठाव फ्रेडरिक विल्यम चौथा याने मोडून काढले असले तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलियानिक युद्धातून (१८०३-१८१५) युरोपमध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होताच, पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात (अर्थात इंग्लंडचा अपवाद).
अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती चालीरीतींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला (१८४९), पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठेपण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षांनी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विल्यम चौथा याने गादी सोडली अन त्याचा भाऊ विल्यम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला (आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही, पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.
या प्रिन्स बिस्मार्कमुळे प्रशियाच्या आणि एकंदर युरोपच्या राजकारणावर आणि सत्तासमतोलावर परिणाम झाला. त्याबद्दल पुढील भागात...
.............................................................................................................................................
या सदरातील आधीच्या लेखासाठी पहा -
२०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!
https://www.aksharnama.com/client/article_detail/3952
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
???? ????????? ???????? ?????
Sun , 26 January 2020
when would be the next part?