१५ जानेवारी २०२० रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘गिरीश कार्नाडांचे समकालीनत्व : रंगभूमी आणि साहित्य’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक अजित देशमुख यांनी केलेल्या समारोपाच्या भाषणाचा हा संपादित अंश…
.............................................................................................................................................
प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाडांच्या नाटकांतील काही व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचे विशिष्ट वर्तन यांची चर्चा मला करावीशी वाटते. संपूर्ण नाटकाचा विचार करता त्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे विशिष्ट वर्तन कदाचित उठून दिसणार नाही, कदाचित लक्षात येणार नाही, म्हणून मला त्याबाबत काही विचार मांडावासा वाटत आहे.
‘अग्नि आणि पाणी’ या नाटकातील ‘परावसू’ आणि ‘अर्वसू’ यांच्याबाबत मी प्रथम बोलतो. मला या व्यक्तिरेखांच्या वर्तनाचा विचार करावासा वाटला, कारण गेल्या सहा-सात वर्षांत आपल्या देशात चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यांचे भारतीय जनतेवर उमटणारे पडसाद. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने सत्ता ताब्यात घेतली. त्या वेळच्या निवडणुकीच्या आधीपासूनच आपल्या देशात वेगवेगळ्या प्रचार आणि अपप्रचाराच्या लाटा निर्माण होत होत्या.
गेल्या सहा वर्षांत असा एकही महिना नसेल ज्या महिन्यात एखादी नवी लाट धडकली नसेल आणि तिने भारतीय जनतेच्या मनात उलथापालथ केली नसेल. आधुनिक काळाच्या महिम्यामुळे आज आपण फेसबुक, व्हॉटसअॅप यांनी जोडले गेलो आहोत. जवळपास सगळी वर्तमानपत्रे आणि सगळ्या टेलिव्हिजन वाहिन्या आपल्या हातात ऑनलाइन उपलब्ध आहेत. आणि या सगळ्यांमधून आपल्यावर वेगवेगळ्या माहितीचा मारा होतो आहे. या सगळ्या यंत्रणेचा वापर करून प्रचार आणि अपप्रचाराच्या लाटा निर्माण केल्या जात आहेत.
भारतीय जनतेच्या भावनांना हात घालून, त्यांना उत्तेजन देऊन भूमिका घ्यायला भाग पाडले जात आहे. जनता कधी त्या लाटांना बळी पडताना दिसते, तर कधी लाटा परतवून लावताना दिसते. आपण सगळे सातत्याने एक भावनाप्रधान डेलीसोप जगत आहोत असा अनुभव आपल्याला येत आहे. भावना दुखावल्या म्हणून हिंसक मोर्चे निघाले, भावनांचा प्रक्षोभ झाल्यामुळे निर्घृण हत्या घडल्या, भावनिक कारणांमुळे दोन गटात दंगली झाल्या, अशी अनेक उदाहरणे देता येतील.
या सगळ्यात आपल्याला आपल्या खास भारतीय वर्तनाचा विसर पडला आहे असे मला वाटते. विशेषतः भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या धर्मांनी भावनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत केलेला आग्रह आणि त्यासाठी शोधून काढलेली तंत्रे यांचा आपल्याला अगदी विसर पडला आहे.
या संदर्भात मला ठळकपणे आठवतो, तो ‘परावसू’, ‘अग्नि आणि पाणी’ या नाटकातील सप्तवर्षीय यज्ञसत्राचा अध्वर्यू. सलग सात वर्षे चालणाऱ्या यज्ञासाठी परावसू आपल्या कुटुंबापासून, बायकोपासून दूर गेलेला आहे. सत्र संपायला अवघा एक महिना शिल्लक असताना परावसूची बायको, विशाखा, तिच्या लग्नाआधीच्या, यवक्री नावाच्या प्रियकराबरोबर एकांत उपभोगते. ही गोष्ट परावसूच्या वडिलांना कळते आणि ते एका ब्रह्मराक्षसाकरवी यवक्रीची हत्या करतात. या पार्श्वभूमीवर परावसू यज्ञसत्राचा नियम तोडतो आणि यज्ञसत्र सोडून घरी येतो. आता पुन्हा एकदा शाप, हत्या होऊ लागतील असे वाटून जाते.
मात्र परावसू विशाखा समोर आल्यावर तसे काहीही घडत नाही. परावसूचे वागणे आणि बोलणे अत्यंत नियंत्रित आहे. त्याचा राग, द्वेष, तणाव दिसत नाही. विशाखाबरोबर त्याचा संवाद होतदेखील नसावा असे वाटावे इतके मोजके आणि स्पष्ट तो बोलतो. मात्र एका क्षणी अत्यंत अनपेक्षितपणे तो आपल्या पित्याची हत्या करतो. हत्येची व्यवस्थित कारणमीमांसा देतो. त्यानंतर लहान भावाला पित्याच्या अंत्यसंस्कारांबाबतच्या व्यवस्थित सूचना देऊन यज्ञभूमीकडे निघून जातो. ही भूमिका करायला नटांना आवडू नये आणि प्रेक्षकांनादेखील त्याचा वैताग यावा इतक्या कृत्रिमपणे त्यांचे बोलणे-वागणे लिहिलेले आहे. भडक नाट्याचा सोस असलेल्या एखाद्या नवोदित दिग्दर्शकाला हा प्रसंग बदलावा वाटेल, इतका तो प्रसंग साधा सरळ आहे. तो असे का वागतो?
मला परावसूचे हे वर्तन खास भारतीय परंपरेतील आहे असे वाटते. गीता सांगते –
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः। आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।2.14।।
इंद्रियांचे संयोग हे शीतोष्ण, सुख दुःख देणारे असतात. तसेच ते उत्पत्ति आणि विलय यांनी युक्त असतात. भारता तू ते सहन कर. अर्थात भावनांचे क्षोभ हे येणारे जाणारे असतात. त्यांना सहन करावे. त्यांचे शमन होण्याची वाट पहावी वा प्रयत्नपूर्वक त्यांचे शमन करावे.
परावसूच्या वर्तनात ते दिसते. त्याने त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवलेले आहे असे दिसते. जे घडून गेले त्याबाबत खंत नाही, तो आता जे घडवणार आहे, त्याबाबत तो उतावीळ नाही, तो जी हत्या करतो, त्याबद्दल अपराधभाव नाही, भविष्यात त्याला जे काही साधायचे आहे, त्या दिशेने तो ठामपणे जातो. नाटकात एका ठिकाणी परावसू म्हणतो की, मी यज्ञसत्राची जबाबदारी स्वीकारली, कारण त्यात सामील झालेले लोक भावनेच्या कोलांटउड्या मारत नाहीत.
परावसूचा लहान भाऊ अर्वसू हा अत्यंत भावनाप्रधान आहे. तो प्रेमात पडलेला आहे. त्याला लग्न करायचे आहे. त्याला नटदेखील व्हायचे आहे. आता नटाचा व्यवसायदेखील भावनाप्रधानच. नाटकाच्या सुरुवातीपासून अर्वसू प्रेयसी, वहिनी, यवक्री, वडील, मोठा भाऊ या सर्वांसाठी धावपळ करतो आणि प्रत्येकाच्या संदर्भातील भावनांचे नानाविध हेलकावे अनुभवतो. या सगळ्यात अडकल्याने त्यांचे स्वप्न भंगते. त्याचा प्रवास भरकटतो. मात्र नाटकाच्या शेवटी अर्वसूदेखील आपल्या मोठ्या भावाप्रमाणे भावनांवर नियंत्रण मिळवतो आणि कठोर निर्णय घेतो. स्वतःच्या मृत प्रेयसीसहित, तोपर्यंत मृत झालेले वडील, यवक्री, मोठा भाऊ, आणि अशा अनेक लोकांना जीवंत करणे टाळतो आणि ब्रह्मराक्षसाला मुक्तीची संधी देतो.
या दोन्ही भावांचे या दोन प्रसंगातील वर्तन अनपेक्षित आहे, प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणारे आहे, नीरस आहे. मात्र हेच वर्तन भारतीय परंपरेला अत्यंत साजेसे आहे असे मला वाटते.
इथे थोडी तुलना अपरिहार्य आहे.
पश्चिमेकडून आलेल्या इतर धर्मांत, जसे ज्यू, ख्रिश्चन वा मुस्लीम धर्मात असे काही आढळत नाही. पूर्वजांनी भोगलेल्या त्रासाबद्दल ज्यू दरवर्षी शोक पाळतात. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ताने अनुभवलेल्या वेदनांबद्दल ख्रिश्चनांनी आज कृतज्ञता बाळगावी अशी अपेक्षा असते वा १५०० वर्षांपूर्वी करबला येते झालेल्या शहादतीबद्दल मुस्लिमांनी आज शोक करण्याची रीत दरवर्षी अंमलात आणली जाते.
इतर धर्म अनुयायांना भावनांच्या आंदोलनात वाहून जायला उत्तेजन देत असताना, भारतीय उपखंडात निर्माण झालेले धर्म भावना म्हणजे मानवी देहातील विकार होय, भावनांच्या आहारी जाऊ नये, भावनांच्या आधीन जाऊन निर्णय घेऊ नये, भावनांच्या भारात कृती करू नये, अशा प्रकारची भूमिका थोड्या फार फरकाने मांडत असतात. महाभारतातील बऱ्याच व्यक्तिरेखा या पद्धतीने कृती करताना दिसतात. मला ही खास भारतीय रीत वाटते. परावसू आणि अर्वसू या दोन्ही भावांच्या वर्तनाचे कारण भावनांना ताब्यात ठेवण्याच्या रीतीत आहे, असे मला वाटते.
आपण आपल्या भावना नियंत्रित ठेवून आपला कार्यभाग साधावा, हा एक महत्त्वाचा आशय भारतीय संस्कृतीने आपल्याला देऊ केलेला आहे. ज्याचा आज विसर पडलेला आहे. भारतीय जनतेचा भावनाप्रधान खुळखुळा झालेला आहे. कधी दोन्ही वा तिन्ही बाजूचे राजकीय पक्ष, तर कधी एखादी टेलिव्हिजन वाहिनी, कधी एखादा दहशतवादी तर कधी एखादा धार्मिक नेता, या प्रचार-अपप्रचाराच्या लाटा निर्माण करताना दिसतो. कोणीतरी भावनांना हात घालतो आणि देशभर भावनिक उद्रेकाच्या लाटा उठत रहातात. हे वर्तन भारतीय नव्हे असे मला वाटते. भावना ताब्यात ठेवणारी भारतीय मानसिकता लोप पावत आहे.
‘हयवदन’ या नाटकातील ‘पद्मिनी’ या व्यक्तिरेखेनेदेखील मला विचारात पाडले. गेल्या २००० वर्षांपासून भारतातील मोठमोठे महात्मे सांगत आलेले आहेत की, माणसांमध्ये वर्ण असू शकत नाहीत. मध्ययुगातील शेकडो संतांनी आपल्याला शिकवण दिली की, माणसांमध्ये जाती असू शकत नाहीत. आता तर आपण समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या, आधुनिक भारतात राहत आहोत. लहान असल्यापासून आपण प्रतिज्ञा घेतो की, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्याचबरोवर सर्व लोक समान आहेत, स्त्री-पुरुष समान आहेत, असा समतेचा जागर ऐकत आणि विषमतेचा विरोध करत आपण लहानाचे मोठे होतो.
असे असले तरी ‘हयवदन’ या नाटकातील या ‘पद्मिनी’ला तिचा नवरा देवदत्त शर्मा आणि त्याचा मित्र कपिल यांच्यात वेगवेगळे गुण दिसतात. इतकेच नव्हे तर जातिनिहाय वेगवेगळे गुण दिसतात. असे कसे काय होऊ शकते? या पद्मिनीला असे विपरीत का म्हणून दिसावे? सगळ्या माणसांत समानता पाहणारे शेकडो महात्मे खरे की, दोन माणसांना वेगवेगळे पाहणारी पद्मिनी खरी? असा प्रश्न मला पडला.
आपण २५०० वर्षांपूर्वीच्या काळाचा अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल की, त्या काळी लोक वर्णव्यवस्थेचा विरोध करत आहेत. लोक त्यांच्यावर लादलेले वर्ण झुगारून देत आहेत. मध्ययुगाचा अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल की, त्या काळी लोक जातीव्यवस्थेचा विरोध करत होते. तथाकथित जातीमुळे लादलेले बंधन झुगारून देत होते. अगदी १००-१२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली जमा झालेल्या लोकांना त्यांच्या जाती मान्य नव्हत्या. त्यांना आपल्या जातींचा त्याग करून उच्च कशाचा तरी स्वीकार करायचा होता.
आज या आधुनिक भारतात मात्र लोक हातात कागदपत्रे घेऊन रांगेत उभे राहत आहेत आणि सांगत आहेत की, आम्ही अमूक एका जातीचे आहोत. त्यांना मनापासून खात्री पटलेली आहे की, ते त्या त्या जातीचे आहेत. त्यांना ते त्या जातीचे असल्याचा पक्का पुरावा हातात हवा आहे. म्हणजे गेले २५०० वर्षे जी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, ती आता अस्तित्वात आली आहे. गेले २५०० वर्षे ब्राह्मणी व्यवस्था जे करू शकली नाही, ते भारत सरकारच्या धोरणांनी करून दाखवले आहे. त्यामुळे आता ठामपणे म्हणायला हवे की, पद्मिनीच खरी ठरली!
देवदत्त शर्मा या ज्ञानी ब्राह्मणात आणि कपिल या शक्तिशाली लोहारात खूप मैत्री होती, खूप प्रेम होते. देवदत्त आणि कपिल यांच्यामध्ये पद्मिनी आल्याबरोबर त्यांच्यात छुपी स्पर्धा सुरू होते. तिचा सहवास मिळावा म्हणून दोघे प्रयत्न करू लागतात. पद्मिनीच्या हातून त्यांच्या डोक्यांची Dदलाबदल झाल्यावर तर त्यांच्यात थेट स्पर्धा सुरू होते. ब्राह्मणाचे शरीर आणि लोहाराचे डोके असलेला कपिल पद्मिनिवर हक्क सांगू लागतो. पुढे जाऊन कविता वगैरे करून बघतो, तर लोहाराचे शरीर आणि ब्राह्मणाचे डोके असलेला देवदत्त शास्त्रीय दाखले देत पद्मिनीला मिळवतो. पुढे जाऊन कुस्त्या वगैरे करून बघतो.
ही पद्मिनी मला जातीय गणिते मांडणारी जिंकणारी राजकीय सत्ता वाटते. मंडल आयोग लागू झाल्यावर बहुजन सत्ताधाऱ्यांची एक पिढी भारतात निर्माण झाली होती. मात्र ही बहुजन शक्ती बराच मोठा काळ ब्राह्मणी नेतृत्वाखाली कार्यरत राहिली आणि या जोडीने सत्तादेखील उपभोगली. जणू लोहाराचे शरीर असलेल्या देवदत्ताबरोबर पद्मिनी गेली.
काही काळाने ब्राह्मणाचे डोके लोहाराच्या शरीरावर विजय मिळवून शरीराला स्थूल बनवते. त्याच वेळी लोहाराचे डोके ब्राह्मणाच्या शरीराला भरपूर श्रम देऊन कणखर बनवते. जोपर्यंत दोघे मित्र म्हणून बरोबरीच्या नात्यात असतात, तोपर्यंत दोघांचा विकास होत नाही. दोघांच्या नात्यात कमीजास्तपणा येऊन स्पर्धा सुरू झाल्यावर खऱ्या अर्थाने दोघांचा विकास सुरू होतो.
समता त्यांना निष्क्रिय बनवते आणि विषमता सक्रिय बनवते, असे या दोघांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. मात्र हे विधान एका उदाहरणापुरतेच आहे.
‘तुघलक’ या नाटकात सुलतान तुघलक फर्मान काढून समता प्रस्तापित करू पाहतो. हे कसे व्हावे? एखादा सुलतान, एखादा गरीब ब्राह्मण, एखादा सरदारपुत्र, एखादी हिंदू स्त्री, खलिप्याचा वंशज, हे सगळे समान कसे काय होतील? मात्र तुघलक ते आदेश देऊन करू पाहतो. तुघलकाचे प्रयत्न फसतात. काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. मग तो चांदीच्या रुपयांच्या जागी तांब्याच्या रुपये आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे प्रयत्नदेखील फसतात. पुन्हा एकदा काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. तुघलकाचे स्वप्न आहे की राज्याची घडी अशी उभारावी की ज्यात कारभार आदर्श असेल, ज्यात जमतेला सुखशांती मिळेल, जे जगातील उत्तम राज्य प्रसिद्ध होईल. पण असे काहीही होत नाही.
तुघलकाचे प्रयत्न बघून असे वाटते की, त्याचा असा गैरसमज असावा की विषमता नष्ट करणे आणि समता प्रस्तापित करणे ही बाब एखाद्या सुलतानी आदेशाच्या वा धर्मग्रंथाच्या ओळीच्या वा कायद्याच्या आधीन असावी. आपल्या मनातदेखील एक तुघलक असतो. आपल्यालादेखील असे वाटते की, आधुनिक भारतात आपण राहतो. महात्मा गांधींनी रक्त सांडून या देशाच्या लोकशाहीचा पाया रचला आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजाचे स्वप्न पहाणारी राज्यघटना लिहून समता प्रस्तापित केली आहे आणि आज समतेचे राज्य सुरू आहे. अनेक लोक या आनंदात असतात. पण मला वाटते की, समतेच्या या नशेने आपल्याला वास्तव दिसेनासे केले आहे.
माणसांच्या जगातील समता आणि विषमता नेमकी कशी असते? या प्रश्नाचा नीट विचार करायला हवा असे मला वाटते. ऋग्वेदात एक ऋचा आहे -
ॐ सं गच्छध्वं सं वदध्वं, सं वो मनांसि जाणताम् देवा भागं यथा पूर्वे संजनाना उपासते |
समानो मंत्र: समिती: समानि | समानं मन: सह चित्तमेषाम् |
समानंमंत्रमभिमंत्रयेव:, समानेन वो हविषा जुहोमि ||
समानी व आकूति:, समाना हृदयनिव: |
समानमस्तु वो मनो, यथा व: सु सहासति || ॐ शांती शांती शांती | ऋग्वेद १०/१९१/२-४
आपण आपल्या पूर्वज देवतांप्रमाणे एकत्र राहायला हवे. आपल्यात आचार, विचार, उच्चार यांची समानता असायला हवी. आपल्या मनातील सुखे, दु:खे, स्वप्ने समान असायला हवी. आपल्या प्रार्थना, आकांक्षा, भावना, उद्देश समान असायला हवेत. आपल्या मनातील समर्पणाची भावना समान असायला हवी म्हणजे उत्तम संघटना निर्माण होईल. आपल्यात व्यक्तिगत प्रगतीचा विचार, वा एकांगी विचार नसावा. सहकाराचा विचार, सहकाराचा प्रयत्न, सहकाराचा संकल्प ही आपली कार्यपद्धती असायला हवी. आपल्यातील प्रत्तेक माणूस स्वाभिमानी, स्वावलंबी असायला हवा. आपल्यात द्वेष, ईर्ष्या, वैर यांना स्थान नसावे. असे झाले की समाजात समता आणि सुख शांती निर्माण होईल.
समतेचा विचार अत्यंत योग्य शब्दात सांगणारी किती चांगली ऋचा आहे. ऋग्वेदाचा काळ ६००० वर्षांपूर्वीचा मानला जातो. मला प्रश्न पडतो की, एवढ्या जुन्या काळात ही अशी समतेचे महत्त्व समजून सांगणारी ऋचा लिहिण्याची गरज का पडावी? उत्तर अगदी स्पष्ट आहे.
मानवी समाजात समता नेमकी कधी होती, हे ठरवणे कठीण आहे. विषमता मात्र नित्य असतेच असते.
जर ६००० वर्षांपूर्वी देखील विषमता प्रभावी असेल तर मग विषमता एक ‘तत्त्व’ म्हणून ‘नित्य सत्य’ आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
कॉम्रेड शरद् पाटील यांनी मातृसत्तेतील अधिकार पदावर असलेल्या स्त्रिया संपत्तीचे वाटप कसे करत याची उदाहरणे दिली आहेत.
कुंती आणि पाच पांडव वनवासात असताना अन्नाचे वाटप कुंती करत असे. सगळ्यांनी जमा केलेले अन्न एकत्र केले जाई. मग कुंती त्या अन्नाचे समान दोन भाग करत असे. त्या दोन भागातला एक भाग एकट्या भीमाला दिला जात असे. उरलेल्या भागाचे पुन्हा समान पाच भाग करून चार पांडव आणि कुंती यांना दिला जात असे. हे वाटप विषम असले तरी पांडवांच्या दृष्टीने ते समानच असे.
ज्या गोष्टींचे विभाजन होणे शक्य नसेल, त्या गोष्टींचे वाटप करताना समस्या निर्माण होत असे. उदाहरणार्थ वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या उत्पादन क्षमतेच्या शेतीयोग्य जमिनीचे पाच तुकडे पाच भावांना वाटायचे असतील तर गणिती वाटप शक्य होत नसे. अशा वेळी हे पाच लोक जुगार खेळून जमिनी वाटून घेत. इथे देखील विषम वाटप असले तर ते समान मानले जात असे. कारण हे वाटप थोड्या वर्षांसाठी असे. त्या नंतर पुन्हा जुगार, पुन्हा वाटप केले जात असे.
या काळात एखाद्यावर वाटपात अन्याय झाला तरी तो दुःख मानून घेत नसे, कारण ती त्या काळाची अपरिहार्यता होती. जे काही वाटायचे आहे ते विषम मूल्याचे होते आणि ज्या लोकांत वाटायचे होते, ते लोकही विषम गुणांचे होते. शिवाय वाटणारे आणि घेणारे एकाच परिवारातील होते. वाटप करणारे कोण आहेत ते घेणाऱ्यांना दिसत असत.
आजच्या आधुनिक काळात सगळे सोपे झाले आहे. उत्पादनाची साधने, उत्पादन प्रक्रिया आणि अंतिम उत्पादन यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत शेवटी पैशाच्या रूपाने मोबदला योग्य माणसाला मिळायला हवा. पण तसे होत नाही.
आजदेखील उत्पादनाचे विषम वाटप केले जाते. वर्षोनुवर्षे एकाच गटातील लोकांवर अन्याय केला जातो. लोकांनी आत्महत्या करावी इतक्या टोकाचा अन्याय केला जातो. मात्र लोकांना दुःख व्यक्त करण्याची सोय राहिलेली नाही कारण आजकाल वाटप करणारे कोण आहेत ते घेणाऱ्यांना दिसत नाहीत. वाटप करणाऱ्यांनी घेणाऱ्यांशी नातेसंबंध तोडला आहे. वाटप करणाऱ्यांनी अर्थमंत्री, कृषिमंत्री, उद्योगमंत्री, कामगारमंत्री अशी नावे धारण केली आहेत. ते समोर येत नाहीत. ते एव्हड्या उंच जागी बसून कारभार हाकतात की वाटपातील त्यांचा सहभाग सिद्ध देखील करता येणार नाही.
वाटपात ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना असे नेमके का होत आहे हे कळणेदेखील कठीण आहे. त्यांना असेच वाटू शकेल की, ते सर्व समतेच्या युगात आहेत. शिवाय ते स्वतंत्रदेखील झालेले आहेत. या आधुनिक जगात त्यांची जबाबदारी त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर आहे. त्यांच्या वाट्याला अन्याय येत असेल तर त्यांनी ते केवळ दुर्दैव होय असे म्हणावे आणि देवाकडे प्रार्थना करावी. अन्यायग्रस्त लोकांना त्यांचा हक्क चोरणारे लोक दिसू नयेत म्हणून तर सर्व देवांची आणि सर्व प्रार्थनांची निर्मिती झालेली आहे.
त्यामुळे समतेचा उदो उदो करून लोकांना भ्रामक समाधान देण्याऐवजी नित्य उपस्थित असलेल्या विषमतेची जाणीव करून देणे योग्य असे मला वाटते. पण असे करण्यात मोठा अडथळा होतो, तो धर्मांचा. मृत्यूनंतरच्या जगावर ज्यांचे लक्ष आहे, त्या धर्मांना आणि आध्यात्मिक पंथांना हे जग नीट दिसत नसावे असे वाटते. त्यांच्या दृष्टीने सगळे समान असतात. अशा काही धर्मांनी, पंथांनी लोकांना समता थेट बहाल केली आहे. अशा रीतीची आपोआप समता प्राप्त केलेल्या लोकांना जगाच्या प्रत्यक्ष व्यवहारातील विषमतेची शहानिशा करण्याची गरज वाटत नाही. उलट आम्ही कसे समतावादी आणि अमुक धर्म कसे विषमतावादी अशी मांडणी करण्यात त्यांना अपूर्व समाधान मिळते.
मला सांगायचे आहे, ते हे की, विषमतेच्या सर्व प्रकारांचा अभ्यास करून, त्यांच्या विरोधात उपाययोजना करून, उपाययोजना प्रदीर्घ काळ आमलात आणून, समतेच्या दिशेने पाऊल टाकता येईल. ते न करता विषमताग्रस्त समाजात बेगडी समतेचा निव्वळ तोंडी प्रचार जास्त घातक आणि जास्त हानिकारक असतो. मग तो ‘तुघलक’ या नाटकात असो वा प्रत्यक्ष आजच्या समाजात असो.
या नाटकात ‘झियाउद्दीन बरनी’ नावाचे एक पात्र आहे. तुघलकाच्या सगळ्या मोहिमांना, धोरणांना ‘इस्लाम आणि कुराण’ यांच्या दृष्टिकोनातून तपासण्याचे काम हे पात्र करते. संपूर्ण नाटकातील बरनीचे वर्तन पाहता एक इस्लामनिष्ठ व्यक्तिरेखा उभी राहते आणि बरनीच्या व्यक्तिरेखेसमोर तुघलकाचे तुलनात्मक पुरोगामीत्व उठून दिसते.
प्रत्यक्षात ज्या झियाउद्दीन बरनी या ऐतिहासिक व्यक्ती वरून हे पात्र घेतले आहे, ते नाटकातील इस्लामनिष्ठ बरनीसारखे नसावेत असे वाटते. कारण प्रत्यक्षातील झियाउद्दीन बरनी यांनी ‘फतावा आलमगिरी’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाला ‘मुस्लिमांची मनुस्मृती’ म्हटले जाते. कारण या ग्रंथात जातिभेद करणाऱ्या नियमांची मांडणी केलेली आहे. या ग्रंथामुळे झियाउद्दीन बरनी यांना ‘मुस्लीम मनु’ अशी उपमा दिली जाते. (संदर्भ बशारत अहमद यांचा लोकसत्तात आलेला लेख.)
अर्थात प्रत्यक्षातील व्यक्तिरेखांशी नाटकातील व्यक्तिरेखा जुळायलाच हव्या, अशी अपेक्षा नाटककाराकडून नसते. नाटककाराने नाटकात निर्माण केलेले जग हे नाटकातील जग असते. या नाटकातील जगाचे आणि त्यातील पात्रांचे स्वतःचे असे तर्कशास्त्र असते. नाटककार एक असे असत्य निर्माण करतो, ज्या असत्यामुळे प्रेक्षकांना सत्याचे दर्शन होते.
भारतीय परंपरेनुसार ‘समुद्रमंथन’ हे पहिले नाटक होय. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी याबाबत ‘बळीवंश’मध्ये मांडणी केली आहे. वेदांचा अधिकार नसलेल्या लोकांना वेदात ज्ञान मिळावे म्हणून चारही वेदांमधून उपयुक्त गोष्टी घेऊन नाट्यवेद निर्माण केला गेला आणि भरतमुनी यांना देण्यात आला. भरतमुनी यांनी त्यांच्या मुलांना घेऊन ‘समुद्रमंथना’चा प्रयोग सादर केला. कोणत्याही प्रकारचे सामाजिक श्रम जिथे अपेक्षित असतात तिथे जास्त श्रमांचा भार उचलणारे ते ‘दैत्य’ आणि कमी श्रमांचा भार उचलणारे ते ‘देव’ होत. सामाजिक श्रमातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाच्या वाटपात भेदभाव केला जाऊन देवांना अमृत आणि दैत्यांना विष मिळते. या शिवाय जे अतिरिक्त उत्पादन निर्माण होते, ते विष्णू आदि देव घेतात. समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी ही मेरूपर्वताला आधार देणाऱ्या कुर्माकडे जाते वगैरे. माझ्या मते ‘समुद्रमंथन’ हे नाटक भारतीय प्रतीकात्मक रीतीने वरकड मूल्याच्या चोरीचा सिद्धान्त समजून सांगते.
असे असले तरी ‘देव आणि दैत्य’ भेद दाखवल्यामुळे नाटककारावर भेदभावाचे समर्थन करत असल्याचा आरोप केला जाऊ शकतो. या नाटकाचा प्रयोग चालू असताना दैत्यांना राग आला आणि आपली बाजू नीट मांडली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी नाटक बंद पाडले. मग दैत्यांच्या नायकांची मनधरणी करून नाटक पुन्हा सुरू करण्यात आले. या पहिल्या नाट्यप्रयोगात आलेल्या विघ्नाचा धसका घेतल्यामुळेच बहुदा आजदेखील नाट्यप्रयोगाआधी गणपतीची पूजा करण्यात येत असावी.
आज अगदी दोन मित्रांनी मिळून काही काम सुरू केले तरी त्यात ‘समुद्रमंथना’ची लक्षणे दिसून येतात. अगदी नवरा-बायकोच्या संसारातदेखील ‘समुद्रमंथन’ बघता येऊ शकते. याचा अर्थ ‘समुद्रमंथन’ची समकालीनता आजही अबाधित आहे.
मात्र हे करताना नाटककाराला ‘देव आणि दैत्य’ असा भेद दाखवावा लागतो. अर्थात ‘देव आणि दैत्य’ असा भेद दाखवला तरच समुद्रमंथनाचे नाटक शक्य होते. जर ‘देव आणि दैत्य’ हे समान होते, अशी कल्पना केली तर नाटकातील प्रतीकात्मक आशय नष्ट होतो. देवांना अमृत मिळाले आणि दैत्यांना विष मिळाले या तपशीलातील प्रतीकात्मक आशयदेखील निरर्थक ठरतो. या नाटकाचा हिंदू संस्कृतीवर इतका प्रभाव पडलेला आहे की, ‘देव आणि दैत्य’ अशा गटांचे अस्तित्व गृहीत धरूनच मांडणी केली जाते आणि टीकादेखील केली जाते.
मानवांबरोबरच देव आणि दैत्य यांनादेखील ग्रासून टाकणाऱ्या भावनांच्या क्षोभांना, नियंत्रित ठेवण्याचे कौशल्य आपल्याला प्राप्त होवो आणि विकारराहित वस्तुनिष्ठपणे या समष्टीकडे बघण्याचा आनंद आपल्याला प्राप्त होवो, अशी शुभकामना व्यक्त करून मी माझे भाषण संपवतो.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 25 January 2020
अजित देशमुख,,
तुम्ही म्हणता ती समता तुकारामांसारख्या संतांना कधीच अभिप्रेत नव्हती. तुम्ही वर्ण नाहीसे करायला निघालात. हा तद्दन मूर्खपणा आहे. कारण की वर्ण म्हणजे अमुकेक काम करायची आवड. माणसाची आवड नाहीशी करून काय डोंबल्याची समता पैदा होणारे? संतांनी समता बघितली ती आत्म्यांत. आत्मा बघायचा असेल तर साधना करावी लागते. ती ईश्वरभक्तीने जमते. पण तुमचा ईश्वरावर विश्वासंच नाही मुळी. मग तुम्हाला काय समता दिसणारे! खरी समता अनुभवायची असेल तर भक्ती करायलाच हवी.
तुम्ही नंतर ऋग्वेदातली प्रार्थना उद्धृत केलीये. पण जर तुमचं हृदय भक्तीहीन असेल तर ती प्रार्थना निरर्थक ठरते. तुकोबांनीच म्हंटलंय की :
भक्तीविना तुमचा केवळ भारवाही म्हणजे गाढव झालाय.
आपला नम्र,
-गामा पैलवान