‘हम देखेंगे’, फैज़ अहमद फैज़ आणि CAA व NRC
पडघम - देशकारण
माधव दातार
  • फैज़ अहमद फैज़, त्यांची ‘हम देखेंगे’ ही कविता आणि एनआरसी व सीएए
  • Tue , 21 January 2020
  • पडघम देशकारण फैज़ अहमद फैज़ Faiz Ahmad Faiz हम देखेंगे Hum Dekhenge सीएए CAA नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स National Register of Citizens एनआरसी NRC

CAA आणि NRC यांच्याविरोधी निदर्शनांमध्ये फैज़ अहमद फैज़ यांच्या ‘हम देखेंगे’ या कवितेचे वाचन/गायन करण्यात आले. अशा प्रसंगी गाणी, नाच अशा समूह कृती नेहमी केल्या जातात. या कवितेचा वापर होण्याचे मुख्य कारण असे की, १९७९च्या सुमारास लिहिलेल्या या कवितेचा वापर पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक़ यांच्या राजवटीविरोधी निदर्शनात करण्यात आला होता. या कवितेवर पाकिस्तानात बंदी घातली गेली आणि साहजिकच तिची लोकप्रियता वाढली. अनेक गायकांनी ती गायली आहे. CAA आणि NRCला विरोध करणाऱ्यांना ती का भावली? हे ही कविता वाचली तर सहज लक्षात येईल-  

हम देखेंगे

लाज़िम है कि हम भी देखेंगे   

वो दिन कि जिसका वादा है

जो लोह-ए-अज़ल में लिखा है       

जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां

रुई की तरह उड़ जाएँगे               

हम महकूमों के पाँव तले

ये धरती धड़-धड़ धड़केगी      

और अहल-ए-हकम के सर ऊपर

जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से

सब बुत उठवाए जाएँगे   

हम अहल-ए-सफ़ा, मरदूद-ए-हरम

मसनद पे बिठाए जाएँगे   

सब ताज उछाले जाएँग

सब तख़्त गिराए जाएँगे     

बस नाम रहेगा अल्लाह का

जो ग़ायब भी है हाज़िर भी   

जो मंज़र भी है नाज़िर भी

उठ्ठेगा अन-अल-हक़ का नारा

जो मैं भी हूँ और तुम भी हो

और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा  

जो मैं भी हूँ और तुम भी हो

(शब्दार्थ - लोह-ए-अज़ल - विधि के विधान, कोह-ए-गरां - घने पहाड़, महकूमों - रियाया या शासित, अहल-ए-हकम – सताधीश, बुत - सत्ताधारियों के प्रतीक पुतले, अहल-ए-सफ़ा - साफ़ सुथरे लोग, मरदूद-ए-हरम - धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग, अल्लाह – ईश्वर, मंज़र – दृश्य, नाज़िर - देखने वाला, अन-अल-हक़ - मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि, खुल्क-ए-ख़ुदा  - आम जनता)

मुळात ही कविता मुस्लीमबहुल वाचक\श्रोत्यांसाठी लिहिली असल्याने तिच्यातील प्रतिमा इस्लामशी संबंधित आहेत. उदा. बस नाम रहेगा अल्लाह का. मात्र हा इस्लामचा प्रचार/प्रसार नसून वर्तमान अन्यायी राजवट संपून न्याय प्रस्थापित होईल (रामराज्य?) हा आशावादच त्यातून प्रगट होतो. ज्या मुक्ती दिनाची कवीला आस आणि खात्रीही आहे, तो प्रत्यक्षात येईल तेव्हा काय काय होईल, याचे वर्णन करताना सर्व राजमुकुट कोलमडतील, सिंहासने ढासळतील, पुतळे उदध्वस्त होतील आणि आम जनतेचे राज्य प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यातून प्रगट होतो. उर्दूचे फार ज्ञान नसलेल्या वाचकाला जो अर्थ प्रतीत होईल तो बहुदा वरप्रमाणे असेल. उर्दू भाषा आणि इस्लामी परंपरा यांच्याशी गाढ परिचय असेल तर अर्थाच्या आणखी भिन्न छटा दिसणे शक्य आहे.

यातील ‘काबा’ हा शब्द मक्का येथील ‘काबा’ दाखवत नसून त्याने पृथ्वीचा निर्देश होतो, तर ‘बुत’ शब्दातून पूजेतील मूर्ती नव्हे तर जुलमी सत्ताधीशांच्या प्रतिमा, पुतळे यांचा निर्देश होतो. मूर्तिभंजनाचा पुरस्कार यातून होत नाहीच, पण कवितेच्या अखेरीस ‘अन अल हक’चा जो उल्लेख आहे, तो हजार-अकराशे वर्षांपूर्वी मन्सूर अल हल्लाज या सूफी संताने प्रथम ‘मी देव/सर्वश्रेष्ठ/बरोबर आहे’, असा दावा केला होता. हे कृत्य उघडच इस्लामी धर्मपरंपरेविरुद्ध असल्याने यासाठी हल्लाज यांना या बंडाची किंमत आपल्या जीवाच्या मोलातून द्यावी लागली. साहजिकच फैज़ यांची ही कविता पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांना आक्षेपार्ह वाटली, यात काहीच नवल नाही.

CAA आणि NRCच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांना ही कविता स्फूर्तिदायक वाटली, यातही काही आश्चर्य नाही. मात्र आयआयटी कानपूरच्याच एक प्राध्यापक वाशिमंत शर्मा यांना ही कविता विद्यार्थ्यांनी निदर्शन प्रसंगी गाणे आवडले नाही. कवितेचा अर्थ वाचकांना भिन्न पद्धतीने प्रतीत होऊ शकतो. एखाद्या चित्राचा अर्थ काय याबाबत दर्शकांत मतैक्य असेलच असे नाही आणि जरी असे झाले तरी चित्रकाराचा त्यापेक्षा निराळे व्यक्त करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता उरतेच!

कवितेत शब्दांचा वापर होत असल्याने मतभेदाच्या शक्यता कमी असली तरी ती शिल्लक राहतेच. पण प्रा. शर्मा यांना ती हिंदू विरोधी वाटल्याने या प्रकाराला त्यांनी आक्षेप घेत व्यवस्थापनाकडे दाद मागितली. प्रा. शर्मा यांचे आयआयटी मुंबई येथे शिक्षण झाले आहे. वैदिक धर्माच्या श्रेष्ठत्वाचा प्रचार करणाऱ्या आणि याबाबतच्या अपप्रचारास विरोध करणाऱ्या अग्निवीर संस्थेशी ते संबंधित आहेत, अशी वृत्तपत्रीय माहिती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे उच्च शिक्षण घेतलेल्या अध्यापकास ही कविता आक्षेपार्ह का वाटावी, असा प्रश्न फैज़ यांच्या पाकिस्तानस्थित नातू डॉ. अली मदीह हाश्मी यांना विचारला असता त्यांनी तो हसण्यावारी नेत आयआयटी च्या अभ्यासक्रमात साहित्य विषयाचा अंतर्भाव करावा, असे गंमतशीर उत्तर दिले.

प्रश्न फक्त कवितेचा अर्थ न समजल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीने त्याबाबत आक्षेप घेण्यापुरता मर्यादित असता तर डॉ. हाश्मी यांच्याशी सहमत होण्यात कोणालाच काही अडचण वाटली नसती. अटल बिहारी वाजपेयींसारखे एक कवी आज पंतप्रधान असते तर त्यांची या प्रकाराबाबत काय प्रतिक्रिया राहिली असती, याची कल्पना करणे फारच मनोरंजक ठरेल.

पण कविता हिंदूविरोधी असणे हा आक्षेप संस्थेच्या संचालकानी गांभीर्याने घेत या संदर्भात एक समिती नेमावी ही बाब अधिक चिंताजनक आहे. या समितीचा निर्णय काय असेल याबाबत तर्क करण्यात काहीच अर्थ नाही. एका कवितेवर ती हिंदूविरोधी असल्याचा आक्षेप घेणारी व्यक्ती हिंदुत्ववादी कार्यक्रमाचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेशी संबंधित असते आणि ज्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले असते, ती आयआयटीसारख्या जागतिक स्तरावरील संस्थेच्या संचालकांनी अधिक चौकशी करण्यायोग्य समजावी यावरून हा प्रश्न अधिक गंभीर आहे हे स्पष्ट होते.

ही कविता हिंदू धर्मविरोधी असल्याच्या आरोपाच्या समर्थनात तीन ओळी आधारभूत आहेत, असे मानले जाते. एका ओळीत ‘काबा’चा उल्लेख आहे. मक्केतील काबा हे इस्लामपूर्व मूर्तीपूजकांचे महत्त्वाचे प्रार्थना स्थळ होते. दुसऱ्या ओळीत मूर्ती (बुत) हटवल्या जातील असा उल्लेख आहे, तर तिसऱ्या ओळीत सर्वत्र अल्लाचे नाव पसरेल असा उल्लेख आहे.

संपूर्ण कवितेचा विचार न करता काही ओळींना महत्त्व देणे योग्य आहे का, हा पहिला प्रश्न. काबा, बुत आणि अल्लाचे नाव होणे यांचा कवितेच्या एकत्रित अर्थाशी साजेशा अशा निराळ्या पर्यायी पद्धतीने विचार शक्य आहे, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. यापेक्षाही निराळा अर्थ कुणाला दिसेल/लावता येईलही. पण तो समग्र कवितेच्या संदर्भात करायला हवा. असे अनेक संभाव्य पर्यायी अर्थ असू शकतात हे मान्य करणे हे हिंदू तत्त्वज्ञानाशी – ज्यात विविध, परस्पर विरोधीही मतांतरे समाविष्ट आहेत – जास्त जवळचे ठरते. या उलट मला जाणवलेला अर्थच खरा, अंतिम आहे असे मानणे हे महंमद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आणि त्यांना प्राप्त झालेले ‘कुराण’ हा परिपूर्ण ग्रंथ असल्याने त्यात बदल सुधारणा शक्य नाहीत, असे मानणाऱ्या कडव्या इस्लामी परंपरेशी अधिक सुसंगत ठरेल.

दुसरा मुद्दा हिंदू धर्मात प्राधान्याने मूर्तीपूजा होत असली तरी मूर्तीपूजा न करणारे, निर्गुणी उपासकही हिंदूच असतात. मूर्तीपूजकांत विविध प्रकारच्या मूर्ती पूजनीय ठरतात. कोणा एका देवतेचे श्रेष्ठत्व सर्व मूर्तीपूजक मान्य करताना आढळत नाहीत. देव अमान्य करणारे नास्तिकही हिंदू परंपरेचा भाग आहेतच. सर्व धर्म चांगलेच आहेत. आपल्या जीवनाचे नियंत्रण करणारी सर्वोच्च शक्ती एकच आहे. त्याला काही ईश्वर म्हणतात तर काही अल्ला असे मानणाऱ्या महात्मा गांधींना हिंदू परंपरेचा भाग मानण्यास हिंदू धार्मिक आचार्य कदाचित तयार होणार नाहीत. पण गांधीजी भारतीय परंपरेचा भाग तर आहेतच. या स्थितीत एखादी बाब ‘हिंदू धर्मविरोधी आहे’ अशी सामान्य भूमिका घेणे कठीण आहे.

शिवाय इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे हिंदू धर्म सुसंघटित नसल्याने धर्मनिर्णय करणारी सर्वोच्च, सर्वमान्य पीठ किंवा धर्माचार्य अशी पारंपरिक व्यवस्था नाही. त्यामुळे कोणा एका व्यक्तीला अमुक गोष्ट विविधतापूर्ण परंपरा असलेल्या हिंदू धर्माविरुद्ध आहे, हे ठरवण्याचा हक्क प्राप्त होत नाही. प्रा. शर्मा यांच्या संदर्भात नेमलेली समिती जो काही निर्णय घेईल, तोही हिंदू परंपरेशी सुसंगत असेल का नाही, हा प्रश्न खुला असेल.

हिंदू धर्मात ज्या विविध सुधारणा झाल्या, मग ती आर्य समाज किंवा सत्यशोधक समाज अशा नव्या पंथांची स्थापना असो किंवा मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण या सारख्या चळवळी – त्यांना हिंदू धर्माचार्यांचा बहुतेक वेळा विरोध होता. अशा विरोधात समाजसुधारकांनी आपले कार्य चालू ठेवले. आणि ते अजूनही चालू आहेच. वर्तमान संदर्भात– फैज़ अहमद फैज़ यांची कविता हिंदू विरोधी आहे, हा मुद्दा हिंदू परंपरा आणि धर्म यांच्या परीघातील नाही /नसावा.

ही कविता हिंदुत्व विरोधी आहे, असा प्रा. शर्मा यांचा मुद्दा असावा. तसे असेल तर त्याचा हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. ही (राजकीय) हिंदुत्वाची मुख्यत: राजकीय भूमिका आहे. पण हिंदुत्व विरोधी अशी स्पष्टता न आणता हिंदूविरोधी अशा मोघम शब्दप्रयोगातून हिंदू धर्माचा भास निर्माण करण्यात येतो. पण हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही; ती एक राजकीय भूमिका आहे. हिंदूधर्मीयांचे लोकसंख्येत ८०-८५ टक्के प्रमाण असले तरी या सर्वांचा हिंदुत्वाला पाठिंबा नाही. भाजपचे सर्व मतदारही राजकीय हिंदुत्वाचे समर्थक नाहीत. फैज अहमद फैज़ या मुस्लीम कवीच्या कवितेचा मुस्लीमबहुल निदर्शनात उद्घोष/उपयोग होतो, ही बाब हिंदू धर्मविरोधी आहे, असे भासवून हिंदुत्ववादी भूमिकेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे.

CAA व NRC विरोधात फक्त मुसलमान आहेत हे खरे नाही. नागरिकत्व कायद्यातील बदल NRCसारख्या प्रकल्पांच्या संदर्भात मुख्यत्वे मुस्लीम समाजाला अडचणीचे ठरतील, असा समज झाल्याने मुस्लीम युवक आणि विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणीय आहे. पण NRCच्या आसाममधील प्रयोगावरून त्याचा उपद्रव हिंदू आणि मुसलमान अशा दोहोंना झाला आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यावरचा तोडगा या स्वरूपात नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल, ही मुस्लीम समाजाची भीती दूर करण्यास नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील निदर्शने हिंदूविरोधी ठरवण्याने मदत होणार नाही.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारी जी निदर्शने झाली, त्यात मुस्लीम युवक आणि विद्यार्थी यांचे आधिक्य होते. या निदर्शकांनी राष्ट्रध्वज फडकावत, आंबेडकर आणि राज्यघटना यांचा घोष करत आपली चळवळ धर्माशी संबंधित नसून ती नागरिकत्व आणि आपले घटनादत्त अधिकार यांच्याशी निगडित आहे, हे अधोरेखित करताना आपले मुसलमानपण लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निदर्शकांच्या ‘पोशाखा’चा उल्लेख केला होताच.

मुसलमान असणे आणि भारतीय नागरिकत्व यांत विरोधाभास नाही, हे खरेच, पण मुस्लीम धर्मविषयक बाबी आंदोलनात वापरल्या तर त्याचा परिणाम नागरिकत्व कायदयाविरुद्धची चळवळ व्यापक बनण्यात अडथळा ठरेल, ही बाबही मुस्लीम आंदोलक पुढे आणत आहेत. ‘अल्ला हो अकबर’ ही घोषणा परमेश्वर (अल्ला) सर्वोच्च आहे, असे अधोरेखित करते, पण ती घोषणा वापरली तर मुस्लिमेतर आंदोलक सहभागी होणार नाहीत, ही बाब मुस्लीम कार्यकर्ते विचारात घेत आहेत आणि तसे करण्यास इतर कार्यकर्त्यांना सांगतही आहेत, ही बाब ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पानांवरील एक माजी महिला पत्रकार आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठातील एक छात्रा यांच्यातील चर्चा निदर्शकांची मुस्लिम ओळख आणि नागरिकत्व कायद्याचा लढा व्यापक बनवण्याची गरज यावरील चर्चा मुस्लिम समाजात परिवर्तनाचे वारे कसे वहात आहेत याची द्योतक आहे. (पहा :  हयात फतेमा ‘Not Just as Muslims’, इंडियन एक्स्प्रेस, १३ जानेवारी २०२० आणि इरेना अकबर ‘Why I Protest as Muslim’, इंडियन एक्स्प्रेस ३ जानेवारी २०२०)

नागरिकत्व दुरुस्ती कायदयाच्या विरोध करण्यातून मुस्लीम समाज आपल्या नागरिकत्व अधिकाराच्या रक्षणासाठी एकत्र येण्यास सुरुवात झाली आणि त्याला व्यापक पाठिंबा मिळाला तर तो एक सामाजिक लाभ ठरेल. आणि तसे झाले तर त्याचे श्रेय भाजपलाच जाईल, त्यास जरी त्याची अपेक्षा नसली तरीही!

.............................................................................................................................................

साभार - https://madhavdatar.blogspot.com/2020/01/blog-post_17.html

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 25 January 2020

माधव दातार,
तुम्ही म्हणता की :

फैज अहमद फैज़ या मुस्लीम कवीच्या कवितेचा मुस्लीमबहुल निदर्शनात उद्घोष/उपयोग होतो, ही बाब हिंदू धर्मविरोधी आहे, असे भासवून हिंदुत्ववादी भूमिकेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे.

तर मग CAA व NRC तरी मुस्लिम विरोधी कुठे आहेत? हे कायदे इस्लामच्या विरोधात आहेत असं भासवून मुस्लिमांना उगीच आंदोलनात ओढलं जातंय.
हिंदूंनी खाल्लं तर शेण आणि मुस्लिमांनी खाल्लं तर श्रीखंड, असं कसं काय? लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घेतली की पाय उघडे पडतात.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......