अजूनकाही
उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी साहित्य जगतात बोकाळलेल्या जातीयवादावर केलेल्या परखड भाष्याचं संवेदनशील साहित्यिक आणि वाचकांच्याकडून स्वागतच व्हायला पाहिजे. बोराडे यांनी मराठी साहित्याच्या कथा, कादंबरी, नाटक अशा विविध दालनात गेली ५०पेक्षा जास्त वर्षं मोठ्या ऐटदार व्रतस्थपणे मुशाफिरी केलेली आहे. लांगुलचालन करून आजवर त्यांनी काहीही मिळवलेलं नाही. घरी चालून आलेल्या मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तळहातावरचा दिवा जपावा अशा काळजीपूर्वक निभावली आणि निर्विकारपणे सोडूनही दिली. कुठे थांबावं याचं भान असलेले दुर्मीळ साहित्यिक बोराडे आहेत. ‘यापुढे कोणताही पुरस्कार नको’ अशी भूमिका त्यांनी २००२ साली घेतली आणि ती निभावताना स्वत:च पुरस्कार देणं सुरू केलं. उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली; ते मिळणार हे स्पष्ट असतानाही त्यांनी ते नाकारलं. कारण ‘मला घोडनवरा व्हायचं नव्हतं’ अशा शब्दांत योग्य वयातच ते मिळायला हवं होतं’, असं सूचित करण्याइतका बोचरा हजरजबाबीपणा बोराडे यांच्यात आहे.
उस्मानाबादच्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बोराडे म्हणाले, “मराठी वाङ्मयात जातीयवाद आला आहे. अगदी उघड उघड. हे फार भयंकर आहे, पण याचा विचार कुणी करत नाही. जातीयवाद पोसणे हाही एक प्रकारचा दहशतवाद आहे. या दहशतवादाबद्दल कोण बोलणार? हा जातीयवाद साहित्याला पोखरणारा आहे, तो साहित्याचे तुकडे-तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या जातीतील लेखक आहे असे लेखक आता म्हणू लागले आहेत. पारितोषिकेही आपल्याच जातीतील लेखकाला दिली जात आहेत, हे चित्र फार भयंकर आहे. गल्लीबोळातले पुरस्कार घेऊन लेखकही आनंदून जात आहेत. असे लेखक हे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. कधी नष्ट होतील ते सांगता येत नाहीत. चांगलं लेखक व्हायचं असेल तर आधी चांगला वाचक होता आलं पाहिजे, पण लेखक दुसऱ्याचं वाचत नाहीत. ते आत्मकेंद्री झाले आहेत. एक नवोदित लेखक या संदर्भात म्हणाला, आपल्या शेतात ऊस असेल तर दुसऱ्याच्या शेतातला खायचा कशाला?”... ते असं बरंच काही परखड बोलले.
बोराडे यांच्या या परखड बोलाच्या वास्तवाबद्दल कुणालाही शंका नाही. ज्या साहित्याच्या क्षेत्रात बोराडे गेली पाच-साडेपाच दशके वावरत आहे, त्या क्षेत्रात हे पीक अलीकडच्या अडीच-तीन दशकात जोमानं फोफावलं आहे, याची कल्पना बोराडे यांना नव्हती का, त्यांनी हे बोलायला उशीर का केलाय, असे प्रश्न मात्र पडले. साहित्य जगतातल्या बोराडे म्हणतात त्या आणि तशा अनेक अनिष्ट बाबींविषयी ते अनभिज्ञ असतीलच असं नाही. कारण लेखन आणि व्यासपीठ अशा दोन्ही ठिकाणी त्यांचा वावर आहे. उशीरा का होईना बोराडे परखड बोलले, याचं स्वागत करतानाचा खरं, तर बोराडे यांनी साहित्य क्षेत्रातल्या एकूणच सुमारीकरण, थिटेपण आणि टोळ्यांवरही असंच टीकास्त्र सोडलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं.
अ. भा. (?) साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुमार लेखकांची ‘निवड’ होण्याची मध्यंतरी लाटच आलेली होती. ‘पार्थिवाचे अंत्यदर्शन’ आणि ‘सख्खे सहोदर’ असं अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलणारे, टुकार मनोरंजनात्मक लिहून राजकारण्यांच्या आशीर्वादानं अध्यक्षपद भूषवणाऱ्याचा धुमाकूळ साहित्य प्रांती माजलेला होता. गेली अनेक वर्षं साहित्य संमेलन कुणा न कुणा राजकारण्याच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे. अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्नित असणाऱ्या घटक संस्था काही ठराविक लोकांचे ‘अड्डे’ झालेल्या आहेत. त्याबद्दल आजवर अनेकदा कुजबूज झाली, पण कुणाकडूनच कधीच पाहिजे तेवढा खणखणीत आवाज उठवला गेलेला नाही. याशिवाय साहित्या जगतात सध्या अनेक ‘टोळ्या’ धुमाकूळ घालत आहेत. जाती-पातीच्या आधारावर निर्माण झालेल्या टोळ्यांसोबतच कथित पुरोगामी आणि तितकेच कथित प्रतिगामी, सुमार आणि बेसुमार, प्रसिद्धीलोलुप, प्रकाशक, रविवार पुरवण्यांचे संपादक, दिवाळी अंक प्रकाशित करणारे, पारितोषिके वाटणारे अशा अनेक टोळ्यांनी साहित्याच्या क्षेत्रात उच्छाद मांडला आहे. त्याबद्दलही बोराडे यांनी बोलायला हवं होतं.
आधीच आपल्याकडे निखळ, अभिजात, थेट जगण्याला भिडणारं साहित्य विपुल नव्हतं. साधारणपणे १९८०च्या आसपास साहित्याच्या असलेल्या त्या मुख्य प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, सामाजिक बांधिलकी मानणारे, वास्तववादी, अमूर्त, बंडखोर, परिवर्तनवादी असे नवे उपप्रवाह निर्माण झाले. हे उपप्रवाह मिसळून साहित्य नावाचा जो काही मुख्य प्रवाह होता तो अधिक सशक्त झाला. मात्र त्याच वेळी मराठी साहित्यात जात-पोटजात-उपजात आणि धर्मनिहाय टोळ्या निर्माण झाल्या; प्रत्येक जात आणि धर्माच्या कथित अस्मितांची आणि राजकीय हेतूंची त्यात भर पडली. हे कमी की काय म्हणून अलिकडच्या सुमारे दोन-अडीच दशकात उन्मादांची झुंडशाही निर्माण झाली. समाजमाध्यमांचा प्रभाव वाढल्यापासून तर बहुसंख्य ‘हुच्चा’त ‘त्यांचे’ आणि ‘यांचे’ अशा (अंधभक्त) ट्रोल्सच्या टोळ्यांची भर पडली. ‘टोळी’ म्हणजे काही किमान सुशिक्षित, समंजस , सुसंस्कृत समाज नव्हे की त्याला कायदा, घटना, नियम असतात. टोळी प्रमुखाच्या मनाला येईल तेच खरं, तोच कायदा आणि तो सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असा हट्ट, दुराग्रह, हुल्लडबाजी... शेवटी दंडेली, असा तो मामला असतो. हे साहित्याला घातक आहे याबद्दल कुणी ‘ब्र’ काढण्याचं धाडस मात्र क्वचितच दाखवलं गेलं.
समकालीन मराठी साहित्य, समाज आणि समकालीन वास्तव यांच्याशी पाहिजे त्या प्रमाणात ‘रिलेट’ होत नाही ; जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था देशात आल्यावर ज्या भोवंडून टाकणार्या गतीनं समाज, माणसाचं बदलेलं जगणं, त्यामुळे त्याची झालेली मोठी घुसमट, दुसरीकडे त्याच्यात आलेली बधीरता आणि बदललेल्या मूल्यव्यवस्थेचं चित्रण मराठी साहित्यात प्रभावी आणि मूलभूतपणे उमटलेलं नाही. जी नवीन समाज रचना अस्तित्वात आली, त्यात जुन्या समाजातला एक मोठा वर्ग मोडून पडला, काही उदध्वस्त झाला तर दुसरीकडे आर्थिक सुस्थिती असणारा सर्व जाती-धर्मीय नवीन वर्ग समाजात अस्तित्वात आला; या नवीन समाजाचं भावजीवन, जगणं, असोशी, समस्या याचं चित्रण फारच अपवादानं मराठी साहित्यात व्यक्त झालं.
शिक्षणाचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण घिसाडघाईनं झाल्या(केल्या)मुळे लोक सुशिक्षित ऐवजी केवळ साक्षर झाले. त्यामुळे आकलन, निकोप दृष्टी आणि सांस्कृतिक समज असणारी पिढी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही. एकीकडे बर्यापैकी आर्थिक स्थैर्य आलं तरी सर्वसमावेशक (म्हणजे अभिजात वाचन, श्रवण, वैयक्तिक- कौटुंबिक- सार्वजनिक वर्तन आणि व्यवहार, सांस्कृतिक समज येणं...इत्यादी) प्रगल्भता समाजात वैपुल्यानं निर्माण झाली नाही. उलट टोळ्या तयार झाल्या आणि ‘हुच्च’पण फोफावलं. त्यात भर घातली गेली ती अर्धवट राजकीय समजाची; त्यातून बोकाळला तो सुमारपणा, एकारला कर्कश्शपणा आणि कोणत्या तरी राजकीय विचाराचे गडद चष्मे घातलेला ‘टोळीवाद’.
मुंबई-पुण्याच्या, विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देशच्या टोळ्या वेगळ्या, प्रत्येक माध्यम समूहाची वेगळी टोळी (विश्वास बसत नसेल तर रविवार पुरवण्यातील लेखकांची नावं आणि कोणाच्या पुस्तकांची समीक्षणं प्रकाशित होतात याचं निरीक्षण करा) आणि त्यांचा वेगळा अजेंडा. या सर्वांकडे संशयाच्या (Skeptical) नजरेतून पाहणारीही आणखी एक टोळी आहे! भाषा, शैली, आशय, समज आणि आकलन थिटे असणार्या या अशा सुमारांच्या गल्लो-गल्ली असणार्या अनेक टोळ्या अलीकडच्या काही दशकात मराठी साहित्यात हुल्लड माजवत असून त्यांना जात-उपजात-पोटजातीच्या अस्मितेचे धारदार कंगोरे आहेत, हीदेखील आणखी एक वस्तुस्थिती आहे.
अलीकडच्या काही वर्षांत म्हणजे पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्यावर; गेली सहा-सात वर्ष नियमितपणे पुरवण्यांचं अवलोकन केल्यावर बहुसंख्य संपादक आणि पुरवण्यांचे संपादक ही देखील साहित्यातील एक स्वतंत्र टोळी आहे, अशा निष्कर्षाप्रत आलो आहे. राज्यभर प्रसार असणाऱ्या खपानुसार पहिल्या सात-आठ स्थानावर असणाऱ्या वृत्तपत्रांच्या पुरवण्यांच्या संपादकांच्या या टोळ्या आहेत. इथे आणखी एक मुद्दा माध्यमांचाच आहे. आपण बातम्या, लेख, स्तंभ, अग्रलेख लिहितो (आणि त्याची पुस्तकं प्रकाशित झाली) म्हणजे आपण साहित्यिक आहोत आणि अमुक कवी/लेखक आपल्यामुळे घडला असा पुरवणी सांभाळणार्या, तसंच बहुसंख्य अँकर्स/पत्रकार/संपादकांचा गोड गैरसमज आहे. आपल्यामुळेच साहित्य व्यवहार चालतो असा त्यांचा ठाम समज आहे. ‘दिव्य’ भाषा बोलत आणि लिहीत मराठी भाषेचे धिंडवडे काढणार्या माध्यमांतील बहुसंख्यांना साहित्य हा एक गंभीर विषय आहे याची फिकीर नसते; त्यांच्यासाठी तो असतो केवळ एक ‘न्यूज इव्हेंट’ आणि आली वेळ मारून नेण्याचं कथित कौशल्य. आपल्याला माहिती आहे तेवढंचं ज्ञान अस्तित्वात आहे आणि त्या आधारे इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती जोपासणारी माध्यमांतील सुमारांची ही एक टोळी साहित्य प्रांती धुमाकूळ घालते आहे. सुमारांची आणखी एक टोळी मराठी भाषा शिकवणार्या शिक्षक आणि प्राध्यापकांची आहे. भाषा शिकवतो म्हणजे आपण साहित्यिक आहोत असा त्यांचाही अनेक माध्यमाकारांप्रमाणे गोड गैरसमज आहे.
कुणाच्या पुस्तकाचं समीक्षण (?), ते कुणाचा लेख कोणत्या वृत्तपत्रात किती आकारात येऊ शकतो, याचा अंदाज सहज बांधता येतो, अशी स्थिती सध्या आहे. ठराविक लेखक आणि ठराविक वृत्तपत्र असं हे समीकरणचं बनलेलं आहे. बहुसंख्य दिवाळी अंकांबद्दलही स्थिती अमुक जाती-पातीचा-राजकीय विचार धारणेचा लेखक आणि अमुक दिवाळी अंक असं साटंलोटं झालेलं आहे. मध्यंतरी एका पुरवणीत चुकीचा संदर्भ आला म्हणून त्या पुरवणीच्या संपादकाला फोन करुन प्रतिक्रिया पाठवतो म्हणालो तर तो उत्तरला, ‘तुमचं नाव बॅन आहे आमच्याकडे!’ आणखी एका पुरवणीच्या संपादकाचा असाच अनुभव आला. ‘तुम्ही अमुक एका वृत्तपत्रात लिहिता म्हणून आमच्याकडे तुम्ही नको’ असा अनुभव अनेक साहित्यिकांनी सांगितला. वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी हे वातावरण मुळीच अनुकूल नाही. मराठी भाषा आणि साहित्यासाठी या सर्व उन्मादी टोळ्या घातक आहेत.
समकालीन मराठी साहित्य हा असा, अनेक टोळ्यांचा एक गढूळ प्रवाह झाला असून त्यात अस्सल, कसदार, जगण्याला थेट भिडणारं, जागतिक बदलांचं भान असणारं जे काही थोडं-बहुत लेखन आणि ते करणारे लेखक आहेत ते कोपर्यात अंग चोरून उभे आहेत.
थोडक्यात काय तर, बहुसंख्य मराठी साहित्य जगत म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता हुल्लडबाजांच्या टोळ्यांचं कुरण झालंय; या टोळ्यांविरुद्ध आवाज उठवणारे रा. रं. बोराडे मोठ्या संख्येनं हवे आहेत.
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Sun , 19 January 2020
अत्यंत खेदजनक परिस्थिती आहे यात काही संशय नाही. ह्यावर उपाय काय? मुळात याच मुद्द्यावर असे पण विचारावेसे वाटते की वाचकांच्यापण टोळ्या झाल्या आहेत का? याचे पण होकारार्थी उत्तर आले तर आश्चर्य वाटणार नाही. (खरे तर झाल्या आहेत असेच माझे वैयक्तिक मत आहे). मग असे खरेच असेल तर साहित्यनिर्मिती या अंगाचे दुःखद निधन झाले आहे असेच समजावे. यापुढे अभिजात साहित्य असे काही निघणार नाही. तसेही किंडल, ऍमेझॉन सारख्या कंपन्यांनी मातब्बर प्रकाशन संस्थेची मक्तेदारी मोडीत काढली आहेच -- त्याचा एक फायदा असा की कुणीही पुस्तक लिहून ते प्रकाशित करू शकतो. तशीच पुस्तके काढावीत आणि त्या त्या टोळ्यांनी वाचावीत. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच इथेही वैचारिक तटबंद्या वगैरे उभ्या राहणार. तश्याही चित्रकला शिल्पकला वगैरे बाबतीत आपली उदासीनता कपाळावर हात मारून घेण्यासारखी आहेच. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये कितीसे सुंदर कलात्मक पुतळे आणि शिल्पाकृती आपण निर्माण करतो? सगळ्या शिल्पकलेला पुढाऱ्यांचे पुतळे बनवण्यासाठीच आपण कामाला लावतो. चित्रकलेच्या नावाने तर अजूनच बोंबाबोंब आहे. अगदी श्रीमंत सोडले तर कुणी चित्रांकडे ढुंकूनही बघत नाही आणि जे बघतात तेही कितपत प्रगल्भतेने बघतात? थोडक्यात, साहित्य ही एक कला जराशी तग धरून असायची पण आता तिचेही दिवस भरले. जय भारत!!याला कारण एकाच, साहित्यिकांनी साहित्याकडे लक्ष केंद्रित करायचे सोडून राजकारणात तोंड खुपसायला सुरुवात केली आहे. आणखी एक रेटा आहे तो म्हणजे व्यवसायाचा. चित्रपट आणि दूरदर्शन इथे आता जरा चांगल्या संहिता येऊ लागल्या आहेत आणि प्रयोग होत आहेत. कदाचित असे तर नसेल की सगळे प्रतिभावंत तिकडे चालले आहेत आणि मुद्रित पुस्तकी साहित्याच्या क्षेत्रात गाळ उरला आहे? ता. क. -- फेसबुक वगैरे समाजमाध्यमांमुळे त्याच त्याच आपल्याच विचारांशी सहमत असे विचार आपल्या पानांवर येऊन आदळत राहतात, याबद्दल प्रत्यक्ष फेसबुकच्या जन्मभूमीत -- म्हणजे सिलिकॉन व्हॅली मध्ये -- अस्वस्थता आहे. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीवर परिणाम झाला आणि त्याबद्दल सर्वत्र अस्वस्थता आहे. पण एकही भारतीय हरीच्या लालाने यावर चिंता व्यक्त केलेली दिसली नाही -- कारण, जर मी फेसबुकवर काही लिहीत असेन आणि फेसबुक माझ्या वाचकवर्गाला तोच तोच मजकूर सतत दाखवत असेल तर संधीसाधू लेखक म्हणून माझा तर फायदाच आहे!! थोडक्यात, एकालाही यातून काही वाकडे घडते आहे ह्याची ना दाखल ना चिंता. "Echo Chamber" ही स्थिती पाश्चात्य लोक घातक समजतात तर आपण त्यामुळे हुरळून जातो. हा फरक आहे दोन्ही समाजात.