मसाया : एखादा माणूस प्रेषित असतो म्हणजे नेमकं काय? प्रेषित असणं फक्त भौतिकशास्त्राचे नियम वाकवणं असतं? का त्यापलीकडचं काही?
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • ‘मसिहा’ची पोस्टर्स
  • Sat , 18 January 2020
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar मसाया Messiah नेटफ्लिक्स Netflix

प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचं ‘इनसायडर’ हे पाक्षिक सदर आजपासून... 

.............................................................................................................................................

मानसशास्त्रात ‘मसाया कॉम्प्लेक्स’ नावाची संज्ञा आहे. वेडेपणाच्या किंवा मानसिक असंतुलनाच्या सीमारेषेवर घुटमळणारे अनेक लोक देव आमच्याशी संवाद साधतो आणि आम्हाला आदेश देतो, असा दावा करत असतात. अनेक गुन्हेगार, सिरिअल किलर्स, दहशतवादी हे त्यांनी केलेल्या निर्घृण हत्यांचं आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गुन्ह्यांचं समर्थन करताना, आम्ही ही सगळी कृत्यं परमेश्वराच्या आज्ञेवरूनच केली आहेत, असे दावे करत असतात. अर्थातच या ‘देवाने दिलेल्या आज्ञां’चा सकारात्मक वापर करण्याची पण उदाहरण आहेतच. फ्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी अजस्त्र ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा देणाऱ्या जोन ऑफ आर्कचा पण असा दावा असायचा की, परमेश्वर मला जुलुमाविरुद्ध लढा देण्यासाठी मार्गदर्शन करतो. परमेश्वर आणि जोन ऑफ आर्क दरम्यानच्या संवादावर बनलेला ‘द मेसेंजर : द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क’ हा अफाट सिनेमा आवर्जून पाहण्यासारखा आहे. हा सिनेमा ‘मसाया कॉम्प्लेक्स’वर चांगला प्रकाश टाकतो.

परमेश्वर माझ्याशी संपर्क करतो आणि मला आज्ञा देतो, असा दावा करणारे लोक सातत्याने समोर येत जातात. यातल्या बहुतेकांना जग अर्थातच गांभीर्याने घेत नाही. प्रेषित ही संकल्पना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात फार मानली जाते. जगाचा पुन्हा उद्धार करण्यासाठी प्रेषित पुनर्जन्म घेणार आहे, ही या धर्मातल्या कोट्यावधी अनुयायांची श्रद्धा आहे. हिंदू धर्मीय ‘अवतार’ संकल्पनेवर विश्वास ठेवतात. या अनुयायांच्या श्रद्धेचा दुरुपयोग करून त्याचा वापर स्वतःची राजकीय किंवा वैयक्तिक लाभाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करत असतात. त्यामुळे एखाद्याने आपण ‘परमेश्वराचा पुत्र’ आहोत किंवा ‘प्रेषित’ आहोत असा दावा केला, तर लोक त्याच्याकडे संशयानेच पाहतात.

अशा अविश्वासाच्या अस्थिर जगात खरंच आपण प्रेषित आहोत असं अनेकांना पटवून देणारा एखादा आला तर? जग अशा माणसाला कितपत गांभीर्याने घेईल? आपलं जग खरंच एखाद्या प्रेषितासाठी तयार आहे का? एखादा माणूस प्रेषित असतो म्हणजे नेमकं काय? प्रेषित असणं फक्त भौतिकशास्त्राचे नियम वाकवणं असतं? का त्यापलीकडचं काही? अशा अनेक गंभीर प्रश्नांची गांभीर्याने देण्याचा एक चांगला प्रयत्न ‘नेटफ्लिक्स’वरची ‘मसाया’ ही वेब सिरीज करते.

‘मसाया’चं कथानक हे आजच्या अस्थिर युद्धग्रस्त सीरियामध्ये सुरू होतं. सध्याचा सीरिया हा जगातल्या महासत्तांच्या बुद्धिबळातला पट बनलं आहे. सध्याचे सीरियन हुकूमशहा असद यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी अमेरिका जीव तोडून प्रयत्न करत आहे. पण अमेरिकेचं या भागातलं वर्चस्व वाढू नये म्हणून रशिया आणि चीन असद यांच्यामागे भक्कमपणे उभे आहेत. तिथल्या अनेक जिहादी ग्रुपना प्रोत्साहन देणारा इराण आणि स्वतःचे या भागातले हितसंबंध कायम राहावेत म्हणून झगडणारा इस्त्रायल ही या बुद्धिबळातली सोंगटी. या भागातली जनता सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जेरीस आलेली आहे. त्यांचे सतत हाल चालू आहेत, पण त्यांची दखल घेण्याची गरज वर उल्लेख केलेल्या बड्या धेंडांना वाटत नाहीये.

तिथं एक तरुण आपण परमेश्वराचे पुत्र आहोत असं सांगून गांजलेल्या जनतेशी संपर्क साधायला लागतो. त्याचं बोलणं हे बरंचसं सेन्सिबल आणि लोकांच्या धार्मिक श्रद्धांना हात घालणारं असतं. भुकी कंगाल जनता आपसूकच त्या आगंतुक तरुणाच्या मागे उभी राहते. तो तरुण कोण आहे, कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, हे कुणालाच माहीत नसतं. पण या अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या तरुणाच्या मागे जनता उभी राहायला लागते. पण मध्यपूर्वेतल्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असणाऱ्या इव्हा गेलर या अमेरिकन गुप्तहेर एजन्सीच्या ऑफिसरचं लक्ष हा प्रेषित असण्याचा दावा करणारा तरुण वेधून घेतो. ती उत्सुकतेनं त्याच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवायला लागते.

मी तुम्हाला भुकेपासून आणि मृत्यूपासून संरक्षण देईन असा दावा करून हा तरुण एका मोठ्या जनतेला सीरिया आणि इस्त्रायलच्या सीमारेषेवर घेऊन येतो. ही सीमारेषा म्हणजे जगातली सगळ्यात अशांत सीमारेषा. हा तरुण इस्त्रायलला आम्हाला अन्न आणि पाणी द्या असं आवाहन करतो. त्याच्या या एका कृतीमुळे हा तरुण पूर्ण जगाच्या नजरेत भरतो. जगातली सगळी माध्यमं त्याला प्रसिद्धी द्यायला लागतात. आपण प्रेषित आहोत असा दावा करणाऱ्या या तरुणाकडे जग उत्सुकतेनं बघायला लागतं. एव्हाना जगानं आणि माध्यमांनी त्या तरुणाचं ‘मसाया’ असं बारसं करून टाकलेलं असतं. या सगळ्यांचे गंभीर परिणाम लक्षात घेऊन इस्त्रायली सुरक्षा दल त्या तरुणाला अटक करतात. पण तिथल्या बंदिवासातून मसिहा चमत्कारिकपणे अंतर्धान पावतो आणि डायरेक्ट प्रकटतो तो अमेरिकेतल्या टेक्सस प्रांतात.

एका छोट्या गावात एक विध्वंसकारी चक्रीवादळ आणि मसाया एकत्रच प्रवेश करतात. पूर्ण गाव त्या चक्रीवादळात उद्धवस्त होतं. फक्त गावातलं चर्च सोडून. त्यामुळे त्या गावातल्या वैयक्तिक आणि आर्थिक गुंत्यात अडकलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकाची मसायावर श्रद्धा बसते. तो जवळपास त्याचा अनुयायीच बनतो. एव्हाना मसाया अमेरिकेतल्या एका गावात प्रकट झाला आहे, अशी बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरायला लागते. माध्यम आणि दर्शनोत्सुक जनता त्या छोट्या खेड्यात दाटून गर्दी करतात. तिथल्या जनतेची पण या मसायावर श्रद्धा बसायला लागते. त्याचा बोलबाला व्हायला लागतो.

अमेरिकन सरकार या देशाचा नागरीक नसणाऱ्या अनधिकृत घुसखोराला अटक करते. त्याच्याविरुद्ध अमेरिकन न्यायालयात खटला उभा राहतो. मसाया या न्यायालयाच्या खटल्याचा पण स्वतःचा संदेश पसरवण्यासाठी कौशल्यानं वापर करतो. या खटल्यातून मसाया निर्दोष सुटतो, आता तो पूर्ण अमेरिकेत देवाचा संदेश पसरवायला सुरुवात करतो. काही चमत्कार (?) पण करून दाखवतो. जनता, माध्यमं आणि जगातल्या सर्वाधिक ताकदवान राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष मसायाच्या प्रभावाखाली फरफटत जायला लागतात.

यातून अनेक आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग उभे राहायला लागतात. एक केऑस तयार होतो. पण इव्हा गेलर आणि आणि इस्त्रायली गुप्तहेर अधिकारी अविराम यांना हा आगंतुक तरुण कोणी मसाया वगैरे नाहीये याची खात्री असते. ते या रहस्यमय तरुणाची पाळंमुळं खणायला लागतात. ही पाळंमुळं खणताना त्यांना अनेक घटकांना आणि धक्क्यांना सामोरं जावं लागतं. हा तरुण खरंच मसाया असतो का? या मसायाच्या आयुष्यात आलेली अनेक माणसं त्याच्यामुळे प्रभावित कशी होतात? मसायामुळे निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगाचा उलगडा कसा होतो? मुख्य म्हणजे इव्हा आणि अविरामला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतात का? या प्रश्नांची उत्तर ‘मसाया’चे दहा एपिसोडस बघताना मिळतात. 

या सीरिजमध्ये मसायाचं पात्र अणुकेंद्र असेल तर त्याच्या संपर्कात येत जाणारी आणि त्याच्या प्रभावामुळे आयुष्य आरपार बदलून जाणारी माणसं ही न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आहेत. मसायावर सुरुवातीपासून लक्ष ठेवून असणारी आणि वैयक्तिक आयुष्यातली दुःखं कामात बुडवणारी इव्हा गेलर, आयुष्यातल्या एका कटू घटनेचं ओझं सतत बाळगत असणारा इस्त्रायली एजंट अविराम, आपल्या दुर्धर आजारानं ग्रस्त मुलीला मसाया बरं करेल, या अपेक्षेनं त्याची मागे लागलेली एक आई, मुस्लीम देशातून आलेल्या व त्याचा अनुयायी बनलेला ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि त्याची खास अमेरिकन डिसफंक्शनल फॅमिली (ज्यात तिघांचे जगावेगळे प्रश्न आहेत) ही अतिशय उत्तम लिहिलेली पात्रं आणि त्यांचे उत्तमरीत्या विकसित केलेले ट्रॅक्स, हे या वेबसीरिजला एक खोली मिळवून देतात. मसायापेक्षा जास्त स्क्रीनस्पेस या पात्रांनी व्यापून टाकलेली आहे.  

नॉर्मली कुठल्याही कलाकृतीच्या कथानकात ‘देव’ किंवा दैवी घटक आला की, कथानक धमाल करण्याकडे कलाकृती तयार करणाऱ्यांचा कल असतो. ‘ब्रूस अलमायटी’, याचाच फारसा न गाजलेला पुढचा भाग  ‘इव्हान अलमायटी’,  परेश रावलची ‘ओ माय गॉड’ आणि काही उदाहरणं आहेत. अजून एक धमाल आणि आपल्याकडे फारसा माहीत नसलेला सिनेमा म्हणजे ‘द ब्रँड न्यू टेस्टामेंट’. या सिनेमात देव हा खत्रूड, कावलेला एक म्हातारा माणूस असून तो ब्रुसेल्स शहरात एका उपनगरात राहत असतो. सतत अवघड प्रश्न विचारणाऱ्या बंडखोर मुलीशी सतत त्याची भांडणं होत असतात. या सगळ्या सिनेमांमध्ये देव आणि माणूस यांच्यात उडणारा संघर्ष आणि त्यांच्यात होणारा संवाद  हा महत्त्वाचा घटक आहे. हे सिनेमे मनोरंजक श्रेणीत मोडणारे आहेत.

‘मसाया’ बघण्यापूर्वी एक सावधानतेचा इशारा म्हणजे या बेव सीरीजमध्ये असं काहीही नाहीये. ‘मसाया’ ज्याला ‘स्लो बर्नर’ म्हणता येईल अशी सीरिज आहे. इथं घटना अतिशय संथ घडतात. मसाया इथं कुठलंही लंबचौड तत्त्वज्ञान देत बसत नाही. इथं मसाया आणि सगळ्याच पात्रांच्या दरम्यान होणारा संवाद हा काहीसा शॉर्ट आणि तुटक आहे. त्यामुळे घटनांची भरमार, सातत्यानं निर्माण होणाऱ्या कॉन्फ्लिक्टसची देमार अशी अपेक्षा असेल तर ही वेब सिरीज बघणाऱ्यांचा अपेक्षाभंग करण्याची  शक्यता जास्त आहे.

इथलं कथानक एकाच वेळेस इराण, पॅलेस्टाईन, इस्त्रायल, अमेरिका आणि सीरियामध्ये घडतं. इथली पात्रं वेगवेगळ्या देशातली असली तरी त्यांची सुख-दुःख आणि वैश्विक जाणीवा या एकसारख्याच आहेत. कथानकातली इतकी पात्रं आणि त्यांच्यातलं वैविध्य यांचा समतोल दिग्दर्शक जेम्स मॅकटिग आणि केट वूड्स यांनी फार उत्तमरीत्या सांभाळला आहे.

‘मसाया’चं ट्रीटमेंटच्या बाबतीत साम्य असलंच तर केव्हिन स्पेसीच्या ‘के पॅक्स’शी आहे. त्यामध्ये केव्हिन स्पेसीचं पात्र आपण के पॅक्स नावाच्या ग्रहावरून आलेला प्रॉट नावाचा परग्रहवासी आहोत, असा दावा करत असतं. एक शास्त्रज्ञ हा दावा मान्य करायला तयार नसतो, पण बरेच लोक प्रॉटवर विश्वास ठेवत असतात. अगदी त्या शास्त्रज्ञाच्या घरातले लोक. फरक इतकाच की, ‘के पॅक्स’चा शेवट खूपच ओपन एंडेड आहे. तुलनेनं ‘मसाया’चा शेवट (विशेषतः शेवटचा सीन) खूपच स्पष्टपणे मसाया कोण आहे हे सांगतो. पण ‘मसाया’चा शेवट पण सिरीज पाहताना निर्माण झालेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. उलट प्रेक्षकांच्या मनात अजून काही नवीन प्रश्न निर्माण करून जातो. एका सिरीजचा आदर्श शेवट. पहिला सीझन संपताना दुसऱ्या सीझनची शक्यता निर्माण करणारी सिरीज एक आदर्श सिरीज असते. 

भारतासारख्या गल्लोगल्ली बाबा-महाराजांचं पेव फुटलेल्या नियतीवादी देशात, जिथे सगळेच बाबा आपण ईश्वरी अंश असल्याचा दावा करतात (आणि त्यांचे लाखो अनुयायी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात), जिथं एखाद्या खेळाडूलाच ‘गॉड’ असं दुसरं नावं दिलं जातं, जिथं असंख्य वैचारिक कोलांट्या उड्या मारणारे अकार्यक्षम राजकारणीच वैयक्तिक आयुष्यात इरसाल, पण राजकीयदृष्ट्या भाबडे असणाऱ्या राजकारण्यांना मसीहा मानलं जातं, जिथं व्यक्तिपूजा हाच सामाजिक जीवनाचा नियम आणि व्यत्यास मानला जातो तिथं खरंच चुकून एखादा प्रेषित आला, तर या अगोदरच शेकडो मसाया वावरत असलेल्या देशात त्याची प्रतिक्रिया कशी उमटेल, हा प्रश्न ही वेब सिरीज बघताना सतत पडत राहतो.

‘ब्रूस अलमायटी’मध्ये देव लुजर नायकाला म्हणतो, “देव असणं म्हणजे फक्त भौतिकशास्त्राचं नियम वाकवणं असं नसतं. ते त्याच्या अजून पलीकडचं असतं.” हे विधान ‘मसाया’ बघताना प्रकर्षानं आठवत राहतं. दोन चांगल्या कलाकृतींना जोडणारा हा एकमेव दुवा. बाकी ‘मसाया’ त्याच्या पलीकडे खूप आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......