अजूनकाही
जेएनयूच्या आंदोलनाबद्दल खोटा प्रचार करताना भाजपच्या आयटी सेलने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. अनेक छायाचित्रं खोट्या बातम्यांसह पेरण्यात आली आणि भक्तांकडून मोठ्या उत्साहाने सगळीकडे पाठवण्यात आली. काही दिवसांपूर्वी जेएनयूच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षा आयुषा घोष यांच्या एका हातावर प्लॅस्टर बांधले असल्याचं छायाचित्र भाजप समर्थकांनी कॉम्प्युटरवर मिरर इमेज ही पद्धत वापरून वायरल केलं. या छायाचित्रानं धुमाकूळ घातल्यानंतर ‘अल्ट न्यूज’ने ते खोटं असल्याचं समोर आणलं.
भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनामा उपसमितीच्या सदस्या करुणा गोपाल यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी एका मुलीने आपले केस कंडोमनं बांधल्याचा आणि त्यासोबत घोषणा देणारी एक तरुणी असं छायाचित्र ट्विट केलं. त्यासोबत “यापेक्षा जेएनयूच्या पडझडीचं चांगलं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही - केस बांधण्यासाठी कंडोम आणि नग्न निषेध” असं त्यांनी लिहिलं. देशभरात भाजप समर्थकांनी या मुलीला जेएनयूची वेश्या म्हणून हिणवत, यांच्यावर कर भरणार्यांचा पैसा का खर्च करावा, असा सवाल केला. वास्तवात ही दोन्ही छायाचित्रं असंबद्ध होती. कंडोम केसांना बांधलेल्या तरुणीचा फोटो २०१७ सालचा असून तो एका ट्विटर वापरकर्तीचा होता. यु-ट्यूबर आरजे रौनक भाजप समर्थनाचे व्हिडिओ बनवत असतो. त्याने आपल्या एका व्हिडिओमध्ये तेच छायाचित्र वापरलं. नंतर त्याच्या व्हिडिओ खाली सत्य उघड करणाऱ्या कमेंट्स आल्यावर त्याने छायाचित्र हटवणार असल्याचा मथळा टाकला.
एका दुसर्या छायाचित्रामध्ये डोक्यावर केस कमी असलेल्या एक तरुण १९८९पासून जेएनयूत शिकत असून, २० वर्षांपासून पीएच.डी. करत आहे, त्याला ४७ वर्षांचा विद्यार्थी म्हणून हिणवलं गेलं. या पोस्टसोबत ‘हा टकला बर्याच वेळापासून जेएनयूत आहे. १० रुपयात खोली, विनामूल्य भोजन, चांगलं वेतन, कंडोम वेंडिंग यंत्र... अजून ‘क्रांतिकारक’ काय हवं आहे?’ असा मजकूर होता. ही खोटी पोस्ट भाजपच्या अनेक प्रवक्ते व संघस्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहानं शेअर केली. त्यानंतर ही पोस्ट भाजप आयटी सेल व समर्थकांकडून लाखोंच्या संख्येत विविध समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आली. या तरुणाने नंतर आपला व्हिडिओ काढला आणि जाहीर केलं की, ‘त्याचं नाव पंकज मिश्रा असून तो उत्तर प्रदेशच्या इलाहाबादचा रहिवाशी आहे. त्याने याच वर्षी मोठ्या कष्टानं जेएनयूच्या एम.फिल विभागात प्रवेश मिळवला आणि त्याचं वय ३० वर्षं आहे.’
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महिला नेत्या एनी राजा यांनी भारताचे सरन्यायाधीश यांच्याशी संबंधित लैंगिक छळ विरोधी आंदोलन केलं होतं. त्यांना आंदोलन स्थळावरून अटक करून पोलिस व्हॅनमध्ये बसवण्याचं जुनं छायाचित्र भाजप आयटी सेलकडून ‘जेएनयूच्या वयस्कर आंटीला पाळणारी जेएनयू बंद करा’ या आशयाच्या मथळ्यानं सगळीकडे पसरवण्यात आलं. एनि राजा या भाकपाच्या नेत्या असून जेएनयूची विद्यार्थिनी नाहीत. मे २०१९ मध्ये लैंगिक छळाच्या आरोपावरून माजी सर न्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर निषेध करणार्यांमध्ये एनी राजा यांचा समावेश होता. तेव्हा हे छायाचित्र विविध ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं.
कनक मिश्रा नावाच्या अकाऊंटवरून दोन हजारपेक्षा जास्त रिट्विट झालेल्या एका पोस्टमध्ये एका २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या ‘झी न्यूज’च्या स्क्रीनशॉट छायाचित्रासह ‘या ४३ वर्षांच्या जेएनयूच्या विद्यार्थिनी आहेत आणिव यांची २३ वर्षांची मुलगी मोनादेखील याच जेएनयूमध्ये शिकते’ असं लिहून पसरवलं गेलं. या विद्यार्थिनीनं संगितलं की, तिचं नाव संभवी सिद्धि असून ती जेएनयूमध्ये फ्रेंच भाषेत एम.ए. करत आहे.
भक्तांकडून जेएनयूची बदनामी करणार्या एका पोस्टमध्ये हातात दारूची बाटली आणि दुसर्या हातात सिगारेट असलेल्या युवतीचं छायाचित्र, ती जेएनयूची विद्यार्थिनी असल्याचं कथन करून फिरवण्यात आलं. त्यावर लिहिलं की “ही हरामखोर जी दारू व सिगरेट पित आहे, त्याच्या एका पेगची किंमत ३०० रुपये आहे आणि हे फी वाढीबद्दल विव्हळत आहेत.” हे छायाचित्र ज्या दुसर्या तरुणीच्या छायाचित्रासोबत प्रसिद्ध करण्यात आलं, ती जेएनयूच्या आंदोलनात एक फलक घेऊन उभी असलेली प्रियंका भारती होती. दोन्ही छायाचित्रांमधील तरुणी स्पष्टपणे वेगवेगळ्या दिसत असूनही ही पोस्ट लाखोंच्या संख्येनं देशभरातील व्हॉट्सअॅप व ट्विटरवर व्हायरल करण्यात आली. दारूची बाटली व सिगरेट पाकीट असलेल्या तरुणीचं छायाचित्र २०१६ सालच्या दुसर्या एका महिलेच्या ब्लॉगवरचं आहे. त्याचा आधार घेऊन फी वाढीचा विरोध करणार्या आंदोलनकर्त्या तरुणीला भाजप समर्थकांकडून बदनाम करण्यात आलं.
सोशल मीडियावर निषेध करणार्या विद्यार्थ्यांना बदनाम करणार्या एका पोस्टमध्ये एका विद्यार्थ्याला काही लोक पकडून नेताना दिसत होते, मागे पोलीस दिसत आहेत. या छायाचित्रासोबत ‘हा ४५ वर्षांचा काँग्रेस नेता मंडळ अध्यक्ष अब्दुल रझा असून तो अजूनही विद्यापीठात विद्यार्थी आहे.’ आणि ‘हा ४५ वर्षांचा विद्यार्थी जेएनयूचा विद्यार्थी असल्याचं समजलं, तो अब्दुल रझा आहे, तो काँग्रेस लीडर आहे.’ असंही लिहिलं आहे. वास्तवात हे छायाचित्र भाषाविभागात एम.ए. शिकणार्या जेएनयूमधील २३ वर्षीय विद्यार्थी शुभम बोकडे या तरुणाचं आहे. ‘अल्ट न्यूज’शी बोलताना बोकाडे म्हणाला, “सर्वप्रथम प्रसारित केलेली पोस्ट बनावट आहे. माझ्या मते प्रसारित केलेली कथादेखील खूप समस्या तयार करणारी आहे. हे स्पष्टपणे इस्लामोफोबिक आहे. दुसरे म्हणजे समजा, मी बनावट बातम्यांनुसार ४५ वर्षांचा असलो तरी अशा व्यक्तीनं स्वस्त दरात शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात काय चूक आहे, हा प्रश्न आहे?”
अशाच एका पोस्टमध्ये ‘ज्या वयात लोक वृद्धापकाळाची पेन्शन घेतात, तेव्हा आंटी कोणतं ज्ञान घेत आहे?’ असा मजकूर लिहून पोलीस जबरदस्तीनं धरपकड करत असलेल्या या महिलेच्या छायाचित्राला थट्टा उडवणार्या इमोजी लावून मोठ्या प्रमाणात ट्विट व शेअर करण्यात आलं. खोट्या बातम्यांचं बिंग फोडणार्या ‘अल्ट न्यूज’नं जाहीर केलं की, हे छायाचित्र जेएनयू विद्यार्थ्यांच्या निषेधाशी संबंधित नाही. हैदराबाद येथील कामगार आयुक्त कार्यालयात कमीत कमी वेतन मिळावं या मागणीसाठी निषेधार्थ सहभागी झालेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. त्याची बातमी ‘आउटलुक’ने प्रकाशित केली होती, त्यातील हे छायाचित्र आहे. पीटीआयच्या मीडिया आउटलेटनुसार १९ सप्टेंबर २०१७ रोजी हे छायाचित्र प्रकाशित केलं होतं.
पोलीस कर्मचार्यांनी एका युवतीवर लाठीहल्ला केल्याचं छायाचित्र सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणात शेअर केलं गेलं. या तरुणीची “ये पडा धोनी का छक्का और बॉल स्टेडियम के बाहर” अशा शब्दांत खिल्ली उडवली गेली. वास्तविक पाहता हे २०१२ मध्ये निर्भयाच्या निर्घृण बलात्कार आणि हत्येप्रकरणी राष्ट्रीय राजधानीत झालेल्या निषेधावेळी काढण्यात आलेलं छायाचित्र होतं.
जेएनयू परिसरात आंदोलनादरम्यान चुंबन दिवस साजरा करण्यात आला, अशा आशयाचं मुलंमुली परस्पर चुंबन घेत असल्याचं छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलं. फेक छायाचित्रांचा भांडाफोड करणार्या वेबसाईट्सनी हे छायाचित्र २०१४ व २०१७ साली मरीन ड्राईव्ह, कोची (केरळ) इथं भरलेल्या ‘प्रेमाच्या चुंबनाचा दिवस’ कार्यक्रमाचं असल्याचं समोर आणलं. हा कार्यक्रम शिवसेना, बजरंग दल व श्रीराम सेनेसारख्या उजव्या कट्टरवादी संघटनांकडून प्रेमी जोडप्यांवर नैतिक पोलीसगिरीच्या नावाखाली वाढलेल्या हल्ल्यांविरोधात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा ही छायाचित्रं ‘डेक्कन क्रोनिकल’ आणि ‘एशियन एज’ या वृत्तपत्रांनी छापल्यामुळे इंटरनेटवर सहज उपलब्ध होती. याचाच वापर जेएनयूला बदनाम करण्यासाठी करण्यात आला.
केंद्रात भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी जेएनयूची प्रतिमा एक पुरोगामी विचारधारा व राजकीय विचारसरणीचं विद्यापीठ आणि देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था अशी होती. परंतु मागच्या सहा वर्षांमध्ये पद्धतशीरपणे तिथले विद्यार्थी ‘देशद्रोही’, ‘तुकडे-तुकडे गँग’, अय्याशी करणारे आणि फुकटे आहेत, असं पसरवलं जात आहे. आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या मागणीसाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनांच्या इतिहासातील उल्लेखनीय लढा दिला होता. आज त्याच विचाराच्या लोकांना ‘लोकशाहीविरोधी’ म्हणून रंगवलं जात आहे.
हकीकत अशी आहे की, जेएनयूने देशाला अनेक प्रतिष्ठित पत्रकार, इतिहासकार, सनदी अधिकारी, राजकीय नेते, प्रशासक आणि शिक्षक दिले आहेत. सीताराम येचुरी व प्रकाश कारत या वरिष्ठ कम्युनिस्ट नेत्यांची नावं सोडा, पण सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या निर्मला सीतारामन आणि माजी आयएफएस अधिकारी सुब्रमण्यम जयशंकर, तसेच अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अभिजीत बॅनर्जी जेएनयूचेच आहेत. नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टराई, लिबियाचे माजी पंतप्रधान आली जैदान, योगेंद्र यादव, अफगाणिस्तानचे वरिष्ठ वित्तमंत्री अब्दुल सैतार मुराद, केंद्रीय मंत्री मेनका गांधी, एतिहाद एयरवेज प्रमुख अहमद बिन सैफ अल नाहयान, माजी रॉ चीफ आलोक जोशी, मॅगसेसे पुरस्कार विजेते वरिष्ठ पत्रकार पी. साईनाथ असे अनेक लोक जेएनयूत शिकले आहेत. आज एनसीपीचे महासचिव असलेले डी.पी. त्रिपाठी एकेकाळी जेएनयूच्या विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष होते. संघाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या विवेकानंद इंटरनेशनल फाउंडेशनचे सध्याचे संचालक अरविंद गुप्ता जेएनयूचे विद्यार्थी होते. आयएएस अधिकारी दीपक रावत, आयपीएस अधिकारी मानव महाराज आणि संजूकूट पराशर जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिली महिला सुरक्षा अधिकारी सुभाषिनी शंकरही जेएनयूच्याच. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत जेएनयू विद्यार्थी आहेत. आयबी प्रमुख सय्यद आसिफ इब्राहीम जेएनयूचे विद्यार्थी होते. दलित विचारवंत व माजी भाजप खासदार उदित राज आणि बसपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधींद्र भदौरिया जेएनयूतच शिकलेले आहेत.
जेएनयूत वयस्कर विद्यार्थी जनतेच्या पैशांवर ऐश करतात हासुद्धा एक मोठा अपप्रचार आहे. जेएनयूत संशोधन करून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय हे देशातल्या इतर कोणत्याही विद्यापीठात संशोधन करणार्या मुलांच्या वयाइतकंच आहे. अनेक विकसित देशांमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. उदाहरणार्थ- फ्रान्स (२६ ते ३० वर्ष), अमेरिका (२६ ते ३२ वर्ष), ऑस्ट्रेलिया (२६ ते ३५ वर्ष), जर्मनी (२८ ते ३२ वर्ष), स्वित्झर्लंड (२९ ते ३३ वर्ष), कॅनडा (२९ ते ३४ वर्ष), ब्राझिल (२९ ते ३७ वर्ष), फिनलंड (३० ते ३७ वर्ष). हा वयोगट भारतातसुद्धा सगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन करताना आढळतो. परंतु अपप्रचार फक्त जेएनयूबद्दल चालू आहे.
जेएनयू हा देशाच्या ऐक्य व अखंडतेसाठी धोका आणि अय्याशीचा अड्डा बनला आहे, अशी बदनामी करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अनेक दिवस फिरत होत्या. जेएनयूची प्रवेश परीक्षा व शिक्षणाच्या दर्जाबद्दल काडीचीही माहिती नसलेल्या लोकांनी या पोस्ट समाजमाध्यमांवर उत्साहाने पसरवल्या आहेत. पण वास्तविकता ही आहे की, आयआयटीबरोबर उच्चशिक्षण संस्थांच्या क्रमवारीत जेएनयू सातव्या क्रमांकावर आहे. या वर्षी शिक्षण मंत्रालयाच्या एकूणच उच्च संस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत सात आयआयटी आहेत. त्यात जेएनयू सातव्या क्रमांकावर आहे. मागच्या अनेक वर्षांपासून जेएनयू देशातील दर्जेदार विद्यापीठांच्या क्रमवारीत दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावर राहिलं आहे. कला शाखेच्या विषयांमध्ये जगातल्या ५०० विद्यापीठांमध्ये देशातली फक्त दोन विद्यापीठं आहेत- दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू.
भाजप सत्तेवर आल्यापासून जेएनयूला निशाणा बनवलं जात आहे. कन्हैया कुमारचं छायाचित्र मागे इसिस या दहशतवादी संघटनेच्या छायाचित्रासोबत लावून त्याला ‘देशद्रोही’ म्हणून हिणवलं गेलं होतं. भाजपचा आयटी सेल आणि त्यांचे पगारी कर्मचारी देशभरात त्यांच्या हजारो व्हॉट्सअॅप ग्रूप, फेसबुक पेजेस आणि ट्विटरच्या माध्यमातून खोटारडे मजकूर व्हायरल करत असतात. खरं तर यातून ते स्वतःच्या समर्थकांनादेखील मूर्ख बनवतात. या प्रकारातून भाजपला जरी राजकीय फायदा मिळत असला तरी आपल्या एका अत्यंत दर्जेदार विद्यापीठातल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा हकनाक बळी जातो आहे.
.............................................................................................................................................
इंग्रजी पोर्टल्सनी जेएनयूबाबतच्या अनेक ‘फेक न्यूज’चा भांडाफोड केला आहे. त्यातील काहींच्या या लिंक्स
१) How misinformation is being used to undermine JNU students’ protest: Alt News compilation - Arjun Sidharth
2) JNU Student Aishe Ghosh Faked A Hand Injury? A FactCheck - Swasti Chatterjee
https://www.boomlive.in/fake-news/jnu-student-aishe-ghosh-faked-a-hand-injury-a-factcheck-6535
३) Fact Check : Aishe Ghosh's hand injury is not shifting, the photo is morphed.- Fact Check Bureau
४) Condom Used to Tie Hair? Old Meme Shared to Discredit JNU Protests - HIMANSHI DAHIYA
.............................................................................................................................................
लेखक संजय पांडे ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्रचे सदस्य आहेत.
adv.sanjaypande@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment