२०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • हेन्री निकोलस जॉन गुंथर
  • Wed , 15 January 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर First World War हेन्री निकोलस जॉन गुंथर Henry Nicholas John Gunther

नुकतीच पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हे नवेकोरे साप्ताहिक सदर...

शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजालादेखील अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि अहंकार, कशा प्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावरची निष्ठा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पहिल्या महायुद्धाच्या या इतिहासातून सापडायला मदत होईल, अशी अशा वाटते.

.............................................................................................................................................

विषय प्रवेश

११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे की, तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. त्यानंतर एका मिनिटात सर्व युरोपभर युद्धविराम लागू झाला. त्यामुळे हेन्री हा पहिल्या महायुद्धात बळी गेलेला शेवटचा सैनिक ठरला. अर्थात नंतर अनेक जण जखमांमुळे, आजारपणामुळे मेले, पण युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर मारला गेलेला हा शेवटचा.

तसे पाहू जाता संपूर्ण युद्धात जे बळी गेले, ते हकनाक गेले, अशी तेव्हा अनेकांची भावना होती आणि आजही आहे (हे युद्ध आणि त्यातील सर्वच प्रकारची हानी दु:खद असली तरी हकनाक नव्हती, तर ती “मानवी सभ्यता आणि लोकशाही तसेच मानवतावादी मूल्य संरक्षण/संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आणि अटळ अशी द्यावी लागणारी किमत होती...” असे मत तत्कालीन विन्स्टन चर्चिल, आर्थर कॉनन डॉयल यांच्यासारखे लोक किंवा आजच्या काळातील सर मॅक्स हेस्टिंग्जसारखे इतिहास-लेखक आग्रहाने मांडतात.) पण या हेन्री निकोलस जॉन गुंथरचा बळी मात्र हकनाकच गेला, असे आपण खात्रीने म्हणू शकतो.

पहिले महायुद्ध जसजसे साऱ्या जगभर पसरले, तसतसे त्याचे पडसाद जगभरातल्या लोकसमूहांवर पडू लागले. या युद्धाला आणि त्यातल्या प्रचंड हानीला कैसर, जर्मन सैन्य, जर्मन साम्राज्य आणि एकूणच जर्मन जनता कारणीभूत आहे, असा ग्रह अनेक देशांतील लोकांचा झाला. यात ब्रिटिश प्रचार यंत्रणेचा वाटा फार मोठा होता. साहजिकच अमेरिकेतील जनमानसही जर्मनी विरुद्ध झाले. अमेरिकन समाज हा अनेक युरोपीय देशांतून येऊन स्थायिक झालेल्यांचे एक कडबोळे होते. त्यात जर्मनवंशीय लोकही होते. त्यामुळे अमेरिकन जनमानस या अमेरिकन–जर्मन लोकांविरुद्ध झाले. अनेकांना अवहेलना, शिवीगाळ ते तुरळक ठिकाणी मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या. अनेक मूळच्या जर्मन असलेल्या तरुण अमेरिकन लोकांवर याचा परिणाम झाला. आपण जर्मनवंशीय असलो तरी त्यांच्यासारखे(!) नाही, हे ठसवण्याकरता कित्येक अमेरिकन-जर्मन तरुण अमेरिकन सैन्यात भरती झाले. गुंथर त्यातलाच एक.

हेन्री गुंथरचा जन्म ६ जून १८९५ रोजी मेरिलंड, पूर्व बाल्टिमोर इथे झाला. त्याचे आजी-आजोबा १७व्या शतकात कधीतरी जर्मनीतून अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. आपण केवळ जन्माने जर्मन आहोत, मनाने अमेरिकनच आहोत, हे सिद्ध करण्यासाठीच तो सैन्यात दाखल झाला. त्याआधी तो बाल्टीमोरच्या बँकेत कारकून होता. सैन्यात दाखल झाल्यावर ३१३ व्या पायदळाच्या तुकडीत सार्जंट म्हणून भरती होऊन तो पश्चिम आघाडीवर आला. सप्टेंबर १९१८मध्ये त्याच्या युनिटची नियुक्ती फ्रेंच-जर्मन सीमेवर लॉरेन इथे होती. पश्चिम आघाडीवरील सैनिकांचे होत असलेले हाल आणि युद्धाची विदारक अवस्था, खंदकातले सैनिकांचे जीवन याचे वर्णन करणारी एक-दोन पत्रे त्याने आपल्या घरी लिहिली. त्यामुळे सैन्य विभागाने नाराज होऊन त्याची सार्जंट पदावरून शिपाई म्हणून पदावनती केली. तसे पाहू जाता त्याची नेमणूक अजून कुठल्याही खंदकात झाली नव्हती की, प्रत्यक्ष युद्धात त्याने भाग घेतला नव्हता. तो त्याच्या युनिटमध्ये कपडे आणि इतर वस्तूंच्या देखरेखीचे व पुरवठ्याचे असे दुय्यम प्रकारचेच काम करत होता.

एक तर मूळचा जर्मन असल्याने त्याच्याभोवती असलेले संशयाचे वातावरण, त्यात झालेली पदावनती! याने तो धास्तावला होता. त्याच्या जर्मन-समर्थक असण्याच्या संशयाला बळ पुरवायला हे पुरेसे होतेच, पण त्यामुळे अमेरिकेतील इतर जर्मन नागरिकांना त्याचा त्रास होणार होता. अशात ११ तारखेला सकाळी ५ वाजता युद्धबंदी झाली असून लगेच म्हणजे ११ वाजता ती अमलात येणार आहे, ही बातमी त्यांच्या युनिटला समजली. म्हणजे आता त्याच्यावर लागलेला जर्मन समर्थक असण्याचा डाग धुतला जाण्याची शक्यता बारगळली. विमनस्क अवस्थेत निकराचा आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तो ज्या ठिकाणी तैनात होता, तिथून त्याने समोरच असलेल्या जर्मन मशीनगन पोस्टवर एकट्यानेच हल्ला केला. युनिट कमांडर एरिक पॉवेलने त्याला तसे न करण्याचा स्पष्ट आदेश दिला, पण त्याने तो पाळला नाही.

इकडे जर्मन मशीनगन पोस्टवरच्या जर्मनांनादेखील एकटाच सैनिक त्यांच्यावर चाल करून येताना पाहून आश्चर्य वाटले. त्यांनाही ११ वाजता युद्धबंदी होणार आहे, हे माहिती होते. असे असताना ११ वाजायला काहीच मिनिटे बाकी असताना हा एकटाच का चालून येतोय! हे कळेना. त्यांनी ओरडून त्याला परत फिरायला सांगितले, मशीनगनमधून हवेत गोळीबारही केला, पण तो काही थांबला नाही. जेव्हा तो जास्तच जवळ आला, तेव्हा नाईलाजाने त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. अशा रीतीने तो १०:५८-५९ला गोळी लागून मेलेला पहिल्या महायुद्धातला शेवटचा सैनिक ठरला.

त्याच्या या मृत्युच्या कहाणीत शौर्य, त्याग समर्पण असल्या भावना नसून युद्धामुळे, प्रचारतंत्रामुळे निर्माण झालेली मानसिकता जास्त कारणीभूत होती. म्हणून त्याचा मृत्यू खेदजनक आणि हकनाक वाटतो. अर्थात तो मेल्यानंतर अमेरिकन सैन्याने त्याची पदावनती रद्द करत त्याचे सार्जंट हे पद कायम केले, ज्याचा त्याला किंवा त्याची कुटुंबियांना काहीही उपयोग नव्हता!

तर  ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर युद्धविराम लागू झाला. युरोपभरच्या चर्चमधून घंटानाद करून हे वर्तमान लोकांना सांगितले गेले. लंडनचे प्रसिद्ध बिग बेन हे घड्याळ १९१६पासून बंद होते. त्याने सकाळी ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकांना ती भेसूर वाटली. कारण, ती भेसूरच होती.    

शत्रूच्या तोफांचे आवाज नोंदवून त्यावरून त्यांची जागा, अंतर आणि ठावठिकाणा शोधणारे यंत्र ‘Artillary Sound Ranging Equipment’ ११ नोव्हेंबर १९१८लादेखील आपले काम करत होते. वर त्या यंत्रातल्या आलेखाच्या दोन प्रती दिल्या आहेत. पहिली ११ वाजायला १ मिनिट बाकी असतानाची आहे, तर दुसरी ११ वाजून १ मिनिटांची आहे. दुसरीत जे दोन छोटे स्पाईक्स दिसतात ते युद्धाबंदीनंतर अत्यानंदाने एका सैनिकाने हवेत दोन गोळ्या झाडल्या त्याचे आहेत.

सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या या नरमेधातून जे वाचले, ते स्वत:ला सुदैवी समजत होते की नाही, हे नक्की सांगता येणार नाही. पण त्यांनी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, सौंदर्य, चेहरा, ओळख, आयुष्यावरचा, एकूणच जगातल्या आणि जगण्यातल्या सौंदर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा आणि इतरही बरेच काही. ‘पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही... असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षांत परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले. का झाले असेल असे? काय कारण असेल? याचा इतिहास रंजक आहे. तसाही युद्धाचा इतिहास रंजकच असतो, पण मग दूरवरच्या युरोप नावाच्या खंडात १०० एक वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाबद्दल आपण का जाणून घ्यावे? काय गरज आहे?

आपण अनेकदा ‘युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, हिंसाचाराने मूल्यांचा ऱ्हास होतो, संस्कृती नाश पावते’ अशा प्रकारची विधाने ऐकतो आणि त्यात तथ्यांश आहेच, पण त्याचबरोबर मानव जेव्हापासून आपली संस्कृती/सभ्यता म्हणून जे काही स्थापत आला आहे, तेव्हापासून युद्ध आणि हिंसा त्याच्याबरोबरच आहेतच. इतिहासातला असा एकही कालखंड नसेल, ज्यात मानव समूह आपसात लढले नसतील. तेव्हा युद्ध, हिंसाचार आणि आक्रमणे ही दरवेळी टाळता येत नाहीत, हा इतिहासाचाच धडा आहे. त्यामुळेच ती दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नक्कीच नाहीत. सर्व युद्धांचा नाश करणारे अंतिम युद्ध म्हणून ज्याचा उल्लेख झाला, ते पहिले महायुद्ध सर्व युद्धांचा नाश तर करू शकले नाहीच, पण पाव शतकापेक्षा कमी काळात दुसऱ्या एका अशाच महाभयनक संगराची सुरुवात व्हायला मात्र कारणीभूत झाले.

फ्रान्स, इंग्लंडसारखी जी साम्राज्ये या झंझावातातून वाचली, त्यांनाही इतका जबर तडाखा या युद्धाने दिला की, त्यांच्या साम्राज्याचा पाया त्यामुळे भुसभुशीत झाला. भारत-पाकिस्तानसारखे अनेक देश या युद्धामुळेच पुढे स्वतंत्र होऊ शकले. आतापर्यंत मायभूमी, देव आणि धर्मासाठी लढणाऱ्या, धन्याच्या खाल्ल्या मिठाला जागून लढणाऱ्या लोकांना पुन्हा नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांना राष्ट्र, राष्ट्रवाद, देशभक्ती अशा नव्या संकल्पना या युद्धामुळेच सापडल्या.

सध्याचा काळ भारतासमोर मोठा धामधुमीचा आणि संक्रमणाचा आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींबरोबरच लोकशाही, हुकूमशाही, देशभक्ती, देशप्रेम, देशद्रोह, संविधान, संविधानावरची निष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अशा नव्या अवजड शब्दांच्या आणि संकल्पनांच्या गदारोळात भारतीय समाजमन गोंधळून गेलेले आहे. राष्ट्रवाद ही शक्ती आहे हे खरेच, पण ही शक्ती शुभ कधी असते? आणि अशुभ कधी होते? शूर, कर्तबगार, विद्याभ्यासी, सभ्य, सुसंस्कृत असणाऱ्या समाजालादेखील अंध-व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य या संकल्पनांत कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि अहंकार, कशा प्रकारे राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावरची निष्ठा? भारतासारख्या शतकानुशतके सरंजामशाही आणि व्यक्तिपूजा रक्तामांसात भिनलेल्या, प्रेरणास्थानांना मर्मस्थान बनवून ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक अस्मितेचे सतत कढ आणणाऱ्या समाजात लोकशाही नक्की रुजणार कशी? तिचे स्वरूप आणि कार्य नक्की कसे असेल? आपण मूळ उद्दिष्टापासून भरकटत तर चाललो नाहीत ना, हे कसे ओळखायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडायला या इतिहासातून मदत होईल, अशी अशा वाटते.

शिवाय भारतातून पहिल्या महायुद्धात साधारण १५ लाख सैनिक सामील झाले. त्यापैकी १ लाख १० हजार सैनिक युद्धात मारले गेले किंवा जखमी झाले. ही आकडेवारी फार भयंकर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पाचही मोठ्या युद्धांत मिळून साधारण २२ हजार ५०० भारतीय सैनिक मारले गेले आहेत. १९१४पूर्वी कुणीही भारतीय सैनिक भारतीय उपखंडाबाहेर जाऊन लढला नव्हता. आधुनिक भारतीय सैन्याची जडणघडण आणि एकूणच तिचा पाया या युद्धाने घातला असे म्हटले तर वावगे ठरू नये. भारताचा, भारतातील तत्कालीन समस्यांचा किंवा इतर कशाचाही काडीचाही संबंध नसताना या युद्धात भारत ओढला गेला याचे एकमेव कारण म्हणजे आपण तेव्हा इंग्रजांचे गुलाम होतो. इंग्लंडच्या सगळ्या वसाहतीतूनच या कामी माणसे जुंपली गेली होती. त्याला भारतही अपवाद नव्हता. आजतरी भारतीय सैनिकांचे पहिल्या महायुद्धातले योगदान आणि समर्पण जवळपास विस्मृतीतच गेले आहे. त्याला उजाळा मिळावा हादेखील यामागे एक हेतू आहे. पहिल्या युद्धात भारतीयांचा सहभाग आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर त्याचे परिणाम यावर आपण पुढे एका प्रकरणात सविस्तर माहिती घेऊच.

दुसरे असे की, मराठीत एक दि. वि. गोखले यांनी लिहिलेला इतिहास आणि दै. ‘नवाकाळ’मध्ये युद्ध चालू असतना त्यानिमित्ताने खाडीलकरांनी लिहिलेली लेखमाला यापेक्षा या विषयावर फार काही कुणी लिहिलेले नाही. खाडीलकरांच्या लेखमालेचे पुढे पाच-सहा खंड प्रकाशित झाले. पण आज तरी ते वाचकांना सहज उपलब्ध नाहीत. तेव्हा मराठीत या विषयावर काही लिहावे असे मला अनेक दिवस वाटत होते म्हणूनही हा लेखनप्रपंच...

नुकतीच म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ही लेखमाला.

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......