अजूनकाही
‘पिंक’ या चित्रपटात कोर्टरूममध्ये अमिताभ बच्चन म्हणतो, ‘ना का मतलब ना होता हैं.’
‘नाही’ म्हणणारी व्यक्ती कोणतीही स्त्री असो, पत्नी असो, गर्लफ्रेंड असो, वेश्या असो किंवा इतर कोणीही. एखाद्या स्त्रीनं नकार दिल्यानंतर त्या ‘नाही’चा अर्थ न समजणाऱ्या विकृत पुरुषाची मानसिकता म्हणजे ‘छपाक’ चित्रपट. हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर ओळख पुसलेल्या अॅसिड पीडितांचे सुन्न करणारे वास्तव आहे. ‘उन्होंने मेरी सूरत बदली है, मेरा मन नहीं’ हे वाक्य बघणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.
चित्रपटाची कथा दिल्लीतील २००५ साली अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या सत्यघटनेवर आधारित आहे. तिच्यावर अॅसिड हल्ला करणारा तिच्या ओळखीचाच असतो. या पूर्वी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी ‘तलवार’ आणि ‘राझी’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दोन्ही चित्रपट सत्यकथेवर आधारित होते. मेघना गुलजार यांनी पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचा ‘छपाक’ केला आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चित्रपट नायिकाप्रधान असतात.
चित्रपट सुरू होतो दिल्लीतील बलात्कार पीडितेला न्याय मागणाऱ्या आंदोलकापासून. त्या गर्दीत अॅसिड पीडित मुलीचा वडील खिशातील पासपोर्ट फोटो दाखवून न्यूज चॅनलच्या कॅमेरामनला बातमीसाठी विनवणी करताना दिसतो. (देशातील स्त्रियांची असुरक्षिता दिसून येते.) त्या वेळी अॅसिड पीडितासाठी एनजीओ चालवणारा अमोल (विक्रांत मैसे) मुलीच्या वडिलांना भेटतो. इकडे मालतीची काम मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. अॅसिड हल्ल्यात तिचा चेहरा विद्रूप झाला म्हणून तिला काम मिळत नाही. (व्यवस्थेचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो.) काम मिळवण्यासाठी मालतीची एनजीओ चालवणाऱ्या अमोलशी भेट होते. मालती एनजीओमध्ये रुजू होते.
एका पीडित मुलीची मुलाखत घेताना चित्रपट फ्लॅशबॅक जातो. ‘छपाक’ची कथा मालती (दीपिका पदुकोण) नावाच्या एका अॅसिड पीडित तरुणीभोवती फिरते. तिचं गायिका होण्याचं स्वप्न असतं. तिला शेजारच्या शाळेतील राजेश आवडत असतो. त्यांच्या प्रेमाला नजर लागते ती बशीर खान नावाच्या तरुणाची. तो तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा असतो. ती दुसऱ्या मुलाबरोबर फिरते म्हणून तो तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकतो. त्या वेळी मन हेलावून टाकणाऱ्या मालतीच्या किंचाळ्या अस्वस्थ करतात आणि चित्रपटाची कथा बदलते. तिला सात सर्जरी कराव्या लागतात. त्यानंतर मालती पॉझिटिव्ह विचारानं अॅसिड विक्री बंद करण्यासाठी आणि अॅसिड हल्ला करणाऱ्याला शिक्षा देण्यासाठी संघर्ष करते. चित्रपटाच्या कथेत कोणताही सस्पेन्स न ठेवता सहज पुढे जाते. चित्रपट कुठेही संथ किंवा कंटाळवाणा वाटत नाही.
मेघना गुलजार यांनी चित्रपटात अॅसिड पीडित तरुणींच्या जीवनातील वास्तव बारकाईनं मांडलं आहे. दीपिका पदुकोण आणि विक्रांत मैसे यांनी अभिनयाने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर पोहचवलं आहे. गुलजार यांनी लिहिलेलं थीम साँग आणि शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीतानं चित्रपट अधिक प्रभावी होतो. चित्रपटात मेघना गुलजार यांनी पीडितेला न्यायासाठी करावा लागणारा संघर्ष, सरकारची उदासीनता, कालबाह्य झालेले कायदे, अॅसिड विक्रीवर बंदी असूनही मार्केटमध्ये खुलेआम होणारी विक्री यावर प्रकर्षानं भाष्य केलं आहे.
स्त्रियांवर अधिकार गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रेमाला किंवा शरीरसुखाला नकार दिला म्हणून तिचा चेहरा विद्रूप करणं किंवा बलात्कार करून तिच्या शरीराची विल्हेवाट लावण्याची विकृत मानसिकता वाढली आहे. या सिनेमातून मेघना गुलजार यांनी अशा विकृती मानसिकतेला सणसणीत चपराक दिली आहे. एका संवादात अमोल (विक्रांत मैसे) म्हणतो, “कानून बनाने से अॅसिड अटैक रुकेंगे? बाज़ार में खुलेआम अॅसिड की बॉटल तीस रुपये बेची जाती हैं. और उसके ख़रीददार भी हैं.” या ठिकाणी सरकारच्या उदासीनतेवर बोट ठेवलं आहे.
प्रेमात भरडली जाते ती स्त्री. नकार दिल्यानंतर रोमिओकडून ‘छपाक’मधील ‘मालती’ होते आणि होकार दिलानंतर कुटुंबाकडून सैराटमधील ‘आर्ची’ होते. तिचा बळी निश्चित जातो. याला कारणीभूत आहे तिच्या ‘होकारा’तील आणि ‘नकारा’तील प्रतिष्ठा.
.............................................................................................................................................
लेखक प्रशांत शिंदे तरुण पत्रकार आहेत.
shindeprashant798@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment